ती - धरती, तो - पाऊस

निळ्याशार व्यथा तिच्या निळ्याशार दिठी
पापण्यांची आसवांना पडलेली मिठी
टीप टीप गालावर सांडून निमाली
वाट पाहण्यात सय कोमेजून गेली
त्याचे गाव क्षितिजाच्या पल्याडच्या देशी
त्याचा ठाव वसलेला आभाळाच्या वेशी 
त्याचे गण गोत सारे वादळाचे अंग
कुणाला न कळलेले त्याचे रंग ढंग
विरहाच्या सुकलेल्या वेळा तिच्या भाळी
त्याने म्हणे भेट दिली कोणे एके काळी
डोंगराच्या माथी त्याचे पाऊल अडते 
तिच्या रानी पानगळ अवेळी झडते
तिची माती पुकारेल त्याचे नाव जेव्हा, 
तिचे रान थरारेल आक्रंदून जेव्हा,
तिची आर्त गाणी तेव्हा आभाळी जातील
थंड त्याच्या हृदयात खोल भिडतील
तेव्हा त्याच्या जाणिवांना फुटेल पाझर
वाट पाहण्याचा आणि संपेल प्रहर
दरीतून पाय त्याचा तळ्याशी वळेल 
तिचे सुख नेत्रामध्ये दाटून अडेल
ताटातूट त्यांची संपायला एक क्षण
ताटातूट त्यांची घडायला एक क्षण
ताटातूट संपताना गर्जे नभी सर 
घडली ताटातूट. पडे संततधार!!
- रोहित कुलकर्णी
(ती - धरती, तो - पाऊस)