कोटामधला मोठा !

        नंजयच्या लग्नाच्या निमित्तानं, बऱ्याच दिवसांपासून कोट (ब्लेझर) घालायची माझी अपूर्ण राहिलेली इच्छा ह्यावेळेस मी पूर्ण करायचं ठरवलं. माझ्याकडे स्वत:चा कोट नसल्यामुळे केदार कडून त्याचा कोट आणला. लोक आपापल्या लग्नामध्ये अगदी उत्साहानं कोट खरेदी करतात. एकदा खरेदी केलेला कोट, लग्नानंतर कधी कुणी परत घातलेला आठवत नाही आणि आम्ही अजूनतरी हनुमानाच्या वानर सेनेतील एक मर्कट. त्यामुळे किमान त्या निमित्तानं सुद्धा कोट वगैरे खरेदी करायची वेळच आली नाही.
केदार चा कोट अंगाला अगदी मस्त बसत होता. कोट घालून कसं वावरायचं, कशी हालचाल करायची ते पण केदार कडून त्याच वेळेस शिकून घेतलं. उद्या मला कोटात बघून लोकांचे काय अभिप्राय येतील त्याची जास्ती उत्सुकता वाटायला लागली.
          दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, बघतोय तर बाहेर मुसळधार पाऊस. कोट घालून घराच्या बाहेर पडायची मुश्कील! 'ह्या धन्याला पण ना... आत्ता पावसाळ्यातच लग्न करायचं होतं.. ' असा ताशारा ओढल्यावर मनाला जरा बरं वाटलं. तो कोट इतका मोठा होता, की सॅक मध्ये मावेल अशी गोष्ट नक्कीच नव्हती. त्यामुळे केवळ त्या एका कोटासाठी सुटकेस घ्यावी लागतीये की काय असा प्रश्न पडला होता. हौस दांडगी ना कोट घालून मिरवायची, मग करा असले वायफळ कष्ट.
(ह्या गोष्टीवरून गणपतीमध्ये ढोल वाजवणारे 'बिचारे' ढोल वादक आठवले. दोन महिने रोज सरावाला जायचं, मिरवणुकीच्या दिवशी तो ढोल पाठीवर घ्यायचा आणि चालत चालत टिळक पुतळ्यापाशी आणायचा, मग तो कमरेला बांधायचा, निम्मी एनर्जी तिथेच जाते. मग केवळ काही तास ढोल वाजवून लोकांसमोर भाव खायची स्वत:ची हौस भागवून घ्यायची. मिरवणूक संपल्यावर प्रचंड थकलेल्या अवस्थेत तोच ढोल पाठीवर घेऊन टेम्पो पर्यंत नेऊन ठेवायचा... अरेरे.. किती कष्ट.. अर्थात मी सुद्धा ह्याला अनेकदा बळी पडलोच आहे ! असो. )
तर हा कोट न्यायचा कसा, ह्याचा विचार मी करत होतो, तितक्यात मातोश्री, रिक्शाने कार्यालयात जाणार असल्याचं कानावर आलं.. वा, किती छान, "आई हा कोट तेव्हडा कार्यालयात ने, आणि तिकडे जाऊन खोलीत ठेव. मी येतोच काही वेळात" हुकूम सोडून मी सोय करून घेतली.
कार्यालयात पोचायला नेहमीप्रमाणे थोडासा उशीर झाला. अंगावरचे कपडे ठीक ठाक असले तरी लग्नात घालायचे नक्कीच वाटत नव्हते. कोटाबरोबर घालायचे शर्ट-पॅन्ट मी सॅक मधून आणले होते. कार्यालयात पाऊल ठेवल्यावर लोकांनी जरा संकुचित नजरेनंच बघितलं. पळतच वर गेलो. खोलीमध्ये अनेक जण आपापले कोट परिधान करण्यात मग्न झालेले. त्यात माझी भर पडली.
मी शर्ट, पॅन्ट आणि नंतर कोट अंगावर चढवला. आरशात सगळं नीट असल्याची खात्री केली आणि अगदी ऐटीत सभागृहात येऊन दाखल झालो. एका कोपऱ्यात फेटेवाला फेटे बांधून देत होता. त्याच्याकडून मस्त फेटा बांधून घेतला. डोळ्यात एक चमक आणि मनात खूप आत्मविश्वास आला होता. ज्या ज्या लोकांना भेटलो त्या सर्वांचा कौतुक आणि स्तुतिसुमनांचा एकच वर्षाव सुरू झाला.
"वा, आता धन्या नंतर तुमचाच नंबर! तयारी जोरदार सुरू आहे की! " हे वाक्य किमान शंभरवेळा कानावर आलं. इतकी स्तुती ऐकून स्वत:वर मी फारच खूश झालो. 'कोट' घालण्याची ऐट वेगळीच असते ते मनाला अगदी पटलं होतं.
थोड्या वेळानं निवांत खुर्चीत येऊन बसलो. माझ्या पाठोपाठच मामा-आजोबा (आईचे मामा) शेजारी येऊन बसले.
"वा, कोट एकदम मस्त दिसतोय की! " इतकंच सांगण्यासाठी बहुतेक ते मला शोधत आले होते.
आश्चर्य म्हणजे आजोबांनी सुद्धा कोटच घातला होता! का कोणास ठाऊक, मला त्यांच्या कोटा बद्दल फारच हेवा वाटला. वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी  हा माणूस कोट घालून अगदी ऐटीत फिरतोय हे बघून जरा आश्चर्य वाटलं. त्यांचा कोट खरंच खूप सुंदर आणि वेगळ्याच पद्धतीचा होता. पूर्वीचे लोक खाली धोतर आणि वरती कोट घालायचे ते चित्रांमध्ये बघितलं होतं. पण आजोबांनी घातलेला कोट तसा अजिबात नव्हता. आजकाल जे कोट (ब्लेझर म्हणू म्हणजे जरा भारी वाटतं ) मिळतात, तश्याच पद्धतीचा होता.
"अरे आजोबा, तुम्ही पण कोट घातलाय! भारी दिसतोय!... वेगळाच आहे तुमचा कोट.. कुठून घेतलात? कधीचा आहे? "
"आहे रे असाच.. छान दिसतोय ना! मग झालं तर! "
माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला आजोबांनी टाळाटाळ केली ते मी समजलो.
मामा आजोबांची घरची एकंदर परिस्थिती मला माहीत होती. शिवणकाम करून मिळेल त्या पैशांवर घर चालवलेलं. उतारवयात जसं शिवणकाम बंद झालं तसं त्यांच्या घरात आलेली आर्थिक अवकळा मी जाणून होतो. आजकाल विकत मिळणाऱ्या कोटाची हजारांच्या घरातली किंमत सुद्धा मला माहीत होती. त्यामुळे इतका सुंदर कोट आजोबांनी कुठून आणला असेल ह्या बद्दल एक उत्सुकता लागली होती. मित्राकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून घेऊन त्यांनी कोट घातला असल्याची शक्यता होती. पण ह्या वयात इतकी हौस कोण करेल?
त्यांना तो कोणीतरी भेट दिला असेल, पण इतका आधुनिक कोट इतक्या म्हाताऱ्या व्यक्तीला कोणी का देईल? द्यायचंच असतं तर एखाद्याने साधे रोज वापरता येतील असे कपडे दिले असते किंवा एखादा कुर्ता दिला असता.
आमचं संभाषण सुरू होतं नं होतं तितक्यात शेजारी आई येऊन बसली. "काय गप्पा रंगल्यात? "
"अग काही नाही, कोट कुठून आणला म्हणून विचारात होता तो.. " - आजोबा म्हणाले.
आईनं कोटावरून एक नजर फिरवली आणि तिला काहीतरी आठवलं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.
"अरे हा कोट त्याच्या लग्नातला आहे... स्वत: शिवून घेतला आहे त्यानं.. त्याच्या लग्नाला आता पन्नास वर्ष होऊन गेली.. अजून बघ कसा मस्त ठेवलंय कोट त्यानं! "
आपण बोललो ते वाक्य खरं असल्याची खात्री करण्यासाठी आईनं मामा-आजोबांकडे बघितलं. त्यांनी होकारार्थी मान हालवली.
आईचं वाक्य ऐकून मी पूर्णपणे चक्रावून गेलो. 'त्या' काळात आजोबांनी स्वत:च्या हातांनी इतका अप्रतिम कोट शिवाला.. ते पण स्वत:साठी स्वत:च्याच लग्नात परिधान करायला.... आणि आज इतक्या वर्षांनी सुद्धा तो कोट एकदम नव्यासारखा दिसत होता.. त्याच अभिमानानं त्यांनी तो आज परिधान केला आहे..
कोट घालून मिरवायची थोरवी आपल्यात अजून नाही अशी भावना माझ्या मनात आली. हे सगळं इतकं विलक्षण वाटलं की डोळ्याच्या कडा कधी पाणावल्या ते समजलंच नाही.

जेवायच्या पंगतीत बसलो असताना "कोट का काढलास" हा प्रश्न अनेकांनी विचारला.
"सहजच! " ह्या पलीकडे माझ्याकडे काहीच उत्तर  नव्हतं!
~*~