विसावा

                        विसावा

मंतरलेले दिवस संपले
रुक्ष जीवनी ऊरे दुरावा
मनात येते क्षणात जावे
जिथे सखीचा असे विसावा

आठवणींचे ढग दाटुनी येती
आसवांचा पुर लोटतो
समजावणीचे शब्द ऐकता
संयमाचा बांध फुटतो

भेट पहिली कशी घडली
स्मरता घटीका त्या क्षणाची
मन हे पळते मागे मागे
वाट पाहते सखी सख्याची

दिवस ठरला वेळही ठरली
परवलीचे कारण ठरले
भेट होता भ्रमर-कळीची
नकळत तेव्हा  फुल उमलले

आणि अचानक घडले काही
ओठांमधले गाणे विरले
कशा ढळल्या दिशा दहाही
काय घडे ते नाही कळले

प्रेम करावे हे कळल्यावीण
असे कुणीसे म्हणून गेले
नकळत घडता ताटातूट ही
कसे जगावे कुणी न कथिले