रात्रीस उखाणा सुचला

मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावितो कविता
मी सूर उसवले दोन्ही, तिसर्‍याच्या उदयाकरता
बघणार्‍या नजरांमधले वाटेत थांबले अंतर 
नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर
वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती
ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती
देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा
रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा
वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली 
घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली 
कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून 
मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून    
----------------------------------प्रसाद साळवी