आनंदडोह...३

‘एकोऽहं बहुस्यामह:’... केवळ आनंदस्वरूप, नित्य, निराकार, अनादी, अनंत असणारा परमेश्वर. त्याला ‘आपण बहु व्हावे, असे का वाटावे?... आनंदसागरातल्या त्याच्या एकटेपणाचा त्याला वीट आला होता ?... का त्या आनंदसागरात त्याला अनेकांची साथ हवी होती ?... का त्याचं ते स्वप्नरंजन होतं ?... तसं नसणारंच्, कारण तो त्या आनंदसागरात महायोगनिद्राधिन होता. त्या अवस्थेत स्वप्नाची शक्यता राहत नाही... काहीही असो, या सर्वसत्ताधिशाला अनेक होण्याची इच्छा होणे, याचाच अर्थ त्याचे महायोगनिद्रेतून बाहेर येणे. ही घटना त्या परमेश्वराला आनंदपरिपूरित अवस्थेतून बाहेर आणणारी ठरते का ? तर तसेही नाही... कारण पूर्णमदः पूर्णमिदं या वचनाप्रमाणे आनंदपरिपूरिततेत अंतर पडणार नाही. म्हणजे असे समजायचे की, बस्... त्याला वाटले, आणखिन् काही नाही !
 या परमेश्वराची निश्वसिते म्हणून वेदांकडे पाहिले जाते. वेद म्हणजे बोल. बोलताना श्वास तोंडाने बाहेर सोडला जातो, हा आपलाही अनुभव आहे. फरक एव्हढाच की, आपले निश्वसित बोल बहुधा वायफळ ठरणारे असतात. परंतु, परमेश्वराच्या निश्वसितातून सृष्टीचे सृजन झाले ! या विश्वरचनेतील सर्वात सुंदर रचना म्हणजे मानवी देह. त्या देहात रचना केलेली इंद्रिये अतिशय कार्यक्षम आहेत. त्यांचा आवाका मोठा आहे. त्यांची ग्रहण शक्ती अफाट आहे आणि त्या इंद्रियांचा वापर करणारी तीव्र जिज्ञासा या सचेतन देहाला वरदान स्वरूपात प्राप्त झाली आहे. हा देह जीवसृष्टीच्या उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा मानायचा का ?
 मानवी देहात अडकून जीव अध्यात्माच्या शोधात कधीतरी वाटचाल सुरू करतो. जीव मुक्तीच्या ध्यासाने भारला जातो. त्याला परमेश्वर-स्वरूप होण्याचे साधन हवे असते. चवथा पुरुषार्थ मोक्ष साधावयाचा असतो. अनेक योनींचे सुख (!) अनुभवत शेवटी ‘जनन-मरणा’चा फेरा चुकविणे, हे त्याचे ध्येय बनते.
 वयाची सत्तरी ओलांडलेली आमची आजी शेवटपर्यंत नुसती हिंडती-फिरतीच नव्हती, तर कधी शिंकायची नाही, कधी खोकायची नाही, कधी ढेकरा देत बसायची नाही. ठराविक वेळी ठराविक प्रमाणात आहार घेऊन ताठ कण्यानं, हंसर्‍या चेहर्‍यानं दिसतील ती कामे करत असायची. तिच्या रूपानं घराला, घरातल्या वार्‍याला नि प्रकाशालाही चैतन्य लाभायचं. रात्री अंथरुणावर बसून डोळे मिटून ती माळ ओढत बसे. त्या अवस्थेत तिला पाहिले की, अहिल्याबाई होळकरांसारखी ती दिसे. काही वेळानं जांभई आवरताना ‘सोडव रेऽऽ बाबा’ करीत ती माळ कपाळावर टेकवून उशीखाली सरकवे आणि पांघरुण अंगावर घेऊन झोपी जाई. झोपेतही तिच्या मुखावरचे हसू मावळलेले दिसायचे नाही.
 अशा या आजीकडूनच ‘सोडव रेऽऽ बाबा’चा अर्थ कळला. पिढ्यानु पिढ्या उतरत्या वयात ‘सोडव रेऽऽ बाबा’ आर्त नाद आपण ऐकत आलो आहोत. घराघरातल्या आजी-आजोबांवर परमेश्वराने ही जणु जबाबदारीच टाकलीय्... त्याच्या सत्तेची जाणीव पुढच्या पिढीला करून द्यायची नि मगच इहयात्रा संपवायची. या अखंडित जाणिवेचं बीज कुणी पेरलं ? या भारतभूवर या वटवृक्षाचं बीज कुणी रुजवलं ? हा वटवृक्षंय्, असं म्हणायचं कारण, हा वृक्ष त्याचा तोच वाढत राहतोय्... त्याला कुणी पाणी घालायची गरज राहिलेली नाहीय्. असंख्य पारंब्यांचा टेकू घेत, अनेक नावं घेऊन वेगवेगळे धर्मपंथ रुजवून हा वटवृक्ष सदाबहार उभा आहे.
 आजीनंच एकदा सांगितलं होतं... हा वटवृक्ष लावण्याचं श्रेय आम्हा सार्‍यांचे आदिआजोबा व्यास महर्षिंना द्यावं लागेल. अफाट बुद्धिमत्ता भगवंतानं त्यांना दिलेली... त्या बुद्धिमत्तेपुढे बुद्धिदेवता असलेल्या प्रत्यक्ष गजाननाला त्यांनी डोकं खाजवायला लावलं... मानवी वृत्ती-प्रवृत्ती, भावभावनांचं त्रिकालाबाधित चित्रण करताना सारं जगत् त्यांनी उष्टं करून ठेवलंय्. महाभारतरूपी अलंकार त्यांनी घडविला. त्या अलंकाराचा मेरुमणी म्हणजे भगवद्गीता. मानव, त्याचं जीवन आणि भगवंत यांना सांधणारा सेतू म्हणजे ही गीता. माणसाचा विवेक जागृत करणारं महाभारत आणि मानवानं जगावं कसं, हे सांगणारी ही गीता... पिढ्यानुपिढ्या तिचे गोडवे गाणारे, तिच्यात रममाण होणारे तसेच तिच्यावर टीकाटिप्पणी करणारे, विरोध करणारे सार्‍यांच्याच बुद्धीला खतपाणी घालणारी ही गीता. या ज्ञानामृतात पोहून श्रीमद् आदिशंकराचार्यांसारखे अनेक महामानव अमर झाले. कित्येकांनी डुबक्या मारून जेवढं जाणता आलं, तेवढ्यावरच स्वतःला धन्य मानलं. जे जाणलं ते इतरांना वाटून संस्कृतीचा वटवृक्ष बहरता ठेवला.
 आदिआजोबा व्यास महर्षींनी घडविलेला दुसरा अनुपमेय अलंकार म्हणजे श्रीमद् भागवत. भगवद्गीता मानवाला जगावं कसं, हे शिकविणारी तर भागवतातून त्यांनी संदेश दिला तो माणसानं आपलं मरण सुंदर करण्याचा. भागवत ग्रंथाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं... मानवी भावविश्व पिंजून काढणारे हे व्यास महर्षी स्वतः असमाधानीच होते. त्यांचं मन बेचैन होतं. नारद महर्षींनी त्यांना भक्तीप्रधान श्रीकृष्णचरित्र लिहिण्याकरिता प्रवृत्त केलं... व्यासांनी लिखाण सुरू केलं... ते लिखाण त्यांनी उन्मनी अवस्थेत केलं. त्यामुळे त्यांच्याकडून त्या अवस्थेत जे लिहिलं गेलं ते त्यांचं त्यांनाच उमगलं नव्हतं. विश्वातली अचिंत्य शक्ती त्यांच्याकडून ते लिहवून घेत होती. पुढे व्यासांचे पुत्र शुकदेव हे भागवत घेऊन नैमिष्यारण्यात विवरण करू लागले, तेव्हा व्यास महर्षी आपल्या या पुत्राकडून ते भागवत ऐकायला सर्वात पुढे बसले होते. ऐकता ऐकता त्यांची भावसमाधी लागली. ‘हे सारं आपणच लिहिलंय् का ?’ त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला. हे व्यासांनी लिहिलेलं शेवटचं - अठरावं - महापुराण !
 हे व्यासमुनी सप्त चिरंजीवातले तिसरे; अश्वत्थामा, बली यांच्यानंतरचे व हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ. अश्वत्थामा हा अनीतीचा द्योतक, व्यास हे ज्ञानाचे द्योतक, बली हा दानाचा द्योतक, हनुमान हा सेवेचा द्योतक, बिभीषण विवेकाचा द्योतक, कृपाचार्य हे गुरूचे द्योतक तर परशुराम निष्ठेचे द्योतक आहेत, असे दिसून येते.
 व्यास चिरंजीव आहेत्... खरंय् ते... आजही गीता-भागवताच्या छायेत राहणार्‍या आमच्या आजी-आजोबांच्या रूपानं हे व्यास घराघरात अंशतः वावरताहेत् ! भगवंताचं स्मरण प्रत्येक पिढीत रुजवत आहेत...
 व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन मोठ्या आस्थेने केले जाते. हा दिवस आपण 'ग्रॅण्ड-पा डे' म्हणून साजरा करायला हवा!...