नाटाचे अभंग... भाग २५

२४. अल्प भाव अल्प मति । अल्प आयुष्य नाहीं हातीं ।
 अपराधाची वोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ति परियेसा ॥१॥
 किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मळिलें अंतर ।
 आदि वर्तमान भविष्याकार । लागे अंतपार ऐसें नाहीं ॥धृ॥
 विविध कर्म चौर्‍यांशीं फेरा । त्रिविध भोग या शरीरा ।
 कर्मकोठार पांजरा । जन्म जरा मरण सांठवण ॥३॥
 जीवा नाहीं कुडीचें लाहातें । ये भिन्न भिन्न पंचभूतें ।
 रचतें खचतें संचितें । असार रिते फलकट ॥४॥
 पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर ।
 मिळती काष्टें लोटतां पूर । आदळे दूर होती खल्लाळीं ॥५॥
 म्हणोनि नासावें अज्ञान । इतुकें करीं कृपादान ।
 कृपाळू तूं जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥६॥

 सार्‍या जीवयोनींमध्ये मनुष्याला मिळालेली एक विशेष देणगी आहे. ही देणगी म्हणजे विवेक. हा विवेक ख्ररे तर अध्यात्माचा पाया असतो. जोपर्यंत मनुष्य ऐहिक पातळीवरच्या सुखाच्या तहानेने व्याकूळ असतो, तोपर्यंत मन-बुद्धीच्या आवरणाने विवेक झाकोळलेला राहातो. असे म्हणता येईल की, मानवी मनावर पूर्वजन्मातील संचितानुसार जे संस्कार पुढे येतात, त्यानुसार माणसाच्या मन-बुद्धीचे वळण ठरत असते आणि त्या वळणाने माणसाच्या कर्मांना दिशा मिळत जाते. त्यातून सुख-दुःखादीचे भोग माणसास कमी जास्त प्रमाणात प्राप्त होत असतात. परंतु, हे सुखदुःखादींचे भोग निरंतर भोगता येत नाहीत. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, अशा रीतीने हे भोग वाट्यास येत राहतात. माणूस सुखात असो वा दुखाःत, ‘मी, माझे, मला’ अशा अहंकाराचा प्रभाव मनावर असताना केवळ क्लेषच भोगावे लागत असतात. त्यातून जीवाचे समाधान होत नसते. एखाद्या प्रसंगातून उद्‍भवलेल्या क्लेषाच्या उत्कट क्षणी हा अहंभाव गळून पडतो. त्यावेळी मात्र विवेक जागृत होतो आणि मनुष्याचा अध्यात्म क्षेत्रात प्रवेश होतो. मन-बुद्धीवर विवेकाचे अधिराज्य सुरू होते. खर्‍या समाधानाचा शोध घ्यावयाची तहान लागणे, हा मुमुक्षुत्वाचा लाभ असतो. स्वत:ची अपूर्णता लक्षात यावयास लागते. याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शास्त्र-संतवचनांचा संग कारण होतो. वास्तविकपणे हेही मनुष्याच्या संचिताचेच देणे असते. असमाधान देणारे भोग लय पावू लागतात आणि समाधान देणार्‍या भाग्याचा उदय होतो. तुकोबारायांच्या आयुष्यात असा क्षण आला.
 विवेकातून मनात श्रद्धा आकार घेऊ लागते. ‘श्रद्धावान् लभते ज्ञानम्’ असे भगवंतांचे गीतेतील वचन आहे. ईश्वरावरची श्रद्धा हे भक्तीचे मूळ आहे. शास्त्र व संत यांच्या संगतीमध्ये साधन करीत असताना श्रद्धेतून उत्तरोत्तर मुमुक्षुत्व तीव्र होत राहते. श्रद्धा साधनभक्तीतून दृढ होत जाते. दृढ झालेली श्रद्धा मन-बुद्धीचे क्षेत्र पार करून चित्तावर आरूढ झाली की, ज्ञानोत्तर भक्तीत साधकाचा प्रवेश होतो. त्यातून उपास्याशी थेट संवाद साधक करू शकतो. साधनभक्तीपेक्षा ज्ञानोत्तरभक्ती म्हणूनच श्रेष्ठ ठरते. या अवस्थेत विवेकाचे पूर्ण सात्विकतेत रूपांतर झालेले असते. अशा अवस्थेमध्ये साधक आणि उपास्य या दोहोंबद्दल यथार्थ ज्ञान झाल्यामुळे उपास्याचे उत्तमत्व आणि साधकाचे जीवदृष्ट्या हीनत्व लक्षात येऊ लागते. अशी जाणीव होते की, साध्य, साधन व साधक या त्रिपुटीमध्ये सर्व कर्तृत्व साध्याचेच आहे. आपले उपास्य हेच आपल्याकडून उपासना करून घेत आहे, ही भावना दृढ होऊन अहंकृतीला स्थान राहत नाही (करी तुका म्हणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसी ॥). उपास्याशी पूर्ण शरणागती साधकाने पत्करलेली असते.
 तुकोबाराय त्यांच्या उपास्याशी, विठ्ठलाशी पूर्ण शरणागत झालेले आहेत. त्यांचा उपास्याशी संवाद प्रस्थापित झाला आहे. स्वत:चे हीनत्व उपास्यापुढे निवेदन करताना अप्रत्यक्षरित्या ते उपास्याची महती गात आहेत. आपल्या निवेदनात तुकोबाराय प्रथम भाव, मति आणि आयुष्या- विषयीचा विचार मांडतात. भाव ही मनाची वृत्ती आहे आणि मति ही मनाची विचार करण्याची क्षमता आहे. आपल्या उपास्याविषयी मनात असणारा भाव आणि हा भाव जोपासणारी मति ही दोन्हीही अल्प असल्याचे सांगून तुकोबाराय आपले आयुष्यही अल्प असल्याचे सांगतात. चंचलत्व ही मनाची स्थायी वृत्ती आहे. त्यामुळे स्वाभाविकतः मनातील भावाची अनिश्चिती असते. तिथे स्थिरता येण्यासाठी मनाच्या विचारशक्तीचे  म्हणजेच मतीचे पाठबळ आवश्यक बनते. मनाचे चंचलत्व जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत मतीला स्थिरता लाभत नाही आणि आवश्यक भाव वृद्धिंगत होत नाही. तुकोबारायांचे ‘अल्प भाव अल्प मति’ हे कथन, त्यांच्या मनाच्या या अवस्थेचे निदर्शक आहे. जीवाचे आयुष्य काळाच्या अधिसत्तेखाली असते. त्यामुळे ‘जीवेत् शरदः शतम्’ म्हणा किंवा ‘ऊर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीय माम्’ (काकडी ज्याप्रमाणे परिपक्व झाल्यानंतर सहजतेने गळून पडते, तसा सहजगत्या हा देह गळून पडावा) या मृत्युंजय मंत्राच्या उत्तर भागातील प्रार्थनेत केलेल्या उल्लेखाप्रमाणे म्हणा, आयुष्याची शाश्वती नसल्याचे वास्तव अधोरेखित केलेले आहे. तुकोबाराय म्हणूनच भाव, मति किंवा आयुष्य या तीनही गोष्टी त्यांच्या हाती नसल्याचे निवेदन करीत आहेत. तुकोबाराय दुसरे एक वास्तव पुढे मांडताना सांगत आहेत की, मनाच्या दुर्बलतेमुळे ‘विनाशकाले विपरीत बुद्धि’ या न्यायाने एकामागून एक अपराध माणसाच्या हातून होत राहतात. थेंबा-थेंबाने तळे साचावे, तद्वत् अपराधांची राशी तयार होत राहते. ‘वोळिलो’ या शब्दातून तिरस्कार व्यक्त होतो. तुकोबाराय म्हणत आहेत की, ‘मी मूर्तीमंत अपराधाची मूर्तीच बनलो आहे आणि म्हणून मला माझा तिरस्कार वाटू लागला आहे.’ स्वतःच्या अशा दयनीय अवस्थेची मनमोकळी कबुली विठ्ठलाला निवेदन करताना आपल्या उपास्यासाठी ते ‘वेदमूर्ती’ असे संबोधन योजतात. ऋषी-मुनींच्या अंतःकरणातून उत्स्फूर्तपणे स्वतःला व्यक्त करून घेणारा हा भगवंत, वेदरूपात साकारलेली ज्ञानाची मूर्ती आहे आणि केवळ अज्ञानामुळे त्यांना प्राप्त झालेली हीन-दीन दयनीय अवस्था तो भगवंतच जाणू शकतो, अशा विश्वासाने तुकोबाराय वेदमूर्ती असलेल्या उपास्याला ‘परियेसा’ अशी काकुळतीने विनंती करीत आहेत.
तुकोबाराय अन्यत्र स्वतःची अवस्था वर्णन करताना स्वतःला त्रिरुक्ती करून ‘पतित पतित । परि मी त्रिवाचा पतित ॥’ असे म्हणतात आणि ‘अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों॥’ असा पश्चात्ताप प्रकट करतात. अशाच प्रकारे इथेही ते आपल्यात अगणित दोष साठत आले आहेत आणि या दोषातून मुक्त होणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे, आपल्याला ते अशक्य असल्याचे, ते कथन करतात. ‘दोषांच्या ’गुणा’मध्ये म्हणजे दोषांच्या बंधनात आपण पूर्णपणे जखडले गेलो आहोत आणि त्यामुळे माझे अंतःकरण मलिन झाले आहे’, असे तुकोबाराय सांगतात. त्यांना असेही म्हणावयाचे आहे की, हे दोषांचे बंधन मागील जन्मजन्मातून तसेच या जन्मी घट्ट होत आलेले असून भविष्यातील जन्मातही या स्थितीत फरक पडेल, असे वाटत नाही. अनंत दोषांची जी पुटे चढली आहेत, त्यांचा नाश कधी होईल हे कळत नाही आणि त्यातून सुटकेचा मार्गही दिसत नाही, असे तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांच्या या निवेदनातून त्यांच्या मनातील संकोच व्यक्त होत आहे. देवाच्या ठायी अनंत गुण आहेत आणि आपल्या ठिकाणी अनंत दोष आहेत, अशी तुलना तुकोबाराय करीत असल्याचे येथे दिसते. देव भावाचा भुकेला, असे म्हणावे, तर मन दोषांनी मलिन झालेले असल्याने देवाविषयीचा यथार्थ भाव आपल्या मनात नाही, त्यामुळे देव कदाचित् आपला स्वीकार करणार नाही, अशी भययुक्त शंका त्यांना क्लेष देत आहे. 
 जे काही अल्प आयुष्य हाती होते, त्यात अल्प भाव-अल्प मतीमुळे अगणित दोष साठत गेले असल्याचे निवेदन केल्यानंतर दोषांचे जे मूळ कारण कर्म, त्याविषयी तुकोबाराय उल्लेख करतात. मुळातच प्रत्येक जीव हा कर्माला बांधिल असल्याने जीवाला स्वेच्छेने, परेच्छेने वा अनिच्छेने कर्म करावेच लागते. त्यामुळे शरीर हे कर्माचे कोठार बनून राहते. प्राप्त आयुष्यातील कर्मांयोगे गोळा झालेले दोष एव्हढीच या दोषांची व्याप्ती (- अंतपार) नाही. चौर्‍यांशी लक्ष योनीत फिरत असताना, प्रत्येक योनीतील अनेक जन्मात, जी काही कर्मे घडली आहेत व भविष्यात घडणार आहेत, त्या कर्मांचे ‘अवश्यमेव भोक्तव्य’ असलेले कर्मफल भोगावेच लागते. सुख, दुःख तसेच संमिश्र प्रकारचे हे भोग आधिभौतिक-आधिदैविक-आध्यात्मिक अशा तीन मार्गांनी शरीराच्या वाट्यास येत राहतात. कर्माचे कोठार असलेल्या या शरीरातील भोगरूपी पिंजर्‍यात जीव अडकलेला राहतो. वासना-कर्म-भोग-वासना हे रहाटगाडगे अव्याहतपणे चालत राहते. कर्म आणि भोग यांची शृंखला अतूट बनून राहिलेली असते. शरीराला जन्म-जरा-मरण या त्रिविध कक्षेतून फिरत राहावे लागत असल्याने अनंत दोष साठत जातात. या पिंजर्‍यातून बाहेर पडण्याची बुद्धी नि बळ जीवापाशी नसते.
 साठत आलेल्या दोषांमुळे मलिन झालेल्या अंतःकरणाची शुद्धी करावयास हवी, हे जरी समजले तरी त्यासाठी शरीराची साथ हवी. प्रत्येक जन्मात जीवाला शरीराचा लाभ होतो खरा, परंतु हे शरीर शाश्वत नाही. आकाश, वायु, अग्नी, जल व पृथ्वी ही पाच भिन्न भिन्न महाभूते एकत्र येऊन (- ये) हे शरीर साकारलेले असते. ही महाभूते स्वतःच कालाच्या अधिसत्तेत राहणारी असल्याने ती क्षणभंगुर आहेत. शरीर हा त्यांचा अंश असल्याने ते जीवासाठी चिरंतन लाभाचे (- लाहातें) ठरत नाही. संचिताच्या मर्यादेत राहून हे शरीर रचले जाते अन् पुन्हा पंचमहाभूतात विलीन होते. वाट्याला आलेले अल्प आयुष्य भोगून जेव्हा शरीर पतन पावते, तेव्हा ते निरूपयोगी ठरते, चेतनाविरहित झाल्याने रिकामे होते आणि त्यातील जीव विस्थापित झाल्याने फलकटाप्रमाणे व्यर्थ, पोकळ बनते. तुकोबाराय इथे शरीरासाठी ‘कुडी’ असा शब्द योजतात. कुडा म्हणजे वाळलेला भाताचा पेंढा. हा पेंढा वापरून उभा केलेला तात्पुरता निवारा म्हणजे कुडी (कुटी). जीवाला लाभलेल्या अशा प्रकारच्या क्षणभंगुर कुडीच्या योगे दोषांपासून मुक्ती संभवणारी नाही, ही वास्तविकता तुकोबाराय देवास निवेदन करतात.
 मनुष्य योनीत जन्म लाभल्याने जोडले जाणारे शरीरसंबंधी काही उपयोगाचे ठरावेत, तर तसेही होत नाही. कर्मबंधनात अडकविणारे ते एक महत्वाचे कारण असते. शरीरसंबंधींचा पसारा मोठा असतो. पत्नी, पुत्रादी संतती, भाऊ-बहिणी, आई-बाप, इतरेजन या सार्‍यांसाठी असलेली कर्तव्ये निभावताना अनिवार्यपणे अनेक प्रकारची कर्मे आचरावी लागतातच. यातून काही लाभ होईल म्हणावे, तर पुरात वाहत जाणार्‍या लाकडांप्रमाणे ही कधी एकत्र येऊन एकमेकावर आदळतात आणि लाटांच्या तडाख्याने दूर जातात. ही नाती शाश्वत नाहीत. हे सारे शरीरसंबंधी जन एकूणच जीवाला स्वतःचे कल्याण साधून घेण्यासाठी निरूपयोगी ठरत असतात. या सार्‍यांविषयी मनात जे ममत्व जोपासले जाते, ते वैयर्थक ठरते.
 अयोग्य विचार आणि कर्माचरण यातून होणार्‍या दोषसंग्रहाचे खरे कारण तुकोबारायांना उमगलेले आहे. ते लक्षात घेऊन ते देवाकडे कुठलीही लौकिक वा पारलौकिक मागणी करीत नाहीत किंवा दोषबंधनातून आपली सुटका करावी, अशी गळ ते देवाला घालत नाहीत. तुकोबारायांनी देवाला जी मागणी केली आहे, त्यातून त्यांचे चातुर्यही दिसून येते. हे चातुर्य असे की, ते देवाकडे ज्ञान न मागता, अज्ञान दूर करण्याची कृपा त्याने करावी, अशी विनंती करतात. ईश्वर ज्ञानस्वरूप सुखमय असून, जगत् कार्यासाठी ईश्वरापासूनच निर्माण झालेली माया ईश्वराधीन राहून जीवाला कार्यरत ठेवत राहते. मायेचा प्रभाव दोन प्रकारचा असल्याचे दिसून येते. ऐहिक पातळीवर ती जीवाच्या ठायी अज्ञानजनित सुख-दुःख-संमिश्र भोग देणारी कर्मे आचरावयास सहाय्यभूत होते, तर दुसर्‍या पातळीवर ती जीवाला ईश्वराप्रत नेणार्‍या सत्कर्मात सहाय्यभूत होत्ते. जीव ईश्वराचा अंश असल्याने ईश्वराशी तादात्म्य पावणे, ही त्याची स्वाभाविक ओढ असते. परंतु, अज्ञानजनित कर्माचरण करताना जीवाला देहभाव निर्माण होतो आणि स्वस्वरूपाचे विस्मरण होते. स्वस्वरूपाशी अर्थात् ईश्वराशी एकरूप होण्यामध्ये या देहभावाचे (लोभ-मोह-ममत्वादींनी युक्त अहंभावाचे) आवरण, म्हणजेच अज्ञान, ते अडसर ठरत असते. जीवाला एकदा स्वस्वरूपाची जाणीव झाली की, मायेच्याच प्रभावाने त्याची ईश्वराशी तादात्म्य साधण्याची ओढ पल्लवित होते. तुकोबाराय या स्थितीप्रत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील मायेच्या प्रभावाची उजळ बाजू कार्यरत झालेली आहे. ते देवाच्या चरणी समर्पित होऊन त्याच्या कृपेची याचना करून आपले अज्ञान दूर करण्यासाठी विनवित आहेत. ही मागणी करताना तुकोबाराय देवाला ‘जनार्दन’ हे संबोधन योजतात. सकल जनांच्या याचना पूर्ण करणारा एकमेव कृपाळ तो जनार्दन. तो सर्वज्ञ आहे. आपण निवेदन केलेली आपली स्थिती तो जाणतो. म्हणूनच, हा जनार्दन तेव्हढ्याच कृपाळूपणे आपली विनंती मान्य करणारा आहे, असा तुकोबारायांचा दृढ विश्वास आहे.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)