नाटाचे अभंग... भाग २६

२५. ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशवा मुकुंदा मुरारी ।
 राम कृष्ण नामें बरीं । हरि हरी दोष सकळ ॥१॥
 जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना ।
 महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥धृ॥
 चक्रपाणि गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा ।
 सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥३॥
 मदनमूर्ति मनमोहना । गोपाळगोपिकारमणा ।
 नटनाट्यकौशल्यकान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥४॥
 गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी सर्वजाणा ।
 करोनि अकर्ता आपणा । नेदि अभिमाना आतळों ॥५॥
 कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा ।
 वश तो नव्हे वांचूनि भावा । पाया वेगळे जीवा न करी तुका ॥६॥

 ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजीवनाचे ध्येय असावयास हवे, ही खरे तर सर्वच धर्मांची शिकवण आहे. त्यासाठी संतांनी प्रतिपादलेला भक्तिमार्ग ही सोपी व सिद्ध अशी पाऊलवाट आहे. ईश्वराविषयीचा निश्चल भाव आणि त्याच्यावरची अचल निष्ठा या दोन भक्कम पायांवर मनुष्य वाटचाल करून त्याच्या अंतिम साध्यापर्यंत पोहोचू शकतो. निश्चल भाव आणि अचल निष्ठा या दोन्हींतून श्रद्धा साकारते. या अभंगातून तुकोबाराय भाव (श्रद्धा) निर्मिती कशी होते, याचे दिग्दर्शन करतात.
 ईश्वराविषयीच्या भावनिर्मितीत नामसंकीर्तन हे महत्वाचे साधन आहे. मूल जन्माला आल्यानंतर जे नाव ठेवले जाते, ते आपापल्या रुचिप्रमाणे ठेवलेले असते. प्रत्यक्षात ते नाव यथार्थ ठरतेच असे होत नाही. बर्‍याच वेळा ‘नाव लक्ष्मीबाई, हाती कथलाचा वाळा’ असा काहीसा प्रकार झालेला दिसतो. परंतु, भगवंताच्या नामाच्या बाबतीत मात्र यथार्थता असते. यामागे असेही कारण सांगता येईल की, गुण-रूपातीत असणारा भगवंत जेव्हा सगुणरूप धारण करतो, तेव्हा भक्तांनी संबोधित केलेल्या कुठल्याही नावाला (भगवंताच्याच प्रभावाने) सार्थकता प्राप्त होते (तुका म्हणे जें जें बोला । तें तें साजें या विठ्ठला ।) तुकोबाराय या अभंगात भगवंताच्या नामांची काही विशेषणांसह गुंफण करतात. वरवर पाहता या अभंगात भगवंताच्या सोळा नामांचा दिव्य नामे म्हणून उल्लेख केलेला दिसून येतो. यावरून असे ध्यानात येते की, औषध घेणे, भोजन करणे, युद्ध आदी वेगवेगळ्या प्रसंगी श्रीविष्णूची जी दिव्य नामे स्मरावयाची, त्या स्तोत्रात सोळाच नामांचा अंतर्भाव केलेला दिसून येतो. सोळा हा अंक शक्तीवाचक आहे. देवीच्या नाम-मंत्रादी जप-पारायणासाठी सोळा आकडा प्रमाण म्हणून मानला जातो. अंक शास्त्राप्रमाणे सोळा या आकड्याला विशेष महत्व आहे. तो आकडा पूर्णत्व सिद्ध करणारा आहे ( काम सोळा आणे फत्ते, सोळा आण्यांचा बंदा रुपया वगैरे). उपासने अंतर्गत भगवंताला अर्पण करावयाचे उपचारही सोळा असून वेदोक्त पुरुषसूक्तात आवाहनादी सोळा उपचारांसाठी सोळा मंत्र दिले गेले आहेत. पूर्ण चंद्र सोळा कलांनी युक्त असतो. चंद्रवंशात अवतार घेतलेल्या श्रीकृष्णाला तो भगवंताचा पूर्णतम अवतार असल्याचे म्हटले जाते. (श्रीराम हा मर्यादा पुरुषोत्तम असलेला पूर्ण अवतार मानला जातो. श्रीकृष्ण अवतारात मात्र त्याने कुठल्याही मर्यादेचे पूर्णतः पालन केलेले दिसून येत नाही. श्रीकृष्णाच्या अमर्याद लीला अतर्क्य असल्या, तरी हे लक्षात ठेवावे लागते की, लीला करण्यामागे भगवंताचा केवळ सुखदान हाच विचार असतो.) या अभंगात उल्लेख असलेली नामे अशी आहेत- केशव, मुकुंद, मुरारी, राम, कृष्ण, हरि, जनार्दन, वामन, मधुसूदन, चक्रपाणि, गदाधर, मनमोहन, कान्हा, गोपगोपिकामनरमण, जगजीवन, आणि मदनमूर्ती. या नामांची काही विशेषणांसह तुकोबारायांनी जी गुंफण केली आहे, त्यामागे अंतःकरणात भावजागृती करणे अभिप्रेत दिसते.
 अभंगाच्या प्रारंभी तुकोबाराय सांगतात की, भगवंताच्या नामाचा निःसंकोचपणे उद्‍घोष सारे जण मिळून करू (- गर्जवूं वैखरी). भगवंताने दिलेली परा, पश्यंती, मध्यमा यानंतरची चवथी वाणी म्हणजे वैखरी, ज्याद्वारे आपण मुखावाटे उच्चार करतो. भगवन्नामाची गर्जना करण्यामागील उद्देश असा की, उद्‍घोष केल्यामुळे, जे नामास विन्मुख आहेत, तेही तो घोष ऐकून नामाभिमुख होतील. डोळे झाकण्यासाठी पापण्या आहेत. नाक बंद करता येते, पण हवे तेच ऐकू यावे यासाठी कर्णेंद्रियांना स्वीच नाही.कृत्रिमरित्या कान बंद केले तरी थोडेफार ऐकू येतच राहते. त्यामुळे जे कानावर पडते ते, अनिच्छेने का होईना, ऐकले जाते. तुकोबाराय म्हणतात, ‘आम्ही तर उद्‍घोष करूच, त्याबरोबर इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित करू.’ असे करण्यात पुण्यकर्म म्हणून धन्यता प्राप्त होत असते (दाता तोचि एक जाणा । नारायणा स्मरवी... त्याचे खरे उपकार॥). कोणत्या नामाचा उद्‍घोष करावा, हे सांगताना तुकोबारायांनी केशव, मुकुंद, मुरारी, राम, कृष्ण, हरि या सहा नामांचा उल्लेख केलेला आहे. भगवंताच्या नामाच्या उद्‍घोषाचे फलित तुकोबाराय सांगतात की, ‘भगवन्नाम गर्जनेने सकळ दोषांचे हरण होते’. इथे दोषाचे कोणतेही विविक्षित स्वरूप सांगितलेले नाही. सर्व प्रकारचे दोषहरण नामगर्जनेने होते, अर्थात् अंतःकरणास निर्मळता प्राप्त होते आणि भावजागृतीसाठीची ‘निर्मळ अंतःकरण प्राप्ती’ ही पहिली पायरी होय.
 पुढील चरणात तुकोबाराय जनार्दन आणि जगजीवन या नामांचा उल्लेख करतात. सकल जनांच्या इच्छा पूर्ण करून, जगाचा योगक्षेम चालविणारा हा भगवंत, वामनासारखे छोटे रूप घेतो आणि विराटस्वरूप धारण करून तिन्ही लोक पादाक्रांतही करतो. असे विलक्षण सामर्थ्य असणारा हा भगवंत विश्वाचे जे मूळ तत्त्व महत् आणि त्यातून निर्मिली जाणारी अन्य तत्त्वे (- महतादि) धारण करणारा असल्याचे सांगून तो  मधु (नि कैटभ) यांसारख्या दुर्जेय दैत्यांचा जगत्कल्याणार्थ कौशल्याने नाश करणारा असल्याचे सांगतात. विलक्षण सामर्थ्याने युक्त असलेला हा भगवंत जीवाचे भवबंधन तोडणारा आहे, असे तुकोबाराय नामगर्जनेचे दुसरे फलित सांगतात. देह आणि प्रपंच यांविषयीच्या ममतेतून कर्मशृंखला व त्यातून जन्म-मृत्यु-जन्माच्या चक्रात अडकणे, हे भवबंधनाचे स्वरूप लक्षात घेतले तर देह आणि प्रपंचाविषयीचे ममत्व संपून ईश्वराविषयीचे ममत्व अंतःकरणात रुजणे महत्वाचे ठरते. ही क्रिया नामगर्जनेने साधते. दुसरे तात्त्विक कारण सांगायचे, तर सांख्य तत्त्वज्ञानाप्रमाणे जी पंचवीस तत्त्वे सांगितली गेली आहेत, त्यातील आठ प्रकारच्या प्रकृतीतील महत् हे मूळ पुरुष आणि मूळ प्रकृतीनंतरची आदी (पहिली) निष्पत्ती आणि हे महत् तत्त्व ‘बुद्धी’ असल्याचे मानले जाते. यानंतर अहंकार हे तत्व आहे. मधुसूदन या नामाने दुर्जेयावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य असणे, हे भगवंताचे विलक्षण सामर्थ्य वर्णिले जात आहे. भवबंधनातून सुटका करून घेणे, यासाठी जीवाची बुद्धी आणि बळ ही दोन्ही तोकडी पडतात. त्यासाठी भगवंताचे पाठबळ अवश्य लागते. एकंदरीत, भावजागृतीसाठीची ‘देवाविषयी ममत्व रुजणे’ ही दुसरी पायरी ठरते.
 पुढील चरणात तुकोबाराय भगवंताच्या ‘चक्रपाणि’ आणि ‘गदाधर’ या दोन नामांनी देवाला आवाहन-रूपात (- हे) संबोधतात. त्याचबरोबर भगवंताच्या दातृत्व आणि उद्धारकत्व (- जगदानी) या गुणांचा निर्देश करताना असुरमर्दन, वीर्यवीर, सकळमुकुटमणी शूर व दातार या विशेषणांनी ही नामे मंडित करतात. भगवंताच्या हातातील सुदर्शन चक्र हे प्रसादरूपाने ज्ञाननिधी महादेवांकडून प्राप्त झालेले आहे, ज्याचा विनियोग त्रैलोक्य रक्षणासाठी सांगितलेला आहे. या चक्राने भगवंत, ज्याप्रमाणे देव-भक्तगणांचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे भक्तांच्या अंतःकरणात येणार्‍या विपत्तीत देखील ते सुदर्शन घडवून विपत्तीत भक्तांचे रक्षण करतात. अंतःकरणात पूर्व संस्कारांमुळे असुरी संपत्ती वास करीत असल्यास त्या संपत्तीचे मर्दन करणारा हा भगवंत आहे. विभूतीयोगाप्रमाणे वीराचे वीरत्व ही भगवंतांनी स्वतःची विभूती असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे (विष्णुपुराणात) भगवंताचे जे षडैश्वर्य वर्णिले आहे, त्यात (ज्ञान, बल, ऐश्वर्य, बल, तेज यांसह) शौर्य हे त्याचे एक ऐश्वर्य आहे. म्हणूनच सकल शूरांचा मुकुटमणी हा भगवंत असल्याचे तुकोबाराय सांगत आहेत. (यादव वंशातील शूर नावाच्या कुळातीलही कृष्ण हा स्वतःच्या विलक्षण चातुर्यादी गुणांमुळे सकलमुकुटमणी ठरला आहे). मूठभर पोह्यांसाठी सुदाम्याला सुवर्णनगरी वसवून देणारा, बोटभर चिंधीसाठी असंख्य वस्त्रे पुरविणारा, भाजीचे एक पान भक्षून दुर्वासांसारख्या कोपसागराला परस्पर तृप्त करणारा, किंबहुना, ‘ज्याला अदेय असे काहीही नसलेला’ हा  भगवंत एकमेव अद्वितीय रक्षक आणि दातार या गुणांनी युक्त असून तो सदा स्मरणीय असल्याचे तुकोबाराय सांगत आहेत. अशा भगवंताविषयीचा कृतज्ञभाव अंतःकरणात रुजणे, ही भावजागृतीसाठीची तिसरी पायरी होय.
 पुढील चरणात भगवंताच्या दिव्य रूपाचे वर्णन करताना उत्कट भावनेने, भगवंताच्या कृष्णावतारातील, त्याचे सर्वप्रिय निष्पाप रूप दाखविणार्‍या ‘कान्हा’ या नामाची योजना करतात. त्याच्या सौंदर्याचे वर्णन करताना शब्द अपुरे पडत असल्यामुळे भगवंताला ‘मदनाचा पुतळा’ एव्हढेच म्हणतात. त्याच्या राजस रूपाने सकळांच्या मनाला आल्हाद देणारा, नितांत मोहक रूप असलेला हा कान्हा आपल्या आगळ्या वेगळ्या लीलांनी गोपाळ-गोपिकांचे मन रिझविणारा असल्याचे येथे म्हटले आहे. सामान्य जनांमध्ये या कान्हाविषयीचा अलौकिक भाव असा आहे की, प्रत्येकाला या कान्हाचा संग हवा आहे. एकाच वेळेस अनेक रूपे धारण करून, ज्याला ज्याला त्याचा संग हवा आहे, त्यांची सार्‍यांची इच्छा पूर्ण करणारा हा कुशल नट असल्याचे वर्णन येथे आहे. सर्व गुणांनी संपन्न असणार्‍या या दिव्य रूप-गुणवान् भगवंताच्या संगाची इच्छा मनात ठेवून त्याच्या रूप-गुणांचे चिंतन ही भावजागृतीसाठीची चवथी पायरी या चरणाद्वारे तुकोबाराय निर्देशित करतात.
  पुढील चरणात तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान करवून देतात. सकल गुणांनी संपन्न असलेल्या साकार भगवंताचे स्वरूप हे मुळात निर्गुण निराकार असल्याचे सांगतात (सगुण निर्गुण तुज म्हणे वेद।, किंवा, सगुण निर्गुण जयाचिये अंगें । तोचि आम्हासंगे क्रीडा करी ॥). दृश्य-अदृश्य स्वरूपात असणारा हा भगवंत सर्व काही जाणणारा आहे. त्याचबरोबर जे काही घडते, ते त्याच्याच इच्छेने, प्रभावाने, प्रेरणेने घडत असूनही तो सारे साक्षित्वाने पाहतो. जे काही घडते, त्याचा कर्ता तोच असला तरी तो अकर्ता राहतो आणि कर्तेपणाचा अभिमान त्याला स्पर्श करीत नाही. भगवंताच्या या स्वरूपाचे नित्य चिंतन केले असता, जीव म्हणून मनुष्य किती नगण्य आहे, याचा बोध होतो आणि अस्मिता, अभिमान आपल्या अंतःकरणाला स्पर्शही करीत नाही (- नेदि आतळों). अर्थात् हीसुद्धा त्या भगवंताचीच करणी असते. अंतःकरण निरभिमानी असणे, ही भावजागृतीची पाचवी पायरी असल्याचे येथे निर्देशित केलेले आहे.
 अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय विविध गुणैश्वर्याने संपन्न, सगुण-निर्गुण स्वरूप असलेल्या भगवंताविषयीच्या अनन्य भावाने आणि अकिंचन वृत्तीने आपल्या अंतःकरणातील मनोगत निवेदन करतात. वेदोक्त मंत्रांसह सोळा प्रकारचे उपचार देवाला अर्पण करावयाचे विधान शास्त्रात सांगितलेले आहे. तुकोबारायांना भगवंताची त्या प्रकारे सेवा करण्यामध्ये रस नाही. तरीही, त्यांच्या मनात संकोच आहे. या भगवंतानेच सारे काही निर्मिलेले आहे. तेच त्याची सेवा म्हणून त्याला अर्पण करणे, योग्य ठरणारे नाही. अपूर्ण असलेला जीव परिपूर्ण असणार्‍या भगवंताकडे, निरुपायाने का होईना, निःसंकोचपणे काही मागू इच्छितो. भगवंत ते उदारपणे देतोही. त्याची उतराई होण्यासाठी केवळ शब्द त्याला तोष देऊ शकतील, याबद्दल तुकोबाराय साशंक दिसतात. ‘असे कुठले कर्म आचरावे, ज्याने या भगवंताची सेवा घडेल’ याचा विचार ते करतात. त्याचबरोबर त्यांच्या मनात असेही विचार येतात की, मुख्य असणारा जो जीव तोच भगवंताने दान स्वरूपात दिलेला आहे आणि त्या जीवावर त्या भगवंताचीच सत्ता आहे. ज्या देहाच्या आश्रयाने जीव वस्ती करून राहिलेला आहे, तो देह पंचभौतिक, नाशवंत, कुश्चळ, अपवित्र आदी अनेक दोषांनी युक्त आहे व तोदेखील आत्मकल्याणार्थ भगवंताकडून काक-तालीय न्यायाने प्रसादरूपाने प्राप्त झालेला आहे. देहसंबंधाने मिळविलेले अनेकविध प्रकारचे ऐश्वर्य हे केवळ नाशवंतच आहे. ते या भगवंताला देणे उचित ठरणारे नाही आणि तो त्याचा अंगिकार तरी कसा करेल? भगवंताची प्राप्ती करून घेणे, हा मनुष्यजन्मातील परमार्थ आहे, हे खरे. मग, या भगवंताला वश करून घ्यायचे कसे? चतुरशिरोमणी भगवंताचे भक्त असणारे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याच्याशी सहचर्य घडलेले असल्यामुळे, त्यांच्या अनुभूतीस आलेले एक गुह्य तुकोबाराय प्रतिपादन करतात, ज्यामुळे भगवंत जीवाकडे आकर्षिला जाऊन तो जीवाला वश होऊ शकतो. ते गुह्य म्हणजे देवाला आळविणे, ‘देवाचिया चाडे आळवावे देवा ।’ अनन्य भावाने  देवाला शरण जाणे. नामसंकीर्तनाने मनात रुजलेला देवाविषयीचा भाव साधकाला भगवंतास वश करून घेण्याची योग्यता देतो, हे तुकोबारायांना सांगावयाचे आहे. या भावाच्या जोडीने साधकाच्या मनात भगवंताच्या चरणी अतूट निष्ठा असावयास हवी. हे समजावून सांगण्यासाठी तुकोबाराय शेवटी नमूद करतात की, ‘जीव ज्याप्रमाणे देहाशी नित्य संलग्न राहतो, त्याप्रमाणेच भगवंताचे चरण मी जीवावेगळे होऊ देत नाही’. 
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)