नाटाचे अभंग... भाग २८

२७. मज ते हांसतील संत । जिहीं देखिलेती मूर्तिमंत ।
 म्हणोनि उद्वेगलें चित्त । आहाच भक्त ऐसा दिसें ॥१॥
 ध्यानीं म्यां वर्णावेती कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे ।
 येथूनि जीव निघत नसे । ऐसिये आसे लागलोंसे ॥धृ॥
 कासया पडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा ।
 आम्हां लेंकरांसी पीडा । एका मागें जोडा दुसर्‍याचा ॥३।
 सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरितों पाय ।
 तूं तंव समचि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥४॥
 नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेती नारायणा ।
 वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥५॥
 बहुत दिवस केला बोभाट । पहातां श्रमलों वाट ।
 तुका म्हणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामिया ॥६॥      

  साधक अवस्थेत असताना परमेश्वराचे यथार्थ दर्शन घडावे, अशी तीव्र उत्कंठा जागृत झालेली असते. हे ज्ञान झालेले असते की, मृत्युलोकी मनुष्यदेह प्राप्त झालेला जीव परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी पूर्णतः अधिकारी आहे. एव्हढेच नव्हे तर, तो आचारहीन किंवा दुराचारी किंवा पापयोनीतील जीव असला तरी त्याला हा अधिकार आहेच, असे भगवंताचेच वचन आहे. परंतु, एकंदरीत पाहता, मनुष्य परमेश्वरापासून केवळ पराङ्गमुख झालेला आहे असे नव्हे, तर नानाविध विषयांच्या प्रलोभनांमुळे परमार्थाभिमुख होण्याची इच्छाही त्याला होत नाही. साधक या अज्ञ अवस्थेतून बाहेर येण्यासाठी त्याचे संचित आणि त्याने केलेले श्रवण-चिंतन-निदिध्यासन उपयोगाचे असते. जसजसा काळ उलटतो, तसतसा साधक परमेश्वरप्राप्तीसाठी उतावीळ होणे स्वाभाविक असते. इतरांशी तो आपली तुलना करतो, तेव्हा आपण कुठे तरी कमी पडत आहोत की काय, अशी शंका येऊन तो बेचैन होतो. त्याच्या मनात अनेक मूलभूत प्रश्न तयार होत असतात. त्या प्रश्नांची उकल जेव्हा होत नाही, तेव्हा तो त्याची तळमळ, अगतिकता एक तर कुणा संत-सद्‍गुरूपुढे व्यक्त करतो अन्यथा त्याच्या उपास्याला शरण जातो. तुकोबारायांनी ही स्थिती या अभंगात वर्णिलेली दिसून येते.
 शास्त्रांच्या सिद्धांतांप्रमाणे तीन प्रकारच्या प्रचितींचा उल्लेख केलेला आढळतो - शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. परमार्थसाधनामध्ये यथार्थ मुक्काम गाठण्याकरिता या तीनही प्रचितींची वेगवेगवेगळी अनुभूती येऊन चालत नाही, तर या तिन्ही प्रचिती एकवटल्या जाव्या लागतात. तरीही परमार्थामध्ये आत्मप्रचितीचे महत्त्व अधिक आहे. गुळाची चव गोड आहे, हे सांगून ऐकून अथवा वाचून समजत नाही. एकदा ती चव घेतली की शब्दातीत कशी आहे, हेही उमगते. यातली कुठलीही प्रचिती इतर दोन प्रचितींच्या विरोधात अथवा वेगळी असेल, तर साधनात कुठे तरी दोष असल्याचे सिद्ध होते. अशा चिंतनामुळे तुकोबाराय आपण अत्यंत बेचैन झालो असल्याचे त्यांच्या उपास्याला सांगतात. इथे तुकोबाराय प्रथम संतांचा दाखला देतात व संतांनी परमेश्वराला मूर्तिमंत पाहिला असल्याचे ते नमूद करतात. ही गुरुप्रचिती ठरते. तुकोबारायांना असे वाटते की, या संतांच्या अंतःकरणात असलेली निर्मळ भक्ती, जिच्यामुळे त्यांना परमेश्वराला मूर्तिमंत पाहता आले, तशी भक्ती आपल्या अंतःकरणात नसावी. संतांना काही विचारावे, तर त्यांना आपले हे न्यून कळून चुकेल आणि ते ‘तुझी भक्ती वरवरची, तकलादू आहे (- आहाच भक्त)’ असे सांगून हसतील.
 पुढील चरणात तुकोबाराय शास्त्रप्रचितीबद्दलची अडचण सांगतात. उपनिषदांमधून परमेश्वराच्या यथार्थ स्वरूपाचे वर्णन केलेले असले, तरी ते समजून उमजून घेणे अवघड आहे. त्यामुळे ‘परमेश्वराचे स्वरूप जाणून त्याचे वर्णन मी कसे करू? असा प्रश्न करून ते आपली असमर्थता प्रकट करतात. शास्त्रप्रचितीचे दुसरे साधन म्हणजे वेद. वेदांमधून परमेश्वराची स्तुती केलेली असली तरी त्यात अनेक देवतांची निरनिराळ्या प्रकारे स्तुती करणारी सूक्ते आहेत. हे वेदही परमेश्वराचे स्वरूप वर्णन करताना ‘असा नाही. असा नाही’ म्हणून चित्ताला गोंधळात टाकतात. वेद-उपनिषदांचे स्पष्टीकरण देणारी जी निरनिराळी शास्त्रे आहेत, ती ही वेगवेगळी मते मांडतात. ‘यातीहीन’ असल्यामुळे या संस्कृत वाङ्गमयात प्रवेश करणे, तुकोबारायांना चुकीचे वाटते. एकंदरीत परमेश्वराचे स्वरूप जाणता येत नसल्याने त्याचे वर्णन करता येत नाही, ही दुसरी खंत तुकोबाराय प्रकट करतात. संतांच्या कृपेने त्यांची वाणी ‘अळंकारिली’ आहे, सारे जण त्याची पावती देतात, परंतु ते जे कीर्तन करतात, त्यात आत्मानुभूती नसल्याने त्यांचे अंतःकरण तहानलेले, अतृप्तच राहते, असे तुकोबारायांना सांगावयाचे आहे. ‘आत्मानुभूती’च्या विचाराने तुकोबारायांचे अंतःकरण निशिदिन व्यग्र राहत आहे (- जीव निघत नसे). ‘क्षुधा-तृषार्ता जननी स्मरन्ते’ अशी बालकाची जी अवस्था असते, तीच अवस्था तुकोबारायांची झालेली आहे. तीच एक तहान त्यांना सतत लागून राहिलेली आहे (- आसे लागलोंसे), असे निवेदन ते त्यांच्या उपास्यापुढे करीत आहेत आणि उपास्याकडून कृपादान मागत आहेत.
 इच्छिताच्या प्राप्तीसाठी अधीर झालेल्या तुकोबारांच्या मनात या जगरहाटीबद्दल प्रश्न उभे राहिले आहेत. मनुष्याला जे हवे ते सहजासहजी का मिळू नये? वास्तविकपणे जे हक्काचे आहे, त्यापासून का वंचित रहावे लागते? त्यासाठी केलेला आटापिटा व्यर्थ का ठरावा? जे मिळणे सहजसाध्य नाही, ते मिळवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक क्लेष भोगायला लावणारे मार्ग कशाला आखून दिले गेले आहेत? सुखाकरीता आयुष्यभर धावाधाव करायची आणि प्रत्येक वेळी दुःखाचाच सामना करायचा, ही कुठली रीत झाली? बरे, हा सारा उपद्व्याप वायफळ असेल, तर मनुष्याच्या मनात त्या दुष्प्राप्य गोष्टीबद्दल उगाच ओढ का निर्माण व्हावी? त्याचे वेड का लागावे? सारे जीव एका परमेश्वराचीच लेकरे आहेत आणि तो तर सुखरूप असल्याचे सांगतात. मग आम्हा लेकरांच्या मागेच पीडा का असावी? अन् जीवाने हतबल होऊन ही पीडा भोगणे, जन्मामागून जन्म घेत, भोगत राहायचे हा परिपाठ घालून द्यायचे कारण काय? तुकोबारायांना या सार्‍या प्रश्नांचे समाधान करून घ्यायचे आहे.
 तुकोबाराय त्यांना पडलेले प्रश्न भगवंतासमोर काकुळतीला येऊन मांडतात आणि या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा करतात. ते भगवंताच्या चरणी लोळण घेऊन त्यांच्या मनातली उलघाल निवेदन करतात की, ‘संतांना तू भेटतोस... आम्हाला मात्र वंचित ठेवतोस, हा सरासर अन्याय आहे. असा अन्याय तू करणे शक्यच नाही. पण हा अन्याय करणारा कोण आहे, ते समजत नाही. का, ‘जो ज्याप्रकारे माझा स्वीकार करतो, त्याप्रमाणे मी त्याचा स्वीकार करतो’ असे तू म्हणतोस्, त्या अर्थी माझ्याकडून काही अन्याय घडत आहे, म्हणून मला ही वंचना सहन करावी लागत आहे?... तू सगळ्यांची आई आहेस... तुझ्या लेखी सारी लेकरे सारखीच आहेत, हे खरे ना?’ तुकोबारायांच्या मनात असा विचार आहे की, सर्व सुखाचे आगर असणार्‍या भगवंताने स्वच्छंदपणे स्वतःस एकट्याला करमत नाही, म्हणून जगतामध्ये नानाविध जीवांची निर्मिती केली. सुखरूप असणार्‍या भगवंताने स्वतःच्या सुखासाठी निर्मिलेले हे जगडंबर मात्र दुःखान्वित जीवन जगत आहे. विशेष हे की, हे सारे त्या भगवंताला अज्ञात आहे असे नाही. तोच सांगत आहे... अनित्यं असुखं लोकं. तो सर्व जाणणारा आहे.
  तुकोबारायांच्या मनात खंत आणि किंचित् रोष उत्पन्न झालेला आहे. त्यांना भगवंतास आठवण करून द्यायची आहे की, ‘बाबा, तूच या जगताचे अभिन्न-निमित्त-उपादान कारण आहेस, असे शास्त्रांचे सांगणे आहे. हा मनुष्य देह, हा संसार ही तुझीच निर्मिती आहे’. काहीशा उद्वेगाने ते भगवंताला विचारतात की, ‘जगताचे सर्व प्रकारे जर कारण आपणच आहात्, तर हे दुःखरूप जगत् निर्माण केलेतच कशाला? हा देह जर यथार्थपणे कारणी लागत नसेल, तर आपण हा जन्म दिलातच कशाला?’ भगवंताला शरण जात ते मन:पूर्वक विनवतात की, ‘अज्ञानी असणार्‍या मला कृपा करून समजाऊन सांगा... मी जे काही बोललो, त्याचे प्रत्युत्तर द्या’.
 तुकोबाराय उद्वेगजनित त्यांचे बोलणे आवरते घेता आणि त्यांच्या सायासाचे प्रकटीकरण करताना म्हणतात, ‘मी खूप दिवस माझे गार्‍हाणे पुन्हा पुन्हा सांगत आलो आहे. कुणी तरी सारे मला समजावून सांगेल, याकरिता वाट पाहून पाहून मी थकलो आहे. आता आपल्या कृपेची वाट पहात बसण्याचे धैर्य माझ्या अंतःकरणात राहिलेले नाही. दिवसेंदिवस माझ्या क्लेषांचा पाढा आणि अपेक्षेची भूक वाढतच चाललेली आहे (- विस्तारले ताट). हे भगवंता, तुम्ही सर्वांतर्यामी, सर्वसमर्थ, सर्वांचे हितकर्ते असूनही आणि माझ्या मनातील उत्कंठा शिगेला पोहोचली असतानादेखील काहीच बोलत नाही. भगवंता, तुम्हाला शरण आलेल्या म्या वेड्या भक्ताची ही वटवट ऐकून आपल्याला माझा वीट आला आहे का काय, हे मला समजेनासे झाले आहे.’ भगवंताला आता तरी दया येईल आणि तो आपले समाधान करेल, अशी आशा त्यांच्या मनाला धीर देत आहे.
 सारांशतः, प्रचितीत्रयापैकी गुरूप्रचिती आणि शास्त्रप्रचिती यांचे श्रद्धायुक्त अंतःकरणाने जरी श्रवण-पठण केले तरी साधकाच्या अंतःकरणाला आत्मप्रचितीशिवाय समाधान लाभत नाही. त्यासाठी साधकाचे मुमुक्षुत्व किती शिगेला पोहोचलेले असावे अथवा पोहोचलेले असते, याचे दिग्दर्शन तुकोबाराय प्रतिनिधिस्वरूपात या अभंगाद्वारे प्रकट करतात.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)