गुंती
माय, बाप, लेक
जोपासतो नातं
अनाथांशी गोत
कोण सांगे ॥
संसार रथाची
होतो दोन चाकं
ज्येष्ठात पालक
कोण पाही ॥
घरात बंधुत्व
पाळतो आपण
भारताची आण
विसरतो ॥
मैत्रीच्या धाग्यात
निःशंक रमतो
कधी न मानतो
लेका मित्र ॥
कुटूंबा अर्पितो
निष्ठा सर्वकाळ
राष्ट्राप्रती नाळ
कोण जोडी ॥
नातलगापरी
मानतात धन
निःस्वार्थाचे बन
उरी सुने ॥
दगडी देवाला
ओपी भक्तिभाव
सजीव तो देव
कोण मानी ॥
परिघा पारची
दिसेना ही नाती
वलयात गुंती
मणसाची ॥
-उद्धव कराड, ( मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.