नाटाचे अभंग... भाग २९

२८.  बरवें झालें आजीवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं ।
 वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुम्हां समर्पण ॥१॥
 दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्या नाश ।
 कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावों परतें ॥धृ॥
 बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं झाली ओढाओढी ।
 नासली जागृती घडी । साच जोडी शेवटीं गोड घांस ॥३॥
 तुम्हां पावविली हाक । तेणें निरसला धाक ।
 तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥४॥
 रविच्या नावें निशीचा नाश । उदय होतांचि प्रकाश ।
 आतां कैंचा आम्हां दोष । तूं जगदीश कैवारी ॥५॥
 आतां जळो देहसुख दंभ मान । न करी तयाचें साधन ।
 तूं जगदीश नारायण । आलों शरण तुका म्हणे ॥६॥
 
‘नाट’ या प्रकारातील अभंगांतून तुकोबारायांच्या अनेकविध भावांचे तरंग पाहावयास मिळतात. त्यामध्ये उपास्यावरील गाढ श्रद्धा, प्रार्थनेतील आर्तता, आपल्याकडे असणारी पारमार्थिक अयोग्यता, त्याचप्रमाणे, जे हवे ते मिळण्याबाबतची साशंकता आदी भाव व्यक्त होतात. तसे पाहता, तुकोबारायांच्या सार्‍याच अभंगातून त्यांच्या मनातील भावांच्या उत्कटतेचे दर्शन होत राहते. या अभंगात तुकोबाराय गतायुष्याबाबत सकारात्मक विचार करताना दिसतात. लागोपाठ दोन वर्षे पडलेल्या दुष्काळामुळे हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचे अनेक आघात त्यांना सहन करावे लागले होते. कौटुंबिक आणि आर्थिक हानी असह्य पातळीवर पोहोचलेली होती. प्राप्त झालेल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पत्नी-पुत्राचे प्राणोक्रमण झालेले पाहावे लागले होते. भाऊ परागंदा झाला. केवळ क्लेष आणि क्लेष घेऊन प्रत्येक दिवस उगवत होता. त्यातून त्यांच्या आयुष्याला मिळालेले वळण आणि त्यातून मिळालेली शांती याविषयी तुकोबाराय समाधान या अभंगात व्यक्त करीत आहेत.

कुणीही असो, मनाविरुद्ध सतत घडत जाणार्‍या घटनांमुळे मनात तीव्र उद्विग्नतेने घर करणे, ही सामान्य प्रतिक्रिया असते. नैराश्यामुळे जिणे नकोसे होते. तुकोबारायांची मनस्थितीही काही वेगळी नव्हती. त्यांनीही देवाचाच धावा केला, जसे इतर लोक करतात. पण वैशिष्ट्य असे की, तुकोबारायांच्या ठायी केवळ गतानुगतिकता नव्हती, तर उपास्याविषयी त्यांच्या मनाची प्रामाणिक तळमळ, त्यांची अनन्य निष्ठा उपास्याला जाग येण्यास कारण होती. काही काळ त्यांना संतवाङ्मयाचा संग घडला. उपास्याविषयीची निष्ठा जागृत झाली व त्यातून त्यांच्या मनातील अशांतीला बाहेर पडण्यासाठी वाट मिळाली.
 
नियती अथवा ईश्वर कुठल्याही जीवाला पूर्णतः दुःख किंवा पूर्णतः सुख सदासर्वदा लाभू देत नाही. परमोत्कट नैराश्यामध्ये आशेचा किरण दिसू लागतो. जीवास तात्पुरते का होईना, समाधान लाभते. हे आशा-निराशेचे तरंग प्रत्येकाच्या जीवनात आलटून पालटून उठत असतातच. तुकोबारायांचे मुमुक्षुत्व तीव्रपणे प्रकट होत असताना ईश्वरी इच्छा अथवा नियती म्हणून त्यांच्या अंतःकरणात आशेचा पाझर अनुभूतीस येऊ लागला. या अवस्थेमध्ये एके दिवशी तुकोबारायांना प्रत्यक्ष संतशिरोमणी नामदेव आणि भगवान पांडुरंग यांनी स्वप्नामध्ये येऊन अभंग रचना करण्याचा आदेश दिला. हे स्वप्न म्हणजे शुभलक्षण आहे, हे लक्षात आल्यानंतर तुकोबारायांना अपरिमित आनंद झाला. एकनिष्ठ भक्तास ईश्वर आनंदाचे दान देताना कुठल्याही उणे-अधिकपणाचा विचार न करता अत्यंत उदारपणे भरभरून देत असतो. याचा परिणाम म्हणून तुकोबारायांच्या अंतःकरणात नाना प्रकारची पारमार्थिक प्रमेये स्फुरण पावून नि शब्दांकित होऊन बाहेर पडू लागली. प्रथमतः तुकोबारायांनी हा प्रसाद म्हणून त्याचे टिपण केले. परंतु मनामध्ये शंकेचा एक कोंब उद्‍भवला. तो असा की, बिंदुवंश आणि नादवंश यांमध्ये अनुक्रमे पितृपरंपरा (कुळ) आणि गुरूपरंपरा यांचा आधार आवश्यक असतो. त्यामुळे पारमार्थिक अभ्युदयासाठी गुरू असणे अत्यावश्यक असते. म्हणूनच राम-कृष्णादी अवतारांनासुद्धा गुरूंचा आश्रय घ्यावा लागला आहे. तदनुसार आपल्याला गुरुपरंपरा सांगता यावी, अशी उत्कट इच्छा तुकोबारायांच्या अंतःकरणात निर्माण झाली. ‘न सांगतां तुम्हां कळो ये अंतर’ या न्यायाने तुकोबारायांच्या चित्तात वास करणारे चैतन्य म्हणजेच त्यांचे उपास्य असणार्‍या पांडुरंगाने ही उणीव भरून काढण्याचे ठरविले आणि नजिकच्या काळात तुकोबारायांना त्यांचे उपास्य असलेल्या पांडुरंगाने ‘बाबाजी चैतन्यां’च्या रूपात येऊन गुरुमंत्र दिला अन् गुरूपदेश केला. त्यांना नादवंश प्राप्त झाला. आता तुकोबारायांच्या अंतःकरणात समाधानाचे बीज रुजले गेले. कालांतराने का होईना, असा अलौकिक प्रसाद लाभल्यावर तृप्तीचे सहजोद्गार तुकोबारायांच्या मुखातून या अभंगाच्या रूपाने बाहेर पडले. (माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरू ॥).
 
अभंगाच्या सुरुवातीस तुकोबाराय धन्यता प्रकट करतात. गाडीचे तिकिट काढून ठेवलेले असावे... आकस्मिक कारणांनी गाडी चुकावी... डोळ्यांसमोरून गाडी गेल्याने मनात तीव्र हळहळ असताना जी गाडी चुकली तिला मोठा अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडल्याचे कळावे... अशा प्रसंगी मनाची जी अवस्था होते... तशीच अवस्था तुकोबाराय येथे प्रकट करतात. मानवदेह हा क्षणभंगुर आहे, याबाबत सर्व शास्त्रांचे एकमत आहे आणि ते प्रत्यक्ष आहे. कुठल्या घडीला काळ झडप घालून आयुष्याची समाप्ती करेल, हे कुणालाच सांगता येत नाही. असे जरी असले तरी, प्रत्येक जीवाचे आयुष्य नियतीने ठरविलेले असते. ते आयुष्य भोगून येणारा मृत्यु हा एक प्रकार तर विचित्र परिस्थितीत सापडून येणारा अपमृत्यु हा दुसरा प्रकार. हा दुसर्‍या प्रकारच्या मृत्युला असणारी कारणे म्हणजे अपघात, आत्महत्या, अन्नपाण्याचे दुर्भिक्ष्य (भूकबळी), नैसर्गिक आपत्ती, असाध्य व्याधी वगैरे. तुकोबारायांच्या आयुष्यात ज्या दुःसह घटना घडत गेल्या, त्यामुळे त्यांच्याही आयुष्य़ात असा प्रसंग आलेला असावा, ज्यामुळे मृत्यु येईल, तर सुटका होईल, असे वाटावे. त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींना अपमृत्यूला सामोरे जावे लागले, याचे ते स्वतः साक्षीदार होते. शारीरिक तसेच मानसिक असलेले पराकोटीचे क्लेष त्यावेळी असह्य होते, हे खरे. पण, तुकोबारायांसाठी तीच परिस्थिती अलौकिक लाभ मिळवून देण्यास कारण झाली. म्हणूनच येथे तुकोबाराय ‘वांचोन आलों एथवरी’ असे म्हणून मृत्युप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. मृत्यूच्या विळख्यातून सुटका झाल्यामुळे ‘बरवे झाले’ असे तुकोबारायांना म्हणावयाचे नाही, तर जे आयुष्य उरले, ते ज्यासाठी लाभले आणि त्यातून ज्याचा अलौकिक लाभ झाला, त्याला ते समर्पित करता येणार आहे, यात त्यांना धन्यता वाटत आहे.

काळ ही ईश्वराची विभूती आहे. काळाबद्दल तुकोबारायांच्या मनात असलेला कृतज्ञ भाव ‘दिला या काळे अवकाश’ या पंक्तीमधूनही व्यक्त होत आहे. या ठिकाणी ‘दिला’ या शब्दाद्वारे तुकोबारायांना असे सुचवायचे आहे की, न मागता काळाने त्यांना ऊर्वरित आयुष्यदान दिलेले आहे. एव्हढेच नव्हे, तर विपरीत परिस्थितीमुळे, जाणता अजाणता, भगवंताच्या सत्तेला विसरून मीपणा मिरवित, विधिनिषेधरहित कर्मे आचरूनही काळाने आपल्या आयुष्याचा नाश केला नाही, ही त्या काळाने केलेली कृपाच होय, असे तुकोबारायांना वाटते. त्याने जी कृपा केली, त्यामागे, तुकोबाराय म्हणतात, काही तरी कार्य घडावे, असा भगवंताचा संकेत दिसतो आहे. सामान्यतः उत्कर्षाची चिन्हे दिसू लागतात, मनाला आल्हाद वाटू लागतो अन् मनामध्ये असे विचार येऊ लागतात की, हे सारे अगोदरच घडून आले असते तर फार बरे झाले असते. पण काळावर कुणाची सत्ता चालत नाही. म्हणून जो आपल्या हाती नाही आणि भूतकाळात जे जमा झालेले आहे, त्याबाबत दुःख व्यक्त न करता तुकोबाराय म्हणतात, ‘गेलें तें भूस जावों परतें’. ‘परते’ म्हणजे ‘लांब, दूर, परत दिसणार नाही, अशा प्रकारे’. झाले, गेले त्याबद्दल तुकोबाराय खंत न करता मिळालेल्या अवकाशाचे सोने करायचे, पुन्हा भूस होऊ नये, असा विचार व्यक्त करतात. तुकोबारायांच्या या निवेदनातून साधकांना अप्रत्यक्षपणे उपदेश दिलेला आहे. आयुष्य वाया न घालवता, ते सत्कारणी लावण्याचाच सतत प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे ते सुचवितात.

गतायुष्यातील घटनांकडे तुकोबाराय आता वेगळ्या नजरेने पाहतात. नैराश्य, सार्‍या यातना, सारे मानापमान यातील फोलपणा आता आलेल्या नव्या अनुभूतीमुळे त्यांच्या लक्षात आला आहे. हे स्पष्ट करण्यासाठी ते थोडक्या शब्दात दोन दृष्टांत देतात. पाण्यात बुडत आहे, असे दिसले तरी तो माणूस जेव्हा पैलथडीला लागतो नि जिवंत बाहेर येतो, तेव्हा त्याचे ते बुडणे खोटे ठरते. त्याचप्रमाणे ‘मरण बरे’ म्हणायला लावणारी घडी उलटून जेव्हा परिस्थितीत बदल घडून येतो नि सारे मनासारखे घडू लागते, तेव्हा त्या यातना शिल्लक राहिलेल्या नसतात. दुसर्‍या दृष्टांतानुसार, स्वप्नातल्या प्रसंगातील सुख-दुःख, राग-द्वेष, दारिद्र्य-श्रीमंती वगैरे अनेक प्रकारची द्वंद्वे, एकदा जाग आली की, शिल्लक राहात नाहीत. स्वप्नामध्ये उपभोगलेल्या जाणिवा नाश पावतात, उलट त्या हास्यास्पद ठरतात आणि मग आपले आपल्यालाच आश्चर्य वाटत राहते. वास्तवातील प्रापंचिक सुख-दुःखे असोत वा स्वप्नातील काल्पनिक जाणिवा असोत, त्यामुळे जीवाला खरे समाधान कधीच प्राप्त होत नाही. खरे ज्ञान झाल्यावर मायारूपी संसारातील सुख-दुःखे क्षणिक असल्याचे पटते. दुःखाचेही सुखात परिवर्तन होते (जाईल भवश्रम । सुख होईल दुःखाचे॥). खर्‍या समाधानाची प्राप्ती होणे, यास तुकोबाराय ‘साच जोडी गोड घास’ म्हणतात.

प्रापंचिक जीवन जगत असताना प्रत्येक जण मनावर दडपण ठेवून जगत राहतो. पुढे काय वाढून ठेवले आहे, याची चिंता लागून राहिलेली असते. काहीशा असुरक्षिततेची भीती मनाला अस्वस्थ करीत राहाते. सहसा मनुष्याच्या जीवनात भूतकाळातील खंत आणि भविष्यकाळाची चिंता त्याच्या वर्तमानकाळाला बिघडवत असते. अशाच प्रकारची तीव्र अवस्था तुकोबारायांनी उपभोगलेली आहे. परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यानंतर त्यांनी पांडुरंगाला साद घातली. त्यांची हाक देवाने ऐकली. त्यांना देवाच्या अस्तित्वाची प्रचिती आल्यानंतर त्यांच्या मनाला आता कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नसल्याचे तुकोबाराय सांगतात. आकांत करणार्‍या बालकाला खाऊ देऊन, त्याचे कौतुक करून शांत केले जावे, त्याप्रमाणे जे शरण येतात, त्यांचे सर्व प्रकारे रक्षण केले जातेच जाते, याची प्रचिती तुकोबारायांना आलेली आहे. येथे हे स्पष्ट केलेले नाही की, कौतुक करणारा, भातें (खाऊ) देणारा कोण आहे. तुकोबारायांना स्वप्नात येऊन भगवंताने दर्शन दिले. तथापि, आर्तातून सुटका करण्याचे कार्य सामान्यतः संत वा गुरू यांच्याकडून केले जाते. त्यामुळे येथेही तुकोबाराय संतांबद्दलच्या भावना व्यक्त करीत असावेत, असे म्हणता येईल. असे म्हणण्याचे आणखी एक कारण असे की, तुकोबाराय ‘पावविली हाक’ असे म्हणतात. म्हणून, त्यांची आर्त हाक कुणी तरी भगवंतापर्यंत पोहोचविली, असा अर्थ येथे ध्वनित होत आहे आणि भगवंतापर्यंत पोहोच असणारी व्यक्ती केवळ संतच असू शकते. ‘पावविली’ या पदाचा अर्थ ‘ऐकून घेतली, दखल घेतली’ असा केल्यास मात्र भगवंताकडे श्रेय जाते आणि शरण आलेल्यांचे रक्षण करण्याचे ब्रीद भगवंताने सांभाळलेले आहे आणि एकदा भगवंताने आपले म्हटले की, शरणागताने मागील दोषांचा परिहार देण्याची आवश्यकता उरत नाही किंवा पूर्वकालात शरणागताने आचरण केलेल्या दोषांबाबत भगवंत पूर्णपणे दुर्लक्ष करतो, असा अर्थ दाखविला जातो (मागील परिहार पुढें नाही शीण । झालिया दर्शन एक वेळां ॥)

या सर्व घटनाक्रमांना दृष्टांत देण्यासाठी तुकोबाराय नमूद करतात की, सूर्योदय होताच रात्रीचा सहजपणे विनाविलंब नाश होतो आणि उदय झाल्या-झाल्या तमाचे रूपांतर प्रकाशात होते. सूर्याचा प्रकाश असताना ‘तमा’ची तमा बाळगण्याचे काही कारण उरत नाही. याच न्यायाने उपास्य अंतःकरणात जेव्हा ठाण मांडून बसलेला असतो, तेव्हा तमरूपी दोष, म्हणजेच अज्ञान, अंतःकरणात राहूच शकत नाही. सार्‍या जगताचा स्वामी असणार्‍याने एकदा स्वीकार केला की, अन्य कुणाचा आधार शोधणे संपते. भगवंत भक्तवांछा-कल्पतरू असल्याने प्रत्येक जीवाचा कैवारी एकमात्र तो भगवंतच असतो.

तुकोबाराय आपले ऊर्वरित आयुष्य अत्यंत योग्य रीतीने जगण्यासाठी प्राप्त झालेल्या विवेकोत्तर ज्ञानामुळे कसे वागायचे, याचा विचार मांडतात. ‘आतां’ म्हणजे यापुढे, जे आयुष्य कालाकडून दान मिळालेले आहे, ते आयुष्य कारणी लावताना, देहाशी निगडित असणारी सुख-दुःख, मान-अपमान वगैरे जी द्वंद्वे, त्यांना तीलांजली दिली असल्याचे तुकोबाराय सांगतात. देहसुखासाठी कुठलीही चिंता करणे, खटपट करणे हा दंभ ठरणारा आहे, म्हणून या द्वंद्वाबाबत आपण उदासीन राहू, साक्षित्वाने पाहू आणि त्या द्वंद्वांना अंतःकरणात स्थान देणार नाही, असा निश्चय व्यक्त करतात. ही जी नानाविध प्रकारची द्वंद्वे आहेत, ती जीवाच्या ठिकाणी प्रारब्धानुरूप अथवा नियतीची योजना म्हणून राहणार आहेत, याबाबत तुकोबारायांच्या मनात शंका राहिलेली नाही. आणि, जगदीश हे विशेषण भगवंताच्या नामामागे लागलेले असल्यामुळे त्याच्यापासून काहीही लपलेले राहात नाही. एव्हढेच नव्हे, तर मूळ-ठेव रूपातील ‘नारायण’ आता जगदीश, विश्वंभर, विठ्ठल आदी स्वरूपात नटलेला असल्याची प्रचिती आल्यामुळे, भगवंताचे मूळ यथार्थ स्वरूप जाणून तुकोबाराय भगवंताच्या चरणी विनित होतात व त्यास शरण आल्याचे कृतज्ञ भावाने भगवंताला निवेदन करतात.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)