ती असताना...

" चहाच आधण ठेवलंय रे, तेवढं उकळल्यावर दूध ओतशील का? "

"पोळ्या झाल्यात... तू डबे भर ना, मी अंघोळीला पळते.. " प्रत्येक कामात तिला मी हवा असतो. तिला येत नाही ते काम म्हणून नाही, तर मी आजूबाजूला, सतत तिच्या डोळ्यासमोर लागायचो. मी खूपदा चिडायचो, "एकही काम पूर्ण करत नाहीस, एक तू केलं तर दुसरं मी आटपेन ना, तू तुझ्याच कामातली सगळी पडकाम माझ्याकडून करून घेतेस " त्यावर जीवघेणी हास्याची चमचमती मखमल माझ्याभोवती पसरवून... आपल्या कामासाठी पसार व्हायची.

ती असताना, ती सतत माझी सावली बनायची, नाहीतर माझ्याच सावलीखाली स्वतःच अस्तित्व जपू पाहायची. ती असताना मला कसलीच काळजी नसायची, माझं घर, माझी माणसं, जे आधी माझं माझं होत ते सगळंच तिनं केव्हाच आपलं करून टाकलं होतं. ती असताना.. हो ती असताना..

आज नाहीय ती, म्हणजे ह्या जगासाठी नसेल ती, माझ्यासाठी मी असे पर्यंत ती असणार, माझ्या प्रत्येक हालचालीत तिची छबी असणार, माझ्यात पूर्ण सामावून गेलेली ती. मी म्हणजे तीच पूर्ण जग, माझं बोलणं, माझं चिडणं, माझ्या चुका म्हणजे तिच्यासाठी रोज नव्यानं जगणं. वेडी होती जराशी पण माझी होती, फक्त माझी.

त्या दिवशी आई कुणाला तरी म्हणाली " मूलबाळ नव्हत म्हणून बरं, नाहीतर अजून एक जीव टांगणीला लागला असता ".... अस वाटलं कुणीतरी भळभळणाऱ्या जखमेवरची हळवी कातडी जड शब्दांची दाबणं वापरून शिवतंय...

एम जी रोडवरच्या बरिस्ता मध्ये बसलो होतो तेव्हा बाळाच्या नावावरून भांडली होती माझ्याशी, म्हणाली " तिचं नाव
' मंजुश्री ' च ठेवायचं, मंजिरीतली मंजू आणि श्रीकांत मधला श्री... " मी म्हणालो " आत्ताच्या काळात हे पुराण काळातलं नाव नको, तीच नाव श्रेया च ठेवायचं, बरेच वाद घातले होते, पण पहिली मुलगीच हवी ह्यावर मात्र एकमत होतं आमचं. " ए तिच्यासाठी खूप सारे वूलनचे कपडे आईंकडून बनवून घेणार मी, तिला जगातली सगळी सुख द्यायची, तीच जग आनंदानं सजवायचं,

तुझ्यासारखे बोलके डोळे असावेत तिचे "

.. " आणि तुझ्यासारखी चोवीस तास बडबड करणारी असली की झालं माझं, आज एकीला झेलतोय, मग दोघी मिळून माझ्या डोक्याचा भुगा करणार.. "

माझ्या ओठांवर एकदम हसू आलं, ती असताना जे जे घडलं होतं ते मला आठवलं की मी असाच, एकटाच हसायचो..

ती गेली तेव्हा मला अजिबात रडू आलं नव्हत, बरेच जन म्हणाले " त्याचं काळीज तरकलय, अचानक, अनपेक्षित घडलेलं त्याला सहन झालं नाहीय "

तिला छानसं सजवलं होत, नवी कोरी हिरवी साडी, पहिल्यांदाच आम्ही दोघांनी एकत्रितपणे न निवडलेली साडी तिने जाताना घातली होती, तश्याच म्याचींग हिरव्या बांगड्या, नाकात नथ, भलं मोठं कुंकू लावलं होत, जे तिला एवढं मोठं कधीच आवडलं नव्हतं,

एकदा आई म्हणाली होती, " मंजू निदान पाहुण्यांकडे जाताना तरी दिसेल एवढी मोठी टिकली लाव गं, कुंकू नाही ना आवडत, मग टिकली तरी मोठी लाव "!

आईच ऐकलं होतं तिने पण फुरंगटली होती, तिकडून घरी येईपर्यंत कुणाशी बोलली नव्हती, मग रात्री तिला जवळ घेऊन समजावलं होत, तिचा राग एक दिवसाच्यावर कधीच टिकला नव्हता.

आज तिला कुणीही येऊन हवं तसं सजवत होतं... तरीही गोंडस दिसत होती, मी एका जागी बसून फक्त तिच्यावर होणारे सोपस्कार परक्यासारखा पाहत होतो. सतत तिच्या अवतींभोवती असणारा मी, तिच्यावर अधिकार गाजवणारा मी, तिच्यात स्वतःची सगळी सुख पाहणारा मी, आज इतका परका झालो होतो की ती मला सोडून गेली होती, पचतच नव्हतं. ती असताना च्या बऱ्याच गोष्टी आजूबाजूच्या लोकांकडून कानावर पडत होत्या.. मी मात्र 'ती नसताना ' च्या कुठल्याच गोष्टींना सामोरं जायला तयार नव्हतो.

ती असताना बाबा संध्याकाळचा चहा सात वाजता प्यायचे. मी सकाळी एकदाच चहा घ्यायचो, पण तिला ऑफिसवरून आल्या आल्या चहाची तलप व्हायची, पण कुणीतरी जोडीला हवं म्हणून चेहरा पाडून बसायची. एवढ्या वर्षांची पाच ला चहा पिण्याची सवय बाबांनी फक्त तिच्यासाठी मोडली.

एकदा ती खूप दमून आली होती, पण एकटीसाठी कुठे करत बसू ह्या विचाराने त्रासलेली बाबांनी बघितली, स्वतःच येऊन मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाले " मंजू, थोडा चहा आज मी हि घेईन, तुला सोबत म्हणून ".. तिचा खुललेला चेहरा आजही माझ्या नजरेसमोरून हलत नाही, साध्या साध्या गोष्टीत सुख शोधायची.

कधीमध्ये ऑफिसवरून येताना आईसाठी गजरा आण, बाबांसाठी काला जामून, कधी कधी माझ्यासाठी माझा रविवार फक्त तिच्यातच गुंतावा म्हणून नाटकाची तिकिटं, कधी मराठी सिनेमाची तिकिटं.... तिला जगायचं होतं माझ्या माणसात, तिला तिच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करून घ्यायच्या होत्या माझ्याकडून.. पण,

माझी सगळीच स्वप्न माझ्या डोळ्यात तशीच तरंगत ठेवून निघून गेली.

आजही बाबांना सात वाजले की चहाची आठवण होते, चुकून कधीतरी किचन कडे मान वळवून काहीतरी बोलायला जातात, मग अगतिकपणे अचानक मागे बघतात. त्यांचा कावराबावरा चेहरा, प्रत्येक सुरकुतीवर उमटलेली दुःखाची छटा, जीव कासावीस करते माझा. आई म्हणते " आता कुणाची वाट बघता, आता कुणीही येणार नाहीय तुम्हाला सोबत करायला " तेव्हा आवंढे गिळत थरथरता आवाज निघतो फक्त " ती असताना लागलेल्या सवयी एकवेळ पुन्हा मोडतील, पण ती असताना तीन स्वतः विणलेलं मोहाच जाळं, ते कस मोडू? "

खूपदा वाटायचं तिला गाडी शिकवलीच नसती तर?, तिचा तो आयुष्य विस्कळीत करणारा हट्टच पूर्ण केला नसता तर? तरी मी कितीतरी ठिकाणी तिला गाडीवरून जाण्यास मनाई केली होती, बऱ्याचदा चिडायची " कितीरे घाबरतोस तू, इथे हायवे ने जाऊ नकोस, तिकडे मधल्या गल्ली बोळातनंच जात जा, अशाने मी घाबरटच राहील आयुष्यभर " पण ह्या सगळ्यामागे माझा स्वार्थ तिला दिसायचाच नाही कधी.

तिची काळजी वाटायची. साधी सायकलही कधी चालवली नव्हती तिने, डायरेक्ट स्कूटी चा हट्ट धरला होता. अक्खा महिना तिला समजावलं पण हट्टी होती, जे मनानं घेतलं ते पूर्ण झाल्याशिवाय चैन पडायचं नाही. मी अबोला धरून पाहिलं, रागावून पाहिलं, चिडचिड करून पाहिलं, पण ती तरीही तसं की नस झाली नाही. माझा राग क्षणात कसा पळवायचा ह्याची किल्लीच होती तिच्याकडे.

शेवटी लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसा दिवशी तिला मी स्कूटीच सरप्राइज दिलं, आज ते सरप्राइज माझ्या आयुष्यालाच कायमच शाप देऊन गेलं.

आजही तीच शेवटच "श्री... मला जगायचंय.. तुझ्यासाठी.. आपल्या होणाऱ्या बाळासाठी... मला वाचव " हे शब्द माझा पिच्छा सोडत नाहीत. ज्या श्वासांच्या उबदार सहवासात मी कायम धुंद असायचो ते श्वास आज नाहीत, ज्या हातांची बोट माझ्या बोटात गुंफण्याचा खेळ करत राहायचे आज ते खेळ नाहीत.. ती असताना, मी कधीच रडलो नव्हतो, आज ती नसताना आसवांच्या पावसात भिजतो..

ती असताना मी अर्थपूर्ण आयुष्य जगलो, आज ती नसताना फक्त जगण्याचा प्रयत्न करतोय.. पण अजूनही आठवणी बोलायला लागल्या की सुरुवात मात्र अशीच होते.. " ती असताना... "

"ती असताना.......