होम जीवनाचा हा चालला तुझ्यासाठी!

गझल
वृत्त: रंगराग
लगावली: गालगा/लगागागा/गालगा/लगागागा
********************************************

होम जीवनाचा हा चालला तुझ्यासाठी!
श्वास श्वास मी माझा जाळला तुझ्यासाठी!!

मोगरा, जुई,जाई.....माळते कुणीही ते......
चंद्र पौर्णिमेचा मी आणला तुझ्यासाठी!

ते वळण जिथे दोघे भेटलो अखेरीला.....
जीव आजही तेथे टांगला तुझ्यासाठी!

हे उडून गेलेही प्राणपाखरू असते.....
हा तुरुंग देहाचा सोसला तुझ्यासाठी!

जीव टाकला ओवाळून मी तुझ्यावरती!
मी अहंपणा माझा छाटला तुझ्यासाठी!!

आजकाल का कोणी थांबतो कुणासाठी?
वाहता पहा रस्ता थांबला तुझ्यासाठी!

तूच सावली माझी, ऊन्ह मी तुझे आहे!
खेळ ऊन्ह-छायेचा चालला तुझ्यासाठी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१