नाटाचे अभंग... भाग ३०

२९. आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि ठायीं ठेविला जीव ।
 सकळ लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायीं ॥१॥
 भांडवल गांठीं तरि विश्वास । झालों तें झालों निश्चयें दास ।
 न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचाचि ॥धृ॥
 आहे तें निवेदिलें सर्व । माझा मोडियेला गर्व ।
 अकाळीं काळ आघवें पर्व । झाला भरंवसा कृपें लाभाचा ॥३॥
 वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचूनि जाणत ।
 तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥४॥
 करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा ।
 कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥५॥
 बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा ।
 बैसला रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळां लेइलों तें ॥६॥
 
 साधन करीत असताना कुठलाही साधक प्रारंभी, अपवाद सोडता, दिग्भ्रमित होत असतो. (अपवादात्मक उदाहरणे म्हणजे कुमारवयात निर्भयपणे ध्रुवाने वनात जाऊन केलेली तपःश्चर्या किंवा अल्प वयात आद्य शंकराचार्य तसेच श्रीज्ञानेश्वरादींना लाभलेली प्रगल्भता, संत नामदेवांच्या बालपणी त्यांच्या बालहट्टाला वश होऊन देवाने भक्षिलेला नैवेद्य वगैरे.) साधन आचरित असताना क्रमाक्रमाने पूर्व सुकृत, सत्संग अथवा नियती म्हणा किंवा ईश्वरेच्छा म्हणा, साधकाच्या आचरणामध्ये अनुकूल बदल होऊ लागतात. याचा अर्थ असा की, साधनाची वाटचाल प्रगतीकडे होऊ लागते. एका विशिष्ट अवस्थेप्रत गेल्यावर साधकाच्या विचारांमध्ये आस्तिक्य बुद्धीचे प्राबल्य वाढून विचारांना तात्त्विक बैठक मिळू लागते. मनातला विश्वास पक्का होऊ लागतो आणि लक्ष्य आवाक्यात आल्याची जाणीव दृढ होत जाते. अशाच अवस्थेप्रत पोहोचलेल्या तुकोबारायांच्या अंतःकरणात तात्त्विक बैठक तयार झाली आहे आणि त्या तात्विक विचारांचे अनुगमन करीत ते या अभंगाद्वारे त्यांच्या मनातील संकल्प प्रकट करीत आहेत.
 अभंगाच्या सुरुवातीस योजलेल्या ‘आता’ या शब्दातून तुकोबारायांना प्राप्त झालेल्या अवस्थेचा निर्देश केला जात आहे. परिस्थितीने केलेली गांजवणूक जेव्हा सोशीकतेच्या मर्यादा ओलांडते तेव्हा स्वाभाविकपणे सुचेल त्या किंवा सुचविल्या गेलेल्या विविध मार्गांचा, उपायांचा अवलंब माणूस सायासाने करीत असतो. तुकोबारायांचेही पूर्वायुष्य वेगळे नव्हते. तथापि त्यांनी अनुसरलेल्या एकाही मार्गाने त्यांची सोडवणूक केली नाही. इथे हे लक्षात येते की, परिस्थितीच्या गांजवणूकीतून सुटका म्हणजे व्यावहारिक लाभ होणे किंवा मनाला आश्वस्त करणारा मार्ग मिळणे. पूर्व सुकृतामुळे व्यावहारिक लाभ जरी झाला नाही, तरी मनाला शांतता लाभली की, त्या मार्गाविषयी मनाला खात्री पटते आणि त्या मार्गाने पुढे जाणे सुरू होते. पारमार्थिक वाटचालीत खात्री-विश्वास-श्रद्धा-निष्ठा-वैराग्य असे पाच टप्पे असल्याचे या अभंगातून तुकोबारायांनी दर्शविले असल्याचे लक्षात येते. त्यांनी ज्या उपासनेचा मार्ग स्वीकारला, त्यातून त्यांना प्रथम खात्री पटली आणि मग ते इच्छा प्रकट करतात की, त्यांच्या मनाने ‘परतों भाव’ जाणू नये. येथे ‘परतों भाव’ या पदातून लौकिक लाभाच्या आशेचा तरंग दाखविला जात आहे. तसल्या लाभाची आकांक्षा आता मनात निर्माण होऊच नये, असे तुकोबारायांना वाटते. त्यांच्या मनाला विसावा लाभलेला आहे. त्यांच्या मनाची कुतरओढ थांबलेली आहे. ‘जीव ठायी ठेविला’ असे तुकोबाराय निवेदन करीत आहेत. ‘ठायी’ शब्दाने स्वीकारलेल्या साधनमार्गाविषयीची मनाची अविचलता दाखविली जात आहे. ‘जीव’ शब्दाने अंतःकरण-चतुष्टयाचा बोध होत असून अंतकरणाला जी शांती मिळाली, तीच सकल लाभांच्या लाभातून होणारी प्राप्ती असल्याचा तात्त्विक विचार त्यांच्या मनात स्थिरावला आहे. हा विचार नुसता स्थिरावलेला नसून चित्ताला त्याची खात्री पटलेली आहे.
 तुकोबाराय त्यांची स्वानुभूती अभंगातून वर्णन करीत आहेत. असे करताना शब्दरचना मात्र अशी साधली आहे की, त्यातून साधकांसाठीही उपयुक्त मार्गदर्शन देणारा संदेश स्पष्टपणे मिळावा. या चरणात स्व-निर्देशक असे पद न वापरता ‘तरी, न पाहे’ असे शब्द योजले गेले आहेत. चित्ताला पटलेल्या खात्रीनंतरचा पारमार्थिक वाटचालीतील पुढील टप्पा ते निवेदन करतात, ‘भांडवल विश्वास’. पारमार्थिक साधन साधताना लागणारे भांडवल ‘विश्वास’ हे आहे. उपास्याविषयीचा विश्वास साधकाने संपादित करून ठेवला पाहिजे (गांठी असावा). या भांडवलाच्या आधारे अवलंबन केलेल्या मार्गावर विश्वास ठेवून स्थिर राहणे, अविचल राहणे महत्त्वाचे आहे. जे झाले ते झाले, त्यात बदल होणे नाही, असा विचार पक्का झाला पाहिजे. हाच भाव वेगळ्या प्रकारे पुन्हा नमूद करताना तुकोबाराय ‘निश्चये’ असे म्हणतात. ‘निश्चये दास झालो’ म्हणजे चाकर झालो, असा येथे अर्थ नसून, उपास्याचा भक्कम आधार संपादन केला आहे, उपास्याला सर्वसमर्थ तारक धनी समजून त्याच्यावर सारा भार टाकून ‘भगवत्-भक्त’ झालो आहे, असे तुकोबाराय म्हणतात. भक्तीमार्गाचा निश्चयाने स्वीकार केल्याचे निवेदन करून त्यांच्या पारमार्थिक वाटचालीतील ‘श्रद्धा’ या तिसर्‍या टप्प्याचा पूर्वभाग ते दाखवित आहेत. आता मागे पाहणे नाही, अन्य विचार नाही, माघारी फिरणे नाही. भूत काळात घडलेल्या साधक-बाधक घटनांचा विचार त्यागावयाचा आहे. भूतकाळातले दुःख नि भविष्यकाळाची चिंता माणसाचा वर्तमान मात्र बिघडवत असते. सिंहगडावर लढताना तानाजी धारातीर्थी पडल्यावर मावळे माघारी पळू लागले, तेव्हा शेलारमामाने घोषणा केली, ‘मी केव्हाच दोर कापून टाकले आहेत्... कड्यावरून कोसळून मरण्यापेक्षा शूरपणे लढून मिळालेले वीरमरण पत्करा.’ शेलारमामाच्या या आवाहनात्मक घोषणेने सिंहगड जिंकून दिला. तोच भाव येथेही ‘झालों ते झालों’ या पदाने व्यक्त होत आहे. अशा कृतनिश्चयाने पुढील मार्गक्रमण करावयाचे. ‘दास्यत्व’ स्वीकारल्यानंतर सेवा हा एकच धर्म आचरावयाचा असतो आणि ही सेवा निरपेक्ष असते, असे म्हणण्यापेक्षा, सर्वसमर्थ असलेला आपला धनी आपली चिंता वाहणारा आहे, असा विश्वास अंतःकरणात दृढ असतो. म्हणूनच आता ज्याचा दास व्हायचे, त्याची सेवा करण्याचा ‘सोस’ हवा, म्हणजेच सेवेचा हव्यास धरला पाहिजे. त्या कार्याला आवडीने प्राधान्य द्यावयास हवे. ‘पुढती’ म्हणजे ऊर्वरित आयुष्यभर निरंतर.
    तुकोबाराय पुढे दास्यत्व-स्वीकाराचा विधी कथन करतात. आपण दास्यत्व स्वीकारले खरे, पण ज्याचे दास्यत्व स्वीकारले आहे, त्याने आपला स्वीकार करणे, हेही महत्त्वाचे आहे. त्याने आपला स्वीकार करावा, यासाठी काय करायचे, ते तुकोबाराय सांगतात. आपल्याविषयी भले-बुरे निःसंकोचपणे, जे आणि जसे आहे, ते सारे निवेदन करणे (पापकर्माच्या निष्कृतीसाठी एकान्तात ‘सेल्फ कन्फेशन’ करणे हा विधी ख्रिश्चन धर्मातही आचरला जातो.). हे करीत असताना अहंकाराचा संपूर्ण त्याग झाला पाहिजे. असे करण्यामागचा उद्देश हा की, परमार्थमार्गात सर्वात मोठा असणारा शत्रू म्हणजे अहंकार किंवा गर्व. तो धैर्याने मोडून काढावयास हवा. ‘माझा मोडियेला गर्व’ असे वदून तुकोबाराय उपास्यापुढे कबूली देतात, त्यामागे असाही भाव ध्वनित होत आहे की, त्यांच्या अंतःकरणातील या गर्वरूपी शत्रूचे दमन त्यांच्याविषयीच्या कारुण्यापोटी, त्यांना नकळत, आपल्या सामर्थ्याने उपास्यानेच केलेले आहे. या क्रियेनंतर धन्याने आपला स्वीकार केला आहे किंवा नाही, हा विचार गौण ठरतो. यासाठी एकलव्याचे उदाहरण लक्षात घेता येईल. द्रोणाचार्यांचा पुतळा समोर ठेऊन त्याने केलेली साधना त्याला अर्जुनापेक्षाही उच्च पात्रता देणारी ठरली. वर्षानुवर्षे नियमितपणे एकाच जागी बसून ठराविक वेळी नमाजाचे साधन करणार्‍या एका साधकाच्या बाबतीत आकाशवाणी झाली की, त्याची सेवा अल्लाने मंजूर केली नाही. सारे जण चिंतित झाले, पण हा साधक मात्र आनंदाने नाचू लागला. त्याला कारण विचारले तर तो म्हणाला, ‘मी काय करीत आहे, ते अल्ला स्वतः पाहात होता, हाच माझ्यासाठी फार मोठा लाभ आहे’. ‘अकाळी काळ आघवे पर्व’ या चरणखण्डाचा अर्थ तीन प्रकारे घेता येतो. ‘पर्व’ म्हणजे पुण्यकर्म आचरावयाचा शुभ काळ. अत्यल्प प्रमाणात, अत्यल्प वेळात केलेली साधना स्वीकारून उपास्याने आपला स्वीकार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केला, हीच साधकासाठी मोठी पर्वणी ठरते. किंवा, उपास्याची सेवा करताना अकाळी मृत्यु (काळ) जरी आला तरी तो फार मोठा पुण्यप्रद क्षण (पर्व) ठरणार आहे. तसेच, एकदा दास्यत्व स्वीकारले म्हणजे सेवेसाठी कोणतीही वेळ शुभ-अशुभ नाही, तर प्रत्येक क्षण हा पुण्यफल देणारा पर्वकाळच आहे. ‘काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं’ असे श्री ज्ञानेश्वरमाउली हरिपाठात उपदेशितात. साधकाने आपल्या अंतःकरणात असा भरवसा धरला पाहिजे की, आपल्या उपास्याच्या कृपेचा लाभ आपल्याला झालेलाच आहे. साधकाने येथे हे लक्षात घ्यावयास हवे की, ‘तुका म्हणे भार घातलियावरी । होईल कैवारी नारायण ॥’ परमार्थात ईश्वराची कृपा लाभणे, हाच परमोच्च लाभ आहे. पारमार्थिक वाटचालीतील हा महत्त्वाचा असा ‘श्रद्धा’ या तिसर्‍या टप्प्याचा दुसरा भाग पार केलेला असतो अर्थात् साधकाने निम्मी वाटचाल केलेली असून अशा अवस्थेत साधकाला साधनमार्गात एक प्रकारे परिपक्वतेचे पर्व प्राप्त झाल्याचे दिसून येते.
 स्वीकारलेल्या धन्याची सेवा म्हणजेच उपास्याची सेवा आणि ही सेवा म्हणजे सतत त्याचेच ध्यान-चिंतन-स्मरण. एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठात नमूद करतात की, ‘योग व्रत नेम दान धर्म । नलगे साधन जपतां हरि ॥’ अंतःकरणाला समाधानाची तहान नैसर्गिक आहे. हे समाधान मिळवावयाचे असेल तर काय करायला हवे, याचे स्पष्टीकरण करताना तुकोबाराय सांगतात, ‘वेव्हारीं वेव्हारा अनंत’. येथे ‘वेव्हारी वेव्हारा’ या जोडपदाचा अर्थ सावकार, समर्थ धनी असा आहे. समर्थ धन्याचा लाभ झाल्यावर कोणताही व्यवहार असो, त्याचा लाभ किंवा होणारी हानी ही सेवकाची नसते. उपास्यासारख्या सर्वसमर्थ, सर्व जाणणार्‍या धन्याची इच्छा म्हणून केलेल्या व्यवहारात होणार्‍या फायद्या-तोट्याविषयी सेवकाला विचार करावा लागत नाही, हा एक अर्थ. त्याचप्रमाणे साधकाने नित्य कर्मे आचरताना जी देवघेव करायची, त्या व्यवहाराचाही निर्देश येथे केला जात आहे. प्रपंच असो वा परमार्थ, दोन्हींकडे विशिष्ट मर्यादेपर्यंत देवघेव चालत असतेच. दिल्या-घेतल्याशिवाय व्यवहार होत नाही. तुकोबाराय याविषयी त्यांच्या अंतःकरणाची झालेली धारणा सांगताना म्हणतात, ‘अनंताशिवाय असलेला व्यवहार मी जाणत नाही.’ यात व्यवहार हा साधकाच्या दृष्टीने जरी एकांगी वाटला, म्हणजे त्याने सेवा केली पण धन्याचा प्रत्यक्ष प्रतिसाद लाभला नाही, तरी तो व्यवहार पुण्यप्रदच असणार आहे. एखादा व्यवहार (सेवा) केव्हा व कसा फलित व्हावा, हे ज्याचे त्याने ठरवायचे नसते, तर ती जबाबदारी उपास्यावर सोडून साधकाने नेणतेपणा बाळगून साधनक्रम आचरित असावे. जाणतेपण, विचार, तर्क यांपलिकडे ज्ञानरूपी ईश्वर आहे, असे श्रीज्ञानेश्वरमाउली स्पष्ट करतात. व्यवहार कोणताही असो, अनंताची इच्छा म्हणून, तोच कर्ता-करविता आहे, अशा निश्चयाने आपण केवळ निमित्तमात्र आहोत, अशा भूमिकेतून नित्याचे सारेच व्यवहार करावयाचे (कर्मयोग आचरावयाचा) एव्हढेच साधकाने लक्षात ठेवायचे. मग लाभऱ्हानीचा विचार आपल्या अंतःकरणाला शिवत नाही. आणि हाच समाधान-प्राप्तीचा मार्ग असल्याचे तुकोबारायांचे सांगणे आहे. प्रपंचात वा परमार्थात चित्ताला समाधान प्राप्त होणे व ते निरंतर उपभोगता येणे, हा अंतिम लाभ आहे (ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।). काही प्रसंगी जीवाच्या अंतःकरणामध्ये, इच्छिलेले प्राप्त होऊनसुद्धा समाधानाची तृप्ती त्याला उपभोगता येत नाही. याला कारण म्हणजे तथाकथित अल्प बुद्धीला अनेकविध प्रकारे विकाररूपी विचारांचे फाटे फुटतात. केवळ दुर्बुद्धीमुळे साधकाला प्राप्तव्याचा उपभोग घेता येत नाही. धरणेकरी ब्राह्मणास तुकोबारायांनी ३१ अभंग नारळासह दिले खरे, पण ते दुर्बुद्धीमुळे त्या ब्राह्मणाने झिडकारले. परंतु तेच दान अन्य एका भाविकाच्या हातावर तुकोबारायांनी ठेवले आणि त्याच अभंगाच्या बळावर आणि नारळात मिळालेल्या माणकांच्या लाभाने तो लौकिकदृष्ट्या अन् पारमार्थिकदृष्ट्याही लाभान्वित झाला. यामागील तथ्य साधकाने लक्षात घ्यावे आणि सकृतदर्शनी दिसणार्‍या हानीनेही लाभाइतकेच समाधान निःशंकपणे मानावे. अशा प्रकारे साधकाच्या साधनमार्गातला ‘निष्ठा’ हा चौथा टप्पा गाठलेला असतो.
 व्यावहारिक जीवनातील लाभ - हानीचा विचार कसा असावा, याचे दिग्दर्शन केल्यानंतर तुकोबाराय सांसारिक पातळीवरील स्वानुभूतीचे विचार मांडतात. चौथा टप्पा गाठून परमार्थ मार्गावर वाटचाल करीत असलेल्या साधकाच्या आवाक्यात त्याचे लक्ष्य आलेले असते. तरीही प्रापंचिक परिस्थिती त्याला मार्गावरून च्युत करण्यास कारण ठरू शकते. ही परिस्थिती कशी हाताळावी, याचे मार्गदर्शन आता तुकोबाराय करतात. ‘करूनि संसारा’ असे तुकोबाराय म्हणतात. संसार सांभाळीन... संसारात राहून जी काही कर्तव्ये वाट्यास येतील, ती ‘वेव्हारीं वेव्हारा अनंत’ याच विचाराने पार पाडीन. पण, ही कर्तव्ये पार पाडीत असताना लाभऱ्हानी यांचा विचार अंतःकरणात येऊ देणार नाही (नातळों). ‘अंग’ पदाने देहसंबंधियांचा तसेच ‘पसारा’ या पदाने प्रापंचिक, स्थूल वस्तूंविषयी विचार सांगितलेला आहे. देहसंबंधी तसेच प्रापंचिक गोष्टींपासून स्वतःला त्यांनी दूर ठेवले. त्यात कोणत्याही प्रकारे ममत्व निर्माण होऊ दिले नाही. तसेच जे काही ममत्व पूर्वपरिणामामुळे मनात रुजलेले होते, ते दूर सारले. तात्पर्य असे की, ‘मग मीं असेन संसारीं वर्तत । जेवि जळात पद्मपत्र ॥’ या न्यायाने निश्चयपूर्वक राहूनच उपास्याच्या सेवेत खंड पडू देणार नाही. प्रारब्धाधिष्ठित असणारे देह-अवयव व त्यांना मिळणारे उपभोग यांचा विचार करावयाचा म्हणजे पुन्हा ‘मागील वास पाहणे’ ठरणारे आहे. त्या वृत्तीतून पूर्णत्वाने बाहेर पडायचे आहे, कारण ते सारे अशाश्वत आहे. ममता, करुणा, कळवळा, तळमळ, सायास आदींचा जो सोस करायचा तो या लौकिक गोष्टींसाठी आता करायचा नाही तर, जो अनंताचा बीजभूत आधार मिळालेला आहे, त्याच्यासाठी तोच सोस करावयाचा आहे. अनंताबद्दलचा आपल्या जीवनात कळवळा, त्याच्याबद्दलचे प्रेम हेच खरे आणि तेच शाश्वत फळ देणारे आहे. या विश्वाच्या उत्पत्ती-स्थिती-लयास कारणीभूत असलेला, जगताचे निमित्त कारण  असलेला (जसा घट निर्माण करण्यात कुंभार निमित्त असतो) आणि जगताचे उपादान कारणही अभिन्नत्वाने असलेला (जशी घट निर्मितीसाठी माती आहे), त्याला जगदीश म्हणा वा परमात्मा म्हणा वा ब्रह्म म्हणा, या अनंताचा बोध ‘बीज’ या पदाने केलेला आहे. या बीजाचा आधार (थारा) मिळालेला असताना, कोणतेही आच-आघात-प्रतिघात हानी करू शकत नाहीत, असा स्वानुभव तुकोबाराय येथे प्रकट करीत आहेत. भक्तीमार्गाचा स्वीकार करून केलेल्या साधनातून उपास्याविषयी मनात कळवळा, प्रेमभाव निर्माण होणे, ही भगवत्कृपा ठरते. तसे होणे हे साधकाच्या भाग्योदयाचे लक्षण आहे, कारण बीजाचा आश्रय घेतल्यामुळे अंतःकरणात चित्तविक्षेप होत नाही व साधकाला पथभ्रष्ट होण्याची भीतीही उरत नाही. ही साधकाच्या साधनेतील सर्वात महत्त्वाची पायरी ठरते, कारण प्रपंच हा जीवाला पुन्हा पुन्हा गर्तेत ओढावयास निमित्त होत असते. वासनाक्षय हा मुक्तीचा पाया असल्याचे शास्त्रांचे सांगणे आहेही.
 अभंगाच्या समारोपाच्या या चरणात तुकोबाराय साधकांना सावध करताना स्वानुभूतीपूर्वक अंतिम आचरण कसे असावे, हे साधकांना सांगतात. परिपक्व दशेतदेखील चित्तक्षोभ घडविणार्‍या बर्‍याचशा घटना घडतात किंवा त्याला कारण होणार्‍या व्यक्तींचा संबंध येण्याची शक्यता असते. केलेले सायास व्यर्थ होतात. अनेक सिद्ध ऋषींना अधोगतीचा सामना करावा लागल्याची अनेक उदाहरणे पुराणातून सांगितली गेली आहेत. म्हणून चित्तक्षोभ घडविणार्‍या प्रसंगी साधकाने स्वतःस त्यापासून अलिप्त ठेवणे महत्त्वाचे असते. अशा प्रसंगी चित्ताच्या स्थिरतेसाठी आवश्यक अशा तीन आवश्यकता तुकोबाराय निवेदन करतात. त्यातील पहिली आहे ती ‘ ऐकावे जनाचे करावे मनाचे’. तुमच्या प्रत्येक कृतीबद्दल अनेकांची अनेक उलटसुलट मते असतात. ती मते चूकच असतील असे नव्हे. परंतु हे लक्षात ठेवावयास हवे की, दुसर्‍याच्या अनुभूतीचा विचार करायचा तो साधनेच्या प्राथमिक अवस्थेत. परंतु आपली अनुभूती ही सत्य असते आणि म्हणून आत्मनिष्ठ राहणे, हे साधनेचे महत्त्वाचे अंग आहे. अशा प्रकारचा विवेक हाच अंतिम कल्याण साधून देतो. तुकोबाराय अन्य ठिकाणी सांगतात की, ‘बहुतांच्या संगती । बहु झाली फजिती ॥. ही फजिती होऊ न देण्यासाठी बहु मतांपासून वेगळे राहावे, वेगळ्या शब्दात सांगावयाचे तर बहुमतांचा विटाळ मानावा, असे तुकोबारायांचे स्वानुभूतीचे सांगणे आहे. परमार्थातील हे सोवळेपण संपादन करायचे असते. पुढचा दुसरा विचार सांगताना तुकोबाराय सांगतात, ‘जे (भगवंताचे) रूप उमगले, त्याचा कळवळा, त्या रूपाबद्दलचे नितांत प्रेम, जिव्हाळा चित्तात रुजायला हवा. येथे रूप हे लाक्षणिक असून उपास्याचे रूप-गुण-नाम-धाम-लीला या सार्‍यांचा त्यात समावेश आहे. रूपाचा कळवळा म्हणजे या रूप-गुणादी सार्‍यांचा कळवळा चित्तात रुजायला हवा. तिसरा विचार हा सांगितला आहे की, ज्या दिव्य रूपाचे दर्शन झाले, ते डोळ्यांनी केवळ बाह्यतः पाहावयाचे नाही, तर डोळ्यात ते साठविलेले राहिले पाहिजे. सर्वत्र त्याच रूपाचा प्रत्यय डोळ्यांना यावयास हवा. ही साधनेच्या सफलतेची अंतिम स्थिती होय. साधक हा पूर्णत्वाने उपास्याशी समरस होतो. त्याला समाधानाची प्राप्ती निरंतर उपभोगता येत असते. तेथे द्वैत असूनही अद्वैताची स्थापना झालेली असते.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)