ढेपश्यांसाठी निमुळते वांगे लागते. या वांग्याच्या जाडसर
गोल चकत्या करा व त्या पाण्यात टाका. सर्व चकत्या पाण्यात टाकल्यावर पाणी
काढून टाका व चकत्या एका रोळीत ठेवा म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल. एका
भांड्यात डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ घ्या. त्यामध्ये लाल तिखट, धने जिरे
पूड, हळद, हिंग व मीठ घाला. मीठ थोडे जास्त घालावे. नंतर वांग्याची एकेक
चकती घेऊन तिला चमच्याच्या टोकाने टोचावे. दोन्ही कडून टोचावे म्हणजे
त्याला चिरा पडतील. आता एका ताटलीत वर तयार केलेले पीठ पसरून घ्या व त्यावर
एक चकती ठेवून त्यावर परत पीठ घालून हाताने दाबा. परत चकतीच्या दुसऱ्या
बाजूनेही असेच पीठ घालून दाबा. हे पीठ दाबून जितके चकतीमध्ये बसवता येईल
तितके बसवा. अश्या रितीने सर्व चकत्या करून घ्या. एकेक चकती झाली की एकावर
एक ठेवा. १५ मिनिटांनी ढेपसे करायला घ्या. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो
तापला की त्यावर २-४ चमचे तेल घाला व ते कालथ्याने सर्व तवाभर पसरवा.
त्यावर एका वेळी २ चकत्या ठेवा. आता आच थोडी कमी करा व चकत्यांवर झाकण
ठेवा. काही सेकंदांनी झाकण काढा व चकत्या उलटून परत त्यावर थोडे तेल सोडा.
चकतीच्या आजूबाजूनेही तेल सोडा व परत त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण
काढून परत त्यावर थोडे तेल घाला.
अश्या रितीने सर्व ढेपसे करून घ्या. चकत्यांवर झाकण ठेवल्याने वांग्याच्या
चकत्या व त्यामध्ये दाबून भरलेले पीठ शिजते. चकत्या जाडसर चिरल्याने
कुरकुरीत होतात. शिवाय तांदुळाच्या पिठानेही त्या कुरकुरीत होतात. हे ढेपसे
गरम गरम खायला जास्त चांगले लागतात. गरम आमटी भाताबरोबर छान लागतात. अथवा
चहासोबत खायला हरकत नाही.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.