श्री देवी अथर्वशीर्ष

 ॥ श्री देवी अथर्वशीर्ष ॥

 तेवीस वर्षांपूर्वी म्हणजे गणेश चतुर्थी, १३ सप्टेंबर १९८० या शुभदिनी आदरणीय महामहोपाध्याय विद्यानिधी (डॉ.) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा सार्थ पंच अथर्वशीर्ष हा ग्रंथ भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. गणेश, देवी, सूर्य, विष्णु आणि शिव या पाच देवतांना उद्देशून रचिलेल्या या रचना पंचायतन पूजेत अभिषेक-जप-अनुष्ठानासाठी उपयोगात आणल्या जातात. याद्वारे त्या त्या देवता प्रसन्न होतात आणि उपासकांच्या मनोकामना पुर्‍या होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या पाच अथर्वशीर्षांपैकी श्रीगणपती अथर्वशीर्ष अनेकांच्या परिचयाचे आहेच.
 प.पू. चित्राव शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे की, उपनिषद साहित्याचे ‘उपनिषद’, ‘अथर्वशीर्ष’ (दध्यंच आथर्वण यांनी उपदेशिलेले) आणि ‘तापिनी’ (सूर्याने उपदेशिलेले) असे तीन प्रमुख विभाग आहेत. त्यांपैकी ‘उपनिषद’ ग्रंथ हे मूलतः तत्त्वज्ञानपर असून ‘अथर्वशीर्ष उपनिषद’ आणि ‘तापिनी उपनिषद’ ही पंचायतन देवतांना उद्देशून सांगितली गेली आहेत.
 पाच अथर्वशीर्षांचे स्वरूप पाहता लक्षात येते की, प्रत्येक देवता ही विश्वरूप कल्पिलेली आहे. ज्या देवतेचे अथर्वशीर्ष आहे, त्या देवतेचीच अन्य देव-देवता विभिन्न रूपे आहेत. परमतत्व एकच असून त्यापासून सर्व लोक, लोकपाल, दिक्‍पाल, देव-असुरादि योनीयुक्त चराचर जगत् निर्मिले गेले असल्याचे वर्णन करून अद्वैताचा पुरस्कार केलेला आहे, त्याचबरोबर उपासकांमधील श्रेष्ठ-गौण जाणिवेतून माजलेले वादंग शमविले गेले आहेत.
 उपासकाच्या मनात एकनिष्ठ श्रद्धा असावी लागते. त्याशिवाय कोणत्याही देवतेशी तादात्म्य पावता येत नाही. ‘एकाग्रता यशोबीजम्’ आणि ‘श्रद्धावान् लभते ज्ञानम्’ हे त्यामागचे तत्त्व आहे यातील पहिले तत्त्व प्रामुख्याने व्यावहारिक ज्ञानासाठी तर दुसरे तत्त्व पारमार्थिक ज्ञानाप्राप्तीच्या विषयी लागू पडते असे म्हणता येईल. परमेश्वराचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेणे व अंतःकरणात रुजवणे, हा मनुष्यजीवनात साधावयाचा परमार्थ असल्याचे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. त्याचप्रमाणे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा चतुर्विध पुरुषार्थ साधावा, असे नीतीशास्त्र सांगते. पुरुषार्थ साधण्यासाठी निष्ठायुक्त प्रयत्नांची तसेच ईश्वरी पाठबळाची नितांत आवश्यकता असते. आरोग्य, संपदा, धन, बल, विद्या आदींची निदान गृहस्थाश्रमीच्या मनुष्यास तरी आवश्यकता असतेच. देवतेच्या उपासनेतून या गरजा भागविल्या जातात व अभ्युदय, ऐश्वर्याचा लाभ होत असतो, अशी श्रद्धा परंपरेने जोपासली गेली आहे. तथापि, परमेश्वराचे स्वरूपज्ञान सोडून अन्य लाभ क्षणिक आहेत, म्हणून त्यात वासना गुंतवू नयेत, जी जी कर्मे करावयाची ती ईश्वरार्पण बुद्धीने, तोच कर्ता-करविता आहे, जगत्कार्यासाठी ईश्वराने प्रत्येक जीवाची योजना केली आहे, अशी भावना मनात रुजलेली असावयास हवी, हा भारतीय विचारांचा गाभा आहे. केवळ मतलबी स्वार्थाला मनात थारा असू नये. ‘स्व’ आत्मा असून तो परमात्म्याचाच अंश आहे. ‘पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते’ या ऋचेनुसार आत्मा हाच शिवस्वरूप आहे, असे उपनिषदांचे सांगणे आहे. प्रत्येकाच्याच हृदयातच शिवात्मा-रूपाने परमेश्वराचा वास असून त्याचा अर्थ जाणता आला, त्याची अभिव्यक्ती आपल्या आचार-विचारातून करता आली तरच यथार्थ स्वार्थ साधता आला, असे म्हणता येते.
 प्रकृति-पुरुष, शिव-शक्ती, ब्रह्मा-सरस्वती, विष्णु-कमला यांत अभिन्नत्व असले तरी शक्तीशिवाय सामर्थ्याला व्यक्त होता येत नाही. पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून त्रिगुणात्मक पंचमहाभूते आणि त्यांपासून सृष्टीची निर्मिती झाल्याचे भारतीय शास्त्रे सांगतात. चैतन्य स्वयं निष्क्रिय आहे. शक्तीच्या योगे त्याला बळ मिळते आणि मग क्रियाशीलता निर्माण होते, असे दिसते. मानवी प्रयत्नांना मिळणारी शक्तीची जोड ही सात्त्विक असावी व त्यातून सत्कार्य घडावे, म्हणून शक्तीची देवतास्वरूपात उपासना केली जाते. अशा उपासनेत देवी अथर्वशीर्षाचा विनियोग करता येतो. तसे पाहता, या अथर्वशीर्षाच्या योगे नारीशक्तीचेच वर्णन उदात्त दृष्टीने केलेले दिसते. आपले सृजनात्मक सामर्थ्य दृष्य-कार्यरूपाने प्रकट करण्यासाठी परमेश्वरानेच धारण केलेले ते रूप आहे, याची जाणिव आपल्या, म्हणजे पुरुष आणि स्त्री या दोघांच्याही, चित्तात रुजावयास हवी. ‘लेडीज् फर्स्ट्’ असे आपण म्हणतो खरे, पण व्यवहारात मात्र स्त्रियांना कमीजास्त प्रमाणात गौणत्व देत असतो. तसेच, केवळ क्षुद्र मतलबासाठी स्त्रियांनी कायद्याच्या आधाराने असत्याचा अवलंब केल्याची उदाहरणेही पाहावयास मिळत आहेत. यातून एकूणच मानवतेस हानी पोहोचत आहे, हे नाकारता येत नाही.
 प.पू. चित्रावशास्त्री यांनी केलेल्या अर्थाच्या मदतीने देवी अथर्वशीर्षाचे ओघवते भाषांतर करण्याचा हा प्रयत्न केला आहे. तथापि, नम्रपणे नमूद करावेसे वाटते की, देवी अथर्वशीर्षातील सातवी ऋचा, जिच्यात ‘अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे ।’ हे एक खण्ड आहे, त्याचा ‘समुद्राच्या तळाशी जलामध्ये जन्मलेली, तसेच स्वर्गनिर्माती’ असा जो अर्थ वाचावयास मिळतो, त्याऐवजी देवीचे विश्वात्मक रूपाचे वर्णन करणारा हा ऋचाखण्ड असल्याचे मानून ‘अथांग सागर गहन । ती नाना रत्नांची खाण । जीवनाचे जिथे सृजन । तो सागरतळ मम योनी असे ॥२२॥ अंतरीक्षी पसरला द्युलोक । जिथे लाभे पितृजना आत्मसुख । तीच माझी मूर्धा बुद्धिप्रेरक ॥ रूप माझे ऐसे व्यापक ॥२३॥’ अशा प्रकारे अर्थ मला योग्य वाटला. हे भाषांतर शब्दशः न करता थोडे स्वातंत्र्य घेतलेले आहे. चुकांचा धनी अर्थात मीच आहे. त्याबद्दल क्षमस्व.
 या वर्षीचे नवरात्र येत आहे. त्यानिमित्त या देवीअथर्वशीर्षाची माहिती करून घेऊ यात्.
    
॥ अथ श्री देवी अथर्वशीर्ष ॥

॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ श्री कुलस्वामिन्यै नमः ॥
॥ श्री महादेवी प्रसन्न ॥

ओम् एकाक्षर ब्रह्म । परमात्मशक्तीचे स्फुरण । चित्तशुद्धीस्तव उच्चारण । त्रिवार मी करीतसे ॥१॥ ओम्... ओऽम्... ओऽऽम् ॥१॥
श्री गणेशास नमन असो । श्री कुलस्वामिनीला नमन असो । तैसेचि माता पिता गुरू यांसी । वंदन मी करीतसे ॥२॥
आजि या शुभदिनी । मम सकल अभ्युदयासाठी ॥ सार्‍यांच्या कल्याणास्तव आणि । हे देवी अथर्वशीर्ष मी जपतसे ॥३॥
शारदेची कृपा जयांवरी । हे अथर्वशीर्ष कथिले जयांनी । ते अथर्वणऋषी ज्ञानी । तयांसी माझा नमस्कार ॥४॥
असावा तयांचा आशिर्वाद । देवी अर्चना व्हावी सफल । अवघ्या फलाचे श्रेय । तयांचेच होय ॥५॥
नमन लक्ष्मीनारायणा । ठेवी सुखें मम पंचप्राणा । तंव अधिन त्या नवग्रहांना । वंदन मी करीतसे ॥६॥
सूर्य चंद्र मंगळ बुध । गुरू शुक्र शनैश्चर । राहू केतू ग्रहगण । देवोत मज शांति-बल ॥७॥
अग्नि वायु निऋति वरुण । वायु सोम इंद्र ईशान । अष्ट लोकपाला या वंदन । करोत सारी विघ्ने दूर ॥८॥
इहलोकाचा आधार धरणी । निधान या देहाची । लागतो तंव चरणी । जननी मज क्षमा करी ॥९॥
॥ श्री महालक्ष्मी प्रसन्न ॥
लोकलोकींचे सुरगण । पातले महादेवी समोरी । पुसती तिज विनम्र भावे । कैसे तुझे स्वरूप ॥१०॥
वदे देवी मी ब्रह्मस्वरूपिणी । आहे मीच जननी । प्रकृतिपुरुषात्मक विश्वाची । अरूप-रूपात्मक जगताची ॥११॥
आनंद मी अनानंद मी । विज्ञान मी अविज्ञान मी । जे जाणावे ते ब्रह्म मी । आणि मीच अब्रह्मही ॥१२॥
आकाश वायु अग्नि जल । पृथिवी आदी महाभूते मी । अपंचमहाभूते मी । आहे मी अखिल जगतचि ॥१३॥
वेद जे सनातन विज्ञान । अवेद ते अभुदयज्ञान । वेद आणि अवेद दोन । ज्ञान विज्ञान मीच आहे ॥१४॥
मीच आहे विद्या अविद्या। प्रकृति मी जी अजा । बद्ध सृजन-लय चक्री जी । ती अनजाही मीच आहे ॥१५॥
खाली मी वरती मी । आडवी मी तिरकस मी । आंत मी बाहेर मी । दशदिशांतुनि व्याप्त मी ॥१६॥
अकरा रुद्र अष्ट वसु । आदित्य आणि विश्वेदेवु । तयांच्या रूपे त्रिभुवनी । संचार असे माझाचि ॥१७॥
मित्र वरुण इंद्र । अग्नि अन् अश्विनीकुमर । मीच धार्त्री तयांची । भरणपोषण करीतसे ॥१८॥
मीच धार्त्री सोमाची । त्वष्टा भग पूषाचीही । विष्णु-ब्रह्मा-प्रजापतींसी । मीच देतसे शक्ती ॥१९॥
यजन आणि स्तवन । करीती जे भक्तजन । तयांसी जे लागे धन । ते मीच पुरवीतसे ॥२०॥
जनमनासी एकात्मता । परतत्वज्ञानघनता । देतसे मी तत्त्वतः । प्रथम यज्ञार्ह देवता मी ॥२१॥
अथांग सागर गहन । ती नाना रत्नांची खाण । जीवनाचे जिथे सृजन । तो सागरतळ मम योनी असे ॥२२॥
अंतरीक्षी पसरला द्युलोक । जिथे लाभे पितृजना आत्मसुख । तीच माझी मूर्धा बुद्धिप्रेरक ॥ रूप माझे ऐसे व्यापक ॥२३॥
जे जाणिती मम स्वरूप । साक्षात् जे परतत्त्व । तयांसी लाभे निःसंशय । दैवीसंपत्ती अवघी ॥२४॥
ऐकोनि ते मधुर बोल । प्रमुदित झाले देवगण । करिती मनोभावे स्तवन । नतमस्तक होवोनी ॥२५॥
हे देवी महादेवी । शुभाऐश्वर्यदायिनी । हे साक्षात् शिवस्वरूपिणी । नमितो आम्ही पुनःपुन्हा ॥२६॥
जिच्या कारणे सद्‍बुद्धी । कर्तव्यकार्यशक्ती । ऐशी तूं प्रवृत्ती । नमितो तुज पुनःपुन्हा ॥२७॥
तूं मांगल्य मंगलाचे । करीसी कल्याण सार्‍यांचे । हे महादेवी मंगले भद्रे । नमितो तुज पुनःपुन्हा ॥२८॥
उपासना करिती तुझी । कर्मफलप्राप्तीसाठी । हे उत्तुंगशिखरवासिनी । नमितो तुज पुनःपुन्हा ॥२९॥
सुरांनी निर्मिली जी वाचाशक्ती । वैखरी नाना प्राणियांची । ही वाणी आमुची महादेवी । सदा देवो तुज संतोष ॥३०॥
वाचारूपी तू भगवती । कामधेनूसम कल्याणकर्ती । आनंद-अन्न-बलदायिनी । सदा सन्निध तूं असावे ॥३१॥
तूं कालरूपी विष्णुशक्ती । वेद जिची करिती स्तुती । स्कंदमाता तूं शिवशक्ती । तूं ब्रह्माशक्ति सरस्वती ॥३२॥
सुरजननी तूं अदिती । दक्षकन्या शांभवी सती । पापनाशिनी कल्याणकारी । नमितो तुज भगवती ॥३३॥
महालक्ष्मीस जाणितो । सर्वशक्तिरूपिणीस ध्यातो । देई प्रेरणा आम्हा देवी। ज्ञान-ध्यान-सत्कार्याची ॥३४॥
दक्ष तो सुपुत्र मारिषेचा । अदिती तयाची कन्या । धर्मजाया ती होवोनि प्रसूता । अमर सुरगण प्रसवले ॥३५॥
काम, योनी, कमला, वज्रपाणि । बीजाक्षरे तयांची क-ए-ई-ल आणि । शिवशक्तीबीज र्‍हीम् योजोनि । बीजशक्ती जाणोनि घ्यावी ॥३६॥
हसा, मातरिश्वा, अभ्र, इंद्र । स- क- ह- ल तयांची बीजाक्षरे भद्र । मायाबीज र्‍हीम् जोडिता तयांस । सिद्ध मूलविद्या जगन्मातेची ॥३७॥
ऐसी जगन्माता ब्रह्मरूपिणी । आत्मशक्ती विश्वमोहिनी । पाश-अंकुश्-शर-धनुर्धारिणी । सकलरक्षक रूप तिचे ॥३८॥
बीजशक्ती महाविद्या । घेता जाणोनि यथार्थतः । तरोनि जाईल अनायासे । शोकसागर, हे निश्चित ॥३९॥
हे माते भगवती । अगाध अनंत तंव शक्ती । रक्ष रक्ष परमेश्वरी । ठेविले मस्तक तंव चरणी ॥४०॥
आठ वसू जे दिशांचे पालक । अकरा रुद्र लोकपाल । बारा आदित्य लोकप्रकाशक । असे हीच भगवती ॥४१॥
सोमरस जे प्राशिती । आणिक जे न प्राशिती । ते सारे विश्वेदेवही । हीच भगवती असे ॥४२॥
यातुधान असुर राक्षस । पिशाच्च यक्ष सिद्ध । असे हे सकलगण । हीच भगवती असे ॥४३॥
सत्त्व-रज-तमातुन । होतसे प्रकृतीचे दर्शन । तरी साक्षात ते त्रिगुण । हीच भगवती असे ॥४४॥
जनन-पालन-नाश । करिती ब्रह्माविष्णुमहेश । तरी तिन्ही रूपात प्रत्यक्ष । हीच भगवती असे ॥४५॥
अंतरिक्ष-स्वर्ग-भूलोक । तयांचे तीन शासक । प्रजापति इंद्र मन्वादिक । हीच भगवती असे ॥४६॥
ग्रह-नक्षत्र-तारे । कला काष्ठादि कालरुपे । विश्वाचे अवयव सारे । हीच भगवती असे ॥४७॥
पापनाशिनी भोगमोक्षदा । अनंता निर्दोष शरण्या । कल्याणकर्ती मंगला । वंदन तुज पुनःपुन्हा ॥४८॥
वियत ते आकाश । अक्षर तयाचे ह् । कामना तयाचे लक्षण । जाणावी ती प्रथम मात्रा ॥४९॥
अग्नीस म्हणती वीतिहोत्र । वर्ण तयाचा असे र् । ज्ञान तयाचे लक्षण । ती जाणावी दुसरी मात्रा ॥५०॥
चवथा स्वर ई-कार । ती जाणावी मात्रा तृतीय । कर्म तयाचे लक्षण । ती जोडावी उभय वर्णांस ॥५१॥
अनुस्वार चंद्रकोरीच्या पोटी । अर्धमात्रा ती जाणावी । या औट मात्रांच्या संयोगे । सिद्ध बीजाक्षर र्‍हीँ ॥५२॥
ऐसे हे बीजाक्षर स्वयें । स्वरूपवर्णन भगवतीचे । उच्चारिता शक्तिस्फुरण ते । सकल कामनांची सिद्धी त्वरें ॥५३॥
ध्यान यती ते करीती याचे । चित्त जयांचे शुद्ध जहाले । निजानंदी जे सदा रमले । जे स्वयें सागर ज्ञानाचे ॥५४॥
वाक् माया ब्रह्मसू । किंवा वाणी, माया अन् कामू । तयांची बीजाक्षरे ऐं र्‍हीं क्लीं । ती ओंकारासह घ्यावी ॥५५॥
शुद्ध चित्ताचिये ठायी । जागविण्या सत्शक्ती पाही । लक्ष स्थिरावण्या देवी चरणीं । जाणोनि घ्यावी बीजाक्षरे ॥५६॥
लाभण्या देवीब्रह्माशी सायुज्यता । तैसेचि महदानंद अनुभविण्या । मंत्र जो नित्य जपावा ॥ तया घ्यावे जाणोनि ॥५७॥
सहावे व्यंजन ते ‘च’कार । जोडोनि तयासी ‘आ’कार । तेजोनिधी मरीचीचा ‘म’कार । तो ‘उ’कारासह घ्यावा ॥५८॥
तयावरी ठेवोनि बिंदु । पुढे ‘ड’कार योजावा । जो ‘ट’कारापासोनि तिसरा । त्यासी ‘आ’कार जोडावा ॥५९॥
वायूतील ‘य’कार । तो घ्यावा अधरयुक्त । तये होई ‘यै’ अक्षर । ते सातवे पद मंत्राचे ॥६०॥
तया जोडिता विच्चै ।  सिद्ध मंत्र नवाक्षरे । जपता तो तल्लीनतेने । महदानंद लाभतसे ॥६१॥
मंत्रजप करते समयी । चित्त सावध असावे पाही । ध्यान जे असावे स्थिर हृदयीं । ते आकळूनी घ्यावे आता ॥६२॥
हृदयकमळी जी स्थानापन्न । उगवत्या सूर्यासम जिचा वर्ण । पाश अंकुश हाती असोन । नेत्र तीन अन् रक्तवसन ॥६३॥
उजवा कर असे उभा । सदा अभय आश्वासिण्या । तथास्तु तथास्तु म्हणतसे । दाखवुनी वरदमुद्रा ॥६४॥
ऐसी साक्षात् शक्ती । मनोहर रूपवती । माता जगज्जननी । महादेवी तुज नमन असो ॥६५॥
जननमरणरूपी जे महाभय । सोडविसी तयापासोन । दुःखांचे जरी डोंगर । शमन करीसी क्षणमात्रे ॥६६॥
तूं महामाया अनादी । अनंत तुझी कीर्ती । तूं साक्षात् कारुण्यमूर्ती । महादेवी तुज नमन असो ॥६७॥
ब्रह्मा आदी सुरगण । न जाणिती तंव स्वरूप । तरी अज्ञेया म्हणती तुज । महादेवी तुज नमन असो ॥६८॥
तंव महिमा अगाध । तुज नाही आदी अंत । तरी अनंता म्हणती तुज । महादेवी तुज नमन असो ॥६९॥
स्वरूप तंव सूक्ष्माहूनि सूक्ष्म । करू शकेना तुज लक्ष्य । अलक्ष्या तरी म्हणती तुज । महादेवी तुज नमन असो ॥७०॥
तूं साक्षात् परमशक्ती । नसे तुज जन्म वा पुनरावृत्ती । तरी अजा म्हणती तुज । महादेवी तुज नमन असो ॥७१॥
तूं सर्वव्यापी सर्वगामी । नसे तुजविण रिक्त काही । तरी तुज एका म्हणती पाही । महादेवी तुज नमन असो ॥७२॥
मूळाक्षररूपे वससी । अवघ्या शब्दांमधुनी । ज्ञानरूपिणी तूं महादेवी । तुजला आम्ही वंदितो ॥७३॥
आत्मस्वरूपी तल्लीन स्थिती । ज्ञानाची जी अंतिम गती । चिन्मयातीता तूं महादेवी । तुजला आम्ही वंदितो ॥७४॥
शून्यासी नाही रूप । तेचि परमेशाचे लक्षण । तंव कारणे तो होई प्रतीत । तुजला आम्ही वंदितो ॥७५॥
अन्य कुणी तुझ्याहुनी । श्रेष्ठ नसे महादेवी । तरी दुर्गा नामे तंव प्रसिद्धी । तुजला आम्ही वंदितो ॥७६॥
आकळण्या जे महाकठिण । तयासी म्हणती दुर्गम । दुर्गमांमध्येही जी दुर्गम । अशी तूंचि दुर्गा ॥७७॥
जे जे दुराचार असती । सज्जना पीडाकर होती । ते ते तूं नाशिसी । अशी तूंचि दुर्गा ॥७८॥
संसारसागर भयाण । कंठी येतसे प्राण । तारणारी तयातुन । अशी तूंचि दुर्गा ॥७९॥
हे दुर्गादेवी भगवती । देसी तूं बल धन शक्ती । सकल भय निवारिसी । तुजला आम्ही वंदितो ॥८०॥
देवी सूर्य गजानन । सदाशिव अन् नारायण । पंचायतनांची अथर्वशीर्षे । जरी वेगळाली असती ॥८१॥
परी हे अथर्वशीर्ष ऐसे महान् । जपता हे एकचि जाण । लाभती फळे सकळ । पंचायतन उपासनेची ॥८२॥
हे अथर्वशीर्ष न जाणोन । करी जो प्रतिमास्थापन । न लाभे उपासनासिद्धी तया । कोटी अन्य जप करोन ॥८३॥
एकशे आणि वरती आठ । या अथर्वशीर्षाचे पारायण । ते जाणावे पुरश्चरण । तयाचे फळ अपरिमित ॥८४॥
करीता दशवार जप । नासे पाप तैसेचि मोचन । दुर्धर संकटापासोन ॥ महादेवीच्या कृपाप्रसादे ॥८५॥
सायंकाळचे अध्ययन । करी दिवसातील पापनाश । करीता अध्ययन प्रभाती । रात्रीची पापे नासती ॥८६॥
सकाळ सायंकाळी अध्ययन । करावे भक्तिभाव धरोन । तरी सकलपापनाशन । जाणावे हे निश्चित ॥८७॥
मध्यरात्र ती तुरीय संध्या । जो करी जप समयी त्या । वाचासिद्धी प्राप्त तया । नसे थारा संशया ॥८८॥
नवप्रतिमेवर करीता आवर्तन । होई प्राणप्रतिष्ठापन । तैसेचि देवता सान्निध्य । लाभेल भक्ता खचितचि ॥८९॥
मंगळवारी अश्विनी नक्षत्र । तो असे अमृतसिद्धी योग । तयावरी देवी सन्निध जप । महामृत्युही टळेल ॥९०॥
सुरगण आणि महादेवी । मायलेकरे स्वर्गलोकीची ती । तयांतिल संवादातुनी । सिद्ध हे देविअथर्वशीर्ष ॥९१॥
ऐसे हे देवी स्वरूप कथन । अविद्येचा करी नाश । ब्रह्मविद्येचे हे उपनिषद । श्रीमहादेवीस समर्पित ॥९२॥
श्रीमहादेवी मायमाउली । मायेची पाखर घाली । आम्हीही लेकुरे तुझी । ठेवी सुखी समाधानी ॥९३॥
हे देवी तंव प्रकट दर्शन । जगी या नारीरूपातून । अन्न विद्या धन बल । वरदान हे तुझेचि असे ॥९४॥
अन्नपूर्णा तूं होऊन । करीतसे भरणपोषण । शिकविण्या जीवनविद्या । होतसे तूंच शारदा ॥९५॥
जीवनचक्र ठेवण्या फिरते । अन् चालविण्या चरितार्थही । देण्या धन संपत्तीते । होतसे तूंचि लक्ष्मी ॥९६॥
दीर्घ आयुष्यप्रवाही । आपदा विपदा जंव येती । त्या त्या समयी होवूनि दुर्गा । करीसी रक्षण तूं माते ॥९७॥
ज्ञान आरोग्य संपदा । कीर्ती यश जय प्रदा । सत्कार्य आमुचे सदा । सफल व्हावे तंव कृपे ॥९८॥
देखोनि दुःखी बाळा । मातेसी येतसे कळवळा । असीम तंव ममतामाया । नसे अन्य थारा तुजविना ॥९९॥
जाणोनि तंव महिमा अगाध । शरण तंव चरणी आम्ही भक्त । तैसेचि मुद्‍गल यशवंत । ठेवी कृपा आम्हांवरी ॥१००॥
॥ श्रीमहादेविचरणार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥ तथास्तु ॥