गृहिणी, सचिव, सखी एकांती

रूथ रेन्डेल ह्यांच्या "द क्लिंगिंग वुमन" ह्या कथेचा स्वैर अनुवाद

     शेजारील इमारतीच्या बाराव्या मजल्यावर सज्जाच्या कठड्याला एक मुलगी लटकली होती. तो नवव्या मजल्यावर राहत असल्यामुळे त्याला मान उंचावून पाहावे लागत होते. सकाळचे साडे-सहा वाजले होते. विमानाच्या आवाजाने त्याला जाग आली होती. डोळे चोळत निरभ्र निळ्या आकाशात विमान शोधताना ती त्याला दिसली.
    आपण स्वप्नात आहोत असेच त्याला आधी वाटले. पहाटेचा हा प्रहर स्वप्नांचाच असतो. आपण जागे आहोत ह्याची खात्री पटल्यावर हा स्टंट असावा असे त्याने ठरवले. हे चित्रपटातील दृश्य असणार. खाली छायाचित्रकार आणि चित्रपटाचा अख्खा ताफा असणार. सुरक्षेची सारी व्यवस्था केलेली असणार. बहुधा ती मुलगीही खरी मुलगी नसून बाहुली असावी. त्याने खिडकी उघडून खाली पाहिले. कार पार्क, फरसबंद अंगण, मधला गवताचा पट्टा सारे निर्मनुष्य  होते. सज्ज्याच्या कठड्यावर बाहुलीचा एक हात हलला, कठड्याला आणखी घट्ट पकडण्याचा निकराचा प्रयत्न करू लागला. आता मात्र जे डोळ्यांना दिसत होते त्यावर विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हते. मेलोड्रामा अविश्वनीय असला तरी खर्‍या आयुष्यात अनेकदा घडतो. ती मुलगी आत्महत्या करायला निघाली होती. पण तिचा धीर सुटला होता व आता ती जिवंत राहण्यासाठी धडपडत होती. काही क्षणात हे सर्व विचार त्याच्या मनात चमकून गेले. त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला.
    पोलिसांचे आगमन व त्या मुलीची सुटका, दोन्ही इमारतींच्या रहिवाशांसाठी चर्चा व कुटाळकीचा विषय झाला. पोलिसांना त्याने कळवले होते हे कोणालातरी कळले व त्याच्या मनाविरुद्ध तो हिरो ठरला. तो एक निगर्वी, शांत, प्रसिद्धिपराङ्मुख तरुण होता. त्या घटनेचे नावीन्य ओसरू लागले, चर्चा कमी होऊ लागली, व येता-जाता लोकांचे त्याच्याकडे कौतुकाने बोटे दाखवणे कमी झाले तेव्हा त्याला हायसे वाटले.
    ह्या मेलोड्राम्याच्या पंधरा दिवसांनंतर तो नाटकाला जाण्यासाठी तयार होत असताना दारावरची बेल वाजली. बाहेर उभ्या असलेल्या मुलीला त्याने ओळखले नाही.
    ती म्हणाली, " मी लिडिया सिंप्सन. तुम्ही माझा जीव वाचवलात. मी तुमचे आभार मानायला आली आहे."
    तो अवघडून गेला. "त्याची काही गरज नव्हती. खरंच. माझ्या जागी दुसरा कोणीही असता तरी त्याने तेच केलं असतं."
    ती शांत होती. आत्महत्येचा प्रयत्न फसलेली व्यक्ती अशी असेल असे त्याला वाटले नव्हते. "पण दुसर्‍या कोणीही केलं नाही," ती बोलली.
    "या, ना, आत या. काय घेणार?"
    "नाही, नको. तुम्ही बाहेर निघालेले दिसताय. मी फक्त आभार मानायला आले होते."
    "त्यात काय एवढं?"
    "एखाद्याचे प्राण वाचवणं म्हणजे काहीच नाही? मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही."
    तिने एक तर आत यावे नाहीतर निघून जावे असे त्याला वाटू लागले. संभाषण असेच चालू राहिले तर शेजार्‍यांना ऐकू जाईल, तेही येतील, आणि पुन्हा कौतुकसोहळा सुरू होईल. "खरंच काही नाही," तो जेरीस येऊन म्हणाला. "मी ते विसरूनही गेलो होतो."
    "मी कधीच विसरणार नाही. कधीच नाही."
    तिचे शांत परंतु उत्कट वागणे त्याला अस्वस्थ करीत होते. ती लिफ्टकडे जायला निघाल्यावर त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. सुदैवाने, ती पुन्हा भेटण्याची शक्यता कमी होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती दुसर्‍याच दिवशी सकाळी बस-स्टॉपवर भेटली. ह्या वेळी त्याने तिचा जीव वाचवल्याचा उल्लेख तिने केला नाही. ती तिच्या नोकरीविषयी सांगू लागली. नोकरी नवी होती, व त्यामुळे ती त्या विशिष्ट बस-स्टॉपवर त्या वेळी उभी होती. तिचे नवे कार्यालय त्याच्या कार्यालयाजवळ होते, व ते त्याच्या कंपनीचे ग्राहक होते. दोघे एकत्र कामावर गेले. आज त्याला तिच्याविषयी काही वेगळेच वाटू लागले. ती तीस वर्षांची असल्याचे त्याला शेजार्‍यांनी सांगितले होते, पण तिच्याकडे पाहता ती त्याहून बरीच लहान वाटत होती. नाजूक, छोट्या चणीची, गोरीपान, पिंगट केसांची.
    रोज सकाळी दोघे त्याच बसने जाऊ लागले. कधी कधी ती सज्जातून त्याला हात हलवायची. एका संध्याकाळी दोघे योगायोगाने तिच्या कार्यालयाबाहेर भेटले. ती बर्‍याच फायली घरी घेऊन चालली होती, आणि त्यांचे ओझे पेलणे तिला जड जात होते. साहजिकच, त्याने त्या फायली तिच्याकडून घेतल्या व घरापर्यंत पोहोचवल्या. तिने देऊ केलेले मद्य घेतले. तिने जेवून जाण्याचा आग्रह केला. तो जेवायला थांबला. ती स्वयंपाक करीत असताना तो चषक घेऊन सज्जात गेला. तिचे हताश होऊन पहाटे तिथे येणे, आत्महत्या करण्यासाठी कठड्याला लटकणे, मग मृत्यूचा आ वासलेला जबडा पाहून घाबरून जाणे, हे सारे आठवून त्याला कसेसेच होऊ लागले. ती जेव्हा स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हा ती किती लहानखोर आणि नाजूक आहे, तिला रक्षणाची किती गरज आहे हे त्याला पुन्हा जाणवले.
    फ्लॅट स्वच्छ व नीटनेटका ठेवलेला होता. त्याच्या ओळखीच्या बहुतेक मुली घराचा उकिरडा करून राहत असत. पुरुषांप्रमाणे नोकर्‍या करणार्‍या त्या मुक्त, स्वतंत्र स्त्रियांना बायकी कामे कमीपणाची वाटत. त्याच्या आईला मात्र आपल्या घराचा अभिमान होता व त्यासाठी ती खूप मेहनत घेत असे. त्यामुळे त्यालाही स्वच्छ घर आवडे. लिडियाच्या घरचे लाकूडसामान चकाकत होते. त्याने ठरवले, पुढल्या वेळेस तिच्या चमकत्या फुलदाण्यांसाठी फुले आणायची.
    उत्तम जेवणाने व मद्याने त्याचा संकोच कमी झाला, व त्याने अचानक विचारले, "तू असे का केलेस?"
    "जीव देण्याचा प्रयत्न?" ती शांतपणे आणि सौम्यपणे बोलली, जणू काही त्याने "तू नोकरी का बदललीस?" असे विचारले असावे. "माझं ठरलेलं लग्न मोडलं. तो दुसर्‍या एका मुलीसाठी मला सोडून गेला. जगून काय करायचं, असं वाटत होतं तेव्हा."
    "आता त्यातून सावरली आहेस?"
    "हो. माझा प्रयत्न फसला ह्याचा मला आनंद झालाय. खरं सांगायचं तर, तू तो यशस्वी होऊन दिला नाहीस ह्याचा आनंद झालाय."
    "पुन्हा असं कधीही करू नकोस."
    "नाही करणार. का करेन? हा काय प्रश्न झाला?"
    हे ऐकून तो विलक्षण खूश झाला. "तुला माझ्यासोबत जेवायला आलं पाहिजे एकदा. सोमवारी नको. कधी जाऊया? अं ...?"
    "आताच ठरवायला नको काही. उद्या सकाळी भेटणारच आहोत आपण."
    तिचे स्मित अतिशय गोड होते. त्याला आक्रमक, स्वावलंबी स्त्रिया आवडत नसत. लिडिया कधीही ट्राउजर्झ किंवा आखुड कपडे घालत नसून, फुलाफुलांच्या पॅटर्नचे लांब स्कर्ट्स घालत असे. रस्ता ओलांडताना त्याने तिचे कोपर धरल्यावर ती त्याचा हात घट्ट धरून ठेवी.
    हॉटेलात तिला मेनू दिल्यास म्हणायची, "तूच ठरव."
    ती धूम्रपान करीत नसे की व्हाइट वाईनहून जास्त काही पीत नसे. तिला गाडी चालवता येत नसे. इतकी पराकाष्ठेची परावलंबी व सौम्य होती की त्याला कधी कधी प्रश्न पडे की ती एकटी राहते कशी, नोकरी करते कशी, घरभाडे भरते कशी. एकदा संध्याकाळी काम खूप असल्यामुळे तो तिच्यासोबत फिरायला जाऊ शकला नाही तेव्हा तिच्या घार्‍या डोळ्यात पाणी आले. ते पाहून तो मनोमन सुखावला. तीन आठवड्यात ती पहिली वेळ होती जेव्हा ते दोघे भेटले नव्हते. त्याला तिची इतकी आठवण येत राहिली की आपण तिच्या प्रेमात पडलो आहोत ह्याची खात्री झाली.
    त्याने दिलेला लाल गुलाबांचा भलामोठा गुच्छ, व लग्नाचा प्रस्ताव तिने स्विकारला. "हो, मी तुझ्याशी लग्न करेन. मला वाचवलंस तेव्हापासून मी तुझीच झाले आहे."
    कोणत्याही गाजावाजाविना त्यांचे लग्न लागले. लिडियाला थाटामाटात लग्न नको होते. दोघे एकमेकांना अनुरूप होते. त्यांच्या आवडीनिवडी सारख्या होत्या: शांतता, टापटीप, जुने विचार व चालीरीती, स्थैर्य, नियमित आयुष्य. त्यांची उद्दिष्टेही एकसारखी होती: वायव्येकडील उपनगरात एक घर, आणि दोन मुले. पण तूर्तास ती नोकरी करत राहणार होती.
    नवे घर ती उत्तम चालवत होती. त्याला रोज सकाळी धुतलेले, परीटघडीचे कपडे, व रोज रात्री सुग्रास जेवण मिळत होते. त्याच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावार उरला नाही. आईचे घर सोडल्यापासून त्याची एवढी काळजी कोणीही घेतली नव्हती. त्याच्या मनात आले, बाई असावी तर अशी. लुडबुड न करता कार्यक्षम, कोमल असूनही कार्यकुशल, गोड तरीही कर्तृत्ववान. दोन-चार अदृश्य व अबोल मोलकरणी दिवसभर राबत असल्यागत घर सुरळीत चालले होते.
    ही सारी कामे करण्यासाठी ती रोज सकाळी सहाला उठे. त्याने घरकामासाठी बाई ठेवण्याविषयी सुचवले पण ती तयार नव्हती. त्याचा अनादर न करता तिने अशा प्रकारे विरोध केला की तो विरघळला.
    "दुसर्‍या कुणा बाईने तुझी काळजी घेतलेली मला सहन होणार नाही, राजा."
    ती खरोखरीच परिपूर्ण होती.
    दोघे एकत्र कामाला जायचे, दुपारचे जेवण एकत्र घ्यायचे, एकत्र घरी यायचे, एकत्र जेवायचे, टिव्ही पाहायचे किंवा संगीत ऐकायचे किंवा पुस्तके वाचायचे, एकत्र झोपायचे. शनिवार-रविवारी तर ते सारा वेळ एकमेकांच्या सोबत असायचे. त्यांनी ठरवले होते की घरात वॉशर, ड्रायर, फ्रीझर, मिक्सर, वॅक्यूम क्लीनरसारख्या सार्‍या गृहोपयोगी वस्तू असायलाच हव्या, व फर्निचर एक तर चकचकीत नवे किंवा ऍन्टीक हवे. त्यामुळे दर शनिवारी ते खरेदीला जात.
    तो अतिशय खूश होता. संसार असावा तर असा. लग्नातील मंत्रांचा हाच तर अर्थ होता - दोन शरीरांचेच नव्हे तर दोन आत्म्यांचे मीलन. इतर कोणी हवेत कशाला? त्यामुळे त्याने ओळखीच्या बहुतेक सगळ्या लोकांचा सहवास सोडून दिला होता. लिडिया लोकांत फारशी मिसळणारी नव्हती. तिला कोणी मैत्रिणी नव्हत्या. त्याने कारण विचारता ती म्हणाली होती, "बायकांना फक्त आपल्या नवर्‍यांच्या कुचाळक्या करण्यासाठी मैत्रिणी हव्या असतात. माझ्या नवर्‍याबाबत माझी काहीच तक्रार नाही."
    त्याचे मित्र जेव्हा घरी यायचे तेव्हा तिच्या आतिथ्याच्या अवडंबराने व बडेजावाने, फिन्गर बोल्सनी व फ्रूट नाइव्जनी दबून जायचे. तिच्या गप्प होण्याने व वारंवार घड्याळाकडे बघण्याने नाराज व्हायचे. अर्थात, अर्धी रात्र उलटून जाईपर्यंत पाहुण्यांनी थांबणे तिला पसंत नसणे स्वाभाविक होते. तिला त्याच्याबरोबर एकांत पाहिजे हे त्यांना समजायला हवे होते. त्याचे ग्राहक व त्यांच्या बायका मात्र दबल्या नाहीत. ते तृप्त झाले असणार. कोणाच्याही मदतीशिवाय रांधलेले व वाढलेले पंचपक्वान्नांचे उत्कृष्ट जेवण त्यांना दुसर्‍या कोणत्या घरी मिळणार होते? पण त्यासाठी दिवसभर लिडियाला स्वयंपाकघरात राबावे लागले. साहजिकच जेवणानंतर ती थकलेली होती. त्यामुळे नव्या गालिच्यावर कॉफी सांडवणार्‍या माणसाला, व शनिवार-रविवारी तिच्या नवर्‍याला (स्टॅग) गॉल्फ खेळायला येण्याचा आग्रह करणार्‍याला जरा चिडून, टाकून बोलली हेही स्वाभाविक होते.                       
    "त्यांना सतत आपल्या बायकांपासून दूर राहायचं असेल तर लग्नच का केलं?", तिने विचारले.
    तो आता चौतिसचा होता.एव्हाना नोकरीत त्याला बढती मिळायला हवी होती. गेली पच वर्षे तो ह्या कंपनीत काम करीत होता व आता संचालक पदाची अपेक्षा बाळगून होता. बढतीला एवढा वेळ का लागत होता हे त्याला व लिडियाला समजत नव्हते.
    "कामाची वेळ संपल्यानंतर मी इतरांबरोबर गप्पा मारत, पीत बसत नाही म्हणून तर नसेल?", तो म्हणाला.
    "विवाहित पुरुषाला आपल्या पत्नीसोबत असावंसं वाटतं हे त्यांना कळत नाही का?"
    "मला वाटतं, मी त्या बोटीवरील पार्टीला जायला हवं होतं. पण बायकांना बोलावणं नव्हतं, आणि माझं एकट्यानं जाणं तुला पसंत नव्हतं."
    पण बढती न मिळण्याबद्दल त्याचे हे तर्ककुतर्क चुकलेले होते. काही काळाने त्याची संचालक पदी नेमणूक झाली. पगारवाढ, कार्यालयात स्वत:ची स्वतंत्र खोली, आणि एक स्वीय सचिव. इतर वेतनेतर लाभांविषयी तो काहीसा चिंतित होता. उदाहरणार्थ, परदेश वार्‍या. पण हे लिडियाला इतक्यात सांगण्याची गरज नव्हती. त्या ऐवजी, स्वीय सचिव मिळणार असल्याचे त्याने तिला सांगितले.
    "हे उत्तम झालं." दोघे बढती साजरी करायला बाहेर जेवायला गेले होते. मित्रांना पार्टी देण्याची त्याची कल्पना लिडियाला पसंत पडली नव्हती. "मला पंधरा दिवसांची नोटीस द्यावी लागेल. पण तू तेवढा थांबू शकशील नं? दिवसभर एकत्र असण्याची मजा काही औरच असेल, नाही?"
    "मी समजलो नाही," समजले असूनही तो बोलला.   
    "आज काय झालय तुला, सोन्या? अरे, माझाहून चांगली सचिव तुला कोण मिळणार?"
    त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. "आता आपल्याला मूल व्हायला हवं. तू नोकरी सोड."
    त्याचा हात हातात घेऊन, ओठांवर स्मितहास्य खेळवत ती म्हणाली, "घाई काय आहे? आपल्याला जवळ आणायला मुलांची काय गरज आहे? तू माझा नवरा आहेस, माझा मुलगा आहेस, माझा मित्र आहेस, सर्व काही आहेस. माझ्यासाठी हेच खूप आहे."
    तिला आपली सचिव बनवणे कसे बरोबर नाही हे तो सांगू लागला. कार्यालयातील राजकारण, वशिलेबाजीचे आरोप, बायकोला नोकरी दिल्यास येणारे अवघडलेपण, सारे खरे होते पण तो नीट समजावू शकला नाही.
    "आपण घरी जाऊया? बिल मागवतोस? मला घरी जायचय," ती हळू आवाजात म्हणाली.
    घरात शिरल्या शिरल्या ती रडू लागली. तो पुन्हा खुलासा करू लागला. ती आणखी रडली. दुसर्‍यांना विचारून बघ, तो म्हणाला. सगळे हेच सांगतील. एका लहान फर्मचा संचालक आपल्या पत्नीला हाताखाली नोकरीवर ठेवू शकत नाही. खोटे वाटत असल्यास तिने त्याच्या अध्यक्षांना फोन करून विचारावे.
    तिने आवाज चढवला नाही. ती कधीही बेफाम होत नसे. "तुला मी नकोशी झाले आहे," दूर लोटलेल्या मुलाप्रमाणे ती म्हणाली.
    "तू मला हवी आहेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण - तुला कसं कळत नाहीये? हे माझं काम आहे. हे वेगळं पडतं." पुढची वाक्ये बोलायला नको होती हे त्याला बोलतानाच जाणवले. "तुला माझे मित्र आवडत नाहीत म्हणून मी त्यांना सोडलं. माझ्या ग्राहकांना घरी बोलावणं बंद केलं. दिवसातून जेमतेम सहा तास मी तुझ्यापासून लांब असतो. हे सगळं तुला पुरेसं नाही का?"
    तिने वाद घातला नाही. तुला मी नकोय, एवढंच परत म्हणाली. रात्रभर रडत राहिली. त्यामुळे सकाळी कामावर जाऊ शकली नाही. त्याने दिवसभरात दोनदा फोन केला. तिचा आवाज रडवेला पण शांत होता, जणू तिने त्याचे म्हणणे स्वीकारले होते. संध्याकाळी सहा वाजता आपल्या चावीने दार उघडून आत शिरताच त्याला गॅसचा वास आला.
    ती स्वयंपाकघरात डोक्याखाली उशी घेऊन उघड्या गॅस ओवनजवळ पडली होती. चेहरा लालबुंद झाला होता.
    त्याने खिडकी सताड उघडली व  तिचे डोके खिडकीबाहेर मोकळ्या हवेत धरले. ती जिवंत आहे, तिला काही होणार नाही असे स्वत:ला बजावू लागला. ती नियमित श्वास घेऊ लागताच तो आवेगाने तिचे चुंबन घेऊ लागला, जिवंत राहण्याच्या विनवण्या करू लागला. तिला थोडेसे बरे वाटल्यावर त्याने तिला नेऊन सोफ्यावर झोपवले, आणि रुग्णवाहिकेसाठी फोन केला.
    डॉक्टरांनी तिला काही दिवस इस्पितळात ठेवले. मानसोपचारही सुचवला पण तिने तो घ्यायला नकार दिला.
    "मी वेडी नाहीये. माझ्यावर कोणाचेही प्रेम नाही असे कळल्यावरच फक्त मी जीव देण्याचा प्रयत्न करते."
    "म्हणजे तू ह्याआधीही...?"
    "मी सतरा वर्षांची असताना झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एका मुलाने मला फसवलं होतं."
    "बोलली नाहीस कधी मला," तो म्हणाला.
    "तुला वाईट वाटलं असतं म्हणून नाही सांगितलं. तुला दु:ख देण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन. मी तुझी आहे आणि मला तुला सुखी करायचय."
    आपण वेळेवर पोहोचलो नसतो तर काय झाले असते ह्या विचाराने त्याचा थरकाप उडाला. तिच्यावाचून घर भकास होते. तिची सतत आठवण येत होती, चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. त्याने ठरवले की ह्यापुढे तिला अधिक वेळ द्यायचा, तिची जास्त काळजी घ्यायची.
    तिला प्रवासाची, सुट्टी घेऊन फिरायला जाण्याची आवड नव्हती. ते कधी रजा घ्यायचे नाहीत. आपल्या घरी पाहुण्यांना फार क्वचित बोलवत. मुलंही नव्हती. त्यामुळे बरीच बचत करू शकले होते. त्यांनी राहते घर विकून नवे, मोठे घर घेतले. कंपनी त्याला तीन आठवड्यासाठी कॅनडाला पाठवत होती. त्याने जायला नकार दिला.
    कॅनडावारीची संधी एका होतकरू कनिष्ठाला गेली. नवे घर घेतल्यापासून लिडियाने नोकरी सोडली होती. ह्यावरून त्याच्या कार्यालयात अफवा पसरली की ती आजारी आहे, अपंग झाली आहे. हे त्याच्या कानी आल्यावर तो वैतागला. लिडिया पंगू? ती कधी नव्हे इतकी आनंदात होती. घरात नवनव्या वस्तू आणत होती, खोल्या विविध प्रकारे सजवत होती, बाग मनाप्रमाणे रचून घेत होती. आजारी असलाच तर तो होता. हल्ली त्याला नीट झोप लागत नसे. नैराश्याचे झटके येत होते. डॉक्टरने झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या, आणि हवापालट करण्याचा सल्ला दिला होता. काम कमी करायला, जमल्यास थोडे काम घरून करायला सांगितले होते.
    "मीच डॉक्टरांना फोन करून ते सुचवलं," लिडिया ममताळू स्वरात म्हणाली. "आठवड्यातून दोन-तीन दिवस तू घरी राहू शकशील, आणि मी तुझी सचिव म्हणून काम करेन."
    कंपनीचे अध्यक्ष तयार झाले खरे पण त्यांच्या हसण्यात तुच्छता होती असे त्याला वाटले. त्याला घरून काम करण्याची परवानगी मिळाली. तो लोकांशी फोनवरून बोलत असला तरी कधी कधी सलग चार पाच दिवस बायकोशिवाय दुसरी कोणीही व्यक्ती त्याच्या नजरेस पडत नसे. ती पत्नी म्हणून जशी आदर्श होती तशीच सचिव म्हणूनही हे त्याच्या लक्षात आले. त्याला फारसे काही करावे लागत नसे. त्याची प्रसिद्धीपत्रके तीच तयार करीत असे, त्याने मजकूर न सांगताच पत्रे लिहीत असे, येणारे फोन व्यवस्थित घेत असे, त्याच्या भेटीगाठींचे नियोजन करीत असे. काम संपल्यावर त्याला काय हवे नको ते न थकता पाहत असे. बसल्या जागी ट्रेवर जेवण देणे तिला मंजूर नव्हते. रोज दुपारी आणि रात्री डायनिंग टेबल सजवलेले असायचे. मात्र, गेल्या दोन वर्षात त्या दोघांव्यतिरिक्त ते ग्लास, ते काटे, सुरे, चमचे फक्त सहा लोकांनी वापरलेत हा विचार त्याच्या मनात आला असला तरी त्याने बोलून दाखवला नाही.
    तो आता झोपेच्या गोळ्यांबरोबर ट्रॅन्क्विलायझरझही घेऊ लागला होता. पण त्याचे नैराश्य काही दूर होत नव्हते. तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नांचा उल्लेख दोघेही करीत नसले तरी तो नेहमी त्याबाबत विचार करीत असे. आपल्याला तिच्या ह्या प्रवृत्तीची लागण तर झाली नाही ना असे कधी कधी त्याला वाटे. प्रसंगी रात्री बाटलीतून झोपेची गोळी तळहातावर घेताना सगळ्याच्या सगळ्या गोळ्या घेण्याचा खूप मोह होत असे. असे का होत आहे हे त्याला कळेना. माणसाला जे जे हवे असते ते सारे त्याला लाभले होते - आदर्श संसार, सुंदर घर, चांगली नोकरी, उत्तम शारीरिक आरोग्य, कोणतेही पाश किंवा बंधने नाहीत.
    लिडिया म्हणाली होतीच, "मुलं असती तर आपल्यावर किती निर्बंध आले असते, राजा". कुत्रा पाळुया असे त्याने सुचवल्यावर बोलली, "पाळीव प्राणी म्हणजे बंधन असतं. वर घर घाण करतात ते वेगळं." हे घर, ही गृहसौख्ये त्याला हवी होती हे त्याला मान्य होते. पण चाळिशी जवळ येऊ लागली तशी त्याला तुरुंगांची दु:स्वप्ने पडू लागली.
    एक दिवशी तो तिला म्हणाला, "तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केलास ते आता मला कळतय. म्हणजे, कोणालाही आत्महत्या का कराविशी वाटू शकते हे कळतय."
    "आपण एकमेकांना किती छान समजून घेतो. पण तो विषय नको. मी परत कधी तसे करणार नाही."
    "आणि मी आत्महत्या करणार्‍यांपैकी नाही, असंच ना?", तो बोलला.
    "तू ? " ती घाबरली नाही की त्याचे बोलणे मनावर घेतले नाही. किंबहुना, ती त्याचा एक माणूस म्हणून विचार करायची तो केवळ स्वत:च्या संदर्भात. हा विचार मनात येताच त्याने स्वत:ला बोल लावले. लिडिया? जिने आपले अवघे जीवन त्याला वाहिले होते, जी प्रत्येक बाबतीत स्वत:च्या आधी त्याचा विचार करायची? "तू कशाला करशील?," ती हसत म्हणाली. "तुला ठाऊक आहे की माझे तुझ्यावर प्रेम आहे. अन्‌ समजा, करू गेलासच तर तू मला वाचवलंस तशी मी वेळेवर येऊन तुला वाचवेन."
    त्याच्या कंपनीचा विस्तार झाला होता. ते मेलबर्नमध्ये एक कार्यालय उघडणार होते. आपली बायको अपंग नाही, आजारी नाही हे अध्यक्षांना पटवून दिल्यावर त्यांनी त्याला तीन महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जाऊन नवे कार्यालय मार्गी लावण्याची संधी देऊ केली. त्याने ताबडतोब होकार दिला. त्याचा खर्च, अर्थात, कंपनी करणार होती. घरात शिरताना तो लिडियाच्या विमान तिकिटाचा व राहण्या-खाण्याचा खर्च किती होईल ह्याचा हिशोब करीत होता. आत्महत्येचे विचार मागे पडले होते. जमेल, कसे तरी जमेल. एका नव्या देशात, नव्या माणसांत तीन महिने. मग त्याच्या कामाची स्तुती, व कदाचित पगारवाढ.
    तिने हॉलमध्ये येऊन त्याला मिठी मारली. आजही तो घराबाहेर निघताना आणि घरी परतल्यावर ती नवोढेच्या आसक्तीने त्याला मिठी मारत असे (पण बाहेर जाण्याचे प्रसंग आताशा कमी झाले होते). त्याचा अंदाज होता की ती घर सोडून ऑस्ट्रेलियाला जायला नाखूश असली तरी तिची समजूत काढता येईल. ती त्याच्यासोबत कोठेही जायला तयार आहे असे तिने अनेकदा म्हटले होते.   
    तो बैठकीच्या प्रशस्त खोलीत आला. खोली नेहमीप्रमाणे स्वच्छ व नीटनेटकी असली तरी बदललेली होती. लाल गालिच्याच्या जागी नवा पिवळसर, मुलायम, मखमली गालिचा होता.
    "आवडला?," तिने हसत विचारले. "तुला चकित करण्यासाठी गुपचुप आणला. आवडला नाही का तुला?"
    "आवडला की," तो म्हणाला. "केवढ्याला पडला?"
    हा प्रश्न तो सहसा विचारत नसे, पण आता विचारणे भाग होते. तिने सांगितलेला आकडा तिच्या ऑस्ट्रेलिया वारीच्या अंदाजे खर्चाच्या जवळपास होता.
    "घरासाठी काहीतरी घ्यायचं म्हणून आपण पैसे वाचवत होतो किनई," ती त्याच्या कमरेला आपल्या हातांचा विळखा घालत बोलली. "ही काही उधळपट्टी नाहीये. खूप टिकेल बघ हा. आणि आपल्या घरावर खर्च नाही करायचा तर कशावर करायचा?"
    त्याने तिचे चुंबन घेतले व "जाऊ दे" म्हणाला. ही उधळमाधळ नव्हती, व तो गालिचा वर्षानुवर्षे टिकेल हे मान्य केले. दोघे कोपेनहॅगेनच्या चिनीमातीच्या प्लेट्सवर जेवले. काटे,सुर्‍या,चमचे जॉर्जियन चांदीचे होते व ग्लास वॉटरफोर्डचे. त्याला ऑस्ट्रेलियाला जाणे भाग होते पण आता तिला नेणे शक्य नव्हते. तिला हे कसे सांगावे हे त्याला कळत नव्हते. त्याला भ्याडपणाने ग्रासले होते.
    आज सांगू, उद्या सांगू करता करता काही आठवडे गेले. मग त्याच्या मेंदूत एक कल्पना आली - तिला सांगायचेच कशाला? त्याला जाण्याची खूप इच्छा होती. त्याला जावे लागणारच होते. तिला न सांगता पळून का जाऊ नये? युरोपमधील विमानाच्या पहिल्या थांब्यावरून फोन करावा आणि सांगावे की अकस्मात जावे लागले. निघण्याआधी फोन करण्याचा प्रयत्न केला पण लागला नाही. तो इतक्या लांबून येऊन तिला वाचवू शकणार नाही हे लक्षात आल्यावर ती आत्महत्येचा प्रयत्न करणार नाही. आणि ती आपल्याला क्षमा करेल कारण तिचे आपल्यावर प्रेम आहे. पण ह्या योजनेत प्रत्यक्ष अनेक अडचणी होत्या. उदाहरणार्थ, सामान. असा विचार तरी कसा आला मनात? त्याचे डोके ठिकाणावर नसावे. लिडियाशी असे वागायचे? लाडक्या बायकोचे तर जाऊ द्या, अशी वागणूक शत्रूलाही देऊ नये.
    असे काही करण्याची त्याला संधीच मिळाली नाही. ती त्याची सचिव होती. माणूस बायकोपासून गोष्टी लपवून ठेवू शकतो पण सचिवापासून काही लपून राहत नाही. एअरलाइनचा तिकिटासंबंधी फोन आला व गौप्यस्फोट झाला.
    "किती दिवसांसाठी जाणार आहेस?," तिने जड आवाजात विचारले.
    "तीन महिने."
    तिचा चेहरा आजार्‍यासारखा पांढराफटक पडला.
    "मी रोज पत्र लिहीन, फोन करेन."
    तीन महिने?," ती बोलली.
    "मी तुला सांगायला घाबरत होतो. मला जायला हवं, ग. कसं समजावू तुला? तुला सोबत न्यायला शेकडो पाउंड खर्च येईल. आपल्याला परवडणार आहे का?"
    "नाही, नाही परवडणार."
    त्या रात्री ती खूप रडली. दुसर्‍या दिवशी सकाळी मात्र तिने तो विषय काढला नाही. दोघे रोजच्यासारखे नीट काम करीत होते, पण तिचा चेहरा फिकट, निस्तेज होता.काम संपल्यावर ती त्याला न्याव्या लागणार्‍या कपड्यांबद्दल व त्यासाठी विकत आणायच्या सूटकेसेसबद्दल बोलू लागली. खिन्न, एकसुरी आवाजात तिने सार्‍या तयारीची जबाबदारी घेतली, त्याने काळजी करू नये असे सांगितले.
    "मी विमानात बसलोय म्हणून तू काळजी करणार नाहीस ना?"
    काळजी करणार नाही असे ती म्हणाली खरी पण ज्या प्रकारे हसत, मान हलवत, प्रश्न हास्यास्पद असल्यागत म्हणाली त्यावरून त्याला कळले. मेलेली माणसे काळजी करीत नाहीत. तिने मरायचे ठरवले होते. तो खूप लांब असल्यामुळे ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही हा विचार किती खुळचट होता हे त्याच्या लक्षात आले.
    दिवस जात होते. त्याच्या जाण्याला एक दिवस राहिला. पण तो जाणार नव्हता. आठवड्यापूर्वीच त्याने हे ठरवले होते. पण जाणार हे तिला सांगायला जसा घाबरला होता तसा आता जाणार नाही हे अध्यक्षांना सांगायला घाबरत होता. त्याला पुन्हा तुरुंगांची स्वप्ने पडू लागली होती. जागेपणी त्याला आयुष्य भीतीदायक तुरुंगवास जाणवू लागले होते …
    दोहोतून सुटण्याचा मार्ग होता. शेवटच्या दिवशी दुपारी त्याने तो घेण्याचे ठरवले. ऑस्ट्रेलियाला जाणार नसल्याचे त्याने ना बायकोला सांगितले होते ना अध्यक्षांना. लिडियाने त्याचे सर्व सामान भरून बॅगा हॉलमध्ये ठेवल्या होत्या आणि त्याचा सगळ्यात चांगला सूट धोब्याकडून आणायला निघाली. वरच्या खोलीत जाऊन काही महत्त्वाची वस्तू घ्यायची राहिली तर नाही ते बघ असे तिने जाताना त्याला सांगितले. दार बंद होण्याचा आवाज आला.
    अर्ध्या तासाने तो वर गेला. त्याला महत्त्वाची नाही, जीवघेणी वस्तू हवी होती - झोपेच्या गोळ्यांची बाटली.
    झोपायच्या खोलीचे दार बंद होते. ते उघडून तो आत गेला. ती बिछान्यावर पडलेली दिसली. ती बाहेर गेलीच नव्हती. गेला अर्धा तास ती तिथेच पडलेली होती. तिच्या हातात झोपेच्या गोळ्यांची रिकामी बाटली होती. तिची नाडी क्षीण नसली तरी अनियमित होती. ती जिवंत होती. रुग्णवाहिनी तिला पंधरा मिनिटात इस्पितळात पोहोचवू शकेल. त्याने फोन उचलला. ती वाचणार. नशीब, ह्या वेळीही तो वेळेवर पोहोचला होता. त्याने तिच्या शांत चेहर्‍याकडे पाहिले. प्राण वाचवल्याबद्दल त्याचे आभार मानायला आली होती त्या दिवशी जसी दिसत होती तशीच आजही दिसत होती. त्याने हळूहळू, स्वयंस्फूर्तपणे फोन खाली ठेवला. त्याच्या गळ्यात हुंदका दाटला. तो दबल्या आवाजात स्फुंदू लागला. तिला आपल्या हातात धरून आवेगाने तिची चुंबने घेऊ लागला, पुन्हा पुन्हा तिला हाका मारू लागला.
    मग तो लगबगीने घराबाहेर पडला. एक बस आली. तो तिच्यात चढला आणि कुठल्यातरी दूरच्या उपनगराचे तिकिट काढले. तिथे एका अज्ञात बागेत हिरवळीवर झोपून गेला.   
    जाग आली तेव्हा अंधार पडू लागला होता. त्याने मनगटावरील घड्याळ पाहिले. पुरेसा वेळ लोटला होता. डोळ्यातील अश्रू पुसत तो उठला व घरी गेला.