उत्तराखंड पुनर्निर्माण कार्य (अंतिम)

मनोगतावर उत्तराखंड मदतकार्यामधल्या सहभागाबद्दल ब्लॉगची लिंक दिली होती. हिंदीत ब्लॉग लिहिले असल्यामुळे इथे थेट लिहिता आलं नव्हत. ब्लॉग मालिका पूर्ण झाली आहे. इथे वाचता येऊ शकेल. त्यावर एक संक्षिप्त मराठी लेख लिहिला आहे. तो इथे शेअर करू इच्छितो.

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!

ठेच
उत्तराखंडला-
धडा
सर्वांना

.
..

उत्तराखंड
इथे १६ जून २०१३ नंतर आलेल्या
भीषण पूर परिस्थितीत आणि
विनाशाच्या तांडवामध्ये
पुण्यातील मैत्री संस्थेने
सातत्याने भरीव मदत केली आहे.
मैत्रीची
पहिली टीम तिथे २१ जूनच्या
सुमारास पोहचली.
त्यानंतर
मैत्रीच्या कित्येक टीम्स
सतत तिथे जात आहेत आणि विभिन्न
भागांमध्ये मदत पोचवत आहेत
आणि पुनर्निर्माणाच्या कामाला
हातभार लावत आहेत.
अनेक
पातळ्यांवर आणि अनेक प्रकारे
हे काम निरंतर सुरू आहे आणि
आणखी काही काळ सुरू राहील.
मैत्रीतर्फे
स्वयंसेवकांच्या कित्येक
टीम्स त्यात सहभागी आहेत.
ह्या
अत्यंत महत्त्वाच्या कार्यामध्ये
मैत्री संस्थेतर्फे सहभाग
घेण्याची संधी मिळाली आणि
मैत्रीच्या कित्येक टीम्सपैकी
एका टीमसोबत प्रत्यक्ष प्रभावित
ठिकाणी जाता आलं.
ह्या
लेखातून त्या वेळी बघितलेल्या
गोष्टी समोर ठेवण्याचा आणि
मैत्रीच्या त्या टीमद्वारे
केलेल्या कामाची ओळख करून
घेण्याचा प्रयत्न करूया.
मैत्रीच्या
आणखीही टीम्स जात आहेत आणि
मोठ्या प्रमाणात काम झालेलं
आहे.
त्यामुळे
२८ जुलै ते ८ ऑगस्टमधल्या दहा
दिवसांच्या थोड्या कामाबद्दलचे
हे अनुभव म्हणजे मैत्री करत
असलेल्या कामाची फक्त झलक
मात्र आहे.
अनेक
पातळ्यांवर मैत्रीचं काम
लक्षात घेता हे कथन प्रातिनिधिकसुद्धा
म्हणता येणार नाही.
पण
तरीही तिथे बघण्यात आलेल्या
गोष्टी असाधारण होत्या आणि
म्हणून त्या टीममधील एका
सदस्याला आलेल्या अनुभवांच्या
आधारे त्यावर ह्या लेखामधून
चर्चा करूया.

मैत्री
संस्थेबद्दल

मैत्री
ही एक स्वयंसेवी संस्था आहे
आणि ती कित्येक सामाजिक
प्रश्नांवर काम करत असते.
पण
ती इतर सामाजिक संस्थांपेक्षा
एका अर्थाने वेगळी‌ आहे.
कारण
मैत्री संस्था पूर्णतः
सेवा
तत्त्वावर काम करते.
आज
कित्येक संस्था सरकारी,
खाजगी
किंवा विदेशी मदतीवर आधारित
काम करतात.
पण
मैत्री संस्था स्वयंप्रेरणेने
आणि आत्मनिर्भर राहून काम
करते.
मैत्री
संस्थेने आजवर अनेक प्रश्नांवर
काम केलेलं‌ आहे.
त्यामध्ये
एक मुख्य विषय मेळघाटमधील
आदिवासी कुपोषण,
शिक्षण
आणि विकास हा आहे.
मैत्रीतर्फे
धडक मोहीमेसारख्या उपक्रमांमध्ये
सातत्याने कित्येक कार्यकर्ते
व स्वयंसेवक मेळघाटामधील
प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत
आहेत.

त्याशिवाय
मैत्रीचं आणखी एक वैशिष्ट्य
म्हणजे आपत्ती व्यवस्थापन
ह्या क्षेत्रामध्येसुद्धा
मैत्रीने स्वतःचा
वेगळा ठसा उमटवला आहे.
फक्त
राज्यामध्येच नाही,
तर
देशाच्या कित्येक भागांमध्ये
वेळोवेळी आलेल्या आपात्कालीन
परिस्थितीमध्ये मैत्रीचे
स्वयंसेवक तातडीने पोचलेले
आहेत.
महाराष्ट्रामध्ये
अलीकडच्या काळात आलेल्या
पूरांबरोबरच गुजरातचा भूजमधला
भीषण भूकंप (जानेवारी
२००१),
तमिळनाडूमधील
त्सुनामी (डिसेंबर
२००४-
जानेवारी
२००५),
लेहमधील
ढगफुटी (ऑगस्ट
२००९)
ही
गतकाळातील काही उदाहरणे.
जेव्हा
जेव्हा अशी आपत्ती आली,
तेव्हा
तेव्हा मैत्रीचे स्वयंसेवक
तातडीने मदतीला धावले.
उत्तराखंडमध्ये
१६ जूनला झालेली ढगफुटी आणि
नंतरचा प्रलय हे मैत्रीच्या
अशा कामाचं सर्वांत अलीकडचं
उदाहरण.

सातत्याने
अशा कामांमध्ये सहभाग घेत
राहल्याने मैत्रीकडे अशा
कामासाठी आवश्यक असणाऱ्या
विशेष प्रकारच्या कार्यकर्त्यांची
फळी निर्माण झाली.
आणि
फक्त कार्यकर्तेच नाही;
तर
अशा कामासाठी अत्यंत महत्त्वाचा
असलेला बॅकस्टेज सपोर्ट.
जणू
नॉन स्ट्राईकर एंडवरून खेळणारे
दिग्गज खेळाडूच.
अशामुळे
मैत्रीकडे आपत्ती व्यवस्थापन
क्षेत्रामधल्या कामाचा समृद्ध
अनुभव तयार झाला.
मैत्री
संस्था व संस्थेची कार्यपद्धत
ह्यांचा परिचय ह्या दहा
दिवसांच्या कामामध्ये सातत्याने
होत गेला.
आधी
मैत्री संस्थेसोबत संपर्क
आलेला नव्हता.

मैत्री
स्वतःशी-
मैत्री
सर्वांशी



जणांच्या टीममधले पाच जण
पुण्यातून २६ जुलै रोजी निघाले.
एक-
दोन
जण सोडले तर कोणीही एकमेकांना
ओळखत नव्हते.
शिवाय
सर्वच जण मैत्रीसोबत आधीपासून
जोडलेले नव्हते.
पण
मैत्री स्वतःशी-
मैत्री
सर्वांशी असा संदेश देणारे
बिल्ले घातल्यानंतर लवकरच
सर्व जण एक टीम बनले.
यथावकाश
टीम लीडर सर आणि आणखी एक सदस्य
दिल्लीमध्ये टीममध्ये सामील
झाले आणि उत्तराखंडच्या दिशेने
प्रवास सुरू झाला.
मध्यरात्री
काठगोदामपासून सुरू झालेला
जीपमधून घाटाच्या रस्त्याचा
प्रवास थरारक होता.
सरांच्याच
शब्दांमध्ये हा एक मिनी ट्रेकच
होता.
तिथून
खऱ्या कामाच्या दिशेने प्रवास
सुरू झाला.
हेल्पिया
ह्या चिमुकल्या डोंगरामध्ये
वसलेल्या गावामध्ये अर्पण
संस्थेच्या परिसरामध्ये बेस
कँप बनला.
इथून
पुढचं काम सुरू होणार होतं.

मैत्रीने
उत्तराखंडमध्ये काम सुरू
करताना आधी काही ठिकाणी असेसमेंट
दौरे केले होते.
काही‌
ठिकाणी मैत्रीचे विशेषज्ञ
जाऊन आले आणि कामाची आवश्यकता
कोणत्या बाजूला सर्वाधिक
आहे,
हे
त्यांनी बघितलं‌ होतं.
त्यानुसार
जिथे सर्वाधिक मदतीची गरज
आहे,
असे
भाग निवडण्यात आले.
मीडियाच्या
बातम्यांमध्ये सर्वाधिक भर
तीर्थयात्री आणि पर्यटकांवर
असल्यामुळे उत्तराखण्डच्या
गढवाल भागामध्ये मदतीचा ओघ
जास्त होता.
केदारनाथ,
बद्रीनाथ,
श्रीनगर,
रुद्रप्रयाग
आदि स्थाने ह्याच भागामध्ये.
अर्थात
जुलै महिन्यापर्यंत इथले
रस्ते तसे बंदच होते;
परंतु
मदतीचा जास्त ओघ इथे होता.
आणि
मैत्रीच्या प्रारंभिक टीम्सने
केलेल्या असेसमेंटमध्ये
कुमाऊँ भागातल्या पिथौरागढ़
जिल्ह्यामध्येसुद्धा बरीच
हानी झाल्याचं‌ आढळलं होतं.

त्याप्रमाणे
मैत्रीने पिथौरागढ़ जिल्ह्यामध्ये
अस्कोट-
जौलजिबी-
धारचुला-
तवाघाट
परिसरामध्ये काम सुरू केलं.
त्यासाठी
अर्पण संस्थेच्या रुपामध्ये
मैत्रीला स्थानिक सहकारी
संस्थासुद्धा मिळाली.
अर्थात
त्यासाठीसुद्धा मैत्रीच्या
आरंभिक टीम्सना प्रचंड कष्ट
घ्यावे लागले.
सुरुवातीला
रस्ते फार जास्त बंद असल्यामुळे
अक्षरश :
आडवाटेने
आणि दरी-
खोऱ्यात
कित्येक किलोमीटर अंतर चालून
जावं लागलं.
कोसळणारे
कडे (Land
slides) आणि
नदीचं‌ रौरवणारं तांडव ह्यांच्या
सान्निध्यात वाट काढावी लागली.
सुरुवातीच्या
टीम्स अक्षरशः
२००
पेक्षा जास्त किलोमीटर अंतर
धोकादायक पायी रस्त्यावरून
चालून खेत,
सोबला,
कंच्योती
सारख्या दुर्गम भागांमध्ये
पोहचल्या आणि त्यांनी तिथे
मदतीचा हात दिला.
मदत
साहित्य वाटलं आणि आरोग्य
शिबिरसुद्धा घेतले.

.
..

त्या
तुलनेत २८ जुलैला पिथौरागढ़
जिल्ह्यात नेपाळ सीमेनजीक
अस्कोटजवळच्या हेल्पियाला
पोहचलेल्या टीमसाठी काही
रस्ते उपलब्ध झाले होते.
कामाचा
एक आराखडा बनला होता.
आता
आणखी काही गावांमध्ये असेसमेंट
करून पुण्यातून पाठवण्यात
आलेल्या आणि तिथे स्थानिक
पातळीवर विकत घेण्यात येणाऱ्या
सामानाचं वाटप योग्य प्रकारे
करायचं होतं.
शिवाय
आरोग्य शिबिरंही घ्यायचे
होते.
त्यासाठी
७ जणांच्या ह्या टीममध्ये २
डॉक्टरही होते.
२९
जुलैपासून अर्पण संस्थेच्या
सदस्यांसोबत काम सुरू झालं.
जौलजिबी-मुन्स्यारी
मार्गावर असलेल्या घट्टाबगड,
चामी,
लुमती
आणि गोरी गंगा नदीच्या पलीकडच्या
किनाऱ्यावर असलेल्या हुड़की,
घरूड़ी,
मनकोट
आदि गावांमध्ये असेसमेंट
केली गेली.
त्या
पाठोपाठ आरोग्य तपासणी शिबिरंही
झाले.
परंतु
इतकं‌ करणंसुद्धा अत्यंत
जिकीरीचं‌ वाटलं.
कारण
मुख्य रस्ते व नेहमी वापरात
असणारे छोटे पूल तुटल्यामुळे
अत्यंत दुर्गम आणि धोकादायक
मार्गांवरून जाणं‌ भाग होतं.
नदीच्या
अगदी वरून जाणाऱ्या डोंगरातील
पायवाटेवरून जाण्याचा आणि
एका लाकडी फळीवरून तीव्र
प्रवाह असलेला धबधबा ओलांडण्याचा
अनुभव अविस्मरणीय होता.
क्षणभर
वाटलं की आपदाग्रस्त लोकांना
मदत करता करता आपणच आपदाग्रस्त
होतो की काय.
परंतु
टीममधील सर्वांच्या सोबतीमुळे
अशा अडचणींवर मात करून काम
पुढे सुरू राहिल.

तवाघाट
परिसरामध्येसुद्धा धौली गंगा
आणि काली गंगा नद्यांच्या
संगमाच्या परिसरामध्ये प्रचंड
नुकसान झालं होतं.
गावांचा
संपर्क तुटला होता.
शिवाय
काही‌ ठिकाणी घरं क्षतिग्रस्त
झाली होती आणि लँड स्लाइडचाही
धोका होता.
त्या
भागातल्या खेला,
गरगुवा,
पांगू,
पांगला,
जम्कू
अशा गावांमध्ये असेसमेंट
करण्यात आली आणि आरोग्य शिबिरं
घेण्यात आली.
इथला
जाण्याचा मार्गही अत्यंत
दुर्गम होता.
मैत्रीसोबत
काम करणाऱ्या गिरीप्रेमी
संस्थेने लावलेल्या एका लोखंडी
पुलावरून नदी ओलांडून आणि
पुढे कित्येक तासांची उभ्या
डोंगरातली पायवाट चालून जाऊन
तिथे पोहचावं लागलं.
अक्षरशः
ही
स्थिती बघताना आधी मनामध्ये
असलेल्या कल्पना किती वरवरच्या
होत्या,
ह्याची
खात्री पटत गेली.

ह्या
टीमच्या कामाचा महत्त्वाचा
आणि शेवटचा टप्पा होता तो
म्हणजे विकत घेतलेलं‌ सुमारे
१३ टनांपेक्षा अधिक असलेलं‌
मदत साहित्य गरजू गावांमध्ये
वाटणे.
त्यासाठी
गावांची असेसमेंट पूर्ण झाली
होती.
लवकरच
स्टोअर उभं राहिलं.
त्यामध्ये
अर्पण संस्थेतील साथी आणि
शिवाय तसा थेट कामामध्ये संबंध
नसलेले ड्रायव्हर,
स्थानिक
लोक आदिंचा सहभागही महत्त्वाचा
राहिला.
पहाड़ी
माणूस आणि पहाड़ी संस्कृती
अत्यंत जवळून बघता आली.
तिथला
साधेपणा आणि एकमेकांसोबतचा
आपलेपणा बघता आला.
अर्थात्
आपात्कालीन परिस्थितीमध्ये
काही लोक लोकांच्या अडचणींचा
फायदासुद्धा घेतातच.
असे
कटु अनुभवही आले.

ह्या
टीमच्या कामातला एक महत्त्वाचा
दिवस ८ ऑगस्ट होता.
टीमच्या
कामाचा शेवटचा दिवस आणि सामुग्री
वाटपाचाही तो दिवस होता.
त्या
दिवशी हुड़की,
घरूड़ी,
मनकोट,
चामी,
लुमती
आदि गावांमधल्या गरजू परिवारांना
धान्य आणि अन्य आवश्यक
साहित्याचं‌वाटप करण्यात
आलं.
त्यानंतर
हेच काम अन्य गावांमध्ये
करण्यात येणार होतं.
त्यासाठी
टीम लीडर सर आणि अन्य एक सदस्य
तिथेच अधिक काळ थांबणार होते.
..

कामापेक्षा
सोबत महत्त्वाची

आता
मागे वळून पाहताना जाणवतं की
मैत्रीच्या ह्या टीमने
केलेलं‌काम तसं फार सामान्य
होतं.
काही
गावांमध्ये मदत साहित्य
पोहचवणे किंवा काही आरोग्य
शिबिरं आयोजित करून लोकांवर
उपचार करणे हे काम तसं लहानच
आहे.
आणि
लोकांचं‌ झालेलं‌ नुकसान
इतकं प्रचंड आहे की,
कितीही
मदत केली तरी ती कमीच पडणार
आहे.
पण
कदाचित अशावेळी कामापेक्षा
सोबत देणंच जास्त महत्त्वाचं
असावं.
जेव्हा
कोणी रुग्णालयात दाखल होतो;
तेव्हा
खऱ्या अर्थाने फक्त डॉक्टर
उपचार करत असतात आणि रुग्णाचं
शरीर स्वतःच्या
नैसर्गिक प्रक्रियेने स्वतःला
दुरुस्त करत असतं.
तरीही
मित्र आणि पाहुणे रुग्णाला
भेटायला जातात.
ते
वस्तुतः
काहीही
'मदत'
करू
शकत नाहीत.
परंतु
सोबत निश्चितच देऊ शकतात.
त्यामुळे
केलेल्या मदतीपेक्षा ह्या
टीमने तिथल्या लोकांना दिलेली
सोबत जास्त महत्त्वाची आहे,
असं‌
वाटतं.
कारण
ज्यांचं अपरिमित नुकसान झालं
आहे;
त्यांना
कोणीच काहीही मदत करू शकत
नाही,
ही‌
वस्तुस्थिती आहे.
ज्यांचं
शेत गेले;
गावच्या
गाव उध्वस्त झालं,
कुटुंबातले
सदस्य गेले;
पशुधन
गेलं,
उपजीविका
गेली;
त्यांचं‌
दुःख
अशा मलमपट्टीमुळे अजिबात
भरून येऊ शकत नाही.
त्यावर
काळ हे एक उत्तर आहे.
आणखी
उत्तरं तर नाही;
परंतु
अनेक प्रश्न मात्र हे सर्व
बघताना मनामध्ये निर्माण
झाले.

बचाव
कार्यापलीकडे-
पुनर्निर्माणातली
आव्हाने


अशा
प्रकारच्या कामासंदर्भात
अनेक जणांचा समज असतो;
की
आता (म्हणजे
जुलै-
ऑगस्ट)
सर्व
लोकांना तिथून बाहेर काढण्यात
आलेलं आहे;
आता
पूर-
पाऊसही
थांबला आहे.
मग
आता तिथे करण्यासारखं काय
आहे?
असे
समज तिथे जाताना मनामध्ये
होते.
परंतु
तिथलं चित्र अत्यंत भयावह
आणि अनेक दॄष्टीने चिंताजनक
होतं.
मनामध्ये
कित्येक प्रश्न निर्माण झाले.
त्यांच्या
उत्तरांची दिशासुद्धा कळत
गेली.

सरांनी
एकदा सांगितल्याप्रमाणे गावा
गावांमध्ये जाणे आणि मदत देणे
किंवा तिथे आरोग्य शिबिर घेणे
हा पुनर्निर्माण कार्याचा
फक्त पहिला टप्पा होता.
ह्यानंतरच्या
मैत्री टीम्सने पुढच्या
टप्प्यांवरही काम केलं.
प्राथमिक
मदतीनंतर सरांच्या मते नदीच्या
प्रवाहांच्या शास्त्रीय
अभ्यासाची गरज होती.
कारण
पहाड़ावर झालेल्या मानवी
अतिक्रमणामुळे आणि जागतिक
तपमानवाढीसारख्या कारणांमुळे
नद्यांच्या प्रवाहामध्ये
नैसर्गिक क्षमतेपेक्षा प्रचंड
मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे
त्यांच्या प्रवाहांमध्ये
मोठे बदल होत आहेत.
त्यामुळे
नद्यांचा मूळ प्रभाव बदलून
पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे
त्या सरळ रेषेमध्ये येण्याचा
प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे
साहजिक नद्यांच्या परिसरामध्ये
आणि धोक्याच्या क्षेत्रामध्ये
येणाऱ्या सर्व भागांचे
जिऑलॉजिस्टद्वारे सर्वेक्षण
करून घेणे आवश्यक आहे.
तसेच
धोक्याच्या कक्षेमध्ये आलेल्या
लोकांच्या पुनर्वसनाचेसुद्धा
असंख्य प्रश्न आहेत.
ह्या
सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने
सरकारकडे जनवकालत (advocacy)
करण्याचीही
गरज आहे.
तिथे
बघितलेल्या गावांमध्ये नया
बस्ती नावाचं‌ एक गाव काली
गंगा नदीलगत होतं.
हे
पूर्वीसुद्धा विस्थापित
झालेलं होतं.
म्हणूनच
त्याचं‌ नाव नया बस्ती होतं.
आणि
दुर्दैवाने ह्या पुरामध्येही
ते गाव उध्वस्त झालं.

काही
ठिकाणी तर अशीही उदाहरणं आहेत
की,
डोंगरातून
पाण्याचा नवीन धबधबा निर्माण
झाला आणि त्याने अख्खं‌ गाव
वाहून नेलं!
अशा
घटना खरं‌ तर ह्या महापूराच्या
सूचक होत्या.
आणि
हवामान आणि पर्वताबद्दल अभ्यास
असलेल्या लोकांना त्याचा
अंदाज होता.
शिवाय
हवामानामध्ये 'वेस्टर्न
डिस्टर्बन्स'
म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या घटनेचाही
ह्यामध्ये परिस्थितीजन्य
कारण म्हणून सहभाग होता,
असं
सरांनी सांगितलं.
ज्या
प्रमाणे चक्रीवादळ आल्यावर
प्रचंड मोठ्या परिसरामध्ये
कमी दाबाचा पट्टा निर्माण
होतो आणि शेकडो किंवा हजारो
किलोमीटर परिसरामध्ये वादळ,
वारा
आणि पाऊस असे परिणाम होतात;
त्याप्रमाणेच
वेस्टर्न डिस्टर्बन्स ह्या
घटनेमध्ये अत्यंत दूरच्या
प्रदेशातून कमी दाबाचा पट्टा
तयार झाल्यामुळे बाष्प जमा
होतं आणि त्यामुळे ढगफुटीसारख्या
क्रिया घडून येतात.
ह्यामागे
पर्यावरणामध्ये अलीकडच्या
काळात घडून येणारे बदल आहेत
आणि ते मुख्यतः
मानवनिर्मितच
आहेत.

त्यामुळे
आता हिमालयासारख्या गुंतागुंतीच्या
प्रणालीमध्ये मोठे बदल होत
आहेत.
सरांच्या
बोलण्यात आलं की,
आता
६००० मीटरपेक्षा सुद्धा जास्त
उंचीवर बर्फ न पडता पाऊसच
पडतोय.
वस्तुतः
तिथे
पाऊस पडायलाच नको.
परंतु
इतक्या उंचीवरही तपमान वाढलं
आहे.
शिवाय
जून १६ ची प्रलयंकारी घटना
घडण्याच्या जेमतेम काही दिवस
आधी बद्रीनाथ आणि हरिद्वारमधलं‌
तपमान काळजी वाटावी इतकं जास्त
होतं.
त्यामुळेच
पुढे जाऊन कमी दाबाचं क्षेत्र
निर्माण झालं.
आणि
मग नैसर्गिक क्षमतेपेक्षा
प्रचंड प्रमाणात पाऊस पडला
आणि नद्या आणि सर्वच जलसंस्थांवर
ताण आला.
साहजिक
त्यातून मोठ्या प्रमाणात
नुकसान झालं.
शिवाय
अनेक ठिकाणं असुरक्षित झाली
आणि लँड स्लाईडसारख्या घटना
झाल्या.

थोडक्यात
असं म्हणता येईल की,
मानवी
हस्तक्षेपाचा ताण हिमालयावर
मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे
आ‌‌णि इतरही घटनांमुळे
निसर्गामध्ये बदल होत आहेत
आणि त्यामुळे तिथली परिस्थिती
मोठ्या प्रमाणात बदलत आहे
आणि परिणामी कित्येक मानवी
वस्त्या आणि मानवी जीवन प्रभावित
होत आहेत.
तिथल्या
लोकांनाही ह्याची चांगली
कल्पना आहे.
एक
दिवस आपल्याला इथून जावं
लागणार हे ही त्यांनी स्वीकारलं
नसलं‌ तरी त्यांना ते कळत आहे.
अशी
बिकट स्थिती आहे की,
ते
तिथेही राहू शकत नाहीत आणि
तिथून दुसरीकडेही त्यांचं
पुनर्वसन होणं शक्य दिसत नाही.
कारण
मुळातच पर्वतीय भागांमध्ये
सपाट जागा अत्यंत थोड्या आहेत.
जर
पुनर्वसन तराई किंवा मैदानी
भागामध्ये करायचं‌ म्हंटलं‌
तरी त्यातही असंख्य प्रश्न
आहेत आणि वाट्टेल ती किंमत
देऊन जमिनी गिळंकृत करणाऱ्या
विकासकांच्या व त्यांच्या
आधीन झालेल्या सरकारच्या
कालावधीत पुनर्वसनासाठी
जमिनीला प्राथमिकता मिळेल
ही शक्यता फार अंधुक आहे.

प्रश्नांना
जणू अंत नाही,
अशी
स्थिती आहे.
रस्त्यांचीही
समस्या तशीच आहे.
जरी
बी. आर. ओ.
अविरत
कष्ट घेऊन रस्ते परत बनवत आहे
किंवा निर्माण करत आहे.
परंतु
रस्ते निर्माण करतानाही डोंगर
फोडावा लागतो आणि स्फोट करून
जागा बनवावी लागते आणि त्यामुळे
रस्ते करतानाही एका अर्थाने
डोंगराच्या संरचनेला धक्का
निर्माण होतो आणि पुढे लँड
स्लाईडचा धोका वाढतो.
असं
हे धोकादायक वर्तुळ आहे.

अर्थात
ह्या संदर्भात अधिक अन्वेषण
आणि संशोधनाची गरज आहे.
हे
सर्व बघताना जाणवतं‌ ते जुन्या
बांधकामाचं‌ महत्त्व.
पूराने
फुगलेल्या नदीने जेव्हा लोखंडी
पूलच्या पूल वाहून् नेले;
तेव्हा
उपयोगी‌ पडल्या त्या पूर्वीच्या
पायवाटा आणि त्यानुसार केलेलं‌
दगडी बांधकाम.
मोठी
बांधकामं उद्ध्वस्त झाली;
परंतु
हे पूर्वीच्या शहाणपणाने
बांधलेले रस्ते अशा वेळी
तारणहार बनले.

आणखी
एक बाजू म्हणजे सध्या लोकांची
परिस्थिती अत्यंत बिकट
झाल्यामुळे लोक जिथून कुठून
मदत येईल,
तिथून
ती घेण्याच्या मानसिकतेमध्ये
आहेत.
लोकांच्या
बोलण्यात चीनबद्दलची भिती
जाणवत होती.
परंतु
जर चीन मदत करणार असेल,
तर
लोक तीही घेण्यासाठी तयार
होतील.
अशा
वेळेस दुर्दैवाने अनेक घटक
परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी
पुढे येतात.
हळुहळु
उत्तराखंडमधील आपत्ती हे एक
मार्केटिंग साधनसुद्धा बनलं‌
आहे.
अनेक
संस्था आता त्यामध्ये नफ्याचा
विचार डोळ्यांपुढे ठेवून
उतरत आहेत.
आणि
अशा संस्था लोकांना कोणत्याही
प्रकारे आत्मनिर्भर न बनवता
जास्तीत जास्त परावलंबी
करण्याच्या विचारात आहेत.
कारण
तसं केलं‌ तरंच त्यांची
दुकानदारी तिथे सुरू राहू
शकते.
असो.

.
..

तेव्हा
प्रश्न असंख्य आहेत.
उपजीविका
आणि निसर्गाला हानी न होईल
अशा प्रकारे मानवी अस्तित्व
तिथे कशा प्रकारे सुरू ठेवता
येईल,
हासुद्धा
असाच कळीचा मुद्दा आहे.
आणि
कुठे तरी मानवी हस्तक्षेपाला
मर्यादित ठेवण्याचीही गरज
आहे.
कारण
पर्वतीय प्रदेश हा काही सामान्य
शहरी भाग नाही.
तिथे
लोकसंख्येचं‌ प्रचंड प्रमाण,
शहरी
सुख-
सुविधा,
प्रत्येक
गोष्ट शहराप्रमाणे मिळण्याचा
अट्टाहास करणं चुकीचं‌ आहे.
त्यामुळे
तिथल्या नैसर्गिक संपदेचा
शहाणपणाने वापर करण्यास
शिकण्याची गरज आहे.
उपजीविकेच्या
संदर्भात आता शेती,
रस्ते,
बाजारपेठा,
स्थानिक
नैसर्गिक संसाधने (उदा.,
पशुधन,
पर्वतीय
जडीबुटी)
बाधित
झाली असल्यामुळे निर्माण
कार्य-
बांधकाम,
रस्ता
निर्मिती आदि योजनांद्वारे
रोजगार निर्माण केला जाऊ शकतो.
रोजगार
हमी योजनेच्या तत्त्वांवर
अशा योजना चालवल्या जाऊ शकतात.
परंतु
त्यासाठी सरकारला इच्छाशक्ती
ठेवावी लागेल आणि दुर्दैवाने
सरकार बऱ्याच प्रमाणात तिथे
नफ्याच्या उद्देशाने येऊ
इच्छिणाऱ्या कंपन्यांच्या
प्रभावाखाली असणार.
शिवाय
अशा बांधकामासारख्या
कामामध्येसुद्धा परत तोच
धोका उद्भवतो की,
ते
करताना परत निसर्गाला धक्का
तर पोहचणार नाही?
अशा
प्रश्नांच्या मालिकेतून
पुनर्निर्माणाचा प्रवास पुढे
जात आहे.
मैत्री
आता ह्या टप्प्यावर कार्यरत
आहे.

ठेच
उत्तराखंडला;
धडा
सर्वांना


जरी
हा पूर उत्तराखंडमध्ये झाला
असला,
तरी
हा निसर्गाने सर्वांना दिलेला
इशारा आहे.
आज
आपण पाहतो आहोत की,
प्रत्येक
ठिकाणी निसर्गाच्या प्रतिक्रिया
येत आहेत व आपल्याला त्या
प्रतिक्रिया म्हणजे निसर्गाचा
प्रकोप आहे,
असं
वाटतं.
आपण
दैवी आपत्ती म्हणून त्यापासून
स्वतःला
वेगळं करतो.
परंतु
निसर्गामध्ये सर्व गोष्टी
एकमेकांशी जोडल्या असतात.
निसर्गामध्ये
येणाऱ्या आपत्ती ह्यासुद्धा
अशा शृंखलाबद्ध प्रक्रियांचाच
भाग असतात.
आपण
जेव्हा एक झाड तोडतो;
एखाद्या
जमिनीवर इमारत बांधतो;
तेव्हा
ही गोष्ट 'लोकल'
वाटत
असली;
तरी
व्यापक पर्यावरण प्रक्रियेमध्ये
आपण एक भेग पाडत असतो.
आणि
मुंबईमधला २६ जुलै २००५ चा
जलप्रलय किंवा अनेक ठिकाणी
नेहमी येणारी चक्रीवादळं,
पूर
परिस्थिती,
भूकंप
हे फक्त निसर्गाचे इशारे आहेत
आणि आपण छोट्या इशाऱ्यांकडे
दुर्लक्ष करत असल्यामुळे
निसर्ग मोठे इशारे देतो आहे.
मानवी
विकासपद्धतीबद्दल आणि
जीवनशैलीबद्दल त्यामुळे
प्रश्न निर्माण होतात.
नैसर्गिक
संपदांवर अत्यंत ताण निर्माण
करून आणि बऱ्याच प्रमाणात
निसर्गाचं विस्थापन करून
विकास मिळत नाही;
उलट
त्यामुळे पुढे जाऊन व्याजासह
मानवालाच विस्थापित होण्याची
वेळ येते;
हा
धडा निसर्ग देतो आहे आणि तो
सर्वांसाठीच आहे.

पर्यावरण
संस्थांच्या मालिकेतील झाड
किंवा शेतीसारखा एखादा दुवा
जरी तोडला;
तरी
त्यामुळे सबंध शृंखलेला धक्का
पोहचतो.
झाडांची
संख्या मोठ्या प्रमाणात कमी
झाल्यामुळे पर्वतांवरून
वाहणाऱ्या पाण्याला नैसर्गिक
बांध राहिला नाही;
त्यामुळे
ते पाणी अधिक गतीने पुढे जात
राहिलं.
हेच
मुंबईसारख्या शहरांमध्येही
झालं‌ आहे आणि पुढेही होऊ
शकतं.
अर्थात्
हा विचार करताना मानवी हालचालींना
सरसकट दोष देण्यात अर्थ नाही.
कारण
असंही लक्षात आलं आहे की,
तवाघाटच्या
जवळ असलेल्या एन. एच. पी. सी.
(National Hydroelectric Power Corporation) सारख्या
धरणांमुळे नदीला थोडा तरी
पायबंद बसला आणि त्यामुळे
होणाऱ्या हानीची व्याप्ती
थोडी तरी कमी झाली.
तेव्हा
असं म्हणता येईल की,
भीषण
पूर परिस्थितीसारख्या आणि
प्रदेश उद्ध्वस्त होण्याचा
धोका असलेल्या परिस्थितींच्या
पार्श्वभूमीवर प्रत्येकाने
आपली विकासाची परिभाषा आणि
जीवनशैली ह्यांचं मूल्यमापन
पर्यावरणीय हानी आणि पर्यावरणीय
स्वीकारार्हतेच्या संदर्भात
करण्याची तीव्र गरज निर्माण
झालेली आहे.
..

अर्थात्
हे सर्व होत असतानाच पुनर्निर्माण
कार्याची लढाई अजून संपलेली
नाही.
त्यामुळे
स्वतःच्या
जीवनशैली आणि विकासाच्या
परिभाषेबद्दल पुनर्विचार
करण्याइतकीच गरज त्या कामामध्ये
हातभार लावण्याचीसुद्धा आहे.
ह्या
लेखामध्ये आलेली निरीक्षणे
मैत्रीच्या फक्त एका टीमच्या
कामातून आली आहेत.
मैत्रीच्या
पुढच्या टीमसुद्धा लक्षणीय
कार्य करत आहेत.
त्याबद्दल
अधिक जाणून घेण्यासाठी आणि
पुनर्निमाण कार्यामध्ये
सहभाग घेण्यासाठी मैत्री
संस्थेला संपर्क करू शकताः

दुवा क्र. ७;
दुवा क्र. ८,
०२०
२५४०८८२.

लेखक-
मैत्री
टीम सदस्य-
निरंजन
वेलणकर

दुवा क्र. ९