यांचे काय करायचे?

   अरविंदकडे सहज डोकावलो तो नवरा बायको बराच पसारा काढून बसली होती.अरविंद पुस्तकांच्या कपाटाबाहेर एका स्टुलावर बसून कपाटातली पुस्तकं काढून त्याच्या मुखपृष्ठावरील नाव वाचून काही पुस्तकं एकीकडे तर काही दुसरीकडे टाकत होता  तर वहिनी भांढ्यांच्या पेटाऱ्यातून भांडी काढून कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला टाकत होत्या."काय चाललेय काय तुम्हा दोघांचं ?काही उद्योग नाही म्हणून तू पुस्तकांची आणि वहिनींनी भांड्यांची मोजदाद चालवलीय का?" मी त्यांच्या उद्योगात खीळ घालत म्हणालो.
"नाही रे बाबा,आता हाच महत्त्वाचा उद्योग होऊन बसलाय आता हा ब्लॉक रिकामा करायचा आहे ना ?"
"खरंच की तुम्ही आता शिफ्ट होताय नाहीका?आता काय बाबा ,तुम्ही नव्या कोऱ्या मोठ्ठ्या जागेत रहायला जाणार ,मग काय हा ब्लॉक भाड्याने देणार का ?"अरविंदच्या मुलाने नुकताच मोठा ब्लॉक घेतला होता.इतके दिवस ते दोन बेडरूमच्या जागेत रहात होते आता नातवंडे झाल्यामुळे त्याना स्वतंत्र जागा हवी म्हणून मोठा तीन बेडरूमचा ब्लॉक त्याने घेतला होता,तिकडे शिफ्ट होण्याचे काम बरेच दिवस रहातच होते,कारण नव्या ब्लॉकमध्ये तश्याच नव्या धर्तीचे फर्निचर,नव्या प्रकारचे पडदे वगैरे सर्व गोष्टी त्या ब्लॉकला शोभेशा करण्याचे काम बरेच दिवस चालले होते.त्यासाठी खास एका इंटीरियर डॅकोरेटरला काही लाख रुपये देऊन नवा ब्लॉक सजवण्याचे काम देण्यात आले होते.
   या जुन्या ब्लॉकमधील बऱ्याच वस्तू नव्या ठिकाणास शोभेशा नव्हत्या त्यामुळे आता त्यांची उपयुक्तता संपलीच होती,त्यामुळे जुना ब्लॉक भाड्याने देण्यापूर्वी "आता यांचं काय करायचं" म्हणून त्या वस्तू कोणालातरी विकून किंवा अगदी तश्याच दिल्या तरी चालेल असे प्रसाद मंजिरी (अरविंदचा मुलगा व सूनबाई) यांचे मत होते.तसे जुने बेड, लाकडी कपाट व स्टीलचेही कपाट , वॉशिंग मशीन,फ्रीज,टी,व्ही.या वस्तू काही गरजू लोकांनी पडेल किंमतीत घेतल्याही पण आता जुनी भांडी काही कोणाला नको होती व एक एक भांडे विकत बसण्याइतका वेळही कोणाला होता? त्याऐवजी एका भंगारवाल्यास ती देऊन टाकावी असे मंजिरीचे मत त्यामुळे मीराताई, अरविंदच्या सौ.त्यातील कोणकोणती भांडी भंगारवाल्यास द्यावी याचा विचार करण्यात गुंतल्या होत्या.
"यापूर्वी कधी असा प्रसंग तुझ्याव्र आलाच नाही का?"मी अरविंदला विचारले.
"आला की आणि तोही अगदी अचानक "अरविंद म्हणाला.
"त्यावेळी मी नुकताच नोकरीला लागलो होतो आणि पुण्यात एकटाच रहात होतो,आणि बाकी सगळी मंडळी आमच्या गावी रहात होती.वडील नुकतेच सेवानिवृत्त झाले होते.पुण्याला कशीवशी एक खोली घेऊन रहात होतो आणि त्या वर्षी असा काही जोराचा पाऊस आला की एक दिवशी मला तारच आली ,"House collapsed start immediately" मग काय तातडीने गावाकडे गेलो.पहातो तो काय आजोबांनी अगदी हाडाची काडे करून बांधलेलं ते मातीचं घर  त्याची समोरची भिंत कोसळली होती सुदैवाने त्या भिंतीजवळ कोणी झोपलेले नव्हते त्यामुळे कुणाला काही इजा झाली नाही पण आता मात्र गावात रहाणे योग्य नाही असे सगळ्यांचे मत पडले."
. पण आता घरच पडल्यामुळे अचानक हा निर्णय घेतल्यावर आमचे मोठे कुटुंब हालवण्याचा प्रश्न तसा मोठाच होता.आमचे घर कुटुंब या दृष्टीने मोठे होते तसे सामानही इतक्या माणसांचे म्हणजे बरेच होते.
       आमचे सामान बरेच होते आणि ते अश्या प्रकारचे होते की शहरातील घरात त्याचा उपयोग करणे जागेच्या अभावामुळे अशक्य होते.उदा:लाकडी देवघर,पितळी फुल्या बसवलेले मोठमोठे पाट ( आज त्या एका पाटाच्या लाकडाचीच किंमत सहज चार पाचशे रु.होईल असे सात आठ पाट,मोठा लाकडी चौरंग,मोठमोठे पितळी हंडे,घागरी व सगळी पितळी ताटे.एक मोठी लाकडी पेटी जिचे वजन दहा वीस किलोहूनही जास्त भरेल.या पेटीत आम्ही जुने कपडे ठेवत असू.व ज्या काळात केळींचे घड घरातील बागेतील केळींना लागत त्यावेळी ते लपवून ठेवायला तिचा वापर आई करत असे नाहीतर दादा गावातील लोकांना ते वाटून टाकत आणि आम्हा पोराना मात्र मग काही मिळत नसे.मोठे दगडी जाते व लोखंडी उखळी,पाटा वरवंटा,असे एकूण सामानाचे स्वरूप होते.आणि ते पुण्याला न्यायचे म्हणजे एकादा ट्रक किंवा छोटी गाडी तरी करावी लागली असती आणि त्यासाठी खर्च त्या सामानाच्या त्यावेळच्या किंमतीपेक्षा कदाचित जास्तच आला असता. आई बाबांचा जीव त्यांच्या भांड्याकुंड्यातही कसा गुंतला असेल ते आता कळतंय.पण त्यावेळी मला झटपट हालायचे होते आणि ट्रक वगैरे करून सामान हालवायचं म्हटले तर कदाचित त्या सामानाच्या किंमतीपेक्षा ट्रकभाडंच जास्त झालं असतं.म्हणजे निर्वासित लोक फाळणीच्या वेळी अंगावरच्या कपड्यानिशी आले तसेच आम्ही हाललो म्हटले तरी चालेल
        आमच्या सामानातील कपडे ,अंथरुणे पांघुरणे व आवश्यक कपडे सोडून बाकी सर्व सामान गावातील आमच्या नातेवाईकांकडे ठेवायचे व काही गरजूंना विकून टाकायचे असे मोठी बहीण व तिचे यजमान यांनी ठरवले व दोन दिवसात सामानाची विल्हेवाट लावून आम्ही निघण्यासाठी तयार झालो.कोठल्याच सामानात माझा जीव गुंतलेला नसल्यामुळे त्याची विल्हेवाट कशी लागली याकडेही मी लक्ष दिले नाहीमात्र माझ्या धाकट्या बहिणीस इतके चांगले लाकडी पाट ,चौरंग हे सामान अगदी फुकटातच लोकांना दिल्याचे फार वाईट वाटले.आईला तर काय वाटले याची कल्पनाच करवत नाही.वडिलांना त्या पडक्या घरातूनही बाहेर काढता काढता आम्हाला अगदी पुरेवाट झाली.त्यांच सारं आयुष्य त्या गावात गेलं होतं त्यामुळे "तुम्ही सगळे जा मी येथेच रहातो "असे ते म्हणत होते.
       आमच्या सामानाची विल्हेवाट अश्या पद्धतीने लावल्यामुळेआमचे सामान इतके कमी उरले की एस टी.बसने आम्ही गावापासून आमच्याबरोबर घेऊन येऊ शकलो व पुण्यातील त्या दोन खोल्यात कसेबसे का होईना बसवून आम्हाला वावरण्याइतकी जागाही उरली पण ती गोष्ट वेगळी होती पण आता या वस्तूंमध्ये जीव गुंतला आहे. त्याअवेळी सगळ्या वस्तु टाकून गाव सोडताना आई बाबांना काय वाटले असेल याची कल्पना आता येतेय.
   "मला वाटते आई तुम्ही फार विचार करू नका सगळी भांडी दोनशे रुपयात घेऊन जातो असं भंगारवाला म्हणालाय" मंजिरीने सुचवले. "अगं असं कसं म्हणतेस ? जरा काही कमी पडलं की यातली भांडी वापरावी लागतात. आज तू दोनशे रुपयास सगळी भांडी देशील आणि उद्या प्रशांतची मुंज निघाली आणि चार पाहुणे आले की लगेच हजार रुपयांची भांडी विकत घ्यायला निघशील आणि एकदा मुंज आटोपली की मग लगेच म्हणशील "’आता यांच काय करायचं ’"
" म्हणून माझ मत आहे की बरेच सामान याच ब्लॉकमध्ये ठेवावे एक खोली त्यासाठी आपल्याकडे ठेवावी आणि बाकीचा फ्लॅट भाड्याने द्यावा "अरविंदने आपले मत व्यक्त केले.पण त्याच्या मतास फारसा वाव होता असे दिसले नाही.
"आता पुस्तकांची काही गरज नाही ती एकाद्या वाचनालयाला देणगी म्हणून द्यावी "असे अरविंदने सुचवताच ते मात्र सगळ्यांना एकदम मान्य झाले.खरं तर मोठ्या हौसेनं अरविंद,मीरा इतकेच काय प्रशांत मंजिरी यांनीही हौसेने फ्गेतलेली जवळ जवळ १०,००० रु.पेक्षाही जास्त किंमतीची ती पुस्तकं होती पण आता नातवंडांना तर मराठी वाचनाचीच ऍलर्जी होती,प्रसादला वाचायला वेळ नव्हता,मंजिरीलाही घरकामातून किती वेळ मिळेल हे समजत नव्हते त्यामुळे पुस्तके आणि पुस्तकांचे कपाट या दोन वस्तू घरातून बाहेर काढावयास अरविंदशिवाय कोणाचीच फारशी हरकत नव्हती.
   त्यामुळे भांडी कोणती ठेवणे आवश्यक आहे हे पहायला मीरा व पुस्तके कोणती आवश्यक आहेत हे पहायला अरविंद बसले होते.प्रत्येक भांडे काढले की त्याबरोबर ते कोणी दिले,केव्हां दिले याची आठवण मीराला यायची. "हे वन्संनी प्रसादच्या मुंजीच्या वेळी दिलं ,हे मामांनी लग्नात दिलं हे काकांनी वास्तुशांतीला दिले करत तिच्या हातून ठेवण्याच्या भांड्यांचाच गठ्ठा वाढत चालला तर प्रत्येक पुस्तक उघडल्यावर "हे पुन्हा एकदा वाचलं पाहिजे ?असं म्हणत अरविंदच्या ठेवण्याच्या पुस्तकाचा गठ्ठा वाढत चालला. शेवटी विकावयाची भांडी आणि देणगी म्हणून द्यायची पुस्तके एकूण भांडी व पुस्तकांच्या १०% सुद्धा निघाली नाहीत शेवटी प्रसाद म्हणाला,
"जाऊदे आई बाबा,इतकीच भांडी व पुस्तके निरुपयोगी निघाली तर उगीचच कशाला निवड करायचीय सरळ सगळी भांडी व पुस्तके नव्या ब्लॉकमध्ये ठेवू त्यांची कपाटेही बरोबर घेऊ म्हणजे ती कुठे ठेवायची हा प्रश्नही निकालात निघाला." शेवटी प्रसादला न राहवून तो म्हणाला.
"अरे पण तूच म्हणालस ना इतकं सामान तेथे नेण्यात अर्थ नाही म्हणून ? " अरविंदने जरी प्रश्न विचारला तरी त्याने त्याचबरोबर सुटकेचा सुस्काराही सोडला हे माझ्या लक्षात आले. त्याचबरोबर यापुढे काहीदिवसांनी जर हेही घर सोडायची वेळ आली तर कदाचित आपल्याविषयीही "यांचे काय करायचे ?" असा विचार त्यांच्या मनात आला तर ? हा प्रश्नही त्याच्या डोक्यात घोंघावत असणार.