नाटाचे अभंग...३१

३०. बरवें झालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं ।
 फेडीन संतसंगती धणी । गर्जईल गुणीं वैखरी ॥१॥
 न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं ।
 झालों संताची आंदणी दासी । केला येविशीं निर्धार ॥धृ॥
 जीवनीं राखिला जिव्हाळा । झालों मी मजसी निराळा ।
 पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥३॥
 जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें ।
 ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवंडूनि* ॥४॥
 आस निरसली ये खेपे । अवघे पंथ झाले सोपे ।
 तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥५॥
 अंकिलेपणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप ।
 सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपेंआप एकाएकीं ॥६॥

 मनुष्य जन्माला आल्यानंतर स्वाभाविकपणे जीवन जगताना, कुतुहलापोटी किंवा मुमुक्षा म्हणून, आयुष्यात कुठल्या तरी क्षणी, काही तरी निमित्ताने, त्याच्या अंतःकरणात जगदीश, जगत्, जीव आणि जीवन यांबद्दल विचारांचे तरंग उठतात. मागे अनेक विचारवंतांनी या साखळीच्या कारणमीमांसेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जीव-जगत्-जीवन यांची निर्मिती करण्यामागे ईश्वरीय संकल्प, हेतु अथवा कारण काय असावे, याबाबत जे विचार केले गेले, त्याच्या अनुरोधाने, शास्त्रांचे सांगणे पाहिल्यास किंवा सत्संगातून हे निश्चितपणे समजून येते की, या जगत्-कार्याचा कुणी तरी निर्माता-नियंता असला पाहिजे आणि या कार्यामागे कुठला तरी एक निश्चित संकल्प, कुठले तरी कारण, कुठला तरी हेतु किंवा उद्देश  असला पाहिजे. संतांच्या संगतीने शास्त्रांचा धांडोळा घेतल्यास असे दिसून येते की, नानाविध योनींतून उत्पन्न होणारे जीव असून त्यांच्यातील मनुष्य योनीच अशी आहे की, जिच्यामधील प्राण्याला परम-उत्कृष्ट व अलौकिक बुद्धीचातुर्य दिले गेलेले आहे. केवळ मनुष्यदेहाच्या योगेच या कारणमीमांसेचा शोध घेता येतो. या ठिकाणी इतर पशु आदी योनीच नव्हे तर सामान्य स्वर्गस्थ देवयोनीदेखील केवळ भोगयोनी असल्यामुळे सारासार विचार करण्यास समर्थ ठरत नाहीत. हा विवेक करण्याचा अधिकार केवळ मानव योनीतच प्राप्त होतो. हा सारासार विचार ज्या अवस्थेत केला जातो, ती मुमुक्षु अवस्था.
 तुकोबारायांना मुमुक्षा अवस्था प्राप्त झाल्यावर व त्या अवस्थेतील त्यांचा प्रवास चालू असताना त्यांनादेखील जगन्नियंत्याच्या जगत्-कार्यामागील कारणाचे चिंतन घडले. त्यांच्या असे लक्षात आले की, मृत्युलोकी मनुष्यदेहाची प्राप्ती ही केवळ भगवंताला, त्या जगन्नियंताला प्राप्त करून घेण्यासाठीच आहे. मानव योनीतील जीवनाचा एकमेव उद्देश स्व-स्वरूपाची प्राप्ती करून घेणे, हाच आहे. अंतःकरणात असा निश्चय दृढ झाल्यानंतर सहजपणे आपल्या मनातील सुविचाराने ते सुखावले (बरवें झालें लागलों कारणीं) आणि तदनुकूल पुढील साधना करण्यासाठी तुकोबारायांनी अनन्यपणे उपास्याच्या चरणांचा आश्रय घेतला. त्यांनी आपले अंतःकरण भगवंताच्या चिंतनातच गुंतविले, बांधून ठेवले असे म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनात दुसर्‍या विचारांना थारा राहिला नाही (आतां कोठे धांवे मन । तुमचे चरण देखलिया ॥). अनन्यपणे ते आपल्या उपास्याला शरणागत झाले असताना त्यांचा जीव आणखिन् सुखावला तो यासाठी की, आपल्याही अगोदर अनेक मुमुक्षुंनी या प्रभुचरणांचा आश्रय घेऊन त्या ठिकाणी ते स्थिरावले आहेत. या संतांच्या संगतीने तुकोबाराय आपली धणी फेडणार आहेत. (येथे ‘धणी’ पुरवून किंवा साधून घेईन असे ते म्हणत नाहीत. म्हणून ‘धणी’ या शब्दाचा येथे ‘हौस’ असा अर्थ घेता येईल. प्रारंभीच्या अवस्थेत एखादी नवी गोष्ट करण्याची हौस असते. ती आवडीत रूपांतरीत झाली की मग वृत्ती बनते. त्यानंतर तृप्तीची अवस्था येते.) ज्या वैष्णवांचा संग त्यांना लाभला, ते सारे नामघोष, कीर्तन यात आवड असणारे आहेत. त्यांच्या संगतीत त्यांच्याकडून जे उमगणार आहे, ते म्हणजे भगवंताचे रूप-गुणादींचे वर्णन. तुकोबाराय म्हणतात, त्यांची वाणी (वैखरी), जी आजपर्यंत निष्फळ बोलण्यात गुंतली होती, तिला आता भगवंताचे गुण मोठ्याने गाण्यात गुंतवीन. येथे तुकोबाराय ‘गर्जईल’ असे पद योजतात. गर्जना करण्यामागे विशिष्ट संकल्प, निःसंकोचपणा, निर्भयता असते. भगवत्भजनात असा भाव अपेक्षित आहे, असे यातून ते सुचवितात. संकीर्तनामध्ये भगवंताच्या गुणांचे म्हणजेच रूप-गुण-नाम-धाम-लीला-काम आदींचे वर्णन सामावलेले आहे.
 तुकोबाराय पुढे म्हणतात, ‘न वंचे शरीर सेवेसी’. संतांच्या मेळ्यामध्ये आणि तेथील वातावरणाने तुकोबारायांचे शरीर आणि मन पुलकित झाले. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात शिगेचा उत्साह निर्माण झाला. परिणामी देहभानरहित होऊन काया-वाचा-मनाने ते संकीर्तनात सामील झाले. त्यांच्या शरीराने मनाच्या आज्ञेची वाट न पाहता स्वयं सेवेत झोकून घेतले. भगवंताची सेवा म्हणजे त्याचे संकीर्तन. शरीराचे कोणतेही अंग या सेवेपासून वंचित राहिलेले नाही. ही सेवा करताना ‘मनासहित पालटली काया’ अशी अवस्था तुकोबारायांना प्राप्त झाली. आनंदाची प्राप्ती झाली, अहंपणाची जाणीव निमाली आणि मग त्यांनी स्वतःला पूर्णतः संतांच्या स्वाधीन करून टाकले (झालों आंदणी दासी). संतांची ‘आंदणी दासी होणे’ म्हणजे केवळ देहाने पडेल ते काम करण्यासाठी तयार असणे असे नव्हे. संतांची तशी अपेक्षा कधीच नसते. संतांचा सहवास अखंड लाभून त्यांच्या उपदेशाचे अमृत मिळावे, यासाठी आयुष्य वेचणे, हे संतांचे दास्यत्व... त्या उपदेशाचे निष्ठेने अनुगमन करणे, हे संतांचे दास्यत्व. तुकोबाराय या विषयी त्यांनी निर्धार केल्याचे सांगतात. हे लक्षात ठेवले पाहिजे की, शिष्य असो वा सेवक, भक्त, तो जितका महान् होऊन सिद्धी पावतो, तीच त्याच्या गुरूची वा धन्याची महानता असते.
 तुकोबारायांनी संतांचे दास्यत्व स्वीकाल्यानंतर त्यांच्या अवस्थेविषयीचे त्यांचे पुढील निवेदन हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. अभंगाच्या तिसर्‍या चरणाच्या रचनेत ‘होतो’ हे क्रियापद अध्याहृत धरता येते. त्यामुळे तुकोबारायांना ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वीची त्यांची स्थिती आणि त्यानंतरची स्थिती या दोन्हींचे वर्णन त्यांनी केले असल्याचे दिसून येते. ‘जीवनीं राखिला (होता) जिव्हाळा । झालों (होतो) मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥३॥ या चरणात तुकोबारायांना प्राप्त झालेल्या अवस्थेची तुलना करताना ते आपल्या गतायुष्यातील जीवनाचा आढावा घेत असल्याचे दिसते. आयुष्य कंठित असताना देहभानात राहून जीवनाबद्दल जीव आसक्त झालेला होता. त्यात जिव्हाळा जोपासल्यामुळे ‘कणभर सुख-मणभर दुःखाच्या’ ऊर्मी जीवाला त्रस्त करीत होत्या. खोट्या अहंभावाने चित्ताला घेरून टाकल्यामुळे, ‘जो खरा मी’ त्याच्यापासून दूर भरकटलो होतो, निराळा झालो होतो. हे शरीर, जे केवळ पंचमहाभूतांपासून निर्मित आहे, नश्वर आहे, त्यालाच ‘मी’ समजून सारे व्यवहार पार पाडले जात होते. नको ते उद्योग करणार्‍याची निंदा करताना तुकोबारायांनी अन्यत्र म्हटले आहे, ‘तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥’  दास्यत्व-पत्करानंतर तुकोबारायांना कोणती दशा प्राप्त झाली, तेही याच वर्णनातून प्रकट होते. ते म्हणतात, ‘जीवनीं राखिला जिव्हाळा’. ‘राखिला’ म्हणजे, पूर्वी जसा होता तसाच राहिला. त्यांच्या निवेदनातला पुढील भाग वर्णन करताना ते म्हणत आहेत, ‘जीवनाबद्दलचा जिव्हाळा आताही माझ्या मनात आहे. तथापि, आता स्व-स्वरूपाची जाणीव झाल्यानंतर त्यावेळच्या देहभानातील ‘मी’पासून आता माझ्यातला ‘खरा मी’ वेगळा झालेला आहे. शरीर हे नाशवंत आहे, पंचभूतांचा तो केवळ पुतळा मात्र आहे. त्याबद्दलची आसक्ती माझ्या मनात आता राहिलेली नाही. रोजच्या प्रापंचिक व्यवहारात हे शरीर सार्‍या क्रिया पुतळ्यावत्, कोणत्याही प्रकारे लिप्त न होता, सहजतेने पार पाडीत आहे. आता संतांची संगत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने भगवंताची सेवा हेच माझे खरे जीवन आहे आणि त्यातच मला स्वारस्य आहे.’
 तुकोबारायांच्या निवेदनाचे हे वैशिष्ट्य पुढील चरणातही दिसून येत आहे. (* या चरणातील ‘भेवंडले’ यात तीन पाठभेद दिसतात. ‘भेवंडले’ हे पद कर्‍हाडकर संपादित गाथेत आहे. मात्र या शब्दाचा शब्दकोषीय अर्थ सापडला नाही. दुसरा पाठभेद ‘भोवंडले’ असा आहे, तो शब्द राहिरकर संपादित ‘सकल संत गाथा’ या ग्रंथात तसेच अन्य एका गाथेत आहे. त्याचा अर्थ भोंवळ, चक्कर येणे असा दिला गेला आहे. तिसरा पाठभेद ‘भोवहूनी’ असा असून पडवळ संपादित गाथेत, देहू-संस्थान गाथेत तसेच डॉ, प्र. न. जोशी यांच्या सार्थ गाथेत वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ डॉ. जोशी यांनी दिल्याप्रमाणे ‘दूर काढून’ असा आहे. हा पाठभेदही शब्दकोषीय दिसत नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या ‘मराठी शब्दकोश, खण्ड ५ (प ते म)’ यातही भेवंडुनी किंवा भोवहुनी हे दोन्हीही शब्द मिळाले नाहीत. त्यामुळे एकंदरीत अभंगाचा पोत लक्षात घेऊन ‘भोवंडूनी’ हेच पद ग्राह्य धरले आहे. ते सहाय्यक क्रियापद असल्याने त्याचा संबंध ‘राखियले’ या क्रियापदाशी येत आहे.) आपले निवेदन पुढे सुरू ठेवीत तुकोबाराय म्हणतात, ‘यथार्थ ज्ञान नसल्यामुळे हा देह आणि देहसंबंधी (नात्यागोत्याची व इतर माणसे) यांच्या विषयी ज्याला ज्याला ज्याची ज्याची इच्छा होईल, ते मिळवून द्यावे, त्यांची आस पुरवावी, त्यांनी जे इच्छिले ते सारे त्यांना लाभावे, हाच भाव मनात होता. त्यासाठीच भ्रमित होऊन जीवाचा आटापिटा करणे चालू होते. यातून खोटा अहंभाव मात्र जोपासला जात होता. खरी जाणिव होईपर्यंत त्या भ्रमित (भोवंडल्या) अवस्थेत देवाचा पूर्णपणे विसर पडला होता.’ याच निवेदनातून तुकोबारायांचा असाही भाव व्यक्त होत आहे की, ‘संत संगतीत जी खरी जाणिव झाली, त्यानंतर अंतःकरणातला भाव उदात्त झाला. ज्याचे जे ईप्सित असेल, त्याचा लाभ त्याला व्हावा, हा भाव मनात रुजला. (ज्ञानोबा माऊलीही पसायदानात ‘जो जें वांछिल तो ते लाहो’ असे म्हणतात.) त्याच भावाचे जीवापाड जतन केले. पूर्वी ज्या भ्रमित अवस्थेत वर्तन केले जात होते, त्यातून देवाने आता सुखरूप केले आहे.’ इथे हे लक्षात घ्यावयास हवे की, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याचा लाभ व्हावयाचा आहे, तो होतच असतो. त्यानुसार प्रत्येकाचे जीवन फळ देत असते. प्रारब्धाच्या पुढे जाऊन हव्यास धरणे, हा ‘आकाशाचे फूल’ तोडण्याचा वायफळ प्रयत्न करणे ठरते. त्यात अनमोल आयुष्याचा नाश होत राहतो. हा प्रमाद आपल्याकडून घडू नये, म्हणून देवाने त्याच्या कृपाकटाक्षाने आपल्याला परावृत्त केले, असे तुकोबारायांना अभिप्रेत आहे, असेही म्हणता येईल.
 तुकोबाराय पुढे स्वानुभूती सांगताना म्हणतात, ‘ये खेपे’. अनेक योनींतून भटकत, भोग भोगीत, मनुष्य योनीपर्यंत पोहोचला आहे.  या योनीत राहून किती जन्म भोगले, हे माहित नाही. या जन्मी मात्र, वायफळ प्रयत्नांमुळे हतोत्साहित झाल्यामुळे, त्या विचारातून बाहेर पडून त्यांना स्वहिताचे विचार सुचले आणि ते साधनमार्गाकडे वळले. मनुष्य देहाला आल्यानंतर उचित कल्याण साधण्यासाठी याच देही जागृतपणे प्रयत्न करणे योग्य होईल, अशा विचाराच्या प्रभावाने ते पुढील मार्गक्रमणा करू लागले, तेव्हा सारे मार्ग सुपंथ झाले, ते सोपे वाटू लागले. ते मार्ग सोपे करण्याचे श्रेय दीनबंधु असणार्‍या संतांना आणि पर्यायाने भगवंतास तुकोबाराय देतात. सामान्य मनुष्य कुटुंबवत्सल असतो. देव हा भक्तवत्सल असतो तर संत मात्र दीनवत्सल असतात, हे तुकोबारायांना उमगलेले आहे. या अवस्थेप्रत आल्यानंतर, विचारांची शुद्धी झाल्यानंतर, तुकोबाराय सांगतात की, या संतांच्या संगामुळे आणि भगवंताच्या कृपेने त्यांना अपूर्व सत्तेचा लाभ झाला आहे आणि आता अन्य विचार या सत्तेपुढे भयभीत झाले आहेत, हतबल झाले आहेत.
 अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय म्हणतात की, दीनबंधू असणार्‍या संतांचा मी अंकित झालो आहे. अंकित झालो, हे म्हणण्यामागे तुकोबारायांच्या अंतःकरणात परावलंबित्वाचा, पराधीनतेचा भाव नसून ‘अंकावर’ म्हणजे मांडीवर बसणार्‍या बालकाच्या मनात जो बालसुलभ लडिवाळपणा असतो, जो निश्चिंतपणा असतो, जी अभयता, जी आश्वस्तता असते, आणि ज्याच्या मांडीवर ते बालक बसले आहे, त्याच्या मनात जे वात्सल्य असते, तो भाव आहे. तेथे दोघांच्याही मनात आनंदाला उधाण आलेले आहे. तेथे पाप-पुण्याच्या भावनांचा स्पर्शही होऊ शकत नाही (आतळों न ये), मग त्यांचा भोग दूरच. ही आनंदावस्था नित्य असावी, असे वाटत राहणे स्वाभाविकच असते. या अवस्थेत कोणतेही संकल्प मनाला विचलित करीत नाहीत. आता जाणतेपण आलेले असले, तरी सारे शुभाशुभ कार्याचे संकल्प दूर ठेवलेले आहेत. त्यामुळे साहजिकच विकल्पांचे तरंगही मनात उठत नाहीत. तुकोबाराय सांगतात की, हा सारा इष्ट बदल आपोआप, आपल्या आपणच, माझ्या कोणत्याही सहेतुक प्रयत्नांशिवाय एकाएकी झाला आहे. (एकाएकीं हा संयुक्त शब्द येथे योजलेला आहे, त्यामुळे तो कालवाचक आहे. या पदाचा विग्रह ‘एका’- ‘एकी’ असा केल्यास ‘एकात एकाने परिवर्तित होणे’, असा अद्वैतबोधक अर्थ जरी घेता येत असला तरी या अभंगातील पूर्व निवेदन पाहता इथे तुकोबारायांना ती अवस्था अभिप्रेत नसावी, असे दिसते.) अर्थात् त्याचे श्रेय संतांच्या संगतीला आणि भगवत्कृपेला देण्याचा भाव तुकोबारायांच्या मनात आहे.    
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)