नाटाचे अभंग ... भाग ३२

३१. अवघ्या दशा येणेंचि साधती । मुख्य उपासना सगुणभक्ति ।
 प्रगटे हृदयींची मूर्ति । भावशुद्धि जाणोनियां ॥१॥
 बीज आणि फळ हरीचें नाम । सकळ पुण्य सकळ धर्म ।
 सकळा कळांचें हें वर्म । निवारी श्रम सकळही ॥धृ॥
 जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास ।
 सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥३॥
 येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें ।
 आपणचि येती तयाचें गुणें । जाणें येणें खुंटे ये वस्तींचें ॥४॥
 न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म ।
 आणिक न करावे श्रम । एक पुरें नाम विठोबाचें ॥५॥
 वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य ।
 मुक्त आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हां ॥६॥
 
  परमार्थ साधन करीत असताना साधकास त्याच्या अंतर्बाह्य अवस्थेमध्ये विशिष्ट प्रकारचे विविध बदल घडून येत असल्याचा अनुभव येत जातो. विचारांच्या प्रक्रियेतील बदल, चेहर्यावरील प्रभा वाढणे, आचारातील बदल, खाण्या-पिण्याच्या सवयीतला बदल अशा प्रकारचे ते बदल असतात. एकंदरीत पाहता असे म्हणता येते की, साधकाचे अंतःकरण सात्त्विकतेकडे झुकू लागते. पारमार्थिक भाषेत ज्या अवस्थांना ‘दशा’ म्हटले जाते, त्या म्हणजे विषयी (विषयात गुंतलेला), जिज्ञासू, साधक, मुमुक्षु व सिद्ध. प्राप्त होणार्या या दशा विचारात घेतल्यास साधकाच्या मार्गक्रमणात क्रमाक्रमाने घडणारी प्रगती (मंत्र-तंत्र, योग वगैरे साधनातील चुकांमुळे कधी कधी होणारी अधोगती) जाणता येते. यात बाह्य बदल आनुषंगिक असले, तरी अंतःकरणात होणारे बदल महत्त्वाचे असतात. सुयोग्य अवस्थांतर प्राप्त होणे साधकासाठी आवश्यक असते. त्याशिवाय त्याच्यात होणारी प्रगती जाणता येत नाही.
 प्रस्तुत अभंगात तुकोबाराय स्वानुभवपूर्वक कथन करतात की, ‘अवघ्या दशा येणेंचि साधती’. ‘येणेंचि’ या पदातून असे दिसते की, तुकोबारायांनी कुणाच्या तरी पृच्छेला दिलेले हे स्पष्टीकरण आहे. ईश्वरप्राप्तीचा खात्रीचा मार्ग कोणता? अशा प्रश्नाचे उत्तर येथे आहे. असेही म्हणता येईल की, कुणी सनातनी वैदिकाने म्हणा वा कुणी योग्याने म्हणा, त्यांच्या मार्गाचे समर्थन करीत तुकोबारायांच्या प्रतिपादनाला घेतलेल्या आक्षेपांना दिलेले हे सडेतोड उत्तर आहे. काहीही असो, विषयी-जिज्ञासू अवस्थेतील व्यक्तींना, ज्यांच्या मनात साधनमार्गाविषयी संभ्रम आहे, त्यांना तुकोबारायांनी ‘च’कारात्मक उत्तरातून दाखविलेला निश्चित, एकमेव, खात्रीचा, सर्वांना सुलभ नि सोपा असा एकमेव मार्ग या अभंगातून व्यक्त होत आहे. जो विषयी होता, त्याचे क्रमाक्रमाने होणारे अवस्थांतर केवळ सगुण भक्तीनेच खात्रीने होते, असे तुकोबाराय येथे स्पष्ट करीत आहेत. उत्तरोत्तर दशा प्राप्त होण्यासाठी उपास्याच्या कृपेला उपासक पात्र झाल्यानंतर क्रमाक्रमाने उपासकात आध्यात्मिक प्रगती घडून येते आणि प्रचितीत्रयामधील सर्वात महत्त्वाची असणारी आत्मप्रचिती त्याला प्राप्त होते. ती अशी की, सर्व भूतांच्या हृदयात वास करणारा परमात्मा साधकाच्या अंतःकरणात प्रगट होऊन त्याला तशी अनुभूती येऊ लागते. (तुकोबारायांचे शिष्य श्रीनिळोबाराय यांनी एका गौळणीत म्हटले आहे, ‘नाना साधनांच्या केलिया खटपटा । त्या त्या न पावती वो याच्या दारवंटा ॥’ पुढे त्यांनी ज्ञानमार्ग, यज्ञयाग, तप, तर्क, तीर्थाटन, मंत्रसाधन, दानधर्म, तन्त्रादी साधनांची व्यर्थता सकारण स्पष्ट केली आहे.) या ठिकाणी तुकोबाराय हेही सांगतात की, सगुण उपासना करीत असताना अंतःकरणात होत जाणारी भावशुद्धी उपास्य जाणते नि साधक पात्रतेला पोहोचला की, हृदयातील मूर्ती प्रगट होते. परमार्थामध्ये उपास्याला प्राप्त करून घेण्यासाठी साधनाचा आत्मा म्हणजे साधकाच्या अंतःकरणातील भाव होय. साधनाचे हे मर्म सांगताना अन्यत्र तुकोबारायांनी म्हटले आहे, ‘भावचि कारण भावचि कारण । मोक्षाचे साधन बोलियेलें ॥’. साधकाच्या मनातील भाव अंतस्थ ईश्वराला वेगळा सांगण्याची आवश्यकता नसते. उपास्य स्वयं साधकाच्या मनातील तळमळ, कळकळ, निष्ठा, समर्पण आदी सारे जाणत असते व त्यानुसारच साधकाला प्रचिती येत जाते.
 अनेकविध साधनांचा उल्लेख शास्त्रांमध्ये केला गेला आहे. रुचिवैचित्र्यानुसार त्यातील एखादे साधन साधक निवडतो खरा, परंतु काही साधने अतर्क्य, दुष्प्राप्य, काहींच्यामध्ये नाना प्रकारची संकटे तर काही साधने अनाकलनीय ठरणारी असतात. अशी साधने सर्वांना, सर्वदा करणे सुलभ नसते. (योग साधला नाही तर रोग मागे लागतो, ध्यानधारणेत चित्ताचे दृढीकरण होणे कठिण असते, मंत्र-तंत्र अनाकलनीय, दुष्प्राप्य असतात वगैरे). साधारणपणे विचार केल्यास, प्रत्येक साधकाला साधनात कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची त्रुटी आढळून येते, ज्यामुळे कित्येक वेळा उपाय होण्याऐवजी अपाय होण्याचा धोका असतो व त्यातून साधकाचे पतन होणे, तो पथभ्रष्ट होणे संभवते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन, जे साध्य आहे, त्याच्या प्राप्तीसाठी सर्व साधनांचे सार म्हणून तुकोबारायांच्या असे ध्यानात आले की, हरीच्या नामाव्यतिरिक्त इतर सर्व साधने व्यर्थ ठरतात. इथे हे लक्षात घ्यायचे की, अन्य कोणतेही साधन असो, विधी आणि निषेध हे साधनाचे दोन डोळे आहेत. ते उघडे ठेवूनच ते ते साधन करावे लागते. सगुण भक्ती ही मात्र विधी-निषेधरूप दोन डोळे झाकूनही साधता येते. यासाठी हरिनाम हे एकच साधन असे आहे की, ते साधकामध्ये साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायाभूत आहे, तसेच ते अंतिम साध्यही आहे. ते साधकामध्ये उचित योग्यता निर्माण करून त्यास उपास्याच्या कृपेस पात्र करवून देते व साध्याची प्राप्ती निश्चितपणे होते. साधकाच्या पथभ्रष्ट होण्याचा मग प्रश्नच उद्भवत नाही. अलौकिक आणि अत्युत्तम असे हरिनाम हे परमार्थ साधण्यासाठी प्रथम केवळ नाममात्र असलेले ‘बीज’ असून ते साधकास प्रगतीसाठी सहाय्यभूत होते आणि ते बीजच पुढे फळ रूपात परिणत होते, म्हणजेच, ते नाम ज्याचे आहे, ते उपास्य दिव्य नाम-रूपासह मूर्त स्वरूपात प्रगट होते, तेच फळ असते. मनुष्य जी साधना करतो, ती साधारणतः सुख प्राप्तीसाठी, निःश्रेयस् अभ्युदयासाठी किंवा योगी ज्याची इच्छा करतात त्या ‘सतरावीचे स्तन्य प्राशन’ करण्यासाठी (किंवा सतरावी कळा जिच्या प्राप्तीतून अमृतस्त्राव होतो, त्या अमृताचे सेवन करण्यासाठी). यातील सुखाला पुण्यकर्म कारण असते, अभ्युदयासाठी यज्ञऱ्यागादी कारण असतात तर सतरावीचे स्तन्य प्राशन करण्यासाठी खडतर तपऱ्योगसाधन कारण असते, असे शास्त्रांचे सांगणे आहे. ही सारी कर्मे आचरताना श्रमांचा सामना करावा लागतो. तुकोबाराय सांगतात की, या सार्या श्रमयुक्त कर्मांचे वर्म केवळ हरिनाम आहे. तेच सारे श्रम निवारण करते, किंबहुना यात श्रम न होता देहास सहजसुखाचीच प्राप्ती होत असते. ‘कळा’ या शब्दाने कौशल्याचाही बोध होतो. प्रपंच असो वा परमार्थ, दोन्हींसाठी तात्त्विक अशा कुशल बुद्धीचे महत्त्व आहे. परंतु व्यवहारात सामान्यतः जीव स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी, प्रसंगी इतरांचे नुकसान करूनदेखीलसुद्धा, आपल्या कौशल्याचा वापर करीत असतो. समर्थ रामदासस्वामी हे तुकोबारायांचे समकालीन आणि त्यांच्या संपर्कातील संत होते. त्यांच्यात वैचारिक चर्चा होणे स्वाभाविक होते. रामदासस्वामींचे परमार्थ साधकांना बोध करणारे एक वचन आहे की, ‘वेश असावा बावळा । अंगी असाव्या नाना कळा ॥’ परमार्थ साधकाला परमेश्वराने बहाल केलेल्या कळांचा म्हणजेच कौशल्याचा उपयोग आपले तसेच इतरांचे आत्यंतिक हित करण्यासाठीच करावा, असा इथे संकेत आहे. परमार्थ हा काही निर्बुद्ध माणसाचे काम नाही. मनुष्याच्या ठिकाणी भगवत्कृपेने प्राप्त झालेल्या बुद्धिचातुर्याचा विवेकपूर्ण विनियोग करीत आपले साधन साधण्यासाठी करावा. बीज आणि फळ स्वरूपात असलेले हरिनाम इतर प्रयासयुक्त साधनांची व्यावृत्ती करते म्हणजे इतर साधनांतून होणारे वायफळ श्रम, त्यांचेही शमन करते. लोण्यातून प्राप्त झालेले साररूप तूप हाती आले की, ते तूपच, श्रम मग ते कुठल्याही कारणाने झालेले असोत्, सारेच श्रम हरण करणारे व शरीरास बल-पुष्टीदायक ठरते.
 प्राथमिक अवस्थेतील विषयी किंवा जिज्ञासू् अवस्थेतील माणसांना तुकोबाराय हरिनाम साधनाची ओळख करून देतात. सगुण भक्तीचा अवलंब करण्यास प्रथम अशा स्थानी प्रवेश करण्यास ते सांगतात, जिथे नामघोष-नामसंकीर्तन चाललेले असेल. हे सांगितल्यानंतर ते नामसंकीर्तनाचे माहात्म्यही उपदेशितात, जेणे करून महत्लाभ पदरी पडतो. हे संकीर्तन-नामघोष असा चाललेला असावा की, त्यात सहभागी झालेले भाविक बेभान होऊन, देहभान विसरून, रंगलेले आहेत. असे करण्याचे मुख्य कारण हे की, तेथे प्रवेश करणार्या नवख्या माणसावरही त्या भाविकांच्या भावपूर्ण अवस्थेचा परिणाम होऊन त्याच्या बुद्धीत इष्ट बदल होतो नि त्यालाही त्या रंगात न्हाऊन निघावेसे वाटू लागते. अप्रत्यक्षरित्या तोही जाणतो की, लौकिक मतांचा, म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार न करता, निःसंकोचपणे नामघोष केल्याशिवाय त्यातील निर्भेळ आनंद उपभोगता येत नाही. भाविक जोवर या अवस्थेत असतो, तोवर तरी तो देहातीत झालेला असतो. तुकोबाराय पुढे सांगतात की, देहभानरहित रंगलेल्या अवस्थेत केवळ एकाच रसाचे रसपान घडत असते. इतर सारे रस केवळ आनंदाने ओथंबलेले, थबथबलेले असतात. (उपनिषदांचे सांगणे आहे, ‘रसो वै सः’, ईश्वर खरोखरच रसरूप आहे. अर्थात् यात सर्व रसांचा - नवरसांचा - अंतर्भाव आहे आणि आनंद हा रसांचा राजा आहे.) अंतर्बाह्य स्वरूपात, मुखातील स्वाद रूपात व डोळ्यातील अश्रू रूपात, हा रस स्त्रवत राहतो. त्या रसाची प्रत्यक्ष अनुभूती भाविकास आल्याशिवाय राहात नाही. सालरूपी बाह्यावरण (लोकलज्जा) नि आतला बाठ (संकोचाची गाठ) हे दोन्हीही दूर झाल्यानंतर केवळ रसच शिल्लक राहातो नि मग रसपान बिनदिक्कत करता येते, हा आपला व्यवहारातला अनुभव आहे. भक्तीमार्गात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणार्या मनुष्यास लोकलज्जा अन् संकोच या दोन बंधनांनी (भवबंधाने) जखडून ठेवलेले असते. त्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम लोकलज्जा अन् संकोच दूर होणे, अत्यावश्यक आहे, हे यातून समजाविलेले आहे.
 भाविकांच्या संकीर्तनात सामिल झालेल्यास येणार्या अनुभवांची अपूर्वता तुकोबाराय वर्णन करतात. एकदा लोकलज्जा नि संकोच या बंधनातून सुटका झाली की मग परमार्थमार्गावरील पुढील वाटचाल गती घेते. हरिनामाची गोडी अनुभवल्यानंतर जो विषयात रमणारा होता, त्याच्या मनातील विषयांची ओढ स्वभावतः कमी होत जाते. भाविकांच्या-संतांच्या संगतीने जिज्ञासा समाधान पावून निष्ठा दृढ होत जाते. त्यातून मुमुक्षुत्वाचा लाभ होतो व उपास्याच्या स्वरूपाचे ज्ञान होते. ते चित्तावर रुजते, श्रद्धा निपजते व उपास्याच्या प्राप्तीची तहान तीव्र होत जाते. हरिनामातून अंतःकरणाला मिळालेले वळण मग साधन अधिकाधिक सक्षम बनवीत नेते. उपास्य ही सारी अवस्था जाणत असते. त्याने साधकाच्या हृदयाचा ताबा घेतलेला असतो. मग त्या उपास्यालाच भक्ताच्या भेटीची तहान लागते. साधक आणि भगवंत या दोघांचीही भेटीसाठी तातडी सुरू होऊन साधकाचे भाग्य उदयाला येते. त्याच्या हृदयात ठाण मांडून बसलेले उपास्य मूर्तीमंत साकारते. जो विषयी होता, तो केवळ हरिनामाच्या योगे सिद्धावस्थेला जाऊन पोहोचतो. सार्याच वासना तत्क्षणी निमालेल्या असतात. याचाच परिणाम असा होतो की, या लोकी जाणेऱ्येणे, जन्म घेणे-मृत्यु पावणे, पुन्हा पुन्हा खेपा घालणे संपुष्टात येते. इथे हे लक्षात घ्यावयाचे आहे की, जीवाची गती त्याला प्रारब्धामुळे प्राप्त होणार्या फलानुसार ठरत असते अन् त्या त्या फलाचा उपभोग घेण्यासाठी त्याला स्वर्ग-मृत्यु-पाताल या लोकात सूक्ष्म वा स्थूल देहात राहून वस्ती करणे क्रमप्राप्त असते. तुकोबाराय सांगतात की, भगवंताशी जीवाचे जे स्वभावतः नाते आहे, ते पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर जीवाची ही गती खुंटते. जीवाला सहजानंदाची प्राप्ती झाल्यानंतर प्रारब्धाचे सारे खेळ आपोआपच संपून जातात. भक्तीमार्गात प्रवेश केल्यानंतर भाविकाच्या अंतःकरणात होणारी अवस्थांतरे इतरांच्याही नजरेतून सुटत नाहीत. ही अवस्थांतरे आपोआपच होत असतात आणि त्या त्या अवस्था दाखविणारी लक्षणे ही भाविकाच्या हृदयात अनावृत्त झालेल्या उपास्याच्या प्रभावाने नि त्याच्या कृपेने प्रगट होत असतात.
 हरिनामाचे अलौकिक माहात्म्य कथन केल्यानंतर तुकोबाराय पुढे समजावितात की, ‘पाहा, हे हरिनानामसाधन अन् त्याच्या सहाय्याने मुक्तावस्था प्राप्त करून घेणे किती सहज सोपे आहे. त्यासाठी शास्त्रांनी कथन केलेल्या चार आश्रमातील कुठल्याही आश्रमातील मनुष्य असो, त्या त्या आश्रमधर्माचरणाचा त्याग करायची आवश्यकता नाही. त्या त्या  आश्रमातील जीवन त्याला निर्वेधपणे कंठता येते.’ पुढे तुकोबाराय सांगतात की, मनुष्याला कुळधर्म-कुलाचारांचे बंधन असते. हरिनामाचा आश्रय एकदा घेतला की, त्यातच सारे कुळधर्म-कुळाचारांचा समावेश होतो.’ तुकोबारायांच्या कथनाचा भाव असा आहे की, ते बंधन पाळले गेले नाही तरी तरी ते दोषास्पद ठरत नाही. शेवटी देव एकच आणि म्हणून धर्मही एकच आणि तो म्हणजे नारायण. जे काही करायचे ते या नारायणाच्याच संतोषासाठी मनुष्य करीत असतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति’ किंवा ‘सार्या नद्या शेवटी सागरालाच जाऊन त्याच्याशी एकरूप होऊन जातात’ हे लक्षात घ्यावयाचे आहे. हरिनामसाधन सोडून अन्य साधने करण्यासाठी कुठलेही श्रम करू नयेत्. नारायणस्वरूप विठोबाचे नाम हेच सार्या धर्माचरणाचे मर्म आहे आणि तेव्हढेच पुरे. तुकोबारायांनी अन्यत्र कथन केले आहे की, ‘भक्तिपंथ बहु सोपा । पुण्य नागवे या पापा । येणे जाणें खेपा । येणेंचि एके खंडती ॥’ ते म्हणतात, कुतर्क्याच्या कपाळी नाश लिहिलेला आहे.
 अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय शास्त्रीय दृष्टीकोनातून एक विठ्ठलच विविध रूपाने कसा नटलेला आहे, हे सांगताना कथन करतात, ‘ज्या मूळ तत्त्वापासून इतर देवदेवतांची निर्मिती झाली आहे, त्याला वेदांमध्ये नारायण म्हटलेले आहे. परंतु वेद जाणून नारायणाला साक्षात करून घेणे म्हणजे बुद्धीची कसरत करावी लागते. योगीजन शून्य असलेल्या कैवल्याचा शोध घेत राहतात, परंतु त्यासाठी देहाला पराकोटीचे कष्ट देतात. मुक्तावस्थेत पोहोचलेले माहात्मे सर्वत्र एकच आत्मा परिपूर्ण रूपाने पाहातात, पण त्यासाठी स्वतः निस्संग होतात’. तुकोबाराय सांगतात, ‘या व अशाच अन्य साधकांशी तुलना करता भक्तीपंथाने जाणारे जे भाविक आहेत, त्यांना सगुण रूपातील विठ्ठलच भगवंत आहे, तोच नारायण आहे, तोच कैवल्यरूप ब्रह्म आहे आणि तोच परमात्मा आहे’. इथे ‘भोळे’ विशेषण योजलेले आहे. आपण व्यवहारात म्हणतो, त्याप्रमाणे युक्ती-प्रयुक्ती न जाणणारा, व्यवहारशून्य, वेडसर असा याचा अर्थ नसून ज्याने एकनिष्ठ निरपेक्ष श्रद्धेने उपास्याचा अंगिकार केला आहे, जे निष्कपट, सरळ मनाचे आहेत, अशा भाविकांसाठीचे ते विशेषण आहे. हा भोळा भावच त्या परमतत्त्वाला सगुण रूपात यावयास लावतो कारण नारायणाला सगुण भक्तच प्रिय आहेत. भगवंताने गीतेच्या बाराव्या अध्यायात स्वमुखाने कथन केले आहे की, ‘ज्यांनी माझ्या ठायी त्यांची मन-बुद्धी अर्पण केलेली आहे, ते भक्त मला प्रिय आहेत’.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)