नाटाचे अभंग... भाग ३३

३२. श्री अनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ।
 जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥१॥
 सकलदेवाधिदेवा । कृपाळुवाजी केशवा ।
 महानंदा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥धृ॥
 चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा ।
 सहस्त्रपदा सहस्त्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥३॥
 कमलनयना कमलापति । कामिनीमोहना मदनमूर्ती ।
 भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥४॥
 अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना ।
 वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥५॥
 तुका आला लोटांगणीं । मज ठाव द्यावा जी चरणीं ।
 हेचि करीतसे विनवणी । भवबंधनीं सोडवावे ॥६॥
 
 तुकोबारायांचा हा अभंग सुपरिचित असून कीर्तनाच्या अखेरी सामुदायिकरित्या हा अभंग प्रार्थनास्वरूपात म्हटला जातो. वरवर पाहता असे वाटते की, नाटाच्या अन्य अभंगाप्रमाणे, ज्यात अभंगाच्या बहुतांश भागात स्वतःतील वैगुण्याचे वर्णन केलेले दिसून येते, तसे या अभंगात दिसत नाही. भगवंताच्या सामर्थ्याचे वर्णन करून शेवटी आपली मागणी थोडक्यात निवेदन करणे, असे या अभंगाचे स्वरूप आहे. तसे असले तरी, ज्या अर्थी हा अभंग नाटाचा अभंग म्हणून गाथेत समाविष्ट केलेला आहे, त्या अर्थी या अभंगातही तसे असले पाहिजे, असा विचार या अभंगावर चिंतन करताना मनात उद्भवतो. तुकोबारायांच्या अंतःकरणात विविध भावांचा कल्लोळ असतानाचा हा अभंग आहे. त्यात ‘आर्त’ भावाचा परिपोष झाला आहे. जीव जेव्हा एखाद्या विषयाच्या प्राप्तीसाठी अत्यंत कासाविस झालेला असतो व ज्याच्या प्राप्तीशिवाय जीवाला विश्रांती लाभत नाही, तो ‘आर्त’ भाव असून ‘आक्रोश’ किंवा ‘पराकोटीची तळमळ’ या भावातून व्यक्त होते. परमार्थात असे आर्त, ज्ञान-जिज्ञासा-अर्थ यांच्या प्राप्तीसाठी सकाम भावाने भगवंताकडे व्यक्त करणे, हे गौण ठरणारे आहे, कारण त्यात भवबंधनातून सुटका अभिप्रेत असेलच असे नव्हे. जेव्हा व्यक्त केलेले ‘आर्त’, ज्ञान-जिज्ञासा-अर्थ या विषयांशी सापेक्ष नसेल आणि ते केवळ परमेश्वर प्राप्तीसाठीच असते, तेव्हा भगवंताला करुणेचा पाझर फुटतो. (भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात ज्ञानयोगाविषयी निरूपण करताना भगवंतांनी चार प्रकारच्या भक्तांचा उल्लेख केला आहे. त्या चारही म्हणजे ज्ञानी, जिज्ञासू, अर्थार्थी व आर्त प्रकारात, ‘आर्त’ भावाचा समावेश असतोच. तेथे ‘ज्ञानी हा माझा आत्मा’ असल्याचे भगवंत म्हणतात. तर, भक्तीसूत्रात नारदमुनी सांगतात, ‘ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्वात् दैन्यप्रियत्वात् च’. जे अभिमानी आहेत, त्यांचा द्वेष करणे अन् जे दीन आहेत, त्यांचा आवडीने अंगिकार करणे, हा ईश्वराचा स्वभाव असल्याचे नारदमुनी सांगतात. सगुणात आलेला परमात्मा, ज्ञानी हा ज्याचा आत्मा आहे, तो परमात्मा भगवंत स्वरूपात येतो आणि मग तो साक्षीरूप राहात नाही, तर तो दीनांचा पाठीराखा होतो, असा अर्थ येथे घेता येतो. तुकोबारायांचे वचन आहे, ‘तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचें मनीं । त्याची चक्रपाणि वाट पाहे ॥).
 तुकोबारायांनी प्रपंचातील सर्व सोहळे अनुभवले. त्यातून जे सुख-दुःखांकित आघात त्यांच्या मनावर झाले, त्यातूनच त्यांचा पारमार्थिक विवेक जागा झाला. संचित, नियतीची इच्छा, पूर्वजांचा आशिर्वाद, संतांचा संग आणि शास्त्रांचे श्रवण घडल्यामुळे त्यांच्या वृत्ती अंतर्मुख झाल्या. ‘जीवनाचे कोडे काय असावे?’ असे चिंतन त्यांना घडू लागले. त्यांचे चिंतन सफल झाले. हृदयस्थ परमात्म्याने त्यांना पडलेले कोडे उलगडून दाखविले. त्यांच्या असे लक्षात आले की, जीव हा ईश्वराचा अंश असूनदेखील, आनंदाला पारखा होऊन राहतो. याच्या कारणाचा शोध घेताना तुकोबारायांना उमगले की, ईश्वराचा अंश असणारा जीव जन्मल्यापासून मायेच्या अधिपत्याखाली वाढत असल्याने त्याच्या हृदयात स्वयंभू असणारे ज्ञान अज्ञानाने आवृत्त होऊन जाते व तो स्वस्वरूपाशी विन्मुख होतो. तुकोबारायांनी असा विचार केला की, माझ्याप्रमाणेच ईश्वराचा अंश असणारे सर्व जीव-बांधव केवळ अज्ञानाच्या आवरणामुळे खऱ्या ज्ञानाला मुकले आहेत. भासमान् दुःखाने ते दुःखी झालेले आहेत. अशा जीवांची करुणेपोटी कीव येणे, हे भगवत् उपासकाचे आद्य कर्तव्य असल्यामुळे आपणाला जर थोडे बहुत काही करता आले तर खात्रीने आपल्या उपास्यालाही समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांना हा विश्वास होता याचे कारण असे की, नरदेह प्राप्त झालेल्या जीवाने स्वस्वरूप जाणावे व सहजानंद उपभोगावा, अशी ईश्वराचीही अपेक्षा आहे. (हेच कार्य मागील जन्मीही करीत होतो, असे तुकोबारायांनी अन्यत्र एका अभंगात सांगितले आहे.)
 सर्वसाधारणपणे पाहता ईश्वर आणि त्याचा अंश असणारा व नरदेह प्राप्त झालेला जीव या दोघात महदंतर आहे. दुःखाने होरपळणार्या अज्ञ जीवांसाठी, अनन्यपणे ईश्वरासमोर आपले दैन्य प्रकट करीत प्रयत्न-प्रार्थना-प्रतीक्षा हा मार्ग अवलंबून ईश्वरास शरण जाणे, हा भक्तीमार्गातला साधा-सरळ सोपा मार्ग असल्याचे ते सांगतात. अज्ञ जीवांचे प्रतिनिधित्व करीत, भगवंताकडे काय आणि कसे मागावे, याचे दिग्दर्शन तुकोबाराय या अभंगात करीत आहेत. अभंगातील नावे भगवंताचे सामर्थ्य, त्याचा स्वभाव, त्याचे रूप तसेच त्याचे स्वरूप उलगडून दाखवितात. त्याचप्रमाणे त्या त्या नामाने भगवंताला संबोधित करताना भगवंतापुढे दीन होऊन मागणी करणार्या भाविकाचे वैगुण्यही प्रकाश-छाया न्यायाने उघड होत जाते (समर्थाचे पोटीं । आम्ही जन्मलों करंटीं ॥ ऐसी झाली जगीं कीर्ति । तुझ्या नामाची फजिती ॥).
 पहिल्या चरणातील नऊ संबोधनातील पहिले नाम ‘श्री’ हे भगवंताचे ऐश्वर्यवाचक असून त्याच्या षड्गुणांपैकी तो एक गुण आहे. त्याचा अंश असणारा जीव मात्र करंटा आहे. भगवंत ‘अनंत’ आहे. त्याला उत्पत्ती-लय नाही, तसेच जे काही पसरलेले आहे, ते सारे त्याच्यातच सामावलेले असून त्याही पलीकडे तो आहेच. त्याचा अंत लागत नाही. जीव मात्र क्षणिक आयुष्य भोगणारा अन् दहा बोटांवर उभा राहणारा आहे. भगवंत ‘मधुसूदन’ आहे, बलाढ्य शत्रूवर युक्तीने विजय मिळविणारा आहे, तर जीवाच्या मागे सहा शत्रू (षड्रिपु) सदा पीडा देत राहणारे असून त्यांपैकी एकावरही जीवाला मात करणे अशक्यप्राय वाटते. भगवंत ‘पद्मनाभ’ आहे. पद्म ही (सजीवात्मक वानस्पतिक) सृष्टीची पहिली निष्पत्ती असून ते परमात्म्याच्या नाभीतून प्रगट झाले. अनेक लोक असलेले हे विश्व कमलाप्रमाणे असून त्याला आधार देणारा हा भगवंतच आहे. जीव मात्र स्वतःला निराधार समजून आयुष्यभर आधार शोधीत राहतो. त्या कमलात ब्रह्मदेव हा पहिला (मानव रूपातील) जीवही परमात्म्याने निर्मिला व आसनस्थ केला. ‘नार’ म्हणजे जीव-जगत्, त्याची उत्पत्ती भगवंतच करतो आणि अंती स्वतःतच सामावूनही घेतो. म्हणून भगवंत हा, जे ‘नार’, त्याचे ‘अयन’ म्हणजे निवासस्थान आहे. तसेच, नार म्हणजे पाणी आणि या जलात तो विश्रांती घेतो. मात्र जीव जन्मोजन्मी भ्रामक सुखाचा शोध घेत वणवण करतो आणि विश्रांतीसाठी तहानलेला राहतो. भगवंताला क्षीरसागराचे सान्निध्य लाभले आहे. त्याच्या आतमसुखाला ते स्सान्निध्य पोषक आहे. जीव मात्र भवसागरातील सुख-दुःखरूपी आवर्तात यातना असहय्यपणे सहन करीत असतो. शास्त्रे वर्णन करतात, त्याप्रमाणे भगवंत जगाला व्यापणारा आहे, त्यात अंतर्बाह्य सामावलेला आहे. जीवाला मात्र या भगवंताचा शोध घेण्यासाठी अथक प्रयास करावे लागतात. तो ‘जनार्दन’ आहे. दुर्जनांचा नाश करणारा, त्यांना पीडा देणारा आहे. जीवाला अनुभव येतो, तो मात्र उलटा! दुर्जन स्वतः सुखाने जगत असतात आणि सज्जनांना पीडा देत राहतात. भगवंत ‘आनंदघन’ आहे, मूर्तीमंत आनंद आहे. त्याचाच अंश असणारा जीव मात्र आयुष्यभर आनंदाला पारखा झालेला राहतो. भगवंत ‘अविनाश’ आहे, जीवाला प्राप्त झालेले देहासह सारे विनाशी आहे.
 पुढील चरणात ‘केशव’ हे नाम योजून त्याच्या अलौकिक गुणांचा उल्लेख करतात. भगवंत केवळ दैवी देह धारण करणारा नसून, दिव्य देह धारण करणारे जे देव आहेत, त्या साऱ्या देवांनी भगवंताचे अधिपत्य स्वीकारलेले आहे, म्हणून तो ‘देवाधिदेव’ आहे. ‘केश’ या पदात ‘क’, ‘अ’ आणि ‘ईश’ या तीन पदांचा अंतर्भाव असून त्यातून अनुक्रमे ब्रह्मा, अच्युत आणि महादेव यांचा बोध होतो. उत्पत्ती, पालन आणि लय करणारे हे तीनही देव या भगवंताच्या आधीन आहेत, म्हणून तो ‘केशव’. निरपेक्षपणे कृपा करणे, हा या भगवंताचा स्वभाव आहे. तो नित्य आत्मानंदात रममाण होऊन राहणारा आहे. तो ‘महानुभव’ आहे. आत्मानंदाचा अनुभव प्रत्यक्ष करून देणारा आहे. त्याचे अनुपमेय तेज हे सुखाचा अखंड स्त्रोत आहे. त्याचा प्रभाव विलक्षण आहे. हा भगवंत ‘सदाशिव’ आहे. यच्चयावत् जीवांना पावन करणारा, त्यांचे अंतिम कल्याण साधून देणारा तसेच त्यांचे अंतिम साध्य आहे. याचे जे दिव्य असे अलौकिक गुण-रूप हे सहज आहे. ते नित्य आहे, अपरिवर्तनीय आहे. म्हणून जीवमात्राचा त्राता एकमेव हा केशवच आहे. 
  पुढील चरणात भगवंताला ‘चक्रधर’ अशी साद घालतात. अतिवेगाने लक्ष्याचा वेध घेणारे व तीव्र गतीने फिरणारे चक्र धारण करणारा हा भगवंत भक्तांचे रक्षण करणारा आणि शिशुपालासारख्या पातक्यांचा नाश करणारा आहे. हे विश्व हेच अनंत पसरलेले आणि अति वेगाने फिरणारे एक चक्रच असून ते चक्र या भगवंताने धारण केलेले आहे. या विश्वात भरून राहिलेला भगवंत समस्त जीवमात्रांचे भरण पोषण करणारा ‘विश्वंभर’ आहे. जीव मात्र हीन दीन होऊन चक्रवातात सापडलेल्या पानाप्रमाणे जन्म-मरणाच्या चक्रात असहाय्यपणे फिरत राहतो. ‘अन्नासाठी दाही दिशा । आम्हा फिरविसी जगदीशा ।’ अशी जीवाची अवस्था झालेली आहे. पुढे या भगवंताला तुकोबाराय ‘गरुडध्वज’ म्हणतात. गरुड हा अत्यंत बलवान् पंख असलेला पक्षीराज असून दुर्गम स्थानी अत्यंत वेगाने पोहोचत असतो. भक्तांच्या हाकेला वेगाने जाऊन त्याचे आर्त दूर करताना या गरुडापेक्षाही वेगाने धावणारा हा हरिरूप भगवंत आहे, असे पुराणातून वर्णन केलेले आहे. हा गरुड भगवंताच्या ध्वजावर अंकित आहे. जीव जन्मजन्मांतरी दीनवाणा होऊन दुःख भोगीत राहतो. ‘आता तुला साद घातली आहे, त्याच वेगाने येऊन मला सोडवावे’ असा भाव येथे व्यक्त होत आहे. ‘चक्रधर’, ‘विश्वंभर’ आणि ‘गरुडध्वज’ या तीन नावांनी संबोधून ‘करुणाकर’ असलेल्या भगवंतापुढे जीवाने आपले आर्त मांडले आहे. ‘करुणा’ या भावाचे वैशिष्ट्य असे आहे की, करुणाकराला दैन्याची जाणीव करून द्यावी लागत नाही. तेथे याचना करावी लागतेच असे नाही. करुणा हा सहजभाव आहे. भगवंताला करुणा यावी, असे सार्याच जीवांना वाटत असते. असा हा करुणाकर हजारो हातांचा नि हजारो पायांचा आहे तसेच तो सहस्त्रशीर्षे धारण करणारा, सहस्त्र डोळ्यांचा - सहस्त्राक्ष - असल्याचे वेदांचे सांगणे आहे. दाही दिशातून एकाच वेळी वेगाने जाऊन सारे जगत्कार्य स्वयं हाताळणारा हा डोळस करुणाकर आहे. असे असूनही याचे वैशिष्ट्य हे आहे की, हा निवांत क्षीरसागरात शांताकार होऊन पहुडलेला असतो. त्यासाठी शेषाने स्वतःच्या देहाची शय्या केलेली आहे. शेष हा अहंकाराचे प्रतिक आहे. सारे जगत्कार्य हा पार पाडतो खरा, पण या अहंकाराला त्याने आपली शय्या केलेली आहे. अहंकाराला भगवंतावर सत्ता गाजविता येत नाही. एक साधन म्हणून हा अहंकार त्याने धारण केला आहे. जीवाच्या ठिकाणी असणारा अहंकार जीवावर स्वार झालेला असतो. अहंकाराचा स्वभाव सर्पवृत्तीचा म्हणजे डूख धरण्याचा आहे. वास्तविकतः यत्किंचितही अहंकार धरण्यासारखे जीवाचे स्वतःचे असे कर्तृत्व काहीच नसते. पण हा अहंकार दूर करण्यासाठी जीव असमर्थ आहे. हा अहंकार दूर झाला तरच जीवाला देवाची प्राप्ती होत असते. म्हणून तुकोबारायांना भगवंताकडे असे निवेदन करावयाचे आहे की, ‘तुझ्यापासून दूर नेणाऱ्या या बलिष्ठ अहंकाराचा नाश केवळ तुझ्या कृपेशिवाय होणारा नाही.’ 
 देवाच्या विलक्षण रूपाचे आणि त्याच्या सामर्थ्याचे वर्णन तुकोबाराय पुढे करतात. समुद्रमंथनाच्या वेळी अत्यंत लावण्यवती अशी लक्ष्मी एका कमलात बसून अवतरली, तेव्हा सारे देव आणि असुर यांना ती आपल्यालाच प्राप्त व्हावी, अशी अभिलाषा निर्माण झाली. परंतु मंदार पर्वताला आपल्या पाठीवर धारण करण्यासाठी कच्छपाचे रूप घेतलेले आणि त्याचवेळी मंदाराच्या शिखराला आपल्या समर्थ हाताने आधार देणारे, कमलदलाप्रमाणे आकार-वर्ण असलेल्या नेत्रद्वयांचे भगवान् विष्णु निश्चल भावाने शांत होते. ते पाहून लक्ष्मी स्वतःहून भगवंताच्या चरणापाशी गेली आणि त्याचे पादसेवन करू लागली. भगवंत कमलापती झाले. लक्ष्मीने भगवंताचा आश्रय घेण्याचे मुख्य कारण असे की, हा भगवंत सर्व जगताचे भरण पोषण निरपेक्षभावाने करणारा जगत्पिता असल्याने त्याला त्याच्या या कार्यात आपण सहाय्यभूत व्हावे, अशी लक्ष्मीला मनोमन इच्छा झाली. या भगवंताचे रूप अलौकिक असे, प्रत्येक स्त्रीला भुरळ घालणारे, मूर्तीमंत मदनाप्रमाणे राजस आहे. मोहिनी अवतारात याच भगवंताचे रूप पाहून, वैराग्याचा पुतळा असलेला महादेव कामुक झाला आणि मोहिनीच्या मागे लागला. असे असूनही आदिपुरुष असलेल्या या भगवंताचे सामर्थ्य अतुलनीय आहे. सृष्टीच्या प्रारंभी पृथ्वी जलात खोलवर बुडालेली होती. मनूला सृष्टी निर्मितीचे कार्य ब्रह्मदेवाने सोपविले, तेव्हा मनूने सृष्टीला आधार मागितला. तेव्हा सारे भगवंताकडे गेले. भगवंताने ‘वराह अवतार’ धारण करून पृथ्वी सागरातून वर काढली अन् तिला अवकाशात स्थिर केले. तुकोबारायांनी भगवंताच्या सामर्थ्याचा दुसरा दाखला दिला आहे, तो वामनावताराचा. एका कुमाराचे रूप धारण करून याच भगवंताने केवळ तीन पावले चालून त्रिभुवन व्यापून टाकण्याचा विक्रम केला. अशा या राजस रूपाच्या त्रिविक्रमाला अशक्य असे काहीच नाही.
 असा हा अलौकिक रूप-गुण-कर्तृत्व असलेला भगवंत मुळात निर्गुण, निराकार असलेला, तथापि ‘एकाकी न रमते’ अशा वृत्तीचा होऊन - म्हणजे याला एकटेपणात करमत नाही म्हणून, सगुण रूप धारण करतो आणि विश्वाचे चक्र हाती घेऊन ते फिरवित राहतो. ‘एकोऽहम् बहुस्यामहः’ असा संकल्प करतो आणि जगताची निर्मिती करून ‘जगज्जनिता’ होतो. स्वतःला रमविण्यासाठी निर्माण केलेल्या जगताचे जीवनही हाच होतो. या जगताची अनुभूती घेण्यासाठी हा भगवंत मग वसुदेव-देवकीचा नंदन होतो. बाळरूप घेऊन रांगतो. बाळकृष्ण होऊन सकल जनांना परमानंद वाटत राहतो. गोकुळात गोपाळांचा सवंगडी होतो. गोपिकांची मने हरण करणारा हा कृष्ण होतो. नवनीत चोरतो नि यशोदेकडून शिक्षाही भोगत हा अनेक लीला दाखवून थक्क करतो. सार्या जीवांचा जिवलग होतो. हा कृष्ण आश्वासन देतो, ‘परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृतान् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥’
 अभंगाचा समारोप करताना तुकोबारायांना असे वाटते की, या भगवंताचे रूप-गुण-सामर्थ्याचे वर्णन करून आणि त्याचबरोबर माझे पामरत्व, दैन्य याला निवेदन करूनही कदाचित् याला माझी कणव येणार नाही. मी सामर्थ्यहीन आहे. म्हणून शेवटी हात जोडून कृपाळू केशवाला म्हणतात, ‘तुका आला लोटांगणी’. विनम्र भावाने शरण येऊन तुकोबाराय काकुळतीने त्यांची विनवणी भगवंतापुढे ठेवीत आहेत... ‘मी कसाही असलो, तरी माझा अव्हेर आता करू नकोस्...’ तुकोबारायांचा भाव असा आहे की, ‘देवाने मला छातीशी धरून धीर दिला नाही तरी चालेल... त्याच्या चरणाशी मला त्याने राहू द्यावे... त्याच्या सान्निध्यात राहू द्यावे... मी त्याचाच अंश आहे. तो सार्या जगताचा पिता-माता-भ्राता-बंधू आहे, असे शास्त्रांनी-संतांनी परोपरीने जीवाला समजाविलेले आहे... बालकाला पित्याचा आश्रय घेण्याचा हक्क असेलही, पण हक्क म्हणून भगवंताकडे मला काही मागायचे नाही... जीव रूपात येऊन बंधनात जखडलेल्या मला या भवबंधनातून मात्र त्याने आता सोडवावे.’
***
 (या अभंगावर चिंतन करताना थोडा वेगळा विचार मनात आला. तुकोबारायांनी ‘श्री’ या पदापासून या अभंगास सुरुवात केली आहे. त्यांनी योजलेले शेवटचे संबोधन आहे ‘बाळकृष्ण’. याची संगती लावताना मानवी जीवनाशी तुलना सहज मनात उद्भवली. ‘श्री’ ही अवस्था प्रौढत्वाची सूचक आहे, तर बाळकृष्ण ही अवस्था अर्भक अवस्थेच्या पुढची आहे. जीव भृण अवस्थेत (गर्भाशयात) असताना त्याला सतत ईश्वराचे स्मरण असते, असे संतांचे सांगणे आहे. जन्म झाल्यानंतर अर्भक अवस्थेत मायेचा पगडा नसतो, कारण मन-बुद्धी-चित्त-अहंकार जागृत नसतात. पाळण्यात म्हणा किंवा अगदी दुपट्यावर पडल्या पडल्या ते स्वतःशीच रममाण झालेले असते. ही आत्माराम स्थिती बाल्यावस्थेत जीवाला रमवीत राहते. भूक लागल्यावर वगैरे स्थितीत ते रडते खरे, पण ते रडणे भावनिक नसते. ही अर्भक अवस्था संपल्यानंतर बाल्यावस्थेत येऊन तो जीव ‘बाळरांगणा’ होतो. जीवाचे मायेने आवृत्त होणे सुरू झालेले असते. आजूबाजूला कुणीतरी ओळखीतले असावे, असे त्याला सतत वाटत असते. माया चित्तचतुष्टय जागृत करते, तेव्हा या बालकाची स्थिती ‘एकाकी न रमते’ अशी होते. पुढे पौगंडावस्थेत याच जीवाला पुरुषत्वाची किंवा स्त्रीत्वाची जाणीव होऊ लागते. विषम लिंगाकर्षण मूळ धरू लागते आणि तारुण्यावस्थेत ‘एकोऽहम् बहुस्यामहः’ (मी एकटा आहे, अनेक व्हावे) वृत्ती बळावते. यथावकाश संसारात पदार्पण केलेला जीव अर्थ-कामसंपन्न होतो, तेव्हा ‘श्री’ अवस्था प्राप्त झालेली असते. या अवस्थेतला काळ जीवाला सुखद वाटत राहतो. डोळ्यासमोर त्या जीवापासून जन्माला आलेले बालक रांगत असताना जीवाला अपार आनंद देत राहते. हा ‘बाळरांगणा’ माता-पित्यालाच नव्हे, तर सार्यांनाच मोहक वाटत असतो, आकर्षून घेत असतो... ‘बालकृष्ण’ झालेला असतो.. या बाळरांगणा अवस्थेतून माता-पिता खरे तर गेलेले असतातच. पण त्यावेळी त्यांना ती अवस्था उपभोगता आलेली नसते. हा ‘बाळरांगणा’ पाहणाऱ्या ‘श्री’ अवस्थेतल्या माता-पित्यांना तसेच इतरांना आता ती अवस्था उपभोगता येते. काही काळ गेल्यानंतर संसारात देहसंबंधियांच्या विषयीचे आकर्षण संपून जीवाला जाणिव होऊ लागते की, या संसारात सुख अत्यल्प आणि परिस्थितीचे चटकेच जास्त आहेत. पत्नी जी प्रथम चंद्रमुखी वाटत होती, ती सूर्यमुखी होते व नंतर ज्वालामुखीही वाटू लागते. पुरुष असेल तर त्याचे उद्योगातील व्यस्त राहणे नि प्रापंचिक जबाबदारीपोटी परिस्थितीचा सामना करताना स्वाभाविकतः पत्नीकडे दुर्लक्ष झाल्याने, पत्नीच्या मनात उद्वेग राहतो. परिस्थितीचे चटके तिलाही सहन करावे लागतातच. त्यामुळे त्रस्त झालेल्या जीवाला, ‘भ्रूण’ अवस्थेत तो ज्याचे स्मरण करीत होता, त्या भगवंताचे स्मरण होऊ लागते. त्याची अध्यात्म मार्गाकडे वाटचाल सुरू होते. ‘श्री’ अवस्था ही ‘विषयी’ अवस्थेची सीमा ठरते नि अध्यात्माची ‘वेस’ बनते. अध्यात्म क्षेत्रात एकदा प्रवेश केला की, गीता-ज्ञानेश्वरी-गाथा-भागवत-अन्य संत वाङ्ग्मय, जे अध्यात्म क्षेत्रातले दीपस्तंभ आहेत, त्या दीपांच्या प्रकाशात जीव उपरम पावतो व पुन्हा ‘एकाकी रमते’ या अवस्थेत येतो. ही अवस्था ‘भ्रूण’ अवस्थेप्रमाणे असते. सतत भगवंताचे स्मरण होत राहते.)
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)