पानशेत प्रलय आणि मी - एक झणझणीत अंजन

१९६१ साली पुण्यात आलेल्या पुरामुळे अनेक मूलगामी परिणाम झाले. शहराचा 'पेठा, बोळ, वाडे' हा छाप पुसला जाऊ लागला आणि नदीच्या पलिकडे (खरे तर आताची वस्ती पाहता 'अलिकडे' म्हणणे जास्त योग्य ठरेल) वस्ती वाढू लागली. पेन्शनरांचे पुणे ते आजचे पुणे या प्रवासाला सुरुवात झाली.
ही (आणि एवढीच) माहिती सर्वांना असते. खडकवासल्याला धरणावर गेले तर पुरात भग्न झालेल्या भिंतीचे काही अवशेष दिसतात. पण या पलिकडे काही नाही. किमान मला तरी अजून काही माहीत नव्हते.
'पानशेत प्रलय आणि मी' हे मधुकर हेबळे यांचे पुस्तक बाचनालयात सहज हाती लागले. मुखपृष्ठ काही आकर्षक नाही. काळ्या - निळ्या - हिरव्या पाण्याच्या लाटांवर तरंगणारी पोलिसांची सेरेमोनिअल कॅप आणि छडी. आणि चित्राची धाटणी बटबटीत म्हणता येईल अशी. तरीही 'होऊन जाऊ दे' म्हणत ते उचलले. आणि पश्चात्ताप अजिबात पावलो नाही.
हेबळे हे स्वातंत्र्योत्तर काळातल्या पहिल्या आयपीएस बॅचमधील अधिकारी. महाराष्ट्र केडरमध्ये भरती झाल्यावर बारातेरा वर्षांच्या आत पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी मिळण्याइतके कर्तबगार.
आता यांचा आणि पानशेतच्या पुराचा संबंध काय?
तर पानशेत पुरानंतर नेमलेल्या नाईक आयोगाने ज्यांच्यावर कडकडीत ताशेरे ओढले, अत्र्यांनी 'बदमाश हेबळे', 'उलट्या काळजाचा, सडक्या मेंदूचा गेंडा हेबळे' अशी ज्यांची वरात काढली, ते हेबळे पूर आला तेव्हा पुणे जिल्हा अधीक्षक होते. आता एवढ्या शिव्याशाप मिळवणे हेबळेंनी कसे जमवले?
पुस्तक वाचायला लागल्यावर अनेक गोष्टींची धक्कादायक संगती लागत जाते.
पानशेत धरण बांधून पूर्ण करण्याचे मूळ ठरलेले वर्ष १९६२. पण १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीकडून हग्या मार खाल्लेल्या काँग्रेसला हे धरण १९६१ मध्ये पूर्ण करून त्याचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून मग ६२ च्या निवडणुकांना सामोरे जायचे होते.
मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण.
इरिगेशन सेक्रेटरीच्या पदावरून सोयिस्करपणे निवृत्त होऊन राजकारणात उतरलेली व्यक्ती कोण? स गो बर्वे.
ज्या दिवशी प्रत्यक्ष पूर आला त्या दिवशी आपल्या पत्रात "पुराचा धोका टळला" असा मथळा छापणारी (आणि अशी चूक झाल्याचे नंतर मान्यही न करणारे) वृत्तपत्रे कुठली? पुण्यातली सगळी.
पुरानंतर 'पोलिस परिस्थिती हाताळण्यास सपशेल अपयशी ठरल्याने पुणे शहर लष्कराच्या ताब्यात' अशी धादांत खोटी बातमी छापणारे वृत्तपत्र कुठले? केसरी.
ज्या गृहस्थांना पुण्याच्या पोलिसांनी नवारीच्या खाटेवर बसवून पुरातून बाहेर काढले, आणि "पोलिस पूरपरिस्थिती हाताळताना कुठेही दिसले नाहीत" असे ज्यांनी जाहीरपणे सांगितले ते कोण? जयंतराव टिळक.
"नालायक! मला तोंडघशी पाडलंत आणि वर तोंड चालवता! बेशरम, तुम्ही जाता की तुमच्याच पोलिसाला तुम्हांला धक्के मारून बाहेर काढायला सांगू? " वदणारे सुसंस्कृत, शालीन व्यक्तीमत्त्व कोण? यशवंतराव चव्हाण.
पूर येऊन गेल्यावर न्या बावडेकरांचा चौकशी आयोग नेमण्यात आला. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काही काळानंतर न्या बावडेकरांचा मृत्यू झाला. तो खून होता की आत्महत्या? उत्तर नाही.
पुढचा चौकशी आयोग नेमण्यात आला तो न्या नाईकांचा. नाईकांच्या स्वतःच्या घराचे (प्रभात रस्त्यावरील बंगला) नुकसान झालेले होते आणि त्यामुळे ते 'ज्यांचे हितसंबंध चौकशीत गुंतले आहेत' अशा श्रेणीतली व्यक्ती होते. पण नाईकांच्या निष्पक्षपातीपणाची मुख्यमंत्र्यांना खात्री होती. का? तर नाईकांनी स्वतःच आपले नुकसान झाल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. किती तर्कशुद्ध.
चौकशी आयोगाचा खेळ सुरू झाल्यानंतरची माहिती वाचताना सुन्न व्हायला होते. धरण फुटल्याची मूळ जबाबदारी कोणाची? उत्तर नाही. धरण फुटणार असल्याचे किती आधी कळाले होते? उत्तर नाही. पुराची व्याप्ती किती असेल याचा अंदाज कुणी दिला होता का? उत्तर नाही. पण चौकशी आयोगाने दोषी ठरवलेले कोण? पाटबंधारे खात्यातील एकही नाही. मुलकी अधिकारी चार. तीन आयएएस आणि एक आयपीएस. आणि दुसऱ्या राउंडला तीन आयएएसही सुटले आणि एक आयपीएस सापडला.
म्हणजे, घाईघाईत बांधलेले धरण फुटले. फुटणार असल्याचा अंदाजही पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांना पुरेसा आधी आला नाही. पूर आल्यास त्याची व्याप्ती किती असेल याचा अंदाज आला नाही. पुराचा धोका टळल्याचे जाहीर करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम वृत्तपत्रांनी चोख पार पाडले. चौकशी आयोगाचे पहिले साक्षीदार स गो बर्व्यांना सोयिस्कर अल्पकालीन स्मृतीभ्रंश झाला. "पोलिस हेडक्वार्टर्समध्ये ईसीआर (इमर्जन्सी कंट्रोल रूम) सुरू केले होते की नाही... माहीत नाही..." [बर्वे स्वतः ईसीआरमध्ये जाऊन आले होते].
आणि चौकशी आयोगाला पूरदुर्घटनेला जबाबदार असलेला गुन्हेगार सापडला. जिल्हा पोलिस अधीक्षक हेबळे.
या सूडचक्रात हेबळेंची काय आणि कशी अवस्था झाली याचे चित्रण पुस्तकात आहे.
आणि आयोगाने किती पद्धतशीरपणे शिकार साधली होती त्याचे सज्जड पुरावेही आहेत.
डोळे उघडायची इच्छा असेल तर झणझणीत अंजन पडेल. नाहीतर आतापर्यंत झाले तेच (दृष्टीआड सृष्टी, अर्थात पुरासंबंधी झाकलेली तथ्ये) चालू राहील. एका अधिकाऱ्याची खुरटलेली कारकीर्द या पुस्तकापुरती मर्यादित राहील.