नाटाचे अभंग... भाग ३४

३३. माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव ।
करूं भक्ति तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥
धर्म करूं तरी नाहीं चित्त । दान देऊं तरी नाहीं वित्त ।
नेणें पुजों ब्राह्मण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥धृ॥
नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान ।
नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥३॥
तीर्थ करूं तरी मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें ।
देव जवळी आहे म्हणों मजसवें । तरि आपपरावे न वचे ॥४॥
म्हणोनि झालों शरणागत । तुझा दास मी अंकित ।
यास न लगे संचित । झालों निश्चिंत तुका म्हणे ॥५॥

मागून येणार्‍या साधकांना, मुमुक्षुंना यथार्थ मार्गदर्शन व्हावे, या हेतूने त्यांचे प्रतिनिधित्व करीत तुकोबारायांनी आपले साधनविषयक चिंतन या अभंगात प्रगट केले आहे. मनुष्य जन्मातील आपले प्राप्तव्य एकदा निश्चित झाल्यानंतर त्याचे प्राप्तीसाठी असणारे विविध मार्ग, त्यातील खाचखळगे, सुलभता-कठिणता आदींचा विवेकबुद्धीने विचार केला जातो. भारत देशात नरदेह प्राप्त झालेला असताना, मनुष्यासाठी एकमेव प्राप्तव्य शास्त्रांनी सांगितले आहे, ते ईश्वरप्राप्ती किंवा स्वस्वरूप जाणून घेणे. किंबहुना, सार्‍या मनुष्यजातीसाठी, ऐहिक पुरुषार्थाबरोबर, कमीत कमी त्यानंतर का होईना, पारमार्थिक पुरुषार्थ साधणे, ही एकमेव अशी गती आहे. जेव्हा नाना प्रकारचे मार्ग व त्यातील आचरण यांचा सांगोपांग विचार करता भक्तीसह प्रत्येक मार्गात सर्वसामान्य मनुषाच्या दृष्टीने विशिष्ट प्रकारचे काठिण्य असल्याचे तुकोबारायांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांना जाणवले की, न पेलवणार्‍या मार्गाने जाण्याच्या प्रयत्नात इष्ट प्राप्ती होणे नाही. किंबहुना, तसे करणे हे मनुष्याला नाउमेद, हतप्रभ करणारे ठरणारे असतात. तो किंकर्तव्यमूढ होणार आहे. या कारणाने तुकोबाराय शास्त्रांनी कथन केलेल्या भक्ती-कर्म-ज्ञान यात समाविष्ट असलेल्या सोळा मार्गांचा (भक्ति-१, धर्म-२, दान-३, ब्राह्मण अतीत पूजन-४, भूतदया-५, गुरुदास्य-६, संतसेवन-७, जप-८, तप-९, अनुष्ठान-१०, वैराग्य-११, वनसेवन-१२, इंद्रियदमन-१३, तीर्थयात्रा-१४, व्रत-१५, ज्ञान-१६) व त्यातील मर्म, यांचा उल्लेख या अभंगात क्रमाक्रमाने करतात व त्यातील काठिण्य निर्भीडपणे दाखवून मनुष्याला सुखरुपतेने साध्याची प्राप्ती करून देणारा खात्रीचा मार्ग किंवा ‘सतरावी कळा’ कोणती, याचे मार्गदर्शन करतात.

अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय जीवनातील एकमेव साध्य जे आहे, त्याचा उल्लेख करतात. भगवंताच्या चरणांशी जवळीक साधता येणे, ते चरण हस्तगत होणे, हे ते साध्य आहे. ‘आतुडणे’ या क्रियेत आतुरता प्रधान आहे. हे साध्य साधण्याकरिता अनेक प्रकारे केलेल्या प्रयत्नांची व्यर्थता ‘खुंटला उपाव’ या पदातून त्यांनी व्यक्त केली आहे. ‘माझा’ या पदाने तुकोबारायांचा स्वानुभव प्रगट होत आहे. अत्यंत आतुर होऊन प्रयास केले खरे, पण ते व्यर्थ ठरले. काय करावे अशी किंकर्तव्यमूढ अवस्था झाली. तथापि, केलेल्या प्रयत्नांना यश येत नाही, भगवंताचा चरणाश्रय लाभत नाही, असे पाहून चित्ताची आतुरता अधिकच तीव्र होत गेली. अशा अवस्थेत फसलेल्या साधकास तुकोबाराय निरनिराळ्या मार्गातील अवघडपणा किंवा दुष्करता क्रमाक्रमाने दाखवितात. प्रथम भक्तीविषयी सांगतात. ‘भक्तिमार्ग बहु सोपा’ असे म्हणतात खरे, पण त्यातील मेख ते जाणतात. त्यात यश का लाभले नाही, तर भक्तीचा प्राण असलेला भाव चित्तात स्थिर होऊ शकला नाही. तुकोबाराय सांगतात की, जीवावर माणसाचे नियंत्रण राहात नाही (नाही हातीं जीव). तो पूर्वसंस्कारांमुळे नानाविध विषयात भरकटत राहतो. जीवाला एकाच विषयात गुंतविणे अशक्य होते. एके ठिकाणी तुकोबाराय स्पष्ट करतात, ‘देवा पायीं नाहीं भाव । भक्ति वरी वरी वाव । समर्पिला जीव -। नाही, तों हा व्यभिचार ॥ थोडक्यात, सामान्य विषयी जीवास एकमार्गी निर्वेध भक्ती करणे दुष्कर होते. (देवाच्या पायांविषयी भाव न ठेवता वर वर भक्ती करणे व्यर्थ आहे आणि जीवाचे समर्पण न करता दाखविलेली भक्ती हा तर व्यभिचारच आहे.)

दुसरे साधन आहे ‘धर्म’. ‘आचारप्रभवो धर्म:’ या वचनाप्रमाणे धर्म हा आचारप्रधान आहे. तुकोबारायांचा पा विषयावरील एक अभंग सर्वश्रुत आहे, ‘चहुई आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म॥’. किंवा ‘धर्म म्हणता कर्म उभे राहते’ या उक्तीनुसार विधि-निषेधांचा विवेक पाळावाच लागतो. त्यासाठी चित्तचतुष्टयाचे म्हणजेच मन-बुद्धी-चित्तादीचे सहाय्य हवे. चित्ताचे चांचल्य निर्दोषपणे धर्म आचरू देत नाही. तिसरे साधन आहे ‘दान’. दानासाठीही शास्त्रात धर्म सांगितला गेला आहे. द्यायचे दान पवित्र हवे, ते अनीतीने मिळवलेले नसावे. ज्याला द्यायचे, त्याची पात्रापात्रता पाहिली पाहिजे. दिलेल्या दानाचा अयोग्य वापर केला गेल्यास, दाता हा अशा गैरवापरातून निष्पन्न होणार्‍या पापांचा धनी होत असतो. थोडक्यात, दान हे देश-काल-व्यक्ती-विनियोग सापेक्ष असते. मुळात दानधर्म करण्यासाठी ‘वित्त’ म्हणजे धन हवेच. ते नसेल तर दानधर्म करता येत नाही (तुकोबारायांच्या बाबतीत म्हणायचे तर, दिवाळखोरीमुळे ते धनहीन झालेले होते.). चवथा साधनप्रकार सांगितला आहे तो ‘ब्राह्मण-अतिथी पूजना’चा. ब्राह्मणाला भूदेव मानतात तर ‘अतिथि देवो भव’ या वचनाप्रमाणे अतिथीलाही देवासमान मानायचे आहे. येथे ‘अतीत’ हा शब्द दोन अर्थ सांगणारा आहे. प्राकृत अर्थाप्रमाणे ‘अतिथी’ हा एक अर्थ तर, ‘अति+इत=अतीत’ यातील ‘अति’ म्हणजे ‘श्रेष्ठ, उत्तम’ आणि ‘इत’ म्हणजे ‘ज्ञान’. म्हणजे अतीत हे ब्राह्मण या पदाचे विशेषण होते. ‘ब्रह्म जानाति स ब्राह्मण:’ या वचनाप्रमाणे ज्याला ब्रह्मज्ञान झालेले आहे, ब्रह्मविद्यासंपन्न जो आहे, तो पूजनीय ठरणारा आहे. ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व न जाणता केलेले पूजन व्यर्थ जाते तसेच आचारहीन ब्राह्मण श्वान-सूकरादि हीन योनीत जाणारा असतो, असे शास्त्रवचन आहे. असे लायक ब्राह्मण किंवा अतिथी सामान्य माणसाला जाणता येत नाहीत. पाचवा साधनप्रकार आहे, ‘भूतदया’. सारे जीव एकाच ईश्वराचे अंश आहेत, असे समजून त्यांच्याविषयी अंतःकरणात दयाभाव ठेवल्यास ते साधनमार्गात सहाय्यक ठरू शकते. परंतु दयाभाव दाखविताना उंच-नीच भाव मनात उद्भवतो हा एक भाग तर दयाभाव किंवा करुणा अगोदर अंतःकरणात निर्माण व्हावयास हवी, हा दुसरा भाग. त्यानंतरच तो भाव हात आदी इंद्रियांद्वारे प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित होईल. ‘पोटात नाही तर ओठात कुठून येणार?’ या उक्तीनुसार किंवा माऊलींनी ज्ञानेश्वरीत स्पष्ट केल्याप्रमाणे (‘आवडे ते किरीटी । आधीं मनौनी उठी । मग तें वाचे दिठी । करांसी ये ॥) मनात उठलेले भावच वाचेने-दृष्टीतूनऱ्हातांच्या क्रियेतून व्यक्त होतात. म्हणून पोटात भूतदयाभाव नाही, मग तो हातांनी कसा व्यक्त होणार? असे वैषम्य तुकोबाराय प्रगट करीत आहेत.

तुकोबाराय पुढे गुरुदास्य, संतसेवन, जप, तप आणि अनुष्ठान या साधनांचा उल्लेख करतात आणि या साधनांचा विधी ते जाणत नसल्याचे सांगतात. संसारात राहून वैराग्य बाळगणे शक्य होत नाही त्याचप्रमाणे सर्वसंगपरित्याग करीत वनात जाऊन एकांताचे सेवन करणे हेही संसारी माणसाला शक्य होत नाही. हाच प्रकार इंद्रिय दमनाच्या बाबतीतही आहेच. भारत वर्षात अनंत प्रकारची तीर्थे वसलेली आहेत. त्या तीर्थांचे दर्शन, तेथील निवास, तेथे राहून केलेले साधन साधकास अवश्य सहाय्यभूत होते, असे शास्त्रे सांगतात खरे, परंतु देह तीर्थक्षेत्री आणि मन प्रपंचात अशी अवस्था आहे. जन्मापासून झालेले संस्कार आणि सहवास यांमुळे जो स्वभाव बनला आहे, तो व्रत-वैकल्ये विधिपूर्वक करू देत नाही. ज्ञानमार्गाने जाणे हे तर माझ्यासाठी अशक्यच आहे. ते ज्ञानी भले म्हणोत, देव तुझ्याजवळ आहे, तो तुझ्या हृदयातच राहणारा आहे वगैरे, पण माझ्या मनातील आपपर भाव काही केल्या जात नाही, त्याला काय करावे? समदर्शन वगैरे जे काही म्हटले जाते, ते आमच्या आकलनाबाहेरचे आहे.

अशा प्रकारे सोळा विविध साधनांविषयी उल्लेख करून आणि त्या त्या साधनांच्या आचरणासाठी स्वतःच्या ठिकाणी (अर्थात् सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीने) असलेली अनभिज्ञता नि असमर्थता निःसंकोचपणे तुकोबारायांनी प्रगट केली आहे. चित्तात तीव्र होत गेलेली आतुरता त्यांना हतबल करू शकलेली नाही. त्यांनी जो अंततः मार्ग निवडला, तो ते सर्वांना विदित करतात, ‘झालों शरणागत’. इथे हे लक्षात ठेवावयास हवे की, शरणागतीसाठी अहंभाव, अभिमान संपूर्णतः त्यागला पाहिजे आणि निरपेक्ष होऊन उपास्याला देह-मनाने समर्पित व्हावयास हवे (अंकित दास व्हायचे). ज्याला शरण जायचे त्याच्याविषयी कोणताही विकल्प, संभ्रम असता उपयोगी नाही. शरणागतीमध्ये विधि-निषेध, साधकाची योग्यता-अयोग्यता अथवा इतर गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता नसते. केवळ अशा शरणागतीमुळेच अर्जुनाला भगवंताने गीता ऐकविली. तुकोबाराय देवाशी संवाद करताना इथे हे विनम्रतेने नमूद करतात की, अशा प्रकारे शरणागती स्वीकारून दास होण्यासाठी संचित असलेच पाहिजे, असे नाही आणि म्हणूनच मी निश्चिंत झालो आहे.
(क्रमशः)

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)