नाटाचे अभंग... भाग ३५

३४. तरी म्यां आळवावें कोणा । कोण हे पुरवील वासना ।
 तुज वांचून नारायणा । लावीं स्तना कृपावंतें ॥१॥
 आपुला न विचारी शीण । न धरी अंगसंगें भिन्न ।
 अंगिकारिलें राखें दीन । देईं जीवन आवडीचें ॥धृ॥
 माझिया मनासी हे आस । नित्य सेवावा ब्रह्मरस ।
 अखंड चरणींचा वास । पुरवावी आस याचकाची ॥३॥
 माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा ।
 एवढ्या आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीचें ॥४॥
 आळवीन करुणावचनीं । आणिक गोड नलगे मनीं ।
 निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रुप ॥५॥
 आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें ।
 लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे केलें अंतरीं ॥६॥
 
 साधक अवस्थेतील मार्गक्रमण सुरू असताना जीवाचा सहजस्वभाव असा होतो की, उत्तरोत्तर पुढील अवस्था आपल्याला कशी प्राप्त होईल, याबाबत मनात उत्कंठा उसळ्या मारीत राहते. अशा परिस्थितीत साधक एक तर गुरूंकडून साहाय्य मागतो किंवा त्याच्या उपास्याने आस पुरवावी, अशी अपेक्षा करीत राहतो. एकदा आपले उपास्य किंवा शरण्य ठरले म्हणजे इतरांचा विचार आपोआपच बाजूला पडलेला असतो. कुठल्याही परिस्थितीत साधकाला ते उपास्य किंवा शरण्य हेच मातेप्रमाणे होते आणि बालक जसे हक्काने आपल्या मातेकडून आपले सारे हट्ट पुरवून घेते आणि त्याचबरोबर बाळाचे हट्ट पुरविण्यासाठी आईसुद्धा आसुसलेली असते, त्याप्रमाणे साधकाला त्याचे प्राप्तव्य मिळत जाते. तुकोबारायांचे उपास्य आणि शरण्य एकच एक आहे. विठ्ठल हाच त्यांचे सर्वस्व आहे. दुसरी गोष्ट ही की, तुकोबारायांची साधनेतील प्रगती वेगाने होत गेली आणि विठ्ठलभक्तीचा झरा त्यांच्या अंतःकरणात अखंड स्त्रवू लागला. संतसंगाचा परिणाम म्हणा किंवा साधनेच्या प्रगतील स्वाभाविक अंग म्हणा, परिपूर्ण भक्तीचा लाभ व्हावा (उपास्याचे खरे स्वरूप जाणता यावे, स्वस्वरूपाची ओळख व्हावी,) अशी तीव्र उत्कंठा तुकोबारायांना बेचैन करू लागली. नामदेवांना अशी तहान लागेना, तेव्हा विठ्ठलानेच त्यांना विसोबा खेचरांकडे पाठविले. तुकोबारायांच्या जीवनात त्यांना गुरूंचा लाभ झाला खरा, पण तो स्वप्नात आणि ते गुरू कित्येक वर्षांपूर्वी होऊन गेलेले असे. तुकोबारायांना त्यांच्या बेचैनीतून बाहेर पडायचे आहे. त्यांचे प्रयास सुरू झाले. त्यांनी जे प्रयास केले व त्यातून जे फलित हातीं आले, त्याचा उल्लेख त्यांनी ‘तुजविण कोणा । शरण जाऊं नारायणा ॥ ऐसा न देखें मी कोणी । दुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ पाहिलीं पुराणे । धांडोळली दरुषणें ॥...’ या अभंगात केलेला पाहावयास मिळतो. अशा प्रकारे केलेल्या प्रयासातून त्यांच्या पदरी वैफल्यच पडले. अशा प्रसंगी त्यांची जी स्थिती झाली, तिचे वर्णन तुकोबाराय या अभंगाद्वारे निवेदन करतात.
  अभंगाच्या सुरुवातीला तुकोबारायांनी दोन किंचित् प्रश्न मांडले आहेत. अर्थातच ते त्यांच्या उपास्याला, विठ्ठलाला, उद्देशून आहेत. सुरुवातीचा ‘तरी’ हा शब्द त्यांनी केलेले अन्य प्रयास विफल झाल्याचे दर्शवित आहे. त्यांच्या अंतःकरणात ‘वासना’ आहे, तीव्र इच्छा आहे, जे हवे ते तातडीने व खात्रीने मिळावे, अशी चित्तात तळमळ आहे. अशी खात्रीही आहे की, ही तीव्र इच्छा अन्य कुणी शमवू शकेलही, पण त्याची शोधाशोध करीत वेळ घालविण्यापेक्षा, आपले उपास्य हे ज्या मूळ तत्त्वाचे रूप आहे, त्या तत्त्वालाच साकडे घालणे चांगले. तुकोबारायांची अशी भावना आहे की, त्यांची वासना ही बालकाच्या तहान-भुकेप्रमाणे आहे. ती शमविणे मातेलाच शक्य आहे, असे जाणून तुकोबाराय त्यांची तहान-भूक शमविण्यासाठी, जे मूळ तत्त्व नारायण, त्यालाच माता समजतात व तिचे स्तन्य मागतात. येथे नारायणास ‘कृपावंते’ म्हणून संबोधिले आहे. नारायण हा विश्वाचा जनिता आहे, तोच भर्ता आहे. या नारायणाचा स्वभाव पित्याप्रमाणे केवळ कर्त्वव्यकठोर नसून तो मातेप्रमाणे अकारण करुणावंत आहे. तो अकृत्रिम कृपेचा सागर आहे. बालकाची वासना, त्याची तळमळ, मातेला न सांगताच उमगत असते. तोच भाव तुकोबारायांच्या मनात नारायणाविषयी आहे. ते नारायणाच्या मातृत्वाला साद घालतात आणि स्तन्य मागतात. इथे हे लक्षात घ्यायचे की, तुकोबाराय येथे केवळ ‘लावी स्तना’ असे म्हणतात. याचे कारण असे आहे की, मातेने बालकाला स्तनाला लावले की, स्तन्य हे आपोआपच स्त्रवू लागते. तेथे नियंत्रणासाठी तोटी वगैरे काही निसर्गाने ठेवलेली नाही, तर मातेच्या हृदयात वात्सल्याचा उमाळा भरभरून ठेवलेला आहे. बालकाचे रुदन ऐकले की हा उमाळा स्त्रवू लागतो. बालकाच्या स्तनपानाचे हे रूपक तुकोबाराय पुढे खुलवित जातात.
 मातेचे वैशिष्ट्य हे आहे की, तिच्या आयुष्याचा क्षण नि क्षण तसेच शारीरिक-मानसिक अंश नि अंश तिच्या बाळाच्यासाठीच असतो. बालक केव्हाही साद घालो, तिला तिची व्यग्रता, झालेला शीण, उद्‍भवलेले आजारपण, काहीही असो, बालकाकडे धाव घ्यावयास लावते. त्याची जी काही मागणी असेल, मुख्यतः तहान-भुकेविषयीची ती, तिला तत्क्षणी पुरवावयाची असते. त्यात ती चालढकल करीत नाही. शिवचरित्रात हिरकणीच्या वात्सल्याचे वर्णन वाचावयास मिळते. पहार्‍याबाबतचे नियम न तोडता, रायगडावरच्या टकमक कड्यावरून बाळासाठी स्वतःला झोकून देणारी हिरकणी शिवबांना तुकवून जाते. यातून मातेचे उदात्त चित्र हृदयावर कोरले जाते. तुकोबाराय इथे तेच चित्र कोरीत आहेत. बालक तळतळून रडत असो वा स्वानंदात रमून खेळत असो, त्याला हृदयाशी कवटाळणे, हा तिचा स्वभाव आहे. त्या बालकाच्या भरण-पोषणाची, त्याचे सर्वतोपरी रक्षण करणे, हा तिचा स्थायी स्वभाव आहे. ती तिला ईश्वरी देणगी आहे. आपल्या बालकाची आवड पुरवून त्याचे जीवन साकारणे, हे तिचे अंगभूत कर्तव्य ती निरपेक्षपणे बजावत राहते. आचार्यांनी वर्णन केले आहे, त्याप्रमाणे ‘कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति’. कुपुत्रासाठी माता कधीही कुमाता होणार नाही. इथे तुकोबाराय ‘देईं जीवन’ म्हणतात. स्तन्य हे बालकासाठी अमृतासमान आहे. त्याला अन्य दूध, पाणी किंवा अन्न पचविण्याची शक्ती नसते. त्याच्या सर्वांगिण वाढीसाठी आईचे स्तन्यच अजोड, परिपोषक असा प्राथमिक आहार असतो. (आजचे शास्त्र सांगते की, मातेच्या स्तन्यात ज्या मूळ पेशी -स्टेम् सेल्स्- मुबलक असतात, त्याच बालकाच्या सर्वांगिण वाढीसाठी सुयोग्य असतात.) बाळाच्या अन्नप्राशनविधीचा विचार केल्यास जीवनरसासाठी स्तनपानावर वाढणार्‍या बालकास त्याच्या वाढत्या वयातील स्वास्थ्यासाठी हळूहळू इतर अन्नाऐवजी प्रथमतः पाणी (जीवन) पाजले जाते व तदनंतर पातळ अन्न व त्यानंतर हळू हळू नेहमीचे जेवण भरविले जाते. अन्य दृष्टीकोनातून या चरणाचा विचार करता हे लक्षात येते की, तुकोबारायांनी नारायणाजवळ आपली वासना पुरविण्याची मागणी मांडलेली आहे. ती पुरविताना या नारायणाने, आपला जो अंशी आहे, त्याची मागणी पुरविण्यासाठी शीण मानू नये, परकेपणा मनात आणून स्वतःपासून भगवंताने दूर सारू नये (न धरीं अंगसंगें भिन्न), ज्याचा एकदा अंगिकार केला, त्याला नंतर हीन-दीन मानून त्यागू नये, त्याचे रक्षणच करावे आणि त्याचे जे आवडीचे जीवन आहे, अर्थात् अखंड नामसंकीर्तन आणि संतसंग, त्यात तुटी येऊ देऊ नये, अशी गळ तुकोबारायांनी घातली आहे. 
 तुकोबाराय पहिल्या चरणात त्यांची ‘वासना’ पुरविण्याची मागणी मांडतात. आदितत्त्वाच्या मातृस्वभावाचे वर्णन करून ‘आवडीचे जीवन’ मागतात. ही आवडी प्रामुख्याने देवाची आहे. जो आपला अंशी आहे, त्याला सतत आपले स्मरण असावे, त्याचे आपल्याशी सख्य असावे, त्याने आपल्यापासून वेगळे होऊ नये, ही भगवंताची इच्छा आहे, कारण तोच जनिता आहे. त्याच्याशी रमणार्‍याची त्याची तहान स्वाभाविक आहे. कृष्णचरित्र नारायणाच्या या आवडीची साक्ष देते. याच तहानेपोटी कृष्णावतारात त्याने गोपाळांशी मौज-मस्ती केली आहे. गोप-गोपींसवे तो रमला आहे. तुकोबारायांना जो संतसंग घडला, जे संकीर्तन घडले, तीच देवाची आवडी असल्याचे त्यांना उमगलेले आहे. त्या प्रसंगी त्यांची ‘स्तन्य प्राशनाची वासना’ शमविली जातेही. तेथे निर्माण होणारा रसराज त्यांना चाखायला मिळतो खरा, पण तो प्रासंगिक, तात्कालिक असतो. तो स्थल-काल-सापेक्ष आहे. त्यांची ही वासना आता ‘आस’ झालेली आहे. भूक वाढली आहे. ब्रह्मरसाचे वैशिष्ट्य असे की, तो कितीही सेवन केला तरी त्याचा वीट येत नाही, तर तृप्तीच अतृप्त राहते. ते एका अभंगात म्हणतात, ‘खादलेंच खावें वाटे । .... परि ते उरे भूक पुढें ॥’ म्हणूनच तो रसराज असलेला ब्रह्मरस नित्य सेवावयास मिळावा, ही ती आस आहे. त्यासाठी ते याचना करतात. हा ब्रह्मरस मिळावा यासाठी अखंड संकीर्तन-संतसंग त्यांना हवा आहे. मागे (नाटाच्या) एकोणिसाव्या अभंगात शेवटच्या चराणात त्यांनी सांगितले आहे, ‘जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आनंदास । सेवूं ब्रह्मरस तुका म्हणे ॥’. ते देहाने देहूत आहेत. पंढरीतला अनुभव त्यांना नित्य येत नाही, याची त्यांना खंत आहे. यातून ते मार्ग काढतात आणि भगवंताला विनवितात की, त्याच्या चरणांचा वास सतत लाभावा. देहूतच भगवंताच्या चरणांचा वास नित्याचा झाला की, आपोआपच संतांचा मेळावा देहूत जमेल आणि ब्रह्मरसाची प्राप्तीही नित्याची होईल. येथे तुकोबाराय स्वतःला याचक म्हणवितात. याचकाला जे दान दिले जाते, ते सन्मानपूर्वक व त्यातून आपल्याला सुकृताची प्राप्ती व्हावी यासाठी. सुभाषितकार सांगतात, ‘याचकः नैव याचन्ति प्रबोधन्ति गृहे गृहे । देयम् देयम् सदा दानं न देयम् फलमिदृशम् ॥’ याचक घरोघरी जाऊन करतो ती याचना नव्हे, तर एक प्रबोधन असते. तो असे सांगत असतो की, बाबांनो, दान देत राहा अन्यथा दारोदारी जाऊन मागत राहायची पाळी (तुमच्यावर) येईल.
 तुकोबाराय सारासार विचार करून आपण या अलौकिक लाभापर्यंत कसे पोहोचू शकलो, याबद्दल आपल्या अंतःकरणातील विचार देवासमोर प्रगट करताना म्हणतात, केवळ माझ्या संचितामुळे, पूर्वपुण्याईमुळे, मला हा लाभ मिळाला आहे. त्या संचितानेच हा तुझ्या भक्तीचा मार्ग मला दाखविला आहे. त्यांना त्यामुळे स्वतःबद्दल आदर वाटत आहे. एव्हढेच नव्हे तर, या आदराचा हेवा त्यांना वाटतो. येथे ‘हेवा’ या पदाचा अर्थ मत्सर, ईर्षा अशा प्रकारचा नाही, तर ‘हव्यास, उत्कंठा’ असा आहे. ज्या संचिताच्या प्रभावाने प्रासंगिक लाभ मिळत आहे, त्या संचिताने आपला प्रभाव अधिक वाढवावा आणि नारायणाकडून त्यांचे इच्छित त्यांना सहज प्राप्त व्हावे, असा हव्यास आता तुकोबारायांच्या चित्तात निर्माण झाला आहे. याच भावाने ते भगवंताकडे जी याचना करतात, ती सेवादानाची. भगवंताची जी आवडी, ती खर्‍या अर्थाने त्यांना पूर्ण करावयाची आहे. ती आता त्यांचीही आवडी झालेली आहे. त्यांची आवडी आहे, भगवंताच्या सेवेची, त्याच्या अखंड संकीर्तनात-सान्निध्यात राहण्याची. या आवडीविषयी त्यांच्या मनात इतके औत्सुक्य आहे की, त्याशिवाय अन्य त्यांना काहीही गोड वाटत नसल्याचे ते भगवंताला सांगतात. त्यांनी मागितलेले दान, सेवादान, भगवंताने द्यावे, यासाठी त्याच्या मनातल्या करुणेला ते साद घालणार आहेत. त्यांच्या मनीच्या आसेचे रूपांतर आता ध्यासात झालेले आहे. झोपेत, जागेपणी किंवा स्वप्नात, कुठल्याही अवस्थेत आपल्या उपास्याचे रूप, त्याचे अखंड ध्यान, त्यांच्या चित्तात आहे. 
  तुकोबारायांनी त्यांच्या चित्तातील ध्यास भगवंताला निवेदन केला आहे. भगवंत त्यांच्या अंतःकरणात, जिकडे पहावे तिकडे, भरून राहिला असल्याची अनुभूती त्यांना येत आहे. असे असले तरी त्यांना हा सारा प्रकार एकांगी वाटतो. त्यांना देवाचे सान्निध्य लाभले आहे, पण देवाला त्यांच्याविषयी, त्यांच्या या स्थितीची, कल्पना आहे का नाही, हे त्यांना सांगता येत नाही. त्यांचा ध्यास एकतर्फी आहे. देवाने प्रतिसाद द्यावा, तशी अनुभूती द्यावी, असे तुकोबारायांना मनोमन वाटत आहे. ते आपली स्थिती देवापुढे विनीत भावाने प्रगट करतात आणि विचारतात, तुमची भेट मला न भेटताच झाली आहे का नाही, हे मला तरी सांगता येत नाही, तुम्ही तुम्हालाच विचारून पाहा. ते पुढे देवाला सांगतात, ‘तुझ्याविषयीच्या प्रेमाचा झरा माझ्या हृदयात अखंड आहे, तरीही तुझी भेट घडावी, तुझा अंगसंग व्हावा, ही माझी आस तू जाणावीस्. तुझ्या भेटीसाठी मी आतुर झालो आहे, बेचैन आहे, माझे अंतःकरण कसेतरी ते सहन करीत आहे. तुझी करुणा जागी होऊ दे आणि मला तुझ्या चरणांचा अखंड आश्रय दे... आता मला दूर ठेवू नकोस्’. ‘साहे’ या पदाने ‘सहाय्य, मदत’ असाही अर्थ दाखविला जात आहे. तुकोबारायांच्या अंतःकरणात विठ्ठलाचा जो ध्यास लागला आहे, त्यात त्यांच्या अंतःकरणाचे सहाय्य लाभले आहे, असे कृतज्ञतेने ते म्हणतात. त्यांचे चित्त न भरकटता स्थिर राहिल्यानेच, त्यांच्या हृदयात विठ्ठलाचे ध्यान आणि त्याच्याविषयीचा प्रेमभाव निरंतर राहिला आहे... त्यांची व देवाची भाव-भेट झाली आहे किंवा अंगसंग घडलेला आहेच, असे धन्योद्गार त्यांच्या मुखी येतात. विठ्ठलाच्या चरणींचा अखंड वास लाभावा, ही त्यांची काकुळतीची विनवणी मात्र तशीच राहणार आहे, कारण धृपदात त्यांनी ‘आवडीचे जीवन’ देवाकडे मागितले आहे. त्यासाठी ते प्रतीक्षा करणार आहेत.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)