झोपलेले बर्फ

खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात कोणत्याही संवादाचा पाया असतो समोरच्याचे प्रथम ऐकून घेणे.
काही व्यक्ती समोरच्याची मते आणि विचार दडपण्याचा प्रयत्न करतात.
ते असे लोक असतात ज्यांना स्वतःची मते आणि गृहीतके बदलण्यात स्वारस्य नसते, जी चुकीची  असू शकतात.
असे लोक एका खोट्या गृहीतकाच्या आधारे जगतात की ते नेहमी बरोबरच असतात आणि तेच नेहमी बरोबर असतात.
असा व्यक्ती ज्याला समोरच्याचे ऐकायचेच नसते ते यासाठी की त्याला भीती वाटत असते की समोरच्याचे ऐकले तर त्यातले पूर्ण किंवा काही भाग स्वीकारावा लागेल आणि स्वतःच्या मनातल्या काही चुकीच्या गृहीतकांना धक्का बसेल. त्यामुळे ते ऐकत नाहीत.
असा व्यक्ती हा एखाद्या झोपेचे सोंग घेतलेल्या माणसासारखा असतो. जरी तुम्ही त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला तरी तो जागा होणार नाही कारण त्याला जागे व्हायचेच  नाही.
म्हणजेच त्याला त्याचे मन आणि मेंदू झोपलेलेच ठेवायचे आहे. जेणेकरून नवे विचार व संकल्पना त्यात शिरणार नाहीत.
म्हणजे त्यांचे मन त्यांना बर्फाप्रमाणे गोठलेले ठेवायचे असते, पाण्याप्रमाणे प्रवाही किंवा वाफेप्रमाणे मिसळणारे नको असते.
हा असा बर्फ असतो ज्याला बर्फच राहावयाचे आहे.
हे बर्फ तोडून मग त्यांना पाण्यात रूपांतरित करायला हवे. म्हणजे हळूहळू एकेका पायरीने एक विचार त्यांनी बदलायला हवा.
असे सगळे बर्फ कोणत्याही संवादाला मारक ठरतात आणि संवादाच्या दृष्टीने ते स्वतः बर्फ असूनही समोरच्या व्यक्तीत मात्र आग निर्माण करतात.
काही प्रमाणात बर्फ असण्यास हरकत नाही पण वेळोवेळी पाणी आणि वाफ होण्याची तयारी ठेवा.