रिकाम्या जागेचा दुसरा प्रश्न

आता पुढे कोण, असा प्रश्न खूपदा तयार होतो. परंपरेहून निराळे कर्तृत्व , हे असा प्रश्न निर्माण होण्यामागचे कारण आहे. कर्तृत्व निराळे असते म्हणून मोठे ठरते. कर्तृत्व इतके निराळे असते की, ते गाजवणारी व्यक्ती तेथून गेली तर डोळ्यांना खुपणारी रिकामी जागा तयार होते. ही जागा भरली जाईल की नाही आणि भरली गेली तर पहिला ठसा पुन्हा पाहायला मिळेल की नाही, असे मूळ प्रश्नात दडलेले दोन प्रश्न सहज उभे राहतात. नव्या माणसामुळे रिकामी जागा कधी ना कधी तरी अवश्य भरली जाते. पहिल्या प्रश्नाचे विलंबाने का होईना, उत्तर मिळतेच. मात्र, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास काही काळ जावा लागतो. नव्या माणसाचे स्वतःचे कर्तृत्व असते परंतु, तुलना आधीच्या माणसाशी केल्यामुळे ते कर्तृत्व सुरुवातीला झाकोळले जाते. एका काळावधीनंतर हा नवा माणूस स्वीकारला गेलेला असतो आणि तेव्हा तुलनाही संपुष्टात आलेली असते.
हा जो दुसरा प्रश्न आहे तो तुलनेशी निगडीत आहे. जागा भरली जावी, ही इच्छा खरे तर ' जागा पहिल्यासारखीच भरली जावी ' अशी असते. तसा विचार करणे, हा मानवी मनाचा सहजस्वभाव आहे. पहिल्या ठशात जर निश्चित विचार, रीत आणि निष्ठा असेल तर असे ठसे दीर्घकाळ अमीट असतात. रिकाम्या जागा भरणाऱ्यांनी ती जागा अवश्य भरलेली असते आणि कार्यचक्रही सुरु राहते पण बरेचदा केवळ शैली दिसून येते. शैलीचे जीवन कमी तर रीतीचे जास्त असते. शैलीलाच रीत बनविण्याचे काही यशस्वी तर काही अयशस्वी प्रयत्न होतात. अभ्यासू आस्वादकाच्या मनात कौल दिला-घेतला जात असतो. पहिल्यासारखीच जागा भरली जावी, ही इच्छा मन विचारक्रांत असेपर्यंत पिच्छा पुरवते. तसे घडेपर्यंत मनाला स्वस्थता नसते कारण तुलनेचा घटक मनातून जात नाही. गेलेल्या स्मरणीय काळाचे काय करायचे, हा प्रश्न मनाचा सावलीसारखा पाठलाग करतो. तुलना संपुष्टात आलेली असते पण जुन्याचे स्मरण ठळक असते. संगणकातून जुनी फाईल काढून टाकता येते पण मेंदूतून स्मरण काढता येत नाही. मानवी मेंदू व संगणक यातला हा वेदनादायक फरक आहे. हा घटकच काढून टाकला तर प्रत्येक प्रतिमा आणि तिची सृष्टी नवी वाटेल. मानसातील विचारगणितातून तुलना वजा केली तर नवा प्रत्येक दिवस अस्पर्शित वाटेल. एक वर्षाच्या बालकाच्या दृष्टीने नवे जग देखल्यास वर्तमानाचा आनंद घेता येईल. रिकाम्या जागेच्या सुस्थापित इतिहासाचा विचार मात्र नव्यांना विसरता येणार नाही.
लेखणीस आणि वाणीस सोपा पण आचरणास कठीण असा हा विचार आहे आणि मानवी जीवनाचा पेच बरेचदा इथेच गोचर होतो.
रिकामी जागा तयार करणाऱ्या सचिन तेंडुलकरला आणि ती भरून काढणाऱ्या प्रभावळीला आपापल्या पुढील जीवनाच्या शुभेच्छा.