अगतिक

रोजच्या प्रमाणे हिंजवडीच्या  बस मधून उतरल्यावर त्यांनी अजिबात वेळ न दवडता गाडीला किक मारली आणि तडक आपल्या  रस्त्याला लागले. आईकडे जायचा दिवस होता तो.

पूर्वी बस मधून उतरल्यावर ते  थोडा वेळ कंपनीच्या त्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या मित्रांशी गप्पा मारायचे. त्यांच्याशी गप्प मारून दिवसभराचा शीण कमी व्हायचा. गप्पा झाल्या की गाडीवरून घरी येणार आणि बायकोच्या हातचा गरम गरम चहा पिणार हे त्यांचं  गेल्या दोन तीन वर्षातलं रूटीन. तेव्हा आयुष्य तसं ठीकठाक चाललं होतं.

लहानपणी त्यांनी  आत्यंतिक  गरिबीचे  दिवस  पाहिले होते. लहानपणीच त्यांच्या वडिलांनी पॅरॅलिसिस होऊन अंथरूण धरलं  आणि संसार चालवण्याची सगळी मदार आईवर येऊन पडली. सातवी शिकलेल्या आईनं कंबर कसली आणि मिळेल ते काम करून मुलांचं संगोपन केलं. दोन मुली आणि एक मुलगा अशी तिची अपत्यसंपत्ती. तिघांनाही आईनं अतिशय हिमतीनं वाढवलं. शिकवलं. स्वतःच्या पायावर उभं केलं. मुली लग्न करून त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या. आणि मग म्हातारी झालेली आई तिच्या मुलाबरोबर राहू लागली. सूनही चांगली होती. सासूचं सगळं प्रेमानं करायची. आपल्या दोनही मुलींना आपली सासू सांभाळते म्हणून आपली नोकरी होते आहे ह्याची तिनी जाण  ठेवली होती.

आई आपल्या दोनही नातींना मनापासून सांभाळायची. त्यांचं खाणं पिणं नीट वेळेवर करायची. वेगवेगळी स्तोत्रं शिकवून  त्यांना  चांगले संस्कार द्यायची. खूप प्रेमानं त्यांचं सगळं करायची. अगदी लहान वयात नवरा अंथरुणाला खिळल्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी पेलता पेलता तिचं शरीर मात्र थकून गेलं होतं. फार लवकर म्हातारपण आलं होतं. डोळे अधू झाले होते. पाय अधू झाले होते. त्यामुळे बाहेर जायला मदतीची गरज पडायची. तिचा मुलगा रोज तिला देवळात सोडणं आणि आणणं करायचा. बाकीच्या बायका तिला 'नशीबवान आहात हं' असं म्हणायच्या तेव्हा तिला मागे केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटायचं.

आईचं नशीब देवानं काय खाऊन लिहिलं होतं कोणास ठाऊक. नवऱ्याच्या आजारपणावर समाधान झालं नाही म्हणून की काय देवानं  तिला  भरपूर आजार दिले होते. कंबरेच्या हाडाचं ऑपरेशन झालं.   डोळ्यांची ऑपरेशनं झाली. गुडघ्याचं आजारपण झालं. आणि शेवटी डायबिटीस नि गँगरीन ही झालं. ह्या सगळ्या आजारपणात मुलगा आणि सून आधार देऊन ठामपणे  उभे होते. दुसऱ्या नातीच्या लग्नानंतर शुगर चं निमित्त झालं आणि तिला माईल्ड पॅरॅलिसिस चा ऍटॅक आला. अंगातली शक्तीच नाहीशी झाली.

आईला पॅरॅलिसिस चा ऍटॅक आल्यावर मुलाचा जीव वरखाली झाला. डॉक्टरांना बोलावून सगळ्या टेस्ट्स झाल्या. पण काही ठाम निदान झालं नाही. आई अंथरुणाला खिळलेली पाहून त्याचा जीव वरखाली होत होता. रोजचा दिवस नवनवीन परीक्षा घेत होता. मुलगा आणि सून आपापल्या नोकरीतून रजा घेऊन ह्या आजारपणाला पुरे पडण्याचा प्रयत्न करत होते. पण सगळं अंथरुणात करणं वाटतं तितकं सोपं नाही. घरी नर्स ठेवण्याचे सगळे प्रयत्न फसले. आठ दिवस आईचं सगळं करता करता मुलगा आणि सुनेची वयंही बोलू लागली. बेड मध्ये जेवण, औषधं देणं, बेडपॅन देणं,   रोजच्या खराब झालेल्या दोन तीन  चादरी बदलणं, डॉक्टरांकडे खेपा ह्या सगळ्यामुळे दोघांच्याही तब्येतीवर परिणाम झाला. बाहेरची माणसं मदत करून करून किती करणार. शेवटी सगळे उपाय थकले आणि त्यांनी आईला नर्सिंग होम मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.

आईला नर्सिंग होम मध्ये हालवण्याचा दिवस ठरला. तिचं सगळं जरुरीचं  सामान बॅग मध्ये भरून ऍंब्युलंस मधून आईला नेलं. तिकडची व्यवस्था पाहून मुलगा सून घरी परत आले. तीन रूम च्या घरात आईची कॉट बाहेरच असायची. घरात आल्या आल्या ती रिकामी कॉट मुलगा आणि सुनेच्या डोळ्यात भरली. पण दोघांनीही एकमेकांना जाणवू दिलं नाही. आईची  तब्येत थोडी बरी झाली की तिला लगेच घरी आणू अशी मनाची समजूत काढत मुलानं ठरवलं की रोज ऑफिस मधून आईकडे जायचं.

बघता बघता दोन महिने गेले. रोजचा  हिंजवडीचा प्रवास आणि आईकडे जाण्याची धावपळ  मुलाला दमवू लागली. आई बरी होण्याची चिन्हं दिसेनात. जो कोण फोन करेल तो हाच प्रश्न विचारायचा 'आई कशी आहे? ' रोज वेगळं काय उत्तर देणार? ज्या दिवशी सून बरोबर नसे त्या दिवशी तिही आल्या आल्या हेच विचारायची 'कशा आहेत त्या? ' एक दिवस मुलानं सांगून टाकलं 'रोज रोज विचारू नकोस, आता माझं हेच रूटीन आहे कायम. तिच्या तब्येतीत बदल होईल तेव्हा मीच सांगीन'.

त्या दिवशी जेवण झाल्यावर मुलगा विचार करत बसला होता. आईचे पूर्वीचे सगळे कष्ट आठवत होते. तिचा दमलेला चेहरा समोर येत होता. काय करावं? घरी आणलं तर तिचं कोण करणार? पैसा तर पाण्यासारखा चालला आहे. हिची नोकरी पण खूप गरजेची आहे. सोडून चालणार नाही. घरी नर्स पण मिळत नाही. आणि काही दिवस मिळाली तरी तिच्यावर आई आणि घर दोनीही कसं सोडणार? आईला काही करून ती पळून गेली तर? ती चांगली असेल, पण आजकाल चोऱ्या किती होतात. दिवसभर घर बंद असतं. कोणी पाळत ठेवून गैरफायदा घेतला तर? आईला असं बघून त्रास होतोय. पण काय करू?   सगळ्या बाजूंनी रस्ते बंद झाल्यासारखं वाटलं त्याला. आपल्या हातात फक्त तिला शक्य तेवढी साथ देणं एवढंच उरलंय हे पटवून घेणं अजिबात सोपं नव्हतं.

आज  अनेक  अनुत्तरित प्रश्न मनात घेऊन ते ऑफिस मधून आईकडे  जातात. आईशी गप्पा मारतात. तिचं जेवण झालं की तिची कवळी धुवून ठेवतात आणि घरी येतात. आजही तिकडे जायचा दिवस होता. गाडीला किक मारून गाडी निघाली होती नर्सिंग होमच्या रस्त्याला.