गझल
वृत्त: व्योमगंगा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा
*****************************************************
चालण्याची हौस होती, चालणे नशिबात आले!
लाभाला नाही किनारा, वाहणे नशिबात आले!!
एवढे पायात काटे घेवुनी मी जन्मलो की;
चालणेही शक्य नव्हते, धावणे नशिबात आले!
ताठ मानेने जगावे वाटले मजही परंतू....
जिंदगी बोजड अशी की, वाकणे नशिबात आले!
काय डोळेझाक केली! काय नमते घेतले मी!
बंद डोळ्यांनी जगाला पाहणे नशिबात आले!!
वेळ ऎकाया कुणाला? आपल्या नादात जो तो!
बंद ओठांनी जगाशी बोलणे नशिबात आले!!
दार, खिडक्या, छप्पराची वानवा होती घराला;
या अशा घरट्यात सुद्धा राहणे नशिबात आले!
जन्म गेला एकट्याने एक घरटे बांधताना!
शेवटी उध्वस्त घरटे पाहणे नशिबात आले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१