विचारांची 'सायकल'

        अवेळी आलेल्या पावसानं चांगलाच जोर धरला होता. थांबायचं नाव घेत नव्हता. बऱ्याच वेळ वाट बघून शेवटी मी घरापर्यंत भिजत जायची मानसिक तयारी केली.
खाली जाऊन सायकलवर टांग टाकली. रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी होती. माझ्यासारखेच वाट बघून वैतागलेले अनेक जण भिजत घरी चालले होते.
    ऑफिसपासून घरापर्यंतचा सायकलचा निवांत प्रवास म्हणजे मनात खूप वेळ वाट बघत बसलेल्या विशिष्ट विचारांना एक हाक असते. दिवसभर ह्या विचारांना पुरेसा वेळ किंवा फुरसत मिळत नाही. मग अश्या निवांत क्षणाची वाट बघत बसलेले हे विचार मनात संधी साधून घुमायला लागतात. कानातल्या हेडफोनवर 'ट्रांस' सुरू असेल तर मग ह्या विचारांना अजूनच पोषक वातावरण. हा ट्रांस, आतलं जग आणि बाहेरचं जग यांच्यातील एक भिंत बनून जातो.
"काहीतरी करायला पाहिजे राव, काय हे रोजचं आयुष्य.. घर आणि ऑफिस .. बाकी काहीच नाही .. वेळ वाया गेल्यासारखं वाटतंय"
"अरे पण काय करायचं ?हिंडणं फिरणं मौज मजा तर सुरूच आहे ! अजून काय वेगळे पाहिजे ?"
"आपल्या लोकांसाठी, ह्या समाजासाठी काय बरं करता येईल ? जे लोक आपले डोळे झाकून बसलेत त्या लोकांना जागे कसं करता येईल ?"
"ह्म्म्म विचार चांगला आहे, पण सुरुवात कशी आणि कुठून करायची ?"

"च्यायला ह्या गर्दीच्या, लोकांना सिग्नल पाळायला काय होतं ..ट्रॅफ़िक जाम झाली ना "
समाजासाठी काहीतरी चांगलं करायचा महत्त्वाचा विचार मी करत होतो, आणि ह्या वाहतूक कोंडी मुळे हे चांगलं काम होता होता राहिलं.
"जाऊ दे, लोकांना साधा सिग्नल पाळता येत नाही, त्यांना नसेल सुधारायचं तर आपण कशाला झिजायचं असल्या लोकांसाठी ? गेले उडत. "
माझ्या मनानं सुद्धा कारणं काढायला सुरुवात केली. तोपर्यंत आजूबाजूला सगळ्या बाजूंनी वाहने येऊन उभी झाली. बाहेर पडायचा रस्ता मिळेना.

चौकात इतकी गर्दी का झालीये ते बघायला मी मान वर केली.
चौकाच्या मधोमध एक रिक्षा बंद पडली होती, त्यावरून लोकांचा आरडा ओरडा आणि ताशेरे चालू झालेले. जोरात कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण अधिकच तापलेलं. ओल्या रस्त्यावर रिक्षा ढकलण्यापेक्षा रिक्षावाला तिला चालू करायचा आटोकाट प्रयत्न करत होता. रिक्षा मात्र रुसून बसली होती. सुरू व्हायलाच तयार नाही !
    अर्धा एक मिनिट गेल्यावर रिक्शातून 'ती' खाली उतरली. सडपातळ, नाजूक बांधा, पाच-सव्वापाच फूट उंची, गोरापान, सुंदर आणि निरागस चेहरा, बारीक काळेभोर डोळे आणि नोकदार नाक, अंगावर सुंदर कपडे...लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.. पुढे ती काय करणार त्याकडेही लोक उत्सुकतेनं बघू लागले.
ती रिक्षावाल्याला काहीतरी म्हणाली. त्याने तिला होकारार्थी उत्तर दिले. आपली पर्स तिनं रिक्शात टाकली आणि बघता बघता चक्क रिक्षा ढकलायला सुरू केली !
गर्दीने खचाखच भरलेल्या चौकात, भर पावसात, एक सुंदर तरुण मुलगी आपल्या नाजूक हातांनी रिक्षा ढकलतीये.
लोक हे दृश्य बघूनच अवाक झाले. काही लोकांसाठी हा एक मनोरंजनाचा खेळ झाला.
रिक्षा बंद पडल्याने आपली झालेली पंचाईत आणि आपल्यामुळे लोकांची झालेली पंचाईत तिला कळत आहे. लोक आपल्या नावाने शंख करत आहेत, ते पण तिला दिसतंय.
ह्या कारणावरून वैताग आणि चिडचिड करण्यापेक्षा, तिनी त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं, किंवा तिला असं करताना आपण काहीतरी विशेष करत आहोत असं वाटलंच नाही. चेहऱ्यावर गोड हास्य ठेवत, प्रचंड निरागसतेने रिक्षा रस्त्याच्या मधून बाजूला कशी जाईल त्यासाठी ही मुलगी धडपड करतीये. रिक्षावाल्याने सुद्धा रिक्शाला थोडासा धक्का मारला.
काही सेकंदांच्या त्या नाजूक परिश्रमानंतर अखेर रिक्षासुद्धा नमली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली. गर्दीत अडकलेल्या असंख्य वाहनांना वाट मोकळी झाली. मी सुद्धा त्याच गर्दीतून पुढे निघून गेलो.
साहजिकच त्या गोष्टीचं मनाला खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर ती घटना मनात खूप खोलवर रुतली आणि टोचली सुद्धा तितकीच. त्याचं कारणही थोडंसं वेगळं होतं.
ती मुलगी भारतीय नव्हती. परदेशातून आलेली 'गोरी' होती.
मनानं विचारांच्या सायकलवर टांग टाकली होती आणि ते खूप लांबच्या प्रवासाला निघालं होतं. कानामध्ये "वि आर वॉट वि आर" नावाचं माझं आवडतं गाणं सुरू झालेलं.