मेकॉलेचे प्रमाणपत्र

    मेकॉले याने २ फेब्रुवारी १८३५ ला किहिलेल्या पत्रात भारताला प्रमाणपत्र दिले आहे ,
I have travel led across length and breadth of this country and I have seen that no person in this country is a beggar or a thief such wealth I have seen in this country such wealth I have seen in this country.people of such caliber that I do not think we would ever conquer the country.
       मेकॉलेच्या या प्रमाणपत्रानुसार मेरा भारत एके काळी खरेच महान होता असे वाटते. 
आपल्यापैकीही बऱ्याच जणांना एके काळी भारतात सुखसमृद्धीचा सुकाळ होता असे वाटते.पण तसे पहायला गेले तर अगदी रामायणकाळी सुद्धा मंथरा होती,राक्षस होते आणि सज्जनांना त्रास देत होते.महाभारतकाळी तर दुर्योधन आणि कौरव पार्टी नीचतेचा कळस होते.त्यांनी पांडवांना मारण्यासाठी काय काय उपद्व्याप केले नसतील ? द्रौपदीवस्त्रहरण हा तर निर्लज्जपणाचा कळसच.  अगदी अर्जुनाला श्रेष्ठ धबुर्धर बनवण्याचा विडा उचलूनसुद्धा आपल्या मुलाला गुप्तपणे द्रोणाचार्य अस्त्रविद्या शिकवत होते.आणि त्याचबरोबर अर्जुनाने तक्रार करताच  एकलव्याचा अंगठाही निर्लज्जपणे तोडून मागत होते.
      मध्ययुगीन कालात वेगवेगळ्या राजांच्या लढाया सतत चालू होत्या.आणि त्यात अनेक नागरिकांच्या प्राणांच्या आहुती पडत होत्या.खाबूगिरीने आपण आपल्या देशाचे नुकसान करत आहोत याची मुळीसुद्धा जाणीव हे राजे ठेवत नव्हते आणि शिकंदर सारख्या परकीयालाही आपल्याच देशातील दुसऱ्या राजाचे पारिपत्य करण्यासाठी बोलावण्याचा अदूरदर्शीपणा दाखवत होते. मध्ययुगीन काळात जयचंद राठोड मोहम्मद घोरीला बोलावून पृथ्विराजाचे पारिपत्य करत होता तर लखूजी जाधव आपल्याच जावयाला पाण्यात पहात होते . इंग्रज अमलातही राज्यकर्त्यांची हांजी हांजी करून आपला स्वार्थ साधणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती त्यामुळे मेकॉलेच्या प्रमाणपत्राचा हवाला देऊन पूर्वी सर्वत्र "आनंदाचे डोही आनंदतरंग "होते आणि सध्याच जिकडे पहावे तिकडे खाबूगिरी चालू आहे असे म्हणता येत नाही आता माध्यमांच्या सुकाळामुळे खाबूगिरीच्या बातम्या आपल्यासमोर दररोज वाचायला मिळताहेत किंवा दूरदर्शनच्या पटलावर पहायला मिळताहेत इतकेच.एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल ती म्हणजे त्या काळात मूल्ये जपणार्क्ष्या व्यक्तींई संख्या आजया तुलनेत अधिक होती. सध्या खाबूगिरी न करणारी माणसे खाबूगिरी करत नाहीत याचे कारण त्याना ती संधीच उपलब्ध होत नाही एवढेच (एकादा हरभजनसिंगसारखा सन्माननीय अपवाद सोडा !) आपल्या पूर्वासुरीनीही सांगूनच ठेवले आहे,
  को s न याति वशं लोके मुखे पिंडेन पूरित: ।
  मृदंगो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम्  ॥
अर्थात
 वश कोण न होईल मुखी मिष्टान्न घालता
  लेपता मुख कणकेने  मृदंगा मधुरध्वनी
मृदंग या वाद्याच्या एका बाजूस कणकेचा गोळा शाईसारखा मध्याभागी मळावा लागतो म्हणजेच त्यातून गोड आवाज निघतो या दृष्टांताचा वापर करून ,"अहो मृदंगाच्या तोंडालाही कणकेचा गोळा थापल्यावर तो गोड स्वरात बोलू लागतो तर मग जगात असा कोण असणार की ज्याला  भरपूर खायला  दिल्यावर तो/ती आपल्याला वश होणार नाही?
      सध्या साखरकारखान्यांचे घोटाळे चालू आहेत आणि ते निस्तरण्यासाठी केंद्राला मदतीचे साकडे घालणे चालू आहे. मश्ये बी.सी.सी.आय.च्या श्रीनिवासन यांचे प्रकरण चालू होते.त्यात अनेक जण गुंतलेले होते. .यापूर्वी ललित मोदी यांनाही वेगळ्याच घोटाळ्याप्रकरणी जबाबदार धरण्यात आले होते.या एक दोन वर्षात इतकी घोटाळा प्रकरणे बाहेर आली आहेत की त्यांची यादी करणे आणि लक्षात ठेवणेही अशक्य. ए.राजा,नुकतेच प. बंगालमधील शारदा चिट फंड ही सगळी प्रकरणे एकामागून एक बाहेर येतच आहेत.तरीही अतिशय नियमितपणे घोटाळे होतच आहेत याचे कारण काय ?खाबूगिरी करणाऱ्यांना त्याचाच वापर करून इतरांचीही तोंडे बंद कशी करावी हे चांगले कळते. त्यातही उच्च पातळीवरील लोकांना त्यात गुंतवले की आपण सुरक्षित असतो याची खात्री असते. याविषयी पंचतंत्रात विष्णुशर्म्याने एक गोष्टच सांगून ठेवली आहे. ती कोष्टी आणि रथकार यांची गोष्ट म्हणून प्रसिद्ध आहे. लहान मुले वाचतात ( म्हणजे वाचत होती, कारण आता ती हॅरी पॉटर वाचतात.) त्या पंवतंत्रातून  ती गाळून टाकण्यात आलेली असते कारण  आजचे समाजस्वास्थ्याचे कैवारी त्यास आक्षेप घेण्याची शक्यता आहे.
     गोष्टीत एक कोष्टी एकदा एका समारंभात राजकन्येस पहातो आणि तिच्यावर लट्टू होतो.आता तो पडला कोष्टी, आणि ती राजकन्या, अशा परिस्थितीत तिची प्राप्ती त्याला होणे शक्यच नसते,हे लक्षात आल्यामुळे तो अगदी बेचैन होऊन झुरणीला लागतो.त्याचा एक रथकार मित्र त्याला मदत करायचे ठरवतो.तो एक उडणारा रथ तयार करतो आणि त्याला हुबेहूब गरुडाचा आकार देतो त्याचबरोबर कोष्ट्याला विष्णूचा वेष परिधान करण्यास सांगतो.आणि मग आपल्या मित्राला सांगतो."आता या रथात बसून राजकन्येच्या खोलीच्या खिडकीपाशी उडत जाऊन तिला सांग, म्हणावं मी विष्णू आहे, आणि तुझ्याशी गांधर्व विवाह लावायची माझी इच्छा आहे.त्या काळी गांधर्व विवाह फारच प्रचलित होते अगदी अतिपरिचित उदाहरण म्हणजे दुष्यंत शकुंतला,आजकाल त्याला कायदेशीर स्वरूपही यायला लागलेय म्हणा,असो !
   कोष्टी सुस्वरूप असावा नाहीतर तो विष्णू आहे यावर राजकन्येचा कसा विश्वास बसणार ? तर तिचा विश्वास बसला आणि तिने गांधर्व विवाहाला सम्मतीही दिली. आणि ही गोष्ट दोघातच राहील असे आश्वासनही दिले.मग काय दररोज रात्री नकली विष्णु राजकन्येकडे गुपचुप येऊ लागले. राजकन्येच्या सख्यांना शंका यायला लागली की हल्ली त्यांची सखी दिवसभर अशी अगदी गुमसुम का असते, अगदी बोलत  नाही की चालत नाही.(आता रात्रभर जागरण झाल्यावर काय होणार?  आणि त्यांना शंका येते की ती प्रेमात पडली असावी आणि ही गोष्ट त्या राजाला सांगतात.राजा आपल्या लाडकीला विचारतो,"बाळे आजकाल तू बोलतच नाहीस, सारखी गप्प गप्प असतेस,असं तुझ्या सख्या म्हणतात, काय भानगड आहे?"यावर लाजत लाजत ती त्याला सांगते,"बाबा,तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित, पण प्रत्यक्ष विष्णूशीच मी गांधर्व विवाह केलाय"
    प्रत्यक्ष विष्णूशी विवाह ? राजाचा यावर विश्वासच बसेना पण खोदखोदून विचारल्यावरही जेव्हां राजकुमारी आपले म्हणणेच पुन्हा पुन्हा सांगून सत्य तेच आपण सांगत असल्याची खात्री देऊ लागली तेव्हां राजाच्या आनंदाला अंतच राहिला नाही.प्रत्यक्ष विष्णूच जावई म्हटल्यावर आता कोणाची आणि कसली भीती ? त्यामुळे ज्या चक्रवर्तीस तो मोठा मान व खंडणी देत होता त्याला आता कशाला भ्यायचे आणि खंडणी द्यायची असा विचार करून दुसऱ्या दिवशी  पाळत ठेऊन तो राजकन्येच्या खोलीत  गुपचुप शिरणाऱ्या कोष्ट्याला पकडतो आणि त्याला साष्टांग नमस्कार करत म्हणतो,"आज मी धन्य झालो,प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी मला दर्शन दिले. आता मला कोणाचीच भीती नाही कृपया आता उद्या चक्रवर्तीशी युद्ध करून त्याला जिंका आणि यापुढे मी त्याला मानणार नाही व खंडणी देणार नाही म्हणून सांगा. "
          कोष्टी घाबरला आणि लटलट कापू लागला.विष्णू होण्याचे नाटक करणे सोपे होते आणि आनंददायकही कारण त्या सुंदर राजकन्येचा दररोज उपभोग घ्यायला मिळत होता पण विष्णू म्हणून आता चक्रवर्ती राजाशी एकहाती युद्ध करून त्याला जिंकणे ही काही खायची गोष्ट नव्हती.बर आता आपण विष्णू नाही असं कबूल करायचाच अवकाश की पुढच्याच क्षणी आपल्याला सुळावर चढवण्यात येईल. याची खात्रीच होती.त्यापेक्षा सरळ रणांगणावरच जाऊन वीरमरण पत्करावं हेच बरे असा विचार त्यानं केला आणि मग राजानेही सगळीकडे मोठ्या उत्साहाने द्वाही फिरवली की आता प्रत्यक्ष विष्णूच चक्रवर्ती राजाला जिंकण्यासाठी रणांगणात उतरणार. 
     तेवढ्या काळात खऱ्या गरुडाने खऱ्या विष्णूच्या कानावर ही गोष्ट घातली त्यावर विष्णूने "मरू दे त्या मूर्खाला,माझे सोंग काढतो काय?" असे म्हटल्यावर गरुड म्हणाला,’महाराज हे ठीक आहे पण जर त्याने लढाई जिंकली नाही तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल त्याचे काय? ते म्हणतील खरेच विष्णु हरले " मग मात्र विष्णू विचारात पडले.आणि आपल्यावरचा लोकांचा विश्वास कायम रहावा म्हणून शेवटी नाइलाजाने त्या कोष्ट्याच्या शरीरात प्रवेश करून चक्रवर्तीच्या सैन्याचा समाचार त्यांनी घेतला. मग काय कोष्ट्याला राजकन्येशी खरेच लग्न करता आले.लोकांचा विष्णूवरील विश्वास कायम राहिला आणि राजा नवा चक्रवर्ती ठरला.
   थोडक्यात काय, जर भानगडी वा घोटाळे करायचेच असतील (आणि ते करायचेच असतात) तर त्यात आणखी अतिमहत्वाच्या व्यक्तीस  गुंतवता येईल याची दक्षता घ्या.मग तुम्ही कोणते आणि किती कायदे तोडले याची काळजी घ्यायला ते समर्थ आहेतच.इतके घोटाळे होऊन अगदी हिमनगाचे टोक म्हणावे असे घोटाळेच काय ते उघडकीस येतात आणि त्यांचेही पुढे काय होते हे कोणासच कळत नाही त्याचे कारण म्हणजे भारतीय घोटाळेबाजांनी ही पंचतंत्र नीती अतिशय चपखलपणे अंगी बाणवून घेतली आहे हेच होय.