तरही गझल
वृत्त: सती जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा
मतल्यातली पहिली ओळ माझे गुरू आदरणीय श्री. सुरेश भट यांची
*****************************************************
पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले!
जणू दिले काम, लोक ऐसे रडून गेले!!
असेन अत्तर, असेन वा मी गुलाबपाणी!
कुणी मला लावुनी, कुणी शिंपडून गेले!!
कलेवराहून दीन झाले जिणे अखेरी.....
चितेवरी जायच्याच आधी, सडून गेले!
किती किनाऱ्यासमीप मी पोचलो खुबीने.....
कळायच्या आत, हाय, गलबत बुडून गेले!
किती शिताफी, किती सराईत बोलताना!
किती सनदशीर ते मला हासडून गेले!!
सुगंध किरकोळ, काळजाच्या कुपीत उरला!
तमाम तारुण्य, अत्तरासम उडून गेले!!
-------प्रा. सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१