चषक

"वर्तुळाचं टोक झालं आहे माझं आयुष्य. सुरुवात आणि अंत शोधूनही न सापडणारं..." नेहमीसारखाच ’वर्तुळ’ चा प्रयोग रंगला होता. तिच्यातल्या ’राधिकाने’ प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला. प्रेक्षागृहात टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती. राधिकाचं दु:ख इतक्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोचत होतं की नकळत सगळे राधिकाची व्यथा अनुभवत होते. अमिता मात्र राधिकाला काठावर उभं राहून साकारत होती. भूमिकेत शिरणं म्हणजे प्रेक्षकांचाही विसर पडणं. तसा तो कधीच पडत नाही ह्यावर तिचा ठाम विश्वास होता. आपण राधिका उत्कृष्ट सादर करतो आहोत, भूमिकेला न्याय देतो आहोत, राधिका प्रेक्षकांच्या काळजाला हात घालते आहे हे कळत होतं तिला. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ती भानावर आली. पडदा पूर्ण बंद होईपर्यंत  तशीच उभी राहिली. स्वमग्न!
रंगमंचावरून आत वळल्या वळल्या अमिता प्रेक्षकांच्या गराड्यात अडकली. हसर्‍या चेहर्‍याने कौतुक, अभिनंदन ती स्वीकारत होती, स्वाक्षरी देत होती. फोटोला उभी राहत होती. इतक्या गर्दीतही तिने तो चेहरा पटकन ओळखला.
"केतन तू? इथे? कसा आहेस?" ती अत्यानंदाने ओरडलीच.
"अगं, आधी अभिनंदन करु दे. तू काय बाबा मोठी अभिनेत्री होत चालली आहेस. हात पोचणार नाहीत अशा जागी जाऊन बसणार तू लवकरच." ती नुसतीच हसली. त्याने तिच्या हातात हात गुंतवला. अतीव प्रेमाने तिने तो तसाच राहू दिला काही क्षण. 
"आहेस तसा आहेस रे तू."
तो हसला.
"सागरपण आला आहे तुला भेटायला." ती काही न कळल्यासारखी केतनकडे पाहत राहिली. शरीरात लाव्हारस उसळल्यासारखं वाटलं तिला. केतनने भितींच्या दिशेने बोट केलं. भिंतीला टेकून सागर तिलाच न्याहाळत होता. एकटक. दोघांनी त्याच्याकडे पाहिल्यावर तो पुढे आला.
"कशी आहेस अमिता?" सागरच्या डोळ्यातली वेदना आपल्या ओठांनी पिऊन टाकावी असं तिला मनोमन वाटून गेलं. 
"मस्त एकदम. तू कसा आहेस? आहेस तसा आहेस हं, जरा चेहर्‍यावर हसू आलं तरी चालेल की. किती वर्षांनी भेटतो आहोत. निवांत मारु की गप्पा. कधी वेळ काढता दोघं?" सागर नुसताच सस्मित चेहर्‍याने तिच्याकडे पाहत राहिला.
"उद्या भेटू या? कुठेतरी जेवायलाच जाऊ." अमिताने उत्साहाने ठरवून टाकलं.  प्रेक्षकांनी घातलेल्या गराड्याचंही तिला भान नव्हतं.
"सागर आहे मुंबईत उद्या. तो भेटेल तुला. मला परत जायला हवं. माझं तिकिट काढलं आहे रात्रीच्या गाडीचं. खास तुझं नाटक पाहायला घेऊन आलो सागरला. चल, खूप लोकं खोळंबले आहेत तुला भेटायला. आपण बोलू पुन्हा." ती पुन्हा लोकांमध्ये मिसळली. गर्दी ओसरल्यावर तिला दिलेल्या खोलीत शिरली. दार घट्ट बंद करुन ती कोसळलीच खुर्चीत. सागर भेटला पुन्हा हे स्वप्न की सत्य? काय वाटतं आहे नक्की आपल्याला? वाटलं, तसं खरंच त्याच्या डोळ्यात होती का वेदना? का नुसताच भास? त्याचे बोलके डोळे खूप काही सांगायचा प्रयत्न करत होते का? पण तो फारसा बोललाच नाही. स्वत:हून आला होता की केतनमुळे यावं लागलं? एकदा तिला वाटलं बाहेर जाऊन पाहावं आहे का अजून तो तिथेच. कदाचित इतर कलाकारांना भेटत असेल. रेंगाळत असेल आपल्याला स्वतंत्रपणे भेटण्यासाठी. नकोच. जड मनाने  सागरचाच विचार करत ती चेहर्‍यावरचे रंग धुऊन टाकायला उठली. पाण्याच्या प्रत्येक हबकार्‍याबरोबर तिच्या मनाची कवाडं  सताड उघडायला लागली. खूप वर्ष मागे घेऊन गेली.  
उन्हाळ्याच्या सुट्टीत शेजारच्या घरी व्हरांड्यात सतत पुस्तक घेऊन बसलेला मुलगा येता जाता अमिताला दिसायचा. तिची उत्सुकता चाळवली होती पण एकदम कसं बोलणार हा प्रश्न होताच,  त्याचं पुस्तकातलं डोकं कधी बाहेर यायचंच नाही. शेवटी एकदा वाचनालयातून येताना तिने धाडस करुन विचारलं,
"काकूंकडे आलायस का?"
तो हसला, 
"हो. पुण्याहून आलो आहे सुट्टीसाठी."
"केतन नेमका मावशीकडे गेला आहे ना?"
"येईल तो उद्या. माझा पुस्तक वाचण्यात जातो वेळ." सौम्य हसून त्याने उत्तर दिलं. 
केतन आला आणि  आजूबाजूच्या सगळ्या मुलांचे रोजचे पत्त्यांचे डाव रंगायला लागले.  हळूहळू सागरशिवाय आपल्याला चैन पडत नाही हे तिच्या लक्षात आलं. त्याच्या नजरेतली ओढ तिने ओळखली होतीच. सारखं त्याच्या आसपास राहावं, त्याचे कटाक्ष झेलावेत, होणार्‍या चुटपुटत्या स्पर्शाने भान हरपावं असं काहीसं वाटत होतं. वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलायचा त्याला नादच. ती पण ऐकताना गुंग व्हायची. घराजवळच्या वाचनालयात एवढ्या वर्षात ती गेली नसेल इतक्या खेपा आता सागरबरोबर व्हायला लागल्या. एकदा सर्वांनी लोणावळ्याला पिक्चर पाहायला जायचं खूळ निघालं.  अमिताच्या आईने नकार दिला तेव्हा केतन आणि सागरनेच तिच्या आईला गळ घातली. अमिताला आताही हसायला आलं. आई फसली होती त्यांच्या आर्जवांना. चित्रपट पाहताना आपसूकच ती सागरच्या बाजूला बसली. अधूनमधून नकळत, सहेतुक होणार्‍या स्पर्शामध्ये हरवत राहिली. पण हे सारं इतकंच. दोन महिन्यांची सुट्टी संपली आणि तो पुण्याला निघूनही गेला.
खोपोलीला महाविद्यालयात जाणारी अमिता आतुरतेने सागरच्या पत्राची वाट पाहत होती. महाविद्यालयाचा पत्ता तिने आवर्जून दिला होता. तिला खात्री होती पत्रातून तो त्याच्या भावना व्यक्त करेल.  मग तीही त्याला लिहिणार होती, त्याला पाहिल्या पाहिल्या ती कशी त्याच्या प्रेमात पडली ते सांगणार होती. तब्बल दोन महिन्यांनी त्याचं पत्र आलं, तिची आठवण येते, पत्त्यांचे डाव, भटकणं, गप्पांचा अड्डा सारं काही सारखं सारखं आठवतं वगैरे वगैरे. पण कुठेही तिला पाहिजे होते ते शब्द कागदावर उमटले नव्हते. अमिता सैरभैर झाली. म्हणजे आपल्याला वाटलेलं ते चुकीचं होतं? सारं वरवरचं? का आपल्याच मनाचे खेळ होते ते? तिच्या स्वभावाप्रमाणे तिने ताबडतोब उत्तर लिहिलंही पण मनातले विचार मनात दाबून. त्याला काय वाटतं आहे ते कळल्याशिवाय तिला पाऊल उचलायचं नव्हतं. पत्रांच्या खेळाला रंग चढत होता पण त्याच्या मनाचा ठाव लागत नव्हता. आणि अचानक एक दिवस तो उगवलाच खोपोलीला. महाविद्यालयात.
"अरे तू? इथे?" तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
"चुकव ना तास. आपण बाहेर जाऊ."
"कुठे जाऊया? घाटाच्या दिशेने?"
"चालेल." रस्ता संपूच नये असं वाटत होतं, पण त्याचवेळी उगाचच अवघडल्यासारखं होत होतं. लाजल्यासारखं होत होतं अमिताला. 
"कुणालाच माहीत नाही मी इथे आलो आहे. संध्याकाळपर्यंत पुण्याला जायचं आहे." बाहेर पडल्या पडल्या सागर म्हणाला,
"घाटाच्या पलीकडे महादेवाचं देऊळ आहे. तिकडे जाऊन बसू या? आत्ता कुणी नसेल त्या बाजूला."
"चालेल." दोघंही मुकाट रस्ता काटत राहिले. हा मुद्दाम भेटायला आला असेल? काय बोलायचं असेल? न राहवून तिने त्याच्या हातात आपला हात गुंतवला. तो हसला. देवळाच्या मागच्या बाजूला थोड्याशा उंच भागावर ते जाऊन बसले. 
"अमिता, तू आवडतेस मला." तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. ती हसली,
"हे एवढं सांगायला तू पुण्याहून मुद्दाम आलास सागर? तुझ्या हेच शब्द असलेल्या पत्राची वाट पाहिली मी कितीतरी दिवस."
"पत्रातून नीट व्यक्त करणं जमत नाही गं मला. आणि तसंही खूप बोलायचं आहे. म्हणजे मला माहीत आहे तुलाही आवडतो मी. वाट पाहत होतीस माझ्याकडून पाऊल उचललं जावं म्हणून. हो नं?" तिने नुसतीच मान डोलवली.
"पण एखाद्या गोष्टीचा शेवट माहीत असेल तरच ते करणं योग्यं. म्हणजे प्रेम आहे प्रेम आहे म्हणत फिरायचं आणि नंतर घरातले नाही म्हणतात म्हणून, बेत बदलले म्हणून काही ना कारणाने वेगळ्या वाटांनी निघून जायचं. पटत नाही ते मला. असं काही झालं की मनावर पडलेला एक व्रण लपवीत हसतमुखाने वावरावं लागतं आयुष्यभर. कधीतरी तो व्रण आहे हे विसरुन जायला होतं. पण नीट पाहिलं की खुणा दिसतात.  माझ्या दादाचं उदाहरण आहे घरात. मी नक्की काय करणार आहे पुढे हे ठरवूनच माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या मला. ठरवलं आधी तुझ्याशी बोलून घ्यावं. पत्रात लिहायचं, उत्तराची वाट पाहायची. खूप दिवस गेले असते. म्हणून आलो तडक तुला भेटायला." त्याचं हे वागणं अमिताला खूप आवडलं. बसल्या बसल्या तिची बोटं त्याच्या हातांशी चाळा करत होती. आता एकदम त्याच्या मिठीत शिरावं असं वाटून गेलं तिला. ती नकळत त्याच्या दिशेने सरकली. त्यानेही किंचित जवळ ओढल्यासारखं केलं आणि तो तिच्याकडे पाहत राहिला.
"बापरे, तू इतका विचार करतोस काही करायच्या आधी? मी ठरवलं नाही रे अजून मला नक्की काय करायचं आहे ते. म्हणजे पदवी घेतली की काहीतरी करेनच पण नक्की असं काही नाही."
"माझं आहे नक्की. बाबांच्या व्यवसायातच काम करायचं आहे मला. त्यांची प्रिटींग प्रेस आहे ना त्यामध्ये नवीन योजना राबविता येतील. खूप काही आहे मनात. फक्त दोन वर्ष. तोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होईल. मग आपण लग्न करु." त्याची ती भेट मोरपिसासारखी  तनामनावर तिने ल्यायली. कितीतरी दिवस, महिने.
"...आणि कानेटकर चषक अमिता पुरंदरे ह्यांना." अंगावर मोरपीस फिरल्यासारखं वाटलं अमिताला. खुललेल्या चेहर्‍याने तिने चषक स्वीकारला. महाविद्यालयात अभिनय करण्याची ही पहिलीच वेळ होती आणि  प्रथम क्रमांक. बक्षीस स्वीकारून ती जागेवर येऊन बसणार तितक्यात महाविद्यालयाच्या शिपायाने प्राचार्यांनी  भेटून जायला सांगितलं आहे असा निरोप दिला. 
"अमिता, हे मोहन घाग. आजच्या अभिनय स्पर्धेचे परीक्षक. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे." ती नुसतीच हसर्‍या चेहर्‍याने मोहन घागांकडे पाहत राहिली.
"अभिनंदन. फार सुरेख अभिनय करता तुम्ही.  बाणेरे बाई जगलात तुम्ही रंगमंचावर." तिला काय बोलावं तेच सुचेना. ती नुसतेच आभार मानत राहिली.
"व्यावसायिक रंगभूमीवर काम करायला आवडेल का तुम्हाला?"
"अं?"
"सध्या आम्ही एका नवीन नाटकाच्या तयारीत गुंतलो आहोत. त्यासाठी विचारतो आहे. तुमची तयारी असेल तर मी येईन तुमच्या आई वडिलांना भेटायला."
"सर, मी असा काही विचारच केला नव्हता. म्हणजे पहिल्यांदाच करते आहे मी अभिनय. विचार करुन सांगितलं तर चालेल?"
"हो नक्की. पण दोन तीन दिवसात कळव मला." गोष्टी इतक्या पटापट घडत होत्या. मोहन घागांनी दिलेला फोन नंबर घेऊन पंख फुटलेल्या परीसारखी ती घरी आली.
"अगं, शिक्षण पूर्ण कर बाई तुझं. मग ह्या बाकी गोष्टी." तिच्या उत्साहावर आईने पाणी ओतलं.
"आई, अगं घाग सर केवढे प्रसिद्ध आहेत. करु दे ना एका नाटकात काम. करेन अभ्यास आणि शिक्षणही पूर्ण मी." दोन तीन दिवस हो, नाही करत करत शेवटी तिला परवानगी मिळाली. मुंबईला कुणाकडे राहायचं, कॉलेज कधी करायचं, सरावासाठी किती दिवस लागतील. घाग सरांबरोबर एकेक बेत होत राहिले. तिने घाईघाईत सागरला मोठालं पत्र लिहिलं. उत्साहाने भरलेलं. 
सागरने अमिताचं पत्र पुन्हा पुन्हा वाचलं. नाटक? अमिता नाटकात काम करणार? तेही अतिशय प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर. तो तसाच बसून राहिला. खरं तर आपल्याला आनंद व्हायला हवा. पण उलट होतं आहे. का? मनाशी एक हुरहूर दाटून येते आहे. वाटतंय, हे इथेच नाही थांबणार. अजून नाटकं, टी. व्ही. कदाचित चित्रपट... याचाच अर्थ थोड्याच दिवसात आपल्या वाटा वेगळ्या होणार. प्रसिद्धीची तहान कधीच संपत नाही. पत्र बाजूला ठेवल्यावर दोन तीन दिवस त्याने अनिश्चिततेत घालवले. अमिताला भेटून बोलणं उत्तम असा विचार करुन त्याने तिला महाविद्यालयात गाठलं,
"वा, हे छान आहे तुझं. पत्राला उत्तर म्हणून तूच येतोस." महाविद्यालयातून घरी निघालेल्या अमिताला झाडाखाली तिची वाट पाहत उभा असलेला सागर दिसला आणि ती खुलली. पण त्याचा चेहरा गंभीर होता, शांत चेहर्‍यामागच्या वादळाचा तिला अंदाज येईना.
"मला विचारावंसही वाटलं नाही तुला अमे?"
"ए, लगेच तडकू नकोस रे असा. इतकी चांगली संधी मिळते आहे. तुला कळवलं की पत्राने. त्यांना लगेच उत्तर पाहिजे होतं माझ्याकडून." तो तसाच काहीही न बोलता उभा होता. अस्वस्थपणे केसातून हात फिरवत होता.
"ए, तू असा केसातून हात फिरवतोस ना तेव्हा देखणा दिसतोस." ती मधाळ स्वरात म्हणाली. तो काहीच बोलला नाही.
"चल चहा टाकू कुठेतरी." त्याचा नूर पाहून अमिताच म्हणाली. न बोलता तो अमिताच्या मागून चालत राहिला. टपरीसमोरच्या खुर्चीत बसल्यावर अचानक शांत झाल्यासारखा म्हणाला,
" खरं आहे. आपण तसं अजून नात्याने गुंतलेलो नाहीच.  कळवलंस हेच खूप झालं. मुंबईलाच राहणार आहेस का? आता येतो भेटायला मनात आलं की तसं नाही करता येणार यापुढे. पत्रानेच भेटू आपण. अमिता आय लव्ह यू."  सागरने शांतपणे म्हटलं.  अमिताला चोरट्यासारखं झालं. नाटकाचा विचारच सोडून द्यावा, सागरशी लग्न करुन मोकळं व्हावं असं वाटायला लागलं. पण नाटकात काम करण्याचं आकर्षण तितकंच मोठं होतं. नखांशी चाळा करत, पाय हलवित ती तशीच बसून राहिली ते सागर उठेपर्यंत. 
अमिता मुंबईला गेली. सराव सुरु झाले आणि प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम करण्याची तिची नशा सागरला लिहिलेल्या पत्रात उतरत राहिली. न चुकता ती सारं लिहीत होती. त्याचीही उत्तरं येत राहिली. अमिताच्या पहिल्या प्रयोगाला तो आणि केतन दोघं आले तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. आई, बाबा परत गेले. त्या रात्री ती सागर बरोबर रेस्टॉरंटमध्ये गेली. केतनने ठरवून त्यांना एकांत दिला.
"अमिता, तू आता मुंबईलाच राहणार आहेस?"
"हे काय रे, मला वाटलं माझ्या अभिनयाबद्दल बोलशील, कौतुक करशील."
"सांगितलं की भेटल्याभेटल्या."
"ते सर्वांसमोर. आता आपण दोघंच आहोत."
तो हसला. 
"खूप छान दिसत होतीस, आणि काम पण छान झालं." एकमेकांच्या स्पर्शाचं चोरटं सुख अनुभवत ती दोघं खूपवेळ गप्पा मारत राहिली.
"पुढे काय करणार तू? म्हणजे कॉलेज, अभ्यास?"
"परवानगी दिली आहे कॉलेजने, जसं जमेल तसं जाईन, नाहीतर एकदम परीक्षा."
"शिक्षण अर्धवट टाकू नकोस."
"नाही रे, त्याच अटीवर तर हे करायला मिळतं आहे. आज पहिला प्रयोग झाला. लागोपाठ मुंबईतच प्रयोग आहेत आता." 
"दीड वर्षात लग्न करु असं ठरलं आहे आपलं. आहे ना लक्षात?" त्याने खात्री केल्यासारखं विचारलं.
"हं, आहे ना." आवाजात कृत्रिम उत्साह आणत तिने म्हटलं. 
वर्तमानपत्राच्या जाहिरातीतला अमिताचा हसरा चेहरा सागर निरखीत राहिला. अमिताला मुंबईला जाऊन वर्ष झालं होतं. तिचा जम बसत चालला होता. सातत्याने येणारी, आनंद उधळल्यासारखी वाटणारी तिची पत्र आता कमी होत चालली होती. वेळ मिळत नाही हे मोठं कारण ती दरवेळी लिहीत होती तरी कुठेतरी काहीतरी हरवत चालल्याची भावना सागरच्या मनात मूळ धरायला लागली होती. फोटो पाहता पाहता अलगद त्याच्या शरीराला अस्वस्थपणाने वेढलं. हे थांबवावं इथेच? अमिता आता मुंबईत राहणार हे तिने स्पष्ट सांगितलं नाही तरी निश्चित होतं. प्रिटींगच्या व्यवसायात त्याचा जम बसला होता. त्याच्या नवीन प्रयोगांना बाजारात चांगली मागणी होती.  पुण्याच्या इतर भागात आपल्या शाखेचा विस्तार करायचा ध्यास होता त्याचा. आपापली ठिकाणं सोडणं दोघांनाही कठीण होतं. कोणी तडजोड करायची आणि का? शोधूनही उत्तर सापडत नव्हतं. त्याने मग विचार करणंच सोडून दिलं. गेल्या कितीतरी महिन्यात अमिताचं पत्र आलं नव्हतं. फोन करायचा तर कुठे? तिच्या वेळाही अनिश्चित. नाटकाबरोबर आता ती टी. व्ही. सीरियल्स मध्ये व्यग्र झाली होती. त्याने पुन्हा एकदा तिला पत्र लिहायला घेतलं.  
सागरचं पत्र बाजूला ठेवून अमिता चित्रीकरणाकडे वळली. यांत्रिकपणाने ती काम करत होती पण मन सागरचा विचार करत होतं. का पाठवत राहतो सागर पत्र? लक्षात येत नाही का त्याच्या; नकळत दुरावत चाललो आहोत आपण एकमेकांना ते. याला इलाज नाही. हातात इतकं काम आहे की ते पूर्ण व्हायलाच पाच सहा वर्ष लागली असती. थांबेल इतकी वर्ष सागर? थांबला तरी येईल आपल्यासाठी मुंबईत लग्नानंतर? त्याचंही चांगलं चालू आहे ते सोडून यावं त्याने? केवळ माझ्यासाठी? पण मग कशाला आशेवर झुलत राहायचं दोघांनीही? आपला इतक्यात लग्नाचाच विचार नाही असं कळवलं तर? चित्रीकरणाच्या मधल्या वेळात मन शांत ठेवत तिने त्याला पत्र लिहिलं. लग्न करुन मोकळा हो, मला मोकळं कर अशी विनवणी केली. लिहिताना जड जात होतं, डोळ्यातले अश्रू कागदावर पडत होते. पण हाच निर्णय तिला या क्षणाला योग्यं वाटत होता. आता फक्त या क्षेत्रात पाय रोवायचे.  आई, बाबा करतील थोडी कटकट. सागरला नकार देणं म्हणजे विश्वासघात होईल असं बाबा नक्की म्हणणार याची तिला कल्पना होती. पण ती दोघांनाही पटवून देणार होती. पण त्या आधी सागरने पटवून घ्यायला पाहिजे, त्याच्या घरातल्यांनी आपलं मन जाणलं पाहिजे. पत्राची घडी करता करता तिच्या विचारांची साखळी तुटली. चित्रीकरणातला पुढचा प्रसंग सुरु व्हायचा होता.
 अमिताच्या पत्राने सागर मनाने कोलमडला. निराशेच्या धक्क्यातून बाहेर आल्यावर संताप, संताप झाला त्याचा. यश, यशाने आंधळं केलं आहे अमिताला. विसरते आहे की हे सगळं क्षणिक आहे. काही वर्ष चलती असते या क्षेत्रात. पुढे काय? नंतर होईल आठवण, मग पश्चाताप. तोपर्यंत थांबायचं, वाट पाहायची, मुंबईला बस्तान हलवायचं की सोडून द्यायचा अमिताचा नाद? त्याला ठरवता येईना,
"बघ बाबा. तुझं तू ठरव. तिने स्वत:हूनच  कळवलं  आहे म्हणजे मोकळा आहेस तू निर्णय घ्यायला. " त्याच्या आईलाही अमिताची शाश्वती वाटत नव्हती.
"म्हटलं तर बरोबर आहे, म्हटलं तर घोड चूक करते आहे अमिता. पण ठेचकाळल्याशिवाय पुढचं पाऊल नीट पडत नाही." बाबांच्या बोलण्यावर सागर नुसताच पाहत राहिला.
"हे बघ, झालं गेलं विसरुन दोघंही मार्गाला लागा. काही वर्षांनी ती देखील लग्न करेलच. आता स्वत:चा विचार तू करावास हे उत्तम."
"एकदा प्रत्यक्ष जाऊन भेटून येतो." सागरची आशा चिवट होती.
सागर भेटून गेला आणि अमिता उन्मळून पडली. किती परोपरीने त्याने तिला समजवायचा प्रयत्न केला. डोळ्यातलं पाणी लपविण्याचा प्रयत्नही न करता तो तिच्याशी बोलत होता, समजावीत होता. तिला वाटत होतं, त्याने चिडावं, हट्ट धरावा, रागारागाने तुझ्यासारख्या कितीतरी मिळतील असं काहीतरी म्हणावं, फसवणुकीचा आरोप करावा. पण त्याने शांतपणा सोडला नाही. 
"अमिता, एक दोन वर्ष अजून थांबायची माझी तयारी आहे. पाहिजे तर मी पुणं सोडतो. मुंबईतही मला प्रिटींगचा व्यवसाय सहज शक्य आहे. तुझं तसं नाही. मुंबईतच तुला जास्त संधी आहे हे कळतं मला."
"अरे पण मला खरंच इतक्यात लग्न करावं असं नाही वाटत. चुकलं आहे सगळं. मान्य आहे, मी स्वार्थीपणे वागते आहे. पण आयुष्यातली एक संधी अशी अचानक हाती लागली आहे. सोनं करायचं आहे मला त्या संधीचं. दहा, बारा वर्ष झोकून देऊन दुसरे काम करायचं आहे. दुसरे कोणतेही अडथळे नको आहेत मला त्यात. तोपर्यंत तुझंच काय माझंही लग्नाचं वय उलटून गेलेलं असेल. आज मी प्रेमाकरता हे सारं सोडेन. पण ती फसवणूक असेल माझी मीच केलेली. त्याचे परिणाम मला सगळ्यांना भोगायला नाही लावायचे. माझी स्वत:ची फसवणूक करुन तुलाही फसवायचं असं नाही करायचं रे. प्लीज समजून घे ना." काही न बोलता सागर उठून चालता झाला आणि अमिताने टेबलावरच डोकं टेकवीत अश्रूनं वाट मोकळी करुन दिली.
या गोष्टीला सात वर्ष उलटून गेली होती. सागर भेटून गेल्यावर तिने कामात बांधून टाकलं स्वत:ला. पण समाधान नव्हतं. आईशिवाय मोकळं बोलायला जीवाभावाचं कुणी नव्हतं. ना मित्र, ना मैत्रिणी. एकाकीपणाचा  वेढा घट्ट होत चालला होता. सागरला लिहिलेली पत्र म्हणजे स्वत:च्या मनाचा आरसाच असायचा की. कधीतरी तिला ते अचानक जाणवून गेलं. खरं तर  गेल्या सात वर्षात असा एक दिवस गेलेला नव्हता की सागरची आठवण झाली नाही. सागरला दिलेल्या नकाराची अमिताच्या मनातली बोच वाढत चालली होती. अचानक एका हळव्या क्षणी अमिताने त्याला पत्र लिहिलं. सारं सोडून लग्न करायची तयारी दर्शविली. लिहिलेलं पत्र पुन्हा पुन्हा वाचत ती शब्दांचे खेळ करत राहिली. त्याच्यामध्ये किती गुंतलो ते आता कसं लक्षात येतं आहे हे स्वत:ला, त्याला पटवून देत राहिली.
"आई, सागरला कळवलं आहे मी लग्नाला तयार असल्याचं." अमिताच्या आईला अतीव आनंद झाला. गेली काही वर्ष ती लेकीला सोबत म्हणून तिच्याबरोबर येऊन राहिली होती. अधूनमधून अमिताने आता लग्न करावं म्हणून ती तिच्या मागे भुणभूण लावे.  
"अगं थांबला असेल का तो तुझ्यासाठी? तूच सांगितलंस ना त्याला लग्न कर. सात वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे. कोण थांबेल गं आशेला काही जागा नसताना. नको होतंस अमू तू असं पत्र लिहायला. आता लग्न करुन बसला असेल तर पुन्हा चुटपूट त्याच्या जीवाला."
अमिताही गांगरली. सागरच्या आयुष्याच्या वाटा बदलल्या असतील याचा विचारच केला नव्हता तिने. पत्र लिहून तर ती मोकळी झाली होती. वाट पाहणं इतकंच उरलं होतं हातात.
"खूप उशीरा समजलं अमे तुला तुझं प्रेम. मला खरंच काय प्रतिक्रिया द्यावी ते समजत नाही. पण आता माझा नकार आहे. का? लग्न केलं आहे का मी? नाही, पण तुझ्याशी लग्न करायचं नाही हे मात्र मी मनाशी पक्कं केलं होतं. त्याच दिवशी. ज्या दिवशी पराभूत मनाने तुझा निरोप ना त्या दिवशी. तुझं थोबाड रंगवावं, ताडताड तुला बोलावं असं मला वाटलं नसेल असं खरंच तुला वाटतं? पण माझा तो स्वभाव नाही, दिलेलं वचन सोयीप्रमाणे फिरवण्याचंही मला जमत नाही. आणि एकदा तुझ्याशी लग्न करायचं पक्कं  ठरवल्यावर माझ्याकडून जमलं तितका प्रयत्न केला होता तुझं मन वळविण्याचा. स्वत:चे बेत बाजूला ठेवून शेवटी मुंबईला यायचंही ठरवलं मी. मला ठाऊक आहे, माझ्या मवाळ स्वभावाचा तुला तिटकारा यायचा कधीतरी,  मी उसळून जावं, उत्स्फूर्त वागावं असं तुझं म्हणणं. जमलं नाही मला ते. आजचा माझा निर्णयही मी शांतपणेच घेतला आहे. तुझं माझं जमायचं नाही. दोघांच्याही आयुष्यात इतर कुणी नसतानाही नाही येऊ शकत आपण एकमेकांच्या आयुष्यात पुन्हा. खूप उशीर केलास अमे. तुझ्या वाटचालीला माझ्या शुभेच्छा.
पत्राचा चोळामोळा करुन ती रडत राहिली. खूप वेळ. अस्वस्थपणा मनात घर करुन राहिला कितीतरी दिवस. आणि एकदम तिला जाणवलं, चहाचा कप हातात घेऊन भितींकडे एकटक पाहता पाहता तिला जाणवलं की हे, हे त्याचं वागणं तिला आवडलं आहे. जमलं आहे त्याला त्याचा मवाळपणा भिरकावून टाकणं आणि त्याच्या अमिताला कठोरपणे चार शब्द सुनावणं. एकदम तिला वाटून गेलं भूमिका बदलाव्या. पूर्वी तो वागायचा तसं वागावं आपण,  अजिजी करावी, गळ्यात पडून मनवावं...खरंच बदलेल तो निर्णय आपला.  तिने असं काही केलं तरी उपयोग होणार नाही याची कल्पना असल्यासारखी ती हसली. केविलवाणं. नकाराचं वर्तुळ पुरं झालं आणि प्रेमभंगाचं दु:ख अमिताने अभिनयात बुडवलं.
आज कितीतरी वर्ष झाली होती या गोष्टीला. इतका काळ लोटला आणि अचानक सागर समोर आला. असेल त्याला दु:ख त्याने दिलेल्या नकाराचं? जागवत असेल तो आठवणी तिच्या, त्याच्या भेटींच्या? पाहत असेल आपली नाटकं, चित्रपट, सन्मान, पुरस्कार सोहळे... त्याच्या त्या नकाराने प्रेमाचा अर्थ समजल्यासारखं तिने तिच्या कामावर, अभिनयावर झपाटून प्रेम केलं.  त्या प्रेमाला भक्तिभावाने आळवत राहिली. अभिनयाने, तिच्या त्या प्रेमाने तिला सारं काही दिलं. ओळख, मान सन्मान, पुरस्कार...
 सागरची ती कृतज्ञ होती. आजचं यश, कीर्ती यामागे होता त्याचा ’नकार.’