हजार चुराशीर मा - महाश्वेतादेवी (अनु. अरुणा जुवेकर)

एखादे तत्त्वज्ञानं आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय? ते पटत असल्यास त्याचा आस्वाद जास्त चांगल्या तर्‍हेने घेता येईल काय? हा प्रश्न मला सुरुवातीला "हजार चुराशीर मा" पुस्तक वाचण्याआधी पडला होता. मात्र महाश्वेतादेवींचे हे पुस्तक हाती पडल्यावर हे सारे प्रश्न विरून गेले आणि एक अतिशय सुंदर पुस्तक वाचल्याची अनुभूती मिळाली. मला मिळालेले पुस्तक अनुवादीत होते मात्र त्याने फार काही फरक पडला असे वाटले नाही. अनुवाद केलेल्या अरुणा जुवेकर यांचा प्रत्यक्ष परिचय असल्याने आणि त्यांचा बंगाली भाषेचा प्रदीर्घ व्यासंग माहीत असल्याने अनुवाद उत्तम असणारच याची खात्री होती. शिवाय लेखकाची शैली अबाधित ठेवण्यावर त्यांचा भर असतो हे त्यांनी आपल्या अनुवादाबद्दल बोलताना मुद्दाम नमूद केलं होतं त्याचा देखिल प्रत्यय हे पुस्तक वाचताना पुरेपूर आला.

हे छोटेखानी पुस्तक कलकत्त्याच्या मुक्तिदशक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कालखंडात घडलेल्या तरुणांच्या हत्याकांडावर आधारलेले आहे. सुजाता ही श्रीमंत खानदानी घरातील मध्यमवयीन स्त्री. पती, मुले, सासू यांच्या गराड्यात वावरणारी. देखणी, अबोल सुजाता बँकेत नोकरी करते. आणि एक दिवस तिला फोन येतो की तिचा सर्वात धाकटा आणि सगळ्या मुलांमध्ये तिचा सर्वाधिक लाडका असलेला मुलगा व्रती हत्याकांडात मारला गेला आहे. तिला आपल्या मुलाच्या बाहेरच्या उद्योगांबद्दल काहीच कल्पना नसल्याने हा तिच्यावर वज्राघातच असतो.त्यानंतरचे सर्व कठीण सोपस्कार उरकतात ते सुजाताच्या मनावर कायमच्या खोल जखमा ठेवूनच. या प्रसंगाला दोन वर्षे उलटून जातात. पुन्हा तोच दिवस येतो. व्रती ज्या दिवशी मारला जातो त्याच दिवशी घरी नेमका धाकट्या मुलीचा साखरपुडा असतो. त्या दिवसभराच्या चोवीस तासात जे वादळ सुजाताच्या मनात आणि बाहेर घडतं त्यावर हे पुस्तक बेतलेलं आहे.

सुजाताच्या मनात प्रश्नांचं काहूर उमटलेलं असतं. सतत दोन वर्षे ती ह्या प्रश्नांची उत्तरे शोधीत आहे. तिच्या कडून काही चूक झाली काय? आपल्या मुलाचं असं कसं झालं? आपल्याला आधी काहीच कल्पना कशी आली नाही? आणि ही उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात तिची भेट व्रतीच्या गरीब मित्राच्या आईशी होते. हा मित्र देखिल व्रतीबरोबरच मारला गेला आही. मात्र यांची अवस्था भयानक आहे कारण त्याच्या मोठ्या बहिणीशिवाय घरात कमावणार कुणीच नाही. सुजाताला या घराबद्दल आणखी ओढ असण्याचं कारण व्रती शेवटच्या दिवशी येथे येऊन थांबलेला आहे. पुढे सुजाताची भेट व्रतीच्या प्रेयसीशी देखिल होते. या सार्‍यांकडुन सुजाता काही धागेदोरे मिळवते. स्वतः विचार करून काही धागे जुळविण्याचा प्रयत्न करते. हे करतानाच तोला आपल्या अवतीभोवतालच्या माणसांशी देखिल झगडावं लागतं.

सुजाताच्या जवळपासची माणसे तिच्याहून अगदीच भिन्न आहेत. स्वार्थी, कामासक्त नवरा, छळवादी सासू, कणाहीन मुले, बेवडे जावई, काही नातलग व्यभिचारी, उथळ, आणि अशा गराड्यात तिला व्रती अगदीच वेगळा वाटतो. हळूहळू तिला त्याचे वागणे कळू लागते, पटू लागते. या सार्‍या प्रस्थापितांविरुद्धच त्याचा लढा असतो. त्याला बदल घडवून आणायचा असतो. त्याच्या मृत्यूची बातमी पेपरात येऊ नये म्हणून यशस्वी धडपड करणार्‍या नवर्‍याबद्दल तिला तिरस्कार वाटू लागतो. जवळचे सरकारी नोकरीतील, पोलिसातील काही जण व्रतीच्या भयानक, क्रूर मृत्यूला कारणीभूत झालेले असतात. त्यांना तिचे मन क्षमा करू शकत नाही. कायमचा गेलेला मुलगा, कसलीही खूण मागे न ठेवता. त्याला पोलिसात फक्त एकच नाव मिळते. क्रमांक एक हजार चौर्‍यांशी. आणि सुजाता ही या एक हजार चौर्‍यांशीची आई. बस. मामला खतम.

महाश्वेतादेवींनी लिहिलेल्या या कादंबरीची ताकद त्यांच्या शैली इतकीच त्या विशिष्ट घटनाक्रमात आहे. फक्त एका दिवसात घडत जाणारे कथानक रंगवण्याचे अतिशय अवघड काम त्यांनी कमालीच्या यशस्वीपणाने पार पाडले आहे. आई मुलाच्या प्रेमळ संबंधाचे हृद्य चित्रण त्यांनी जागोजाग केले आहे. त्यामुळे हे नाते पुढे पुढे अधिकाधिक गहिरे होत जाते आणि सुजाताचे दु:ख देखिल तितकेच गडद होत जाते.व्रतीच्या मृत्यूचे वर्णन देखिल अंगावर शहारे आणते. महाश्वेतादेवींच्या शैलीचा जबरदस्त परिणाम वाचकावर होतो यात शंकाच नाही. काही ठिकाणचे वर्णन तर वाचवतदेखील नाही इतके दु:ख त्यात भरलेले आहे. स्त्रीच्या कोमल भावना, तिच्या मुलाबद्दलची तिची ओढ अतिशय तरल शब्दात महाश्वेतादेवी मांडतात आणि कथानायिकेचं दु:ख हे वाचकाचं दु:ख होऊन जातं. अर्थातच यात अनुवाद केलेल्या अरुणा जुवेकरांचा महत्त्वाचा वाटा आहेच. त्यांची भाषेवरील हुकुमत निर्विवाद आहे. महाश्वेतादेवीची शैली बरोबर घेऊन त्याचा मराठीत अनुवाद करण्याचे काम त्यांनी कौशल्याने पार पाडले आहे. फक्त एका ठिकाणी मला खटकलेली गोष्ट म्हणजे खालच्या स्तरावरील माणसांच्या तोंडी त्यांनी घातलेली ग्रामीण मराठी बोली. जागोजाग येणार्‍या कलकत्त्याच्या वातावरणात ही बोली निदान मला तरी खटकली. बाकी अनुवाद अतिशय प्रभावशाली. थोडक्यात एक आशय ठासून भरलेले, अप्रतिम पुस्तक वाचण्याचा आनंद या पुस्तकाने दिला.

यानंतर एक समाज शास्त्राचा विद्यार्थी म्हणून या कादंबरीकडे पाहताना मात्र माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले. त्याचा ही उल्लेख येथे केल्यास अस्थानी होणार नाही. मार्क्स, कम्युनिझम, मार्क्सवाद याचा कसलाही उल्लेख या पुस्तकात नाही. तरीही मार्क्सवादी मांडणी जागोजाग जाणवते. मार्क्सवाद हा विद्वानांनी कितीही गुंतागुंतीचा केला तरीही या तत्त्वज्ञानाने अनेकपदरी जनव्यवहार सोपा करून टाकलेला आहे आणि त्याचा प्रभाव या लेखनात दिसतो. महाश्वेतादेवींबद्दल त्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत या व्यतिरिक्त मला फारशी माहिती नाही. मात्र त्या कट्टर मार्क्सवादी असाव्यात असे मला या पुस्तकाच्या मांडणीवरून वाटले. आणि ही मांडणी पाहणे उद्बोधक आहे. सुस्पष्टपणे काळ्या आणि पांढर्‍या या दोनच रंगवलेल्या सर्व व्यक्तिरेखा. काळ्या रंगात सर्व प्रस्थापित भांडवलवादी रंगवलेले. ते सारे शोषण करणारे, स्वार्थी, व्यभिचारी, कामी, दारुडे, उथळ. सुजाताला तिच्या सार्‍या श्रीमंत नातेवाइकात एकदेखील माणूस तिच्या विचारांचा किंवा तिच्या मुलाशी सहानुभूती दर्शवणारा मिळत नाही याचे खूप आश्चर्य वाटले. सारे गरीब पांढर्‍या रंगात रंगवलेले. अगदी सद्गुणांचे पुतळे नसले तरी ते सर्व शोषित. येथे नायिकेला संशयाचा फायदा मिळतो कारण त्यांच्यातले दुर्गुण कळावे इतपत तिची त्या समाजात ऊठबस नाही. मात्र माझ्यासारखे वाचक जे या समाजातून आहेत त्यांना येथील समस्यादेखील माहीत असतातच. त्यामुळे गुंतागुंतीचा लोकव्यवहार अगदीच सोपा केलेला वाटतो. यावर बरेच काही लिहिता येईल. मात्र एक गोष्ट नक्की तीही की यामुळे कादंबरीच्या आस्वादात काही फरक पडत नाही. एक सामर्थ्यशाली लिखाण या कादंबरीत भेटले असे मला वाटते.

अतुल ठाकुर