नाटाचे अभंग... भाग ३६

३५. हेंचि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध ।
 आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्‍वर्गा ॥१॥
 सांवळें रूप ल्यावें डोळां । सहा चौ अठरांचा मेळा ।
 पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्त्र ॥धृ॥
 भोजना न द्यावें आन । जेणें चुके अनुपान ।
 तरीच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥३॥
 नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा ।
 बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥४॥
 पासी तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी ।
 होईल घुसळिलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥५॥
 न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा ।
 होसील आधीं होतासी तैसा । तुका म्हणे दशा भोगी वैराग्य ॥६॥

  जन्माला आल्यानंतर देहधारी जीवाला, त्याची इच्छा नसतानादेखील, कर्मविपाक सिद्धांतानुसार अथवा प्रारब्धाचे भोग म्हणून काही ना काही आधी-व्याधींचे क्लेष सहन करावेच लागतात. ‘न प्रार्थिता दुःख पावें । या कारणें न संभवे स्वतंत्रता॥’ असे एकनाथ महाराज सांगतात. मानसिक किंवा शारीरिक रोगांचे भोग प्राप्त झालेले असताना असहाय्यतेने आणि आतुरतेने त्या क्लेषातून सुटण्याची जीवास उत्कंठा लागून राहते. शास्त्रामध्ये अनेक ऋषी-मुनिंनी या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून वेदाचे एक उपांग असलेल्या ‘आयुर्वेदा’ची निर्मिती केली आहे. तरीही ‘भवरोग’ या नावाचा रोग आणि त्यावरील उपायाचा स्पष्ट असा उल्लेख, पारमार्थिक वाङ्गमय वगळता, इतरत्र केलेला दिसत नाही. तथापि, तसा उल्लेख नाही, म्हणून तो रोगच नाही, असे म्हणता येत नाही, कारण प्रत्येक जीव अशांत-बेचैन असल्याचे रोजच्या मानवी जीवनात दिसून येते. या रोगाचे वैशिष्ट्य असे की, विशेषत्वाने नरदेह प्राप्त असणार्‍यांना हा रोग जन्मजात जडलेला असला तरी अति जवळिकतेमुळे त्याची जाणिव लवकर होत नाही. तसे पाहता, रोग व दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दुःखाची तीव्रता वाढते तेव्हा त्या दुःखापासून सुटका करून घेण्यासाठी जीवाची तातडी सुरू होते. त्यासाठी नानाविध प्रकारे तो उपाय करू लागतो खरा, परंतु अपेक्षित यश त्याच्या पदरात पडणे हे पुन्हा प्रारब्धाच्या हातीच राहात असते. असे प्रयास सुरू असताना प्रारब्धवशात् त्याला संतमुखाने श्रवण घडते... ‘वैद्यो नारायणो हरिः’ किंवा, ‘वैद्य एक तो पंढरीराव । झाली माव तो जाणे ॥’. त्याला असेही समजते की, ‘भवरोगाऐसें जाय ।  आणीक काय क्षुल्लकें ॥’ अशा प्रकारे त्याला श्रवण घडल्यानंतर त्याला चिंतन घडते. परंतु या ठिकाणी त्याची बुद्धी थेकुटी पडते व तो निराश होतो. तो मग जाणकार असलेल्या संतांना शरण जातो. येन् केन् प्रकारेण रोगापासून मुक्ती मिळणे, हेच त्या व्यथित जीवाचे ध्येय बनलेले असते. त्यासाठी तो आतुर झालेला असतो. अशा आतुर जीवांचा कळवळा तुकोबारायांना आला आहे. त्यापोटी त्यांनी जो उपदेश केला आहे, तो या अभंगातून वाचावयास मिळतो. हा उपदेश करताना तुकोबारायांनी ‘ताप आणि त्यावर केल्या जाणार्‍या पारंपरिक उपायां’चे रूपक योजलेले आहे.
 ताप भरला असता पारंपरिक उपाय करताना काडेचिरायता काढा देणे, त्रिभुवनकीर्तीरस किंवा सुदर्शनवटी योगवाही मिश्रणासह देणे, अनेक वनस्पती वापरून तयार केलेला काढा किंवा गोळी देणे, औषधाचा गुण लवकर यावा म्हणून अनुपान सांभाळणे म्हणजे मुख्य औषध घेतल्यानंतर गरम पाणी किंवा दशमूलाचा उकाळा प्राशन करणे, लंघन (अन्न न घेणे) करणे, साबुदाण्याची गरम खीर किंवा गरम कणेरी खाणे, जाडजूड पांघरूण घेऊन पडून राहणे, वारा लागू न देणे, पूर्ण विश्रांती घेणे, शरीरातून घाम काढण्यासाठीचे उपाय करणे आणि ताप निघाल्यानंतर (अनुताप) कढत पाण्याने आंघोळ करणे अशा प्रकारे उपाय केले जातात. हे उपाय करीत असताना जे पथ्य सांगितले जाते, ते पाळावे लागते तरच गुण लवकर दिसून येतो. भवरोगामुळे आलेल्या भवतापाचे हरण करण्यासाठी तुकोबाराय अशाच प्रकारे करावे लागणारे उपाय समजावितात.
 भवरोगाबाबत विचार करता असे लक्षात येते की, स्वस्वरूपाचा विसर आणि मायाकृत संसाराचे अथवा प्रपंचाचे भासित ज्ञान (खरे म्हणजे अज्ञान) हे भवरोगाचे कारण असते. याच्या लक्षणाबाबत असे म्हणता येईल की, मायेच्या आधिपत्यामुळे दिसणारे व भासमान् असलेले ते आणि तेव्हढेच सत्य असे वाटणे व त्यातून दिग्भ्रमित झाल्यामुळे नको तो संग घडून क्लेष पदरी येणे. या रोगाच्या व्याप्तीचा विचार असा सांगता येईल की, ज्याप्रमाणे तापाचे नक्की ठिकाण सांगता येत नाही, सारे शरीरच गरम होते, तद्वत् भवरोगाचेही आहे. साधारण ताप आणि भवरोगामुळे होणारा ताप यातील फरक एव्हढाच आहे की, ताप हा शरीरावर प्रत्यक्ष जाणवत असतो, ती व्याधी असते. मात्र भवताप हा मानसिक ताप असल्याने ती आधी असते. वर म्हटल्याप्रमाणे ही आधी (मानसिक क्लेष) अनुवंशिक, जन्मजात असते. त्यामुळे त्या आधीचे स्वरूप ‘खोलवर रुजलेला आजार’ (क्रॉनिक झालेला आजार, हाडीताप) असे असते. त्यामुळे साध्या औषधांचा या आधीवर उपाय चालत नाही. त्यासाठी जालीम असे औषध द्यावे लागते. हे रामबाण औषध संतांना मात्र चांगले ठाऊक असते.
 अशा या जुनाट भवरोगावरचे औषध सांगताना तुकोबाराय सर्वप्रथम ‘हेंचि’ हे चकारात्मक पद वापरतात. ते जे औषध सांगणार आहेत, ते रामबाण, शंभर टक्के गुण देणारे एकमेव, अद्वितीय असे औषध असल्याचा निर्वाळा तुकोबाराय देतात, कारण त्याची स्वानुभूती त्यांनी घेतलेली आहे. या औषधाचा दूरगामी असा परिणाम सांगताना ते उल्लेख करतात की, या औषधाने जन्मासवे चिकटलेली जरा व्याधी तुटते. ‘जरा’ म्हणजे म्हातारपण, वार्धक्य. लक्षात घ्यावे लागते की, म्हातारपण हे शरीराचे क्षीण होणे असते आणि ते नैसर्गिक आहे. जन्म आणि जरा ही जीवनरूपी दोरीची दोन टोके आहेत आणि या दोन्हीही अवस्था क्लेषदायक (- व्याध) असतात. सामान्यतः यातून सुटका नसते. तुकोबाराय जे औषध सांगणार आहेत, त्याच्या परिणामाने पुढील जन्म-जरा-मृत्यु ही शृंखलाच खंडित होते. पुनर्भव नसल्याने भवरोगातून सहीसलामत बाहेर पडणे शक्य होते. या दूरगामी परिणामाशिवाय या औषधाचे असेही वैशिष्ट्य असल्याचे ते सांगतात की, यामुळे अन्य छोट्या-मोठ्या बाधा (साईड् इफेक्ट्स्) नाहीत किंवा तशा बाधा असल्या, तरी त्याही दूर होतात. एव्हढेच नव्हे, तर ज्या कारणाने या बाधा होतात, तो षड्वर्ग (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मानसिक क्लेष देणारे शत्रू), त्याचा हे औषध वध करते. त्यांचा समूळ नायनाट करते.
 भवरोगावरील हे जालीम औषध कोणते, ते तुकोबाराय पुढे धृपदात स्पष्ट करतात. ते सांगतात, ‘सांवळे रूप ल्यावें डोळां’. सावळे रूप म्हणजे हरि (हरण करणारा) असलेला विठ्ठल. ‘वैद्यो नारायणो हरिः’ असे शास्त्रवचन आहे. या सावळ्या रूपाचे मनोमन दर्शन घ्यावे. त्याचे रूप डोळ्यात साठवावे. हा ‘हरि’ हेच या भवरोगाचा वैद्य आहे आणि तोच औषधही आहे. सहा (शास्त्रे), चार (वेद), अठरा (पुराणे) यांतून एकमुखाने वर्णिलेला हा हरिच आहे. द्रव औषध (काढा) किंवा गोळी तयार करताना त्यात ज्याप्रमाणे समान गुणधर्मी घटकांचे मिश्रण करण्याचे विधान असते, त्याचप्रमाणे वेद-शास्त्रे-पुराणे हे घटक एकत्र करून (मेळा) हे औषध सिद्ध केलेले आहे. या औषधाचे हे जे सहा-चौ-अठरा घटक आहेत, ते नित्य शुद्ध असणारे आहेत. ‘खळ’ म्हणजे क्षुद्र दैवते व त्यांना वश करण्यासाठी असणारी साधने किंवा विषयांनुषंगाने उद्‍भवणारे दोष. अशा खळांचा दूरान्वयानेदेखील संपर्क येऊ देऊ नये, त्यांना जवळपास फिरकू देऊ नये (पदर लागों नेदी). किंबहुना, या औषधाचे म्हणजेच सावळे रूप धारण केलेल्या हरीचे स्वतःचेच सामर्थ्य असे आहे की, जे ‘खळ’ आहेत, अपवित्र आहेत, त्यांना तो जवळ फिरकू देत नाही (नाशुभम् प्राप्नुयात्किञ्चित्... वि.स.ना.) .  या औषधाचा सेवनविधी सांगताना तुकोबाराय जो मार्ग सोयीस्कर असेल, त्या मार्गाने हरिनाम घ्यायचे. यासाठी दोन मार्गांचा तुकोबारायांनी उल्लेख केला आहे. ‘नाम जे मंत्ररूप आहे (रामनाम, रामकृष्णहरि आदी), त्याच्या माळा कंठी धारण करावयाच्या म्हणजे सातत्याने उच्चार करायचा किंवा विष्णुसहस्त्रनामाचे अखंड पारायण करायचे.
 औषध घेण्याचा विधी सांगितल्यानंतर तुकोबाराय पथ्याचा उल्लेख करतात. वैद्यक शास्त्र हे औषधाइतकेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्व पथ्यापथ्याला देते. तुकोबारायांचे सांगणे आहे, ‘भोजना न द्यावे आन’. हे औषध हेच भोजन आहे. त्याशिवाय अन्य काहीही खायचे नाही, (पूर्ण लंघन करायचे, जे ताप आला असता अपर्यायाने आचरावयास वैद्यकशास्त्र सांगते). अन्य काही सेवन केले तर अनुपान चुकेल. ‘भोजन’ याचा अर्थ येथे आहार-विहार असा घेतल्यास, आपला आहारविहार परमार्थास बाधक न होता साधक कसा होईल, याची काळजी घेणे हितावह ठरणारे असते. साधकाने जे साधन सांगितले असेल, त्याप्रमाणेच आचरण करावे. त्यात आपमतीने बदल करू नये. (तेचि मार्गें चालों जातां । न पडे गुंता कोठे कांहीं ॥) तुकोबाराय हे स्पष्ट करतात की, अनुपान सांभाळले गेले, तरच घेतलेल्या औषधाचा खरा गुण येतो (सत्य भाव), हे नीट लक्षात ठेवावे (जाण).
 पथ्य-कुपथ्य सांगितल्यानंतर तुकोबाराय अपथ्य म्हणजे ज्या गोष्टी कटाक्षाने टाळल्याच पाहिजेत्, अशा अपथ्याचा उल्लेख करतात. तापाने आजारी व्यक्तीला वारा लागू द्यायचा नाही, कारण अशा आजारात बाहेरचा वारा लागल्यास अन्य जंतूंचे आक्रमण संभवते आणि मग आजार गंभीर रूप धारण करीत असतो (आजच्या वैद्यक शास्त्राप्रमाणे न्यूमोनिया संभवतो किंवा पोलियोप्रमाणे अपंगुत्व संभवते.). यासाठी तुकोबाराय निक्षून सांगतात की, आपल्या घराबाहेर निघू नये. येथे ‘आपुलिये घर’ या पदाचा विचार करताना राहण्याची जागा, देह (आत्म्याचे निवासस्थान), कुटुंब, घराणे किंवा वंश असे अनेक अर्थ असले तरी येथे विषयानुरोधाने ज्या साधनात स्थिर राहणे अपेक्षित आहे, ते साधन असा अर्थ घ्यावा लागतो. घराबाहेर निघणे म्हणजे घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करणे, अन्य मार्ग चोखाळणे. तसे झाले तर अन्य मार्गांचा मोह होऊन पुन्हा आजारपणास निमंत्रण देणे ठरेल किंबहुना आजाराचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढेल. घराबाहेर न निघणे, बाहेरचा वारा लागू न देणे, वायफळ बोलणे (इंद्रियांचा दुरुपयोग करणे ) आणि अन्य संग वर्ज्य करणे ही सारे अपथ्ये असल्याचे तुकोबारायांचे सांगणे आहे. संगाचा परिणाम सांगण्यासाठी ‘ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला’ अशी म्हण वापरली जाते. त्याचप्रमाणे ‘संगति संगदूषणम्’, संगातून दुसर्‍याचे सद्‍गुण आपण सहसा उचलीत नाही, पण दुसर्‍याचे दोष मात्र आपल्यात विनासायास संक्रमित होत असतात. असे घडणे हानिकारक असते, हे वेगळे सांगावयास नको. आपल्या घराबाहेर पडल्यास काय होते, ते भगवद्गीतेच्या दुसर्‍या अध्यायात स्पष्ट केले आहे. घराबाहेर पडले की, विषयांशी संपर्क होतो, त्यातून वासना चाळविली जाते, वासनेतून क्रोध जागा होतो, क्रोधामुळे संमोह होतो, संमोहामुळे म्हणजे मूढत्वामुळे स्मृतिभ्रंश होतो, त्यातून बुद्धी काम करेनाशी होते आणि मग विवेक संपल्याने मनुष्य आपल्या स्थितीतून पतित होतो. हे पतन टाळण्यासाठी अकारण होणारा इतर गोष्टींचा अंतर्बाह्य संग टाळणे श्रेयस्कर असते. तथापि, साधनेस सहाय्यभूत होणारा सत्संग मात्र पथ्यकर असतो.
 भवरोगावरील औषध सेवन, अनुपान, पथ्य, कुपथ्य, अपथ्यादींचा विचार केल्यानंतर तुकोबाराय आजारास उतार पडत अस्ल्याची लक्षणे दिसू लागताना घ्यावयाच्या काळजीविषयी स्पष्टीकरण देतात. औषध सेवन केले असता, हळू हळू त्या औषधाच्या परिणामाने व्याधीला कारण झालेल्या जंतूंची तडफड सुरू होते. त्यांचा प्रभाव संपत जातो. शरीराची प्रतिकारशक्ती जोमाने कार्य करू लागते. घामावाटे रोगाचे कारण बाहेर पडू लागते. तापाची लक्षणे कमी होऊ लागतात. या स्थितीत रोगाचे कारण पूर्णतः बाहेर पडावे म्हणून रुग्णास आणखी पांघरुण घालतात. त्यामुळे दरदरून घाम सुटू लागतो. श्रद्धा हे आपल्याजवळ असलेले कांबळे (ब्लॅन्केट) आहे ते पांघरायचे. नामाचा आश्रय घेतला की, मनाला घेरून असणार्‍या विषयवासना खवळून उठतात. श्रद्धेचे जाड पांघरूण घेऊन निरंतर नामरूपी साधनाचा मारा चालू ठेवल्याने अंतःकरणात आत्म-स्वरूपज्ञानाचा हळू हळू उदय होत जातो. त्या ज्ञानाच्या प्रभावाने विषयवासना खवळतात खर्‍या, परंतु त्या शेवटी हतबल होतात. विषयवासना व तदनुषंगिक सुख-दुःख ज्यात खचाखच भरले आहे, ते मन हेच जणु दही असते आणि हरिनाम हे जणु घुसळण करणारे साधन अर्थात् रवी बनते. स्वरूपज्ञानाचा उदय होणे हीच नवनीताची सिद्धी बनते. मागे उरते ते हतबल झालेल्या वासनांचे फलकट ताक. त्याचा त्याग करायचा. किंबहुना, त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. नवनीताचा गोळा हाती आलेला असतो. मंथन सिद्धीस गेलेले असते.
 ताप अंगातून बाहेर पडल्यानंतर स्नान केले जाते. अंतर्बाह्य निर्मळता प्राप्त होते. भरकटलेल्या, तापलेल्या बेचैन मनाला शांती लाभावी, यासाठी तुकोबाराय सांगतात, अनुतापाने स्नान करावे. गरम पाण्याने स्नान केले असता पुन्हा दरदरून घाम फुटतो. आपल्या उपास्याजवळ आपल्या वैगुण्याचे निवेदन करणे हेच ते स्नान असते. ही कळकळ प्रामाणिक, भावपूर्ण असली की, अनुताप अधिक प्रभावीपणे कार्य करतो. मनातील लौकिकाच्या प्राप्तीविषयीच्या आशा काढता पाय घेतात. अंतःकरण निर्मळ होते. त्याला दिशा सापडलेली असते. आत्मबोध झालेला असतो. हेच ‘आधी होता तैसे होणे’ असते. मनातल्या लौकिक आशा संपुष्टात आल्या की, जी दिशा सापडली, त्या दिशेने प्रवास निर्विघ्नपणे सुरू होतो आणि मग शिवस्वरूपात स्थिर होऊन, विरागी अशा खर्‍या निरामय स्थितीत जीव सहजानंद भोगू लागतो.
 ‘दिशा पांघरणे’ असा शब्दप्रयोग तुकोबारायांनी केला आहे. याचा विचार करता असे लक्षात येते की, दिशा दहा आहेत. अनंत आकाश ही त्यांची व्याप्ती आहे. या जगताला आकाशाने आच्छादिलेले आहे, जगताचे ते पांघरुण आहे. मनुष्याच्या मनाला असे विलक्षण सामर्थ्य लाभलेले आहे की, या अनंत पसार्‍यात ते कुठेही विलक्षण वेगाने भ्रमण करू शकते. घेतलेले पांघरुण शरीराभोवती गुंडाळले जाते. त्याचा पसारा आवरला जातो. या विचाराने असे म्हणता येते की, ‘दिशा पांघरणे’ म्हणजे बेलगाम फिरणार्‍या मनाला लगाम घालून स्वकेंद्रित करणे. मनाला स्थिरता लाभली की, साधनात एकाग्रता आपोआपच स्थापली जाते. वेगळ्या अंगाने विचार करता दिसते की, ‘दिशा’ या शब्दाने रीत, पद्धत, प्रकार असा अर्थ दाखविला जातो. पांघरुण घेण्याने संरक्षण मिळत असते. हरिनामाचे औषध घेण्यासाठी जाणत्यांनी सांगितलेली रीत, पद्धत म्हणा किंवा प्रकार, विधी म्हणा, तोच अंगिकारायला हवा. आजारातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तो आजार होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. यात रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविली जाते. हरिनामाचा निरंतर आश्रय हाच साधकाला आवश्यक त्या शक्तीचा स्त्रोत असतो. तोच साधकाचे आजीवन संरक्षण करण्यास सर्वथा योग्य ठरणारा असतो.
 पुन्हा जन्मा नाही येणे, ना जन्म-जरा-दुःखास सामोरे जाणे, या स्थितीचा लाभ होतो, तो केवळ हरिनामाचे औषध श्रद्धेने सेवन केल्याने, असे तुकोबारायांचे स्वानुभूतीचे सांगणे आहे.
(क्रमशः)
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)