नाटाचे अभंग... ३७

३६. मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी ।
 हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥
 लक्ष चौर्‍यांशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा ।
 येऊनि पडसी संदेहपुरा । वोळसा थोर मायाजळीं ॥धृ॥
 पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती ।
 काय एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥३॥
 नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती ।
 देवचि होईन म्हणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥४॥
 क्षण एक मन स्थिर करूनि । सावध होईं डोळे उघडोनि ।
 पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥५॥
 
 एकाकी रमत नसल्याने जगदीशाने जगडंबराचा संकल्प केला आणि त्यामध्ये नाना प्रकारच्या जीवांची निर्मिती केली. मुख्यतः उद्‌भिज, अंडज, जारज आणि स्वेदज या चार योनींतील जलचर, भूचर, उभयचर, खेचर आदी नाना प्रकारचे जीव तयार झाले. प्रामुख्याने विचार करावयाचा तो या जीवांतील मानवदेहधारी जीवांचा. याचे कारण असे की, हाच एक देह असा आहे की, विवेकयुक्त बुद्धीने तसेच नानाविध प्रयत्नांनी त्याला ईश्वरप्राप्ती म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख करून घेता येणे शक्य आहे.
 जीव कर्माशिवाय राहू शकत नाही आणि हे कर्मच अनंत जन्माला कारण होत असते. केलेल्या कर्मातून संचित-प्रारब्ध-क्रियमाण आयुष्याचा अविभाज्य भाग बनत असते. या कर्मसंचयाला कारण होत असते ते संकल्प किंवा वासना. ही वासनाच देवापासून जीवापर्यंत जन्मांतर घेण्यास भाग पाडत असते. वासनेचे मूळ स्वरूप पाहू गेल्यास दिसते की, प्राथमिकपणे एखाद्या वस्तूची आवड निर्माण होते व नंतर तिच्या प्राप्तीचा मोह होतो. इच्छिताची प्राप्ती होईपर्यंत आवडीचे रूपांतर उत्कंठेत होऊन त्यातूनच भोगाची लालसा किंवा आसक्ती निर्माण होत जाते. या आसक्तीलाच शास्त्रीय परिभाषेत वासना म्हणणे अयोग्य होणारे नाही. वासनेची पूर्ती होईपर्यंत, जीव अधिकारी असला तरी, त्याला विसावा लाभत नाही. वासना-जन्म-वासनेच्या अनुरूप कर्म-अन्य वासना-अतृप्ती-अतृप्त वासनेतून जन्म ही शृंखला सुरूच राहते. या शृंखलेला तोडण्यासाठी केवळ मनुष्यदेहच समर्थ आहे. म्हणजेच मनुष्यालाच असा पुरुषार्थ करता येणे शक्य असते. माउली सांगतात, ‘तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारें । चिरा पडे ॥ (ज्ञाने. १२.११.१३६)
 दुर्दैवाची गोष्ट अशी की मानवदेह प्राप्त होऊनही वासनानिर्मिती आणि वासनापूर्तता ही मनुष्य आपल्या कर्मानेच वाढीस लावत असतो. आयुष्याअंती अपूर्ण राहिलेल्या वासना पूर्ण करून घेण्यासाठी पुनर्जन्माचा आश्रय करू पाहतो. ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ अशी एक म्हण आहे. खरे म्हणजे, ‘जित्याची खोड मेल्यावरही पिच्छा सोडत नाही’, असे म्हणता येते. पुढचा जन्म अंतकालीच्या चिंतनाला अनुकूल असा किंवा कर्मसंचयानुसार जो अनुकूल असेल त्या योनीत प्राप्त होतो. अशाप्रकारे लाभलेल्या पुनर्जन्मात मिळणारे भोग हे स्वतःच केलेल्या पाप-पुण्यात्मक कर्मानुसार प्राप्त होणारे असतात. मग एखाद्या श्वानाला श्रीमंताच्या घरात थारा मिळून खायला महागडे खाद्य, झोपायला डनलॉपची गादी मिळते तर कुणी मनुष्यदेह लाभूनही कचर्‍याच्या ढिगातले अन्न खाऊन पोटाची आग शमवित राहतो. म्हणून वासनापूर्तीच्या मागे लागून पुन्हा दुःखदायक स्थिती ओढवून घेणे हितावह ठरणार नाही, असा निर्देश तुकोबाराय अभंगाच्या सुरुवातीस करीत आहेत.
 तुकोबाराय समजावित आहेत की, कुणीही कितीही सायास केले तरी, पुढील जन्म दुर्लभ आणि अलौकिक अशा या मनुष्ययोनीतीलच लाभेल किंवा आयुष्यातील सुख-दुःखाचा जमाखर्च नक्की काय, हे कुणालाही सांगता येणे शक्य नाही. म्हणजेच पुढील जन्म आणि वासनापूर्ती यांबाबत जीव पूर्णतः परावलंबी आहे. माणसाला हे कळत नाही असे नाही, पण त्याला ते वळत नाही. तो या गोष्टीकडे जेव्हढ्या सावधपणे लक्ष द्यावयास हवे, तितके देत नाही. किंबहुना तो दुर्लक्षच करीत असतो. भ्रमित जीवाला जागृत करण्यासाठी येथे तुकोबारायांनी वास्तव नमूद करून खोचक असा ‘कां रे अंध होसी जाणोनियां’ हा किंचित् प्रश्न केला आहे.
 वासनेचा प्रभाव किती दारूण परिस्थितीत जीवाला पोहोचवित असतो, ते पुढे तुकोबाराय समजावितात. वासनेचा गुलाम झालेला जीव जन्म-मरणाच्या चक्रात अडकला की, त्याला चौर्‍यांशी लक्ष योनीतील कुठली योनी लाभेल हे सांगता येत नसते. आणि, जीव कुठल्याही योनीत जन्म घेवो, त्याला भ्रूण अवस्थेच्या म्हणजेच गर्भवासाच्या यातना निमूटपणे, असहाय्यतेने भोगाव्याच लागतात. याशिवाय प्रत्येक योनीमध्ये किती वेळा जन्म घ्यावा लागेल, हेही सांगता येत नसते. अशा या दारूण यातना भोगून जन्म घ्यावा, तर मायेच्या अधिपत्याखाली जीवास संपूर्णतः मूढ अवस्था प्राप्त झालेली असते व आपल्या आजूबाजूच्या स्थितीचे किंवा वस्तूंचे यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे केवळ संदेहाने ग्रासलेला जीव भरकटत राहतो. माया नदीतील जन्म-जरा-मृत्युरूप असा हा ‘वोळसा’ म्हणजे भोवरा (आवर्त) इतका जबरदस्त असतो की त्यातून सुटका करून घेणे भ्रमित जीवाला महाकर्मकठीण होऊन बसते.
 अन्य योनीतील क्षुद्र जीवांचा विचार करावा तर त्यांचे मन-बुद्धी अत्यंत अप्रगत असल्यामुळे त्यांच्यात स्वतःचा उद्धार करून घेण्याची पात्रताच नसते. तुकोबाराय त्यामुळे त्या जीवांचा विचार न करता पशुयोनीचा विचार मांडतात. मनुष्य हा पशुयोनीतून प्रगत होत आलेला आहे, असे आजचे विज्ञानही सांगते. या पशूंना मन-बुद्धी नाही असे नाही परंतु पाप काय किंवा पुण्य काय याचा निर्णय ते करू शकत नाहीत. प्रवाहपतित झाल्याप्रमाणे ते त्या योनीतील जीवन भोगत राहतात. त्यांचे जीवन आहार-निद्रा-भय-मैथुन या चौकटीतच बांधलेले राहते. सदाचार अथवा मिथ्याचाराने मिळणारे पुण्य-पाप त्यांना बंधनकारक ठरत नाहीत. अशा योनीत गेलेले जीव गत जन्मातील प्रारब्धानुसार उत्तम वा मध्यम भोग भोगत असतात. राजाचा रथ ओढणारा घोडा असो वा टांग्याला जोडलेला घोडा असो, त्याला खावयाला गवतच मिळते. फरक एव्हढाच की राजाच्या घोड्याचे लाड केले जातात, त्याला चांदीचे दागिने, रेशमी झूल घालून सजविले जाते तसे टांग्याला जुंपावयाच्या घोड्याबाबत घडत नाही. परंतु दोन्ही घोड्यांची अंतिम गती मात्र एकच असते. काही पशू तर उपजताच मरतात किंवा अत्यंत दयनीय अशा अवस्थेतले म्हणजे बहिरे, आंधळे, पंगु, मुके असे असतात. थोडा विचार करता असे म्हणता येते की, तुकोबारायांनी या चरणात केलेले हे वर्णन म्हणजे डोळ्यांवर कातडे ओढून पशुवत् आहार-निद्रा-भय-मैथुन या चौकटीतच आयुष्य वाया घालविणार्‍या माणसांसाठीच लागू पडणारे आहे. केवळ गैरसावध राहून केलेल्या कर्मातून जे भोग वाट्यास आलेले असतात, त्याबाबत निरुपाय असतो आणि ते भोग भोगण्याशिवाय अन्य पर्यायही नसतो.
 अन्य योनींतील जीवांची होणारी फरपट नजरेस आणून दिल्यानंतर तौलनिक दृष्टीने तुकोबाराय मनुष्य योनीतील जन्माचे महत्त्व सांगतात. मनुष्यजन्माच्या प्राप्तीचा हा दुर्मिळ लाभ जेव्हा जीवास होतो, तेव्हा एक निधान हाती आलेले असते असे तुकोबाराय सांगतात. ‘निधान’ म्हणजे केवळ निधी किंवा ठेवा नाही. त्यात असामान्यता दर्शविली जाते. प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश असला तरी ईश्वरत्व प्रगट करण्याचे सामर्थ्य नरदेहात आहे. नरदेहाच्या ठायीच सारासारविवेकबुद्धी दिलेली असल्याने नरदेह हा सर्व योनींचे सार ठरतो. अनेक योनीतून फिरत फिरत जीवाला लाभलेला नरदेह हा जीवाच्या उत्तम गतीचे लक्षण आहे. स्वतःचा उद्धार करून परमगती त्याला प्राप्त करून घेता येते. ही परमगती म्हणजेच ‘देव होणे’. ‘तरि चित्तीं कां न धरावें’ या किंचित् प्रश्नाद्वारे तुकोबारायांना सांगायचे आहे की, केवळ नरदेहाच्या योगेच परमेश्वर प्राप्ती करून घेणे शक्य होत असते, ही खूणगाठ मनाशी बांधावी. ‘मला नरदेह मिळाला आहे, तो अनमोल आहे, त्याच्या ठायी विलक्षण सामर्थ्य आहे, या सामर्थ्याचा मला पुरेपूर लाभ घ्यायचा आहे, ही जाणीव चित्तात धरावी’, असे तुकोबारायांचे सांगणे आहे.
 अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय ज्याप्रकारे ‘विनवणी’ करतात, त्यातून ते समोरच्या व्यक्तीविषयी अत्यादर दाखवीत असल्याचे जाणवते. कुणीतरी वेदाभिमानी त्यांच्यासमोर असावा. ज्ञानी असला तरी त्या व्यक्तीचा आचार चुकत असावा. म्हणून त्याला ते सगुणाच्या भक्तीला पर्याय नसल्याचे नम्रतेने प्रतिपादन करतात व त्यातील मर्म त्याला समजावून सांगतात. त्याला हिताचा सल्ला देताना ते त्याच्या आचारातील वैगुण्य त्याला उलगडून दाखवून, त्याला त्याचा दोष दाखवून देतात. तुकोबारायांचे त्याला सांगणे आहे की, जी वास्तविक स्थिती आहे, ती लक्षात घ्यावयास हवी. मनातली सारी किल्मिषे दूर ठेवून, मन क्षणमात्र स्थिर करून जे वास्तव आहे त्याचा विचार करावा. आतापर्यंत वासनेत गुंतून आणि या वास्तवतेकडे डोळेझाक करून, मिळालेल्या नरदेह-निधानाचा दुरुपयोग आपण करीत आहोत्, हे उमजून घ्यावे. लाभलेल्या मनुष्यजीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी वेळीच सावध होऊन डोळसपणे पाहिले पाहिजे. आपल्या सांगण्याची पुष्टी करण्यासाठी ते म्हणतात की, वेद जे बोलले आहेत, तेच पुराणातही आहे. पुराणे वावगे काहीच सांगत नाहीत. सगुण भक्तीच्या मार्गानेच मनुष्यजीवनाचे सार्थक करून घेता येते, हे वाटल्यास तुझे तूच पाहा आणि उमजून घे. तुकोबारायांच्या कथनामागील भाव असा आहे की, शुष्क ज्ञान पांगळे आहे. त्याला सगुण भक्तीनेच सामर्थ्य लाभते आणि ज्ञानोत्तर भक्ती जीवाला शिवस्वरूपात घेऊन जाते.
 तुकोबारायांचे सांगणे अत्यंत साध्या सोप्या शब्दातले आहे. जीवाचा भाव आणि त्याचा परिणाम सांगताना भगवंताने अर्जुनाला गीतेच्या आठव्या अध्यायात जे सांगितले आहे, ते नुसते चिंतनीयच नव्हे, तर आग्रहपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्नही करावयास हवा. भगवंताच्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की, ज्या ज्या भावाचे चिंतन देह सोडताना जीव करीत असतो, त्या त्या भावास तो प्राप्त होत असतो. देह सोडताना म्हणूनच ईश्वराचे चिंतन मनात यावयास हवे. हे तेव्हाच घडू शकते, जेव्हा आजीवन मनाला भगवच्चिंतनाची सवय लागलेली असेल, हरिनामारूपी औषधाचे सेवन निरंतर घडत असेल.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)