नाटाचे अभंग... ३८

३७. दास्य करी दासाचें । उणें न साहे तयाचें ।
 वाढिलें ठायींचें । भाणें टाकोनियां धांवे ॥१॥
 ऐसा कृपेचा सागर। विटे उभा कटीं कर ।
 सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥धृ॥
 हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचे भूषण ।
 नाहीं तयाचा शीण । सुख धरिलें लातेचें ॥३॥
 सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगिकारी ।
 सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥४॥
 राखे दारवंटा बळीचा । सारथी झाला अर्जुनाचा ।
 दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥५॥
 भिडा न बोले पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं ।
 तुका म्हणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥६॥

 अन्य नाटाच्या अभंगांपेक्षा हा अभंग वेगळा असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येते. भक्तीपोटी सगुण-साकार रूपात आलेल्या उपास्याचे उपास्याने केवळ भक्तीचा अत्यादर करून केलेल्या चार विशेष क्रियांचा उल्लेख तुकोबारायांनी या अभंगात केला आहे. भगवंत षड्‍गुणसंपन्न असल्याचे वर्णन केले जाते. हे गुण म्हणजे यश, श्री, ऐश्वर्य, औदार्य, ज्ञान किंवा धर्म, वैराग्य. भक्तासाठी जेव्हा तो प्रगट होतो, तेव्हा त्याच्याठायी आणखी एक गुण जो प्रकर्षाने प्रगट होतो, तो म्हणजे कैवार. तुकोबारायांना भगवंताचा हा गुण निदर्शनास आणून द्यायचा आहे, त्यामागचा उद्देश हा आहे की, या विशेष गुणामुळेच ‘माउली’ असणारा भगवंत त्याच भावनेने अनिवार्यपणे अंगिकारला जावा.
 खरे म्हणजे देवाला निर्गुण अथवा सगुण अशा कुठल्याही एका उपाधीमध्ये बंदिस्त करता येत नाही. तात्त्विक दृष्ट्या निर्गुणत्व हे भगवंताचे अद्वैत स्वरूप असते. परंतु भक्तीप्रीत्यर्थ भक्ताला आणि त्याला स्वतःला आनंद उपभोगता यावा, यासाठी भगवंत भक्ताच्या इच्छेप्रमाणे द्वैत रूपाचा अंगिकार करून सगुणत्वात येतो. भक्तिसूत्रात ‘तत्सुखीसुखित्वम्’ हे सूत्र सांगितले आहे. त्याप्रमाणे भगवंत स्वतः भोग्य बनतो तर भक्त भोक्ता असतो. भक्ताचे सुख हेच भगवंताचे सौख्य असते. भक्तीमधील आनंद, ऐश्वर्य, लाघव, अलौकिकत्व आदींनी युक्त असा जो अद्वयानंद असतो, तो द्वैत स्वीकृतीशिवाय देव आणि भक्त या उभयतांना उपभोगता येणार नाही. (भगवंत स्वतःच सुखरूप असताना या सुखाचे अपरुप त्याला वाटते, असे म्हणणे कदाचित् काहीसे धार्ष्ट्याचे ठरेल.) अशाच भावनेने तुकोबाराय अन्यत्र म्हणतात, ‘नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मीं भक्त तूं देव ऐसें करी ॥’ या द्वैताच्या बाबतीत पूज्यपाद आदिशंकराचार्यदेखील म्हणतात, ‘भक्त्यर्थं स्वीकृतम् द्वैतम् अद्वैतात् अपि सुंदरम्’ (भक्तीस्तव अंगिकारलेले द्वैत अद्वैताहूनही सुंदर आहे).
 नवविध भक्तीपैकी सख्य, वात्सल्य अथवा दास्य या प्रकारातील भक्तीमध्ये अशा प्रकारचा अलौकिक व शब्दातीत आनंद उभयतांनाही तृप्त करणारा दिसून येतो. तसे पाहू गेल्यास भक्तांच्या ठायी (ते शेवटी जीवाचेच प्रतिनिधी असल्यामुळे) स्वभावतः सर्व प्रकारचे सामर्थ्य त्यांच्याकडे असेलच असे नव्हे. तथापि, उपास्याच्या ठिकाणी कर्तुम्-अकर्तुम्-अन्यथा कर्तुम् असे सामर्थ्य असल्याने त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. यामुळेच उभयतांना आनंद प्राप्त होण्यात कर्तृत्वाचा भाग प्रामुख्याने भगवंताच्या ठिकाणी दिसून येतो. या अभंगात तुकोबाराय देवाच्या याच गुणाचे वर्णन करीत आहेत. भक्ताच्या ठिकाणी कोणतेही न्यूनत्व देवाला सहन होत नसल्याचा आणि सर्वसामर्थ्यवान् असणारा देव त्यासाठी प्रसंगी दास्यत्व आनंदाने स्वीकारतो, हा विशेष गुण तुकोबाराय या अभंगात सोदाहरण वर्णन करीत आहेत.
 भवतापाने होरपळलेला जीव अंततः भगवंताची शरणागती पत्करतो. देवाची इच्छा असो वा नसो, आपल्याला भगवंताने त्याच्या चरणीं आश्रय द्यावा, अशी तो मागणी करतो. त्याने देवाचे दास्यत्व स्वीकारलेले असते, परंतु यावर देवाची प्रतिक्रिया तो जाणू शकत नाही. देवाचे दास्य करणे हा भक्ताचा नित्यभाव होऊन राहतो. ही सेवा चालू असताना प्रसंगानुरूप देवाच्या प्रतिक्रियेचा प्रत्यय भक्तास येतो खरा, पण त्या प्रसंगी पाठीशी उभा राहून प्रत्यक्ष देवानेच प्रसंगाचे निवारण केले असल्याचे भक्ताला नंतर उमगते. हा भाव तुकोबाराय अभंगाच्या प्रथम व दुसर्‍या चरणात व्यक्त करतात. देव दासाचा दास होतो, दासाचे उणे त्याला अजिबात सहन होत नाही, अगदी आवडीचे खाणे सोडून तो धावतो आणि भक्ताचे उणे दूर करतो. कृपेचा सागर असणारा, सर्वस्वाने (आपल्या षड्‍गुणांसहित) उदार होऊन देव भक्तावरील प्रसंगाचे निवारण करतो आणि आपण काहीच न केल्याचे दाखवित तो पुन्हा आहे त्याच निष्क्रिय स्थितीत, हात कमरेवर ठेवून विटेवर उभा राहिलेला दृष्टीस येतो.
 खरे म्हणजे भगवंत साक्षीरूपाने यच्चयावत् जीवमात्रांचे कर्म अवलोकन करून तदनुसार त्या कर्माचे फल जीवास भोगण्यासाठी बाध्यकर करीत असतो. परंतु असे काही भक्त पाहावयास मिळतात की, आपल्या जीवासह सर्व भाव त्यांनी देवाच्या चरणी समर्पित केलेला असतो. हे करताना त्यांची देवाकडून काहीही अपेक्षा असत नाही. भक्ताकडून अशा प्रकारे केली जाणारी निरपेक्ष सेवा हे एक प्रकारे देवाच्या माथ्यावर भक्ताने ऋण तयार करून ठेवणे असते. ‘समोऽहम् सर्वभूतेषु...’ आणि ‘ये यथा माम् प्रपद्यंते...’ म्हणजे ‘मी पक्षपात अजिबात करीत नाही’ किंवा ‘भावाचे प्रत्युत्तर त्याच भावाने देतो’ या भगवंताच्या दोन वचनांचा विचार करता भगवंत भक्तांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, आपल्या अवताराचे ते प्रमुख प्रयोजन मानून, नित्य प्रयत्न करीत असतो, असे म्हणता येते. तुकोबारायांनी अन्यत्र हे स्पष्ट करण्यासाठी म्हटले आहे, ‘साक्षी तयापाशीं पूर्वील कर्माचा । बांधला सेवेचा ऋणी देव ॥’ आणि ‘रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥’ श्रीज्ञानेश्वरमाउलीही भगवंताच्या मनातील भाव व्यक्त करताना म्हणतात, ‘तें ऋणवैपण देखोनि आंगीं । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं । भक्तांचियां तनुत्यागीं । परिचर्या करीं ॥’ तात्पर्य हे की, भगवंत स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने आत्मानंदाकरिता दासांचे दास्यत्व स्वीकारतो. हे करीत असताना आपल्या दासाचे दास्यत्व एव्हढ्या उत्कंठेने आणि निरतिशय प्रेमाने करतो की, अष्टभोग भोगण्यासाठी प्राप्त असूनदेखील, त्या भोगांचा (भाणे) त्याग करून भक्तकार्यार्थ धावून जातो. त्याच्या ठिकाणचा कृपेचा भाव सागरासारखा अथांग आहे. तो ‘सर्वस्वें उदार’ आहे. अभंगाच्या संदर्भात त्याच्या सर्वस्वाचा विचार करायचा तर त्याचे षड्‍गुण हे त्याचे सर्वस्व आहे. हे सारे सर्वस्व उदारपणे हा भगवंत भक्तांचे उणे दूर करण्यासाठी उपयोगात आणित असतो. असा हा गुणी भगवंत हात कमरेवर ठेवून विटेवर उभा असल्याचे तुकोबाराय म्हणतात. कमरेवर हात ठेवून उभा आहे, असे जे तुकोबाराय म्हणतात, त्यातून असा भाव व्यक्त होत आहे की, ‘सारे करून काहीच मी केले नसल्याचा देखावा हा करतो’ किंवा ‘समोर येईल ते भक्ताचे दास्यकार्य करण्यास हा सदैव तयारच असतो.’
 पुढील चरणात भगवंताच्या ‘वात्सल्य’ या गुणाचा निर्देश तुकोबाराय करतात. नर्मदा नदीच्या तीरावर वास्तव्य करणार्‍या भृगु ऋषींनी भगवंताच्या ‘ब्राह्मण मला प्रिय आहेत’ या वचनाची परीक्षा पाहण्याचे ठरविले. ते श्रीविष्णूकडे गेले. लक्ष्मी भगवंताचे चरण चुरत होती. भृगुंनी काहीही न बोलता श्रीविष्णूंच्या वक्षस्थळावर लाथ मारली. ते पाहता क्षणीच लक्ष्मीला क्रोध येणे स्वाभाविक होते. तिच्या क्रोधाचा परिणाम हा झाला की, ब्राह्मण लक्ष्मीच्या कृपेला वंचित झाला. श्रीविष्णूंनी मात्र झटकन् उठून भृगुंचे पाय हाती घेतले अन् म्हणाले, ‘माझे वक्षस्थल वज्राप्रमाणे कठिण आहे... आपले चरणमृदु असल्याने आपण व्यथित झाला असाल... क्षमा असावी’. भृगु ऋषींच्या चरणाचा ठसा श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर उठला होता. तो श्रीविष्णूंचे आभूषण बनला. श्रीविष्णू सुखावले. तुकोबाराय या प्रसंगाचे वर्णन करताना श्रीविष्णूंच्या कंठाभोवताली झळाळणार्‍या वैजयंतीमाळा, कौस्तुभमणी वगैरे अलौकिक अशा आभूषणांचे वर्णन टाळून वत्सलांछनाचे वर्णन करतात. वास्तविकपणे पाहता बाह्यांगाने लांछनस्वरूप असणारे ते चिन्ह श्रीविष्णूंनी कायमस्वरूपी केवळ बाह्यरूपाने आपल्या वक्षावर धारण केले नाही, तर तो एक भृगूंचा प्रियोपचार मानून हृदयात धारण केला. या भूषणाची श्रीविष्णूंना असलेली आत्यंतिक प्रियता अशी की, आपली सरूपता मुक्ती भक्तास देत असताना, आपल्या अंगावरील सारी आभूषणे ते उदारपणे प्रदान करतात, परंतु आपल्या हृदयावर कोरले गेलेले हे वत्सलांछन मात्र स्वतःपासून वेगळे होऊ देत नाहीत. ती आपली निजी ठेव म्हणून ते सांभाळतात. मातेला आपल्या वत्साने केलेले लत्ताप्रहार जसे सुखावतात, तद्वत् भगवंताचा हा वात्सल्यपूर्ण व्यवहार असल्याचे तुकोबारायांचे सांगणे आहे. धर्म हे भगवंताचे स्वरूप आहे आणि ब्राह्मण हे धर्माचे अधिष्ठान आहे. त्याचा सर्वभावे अत्यादर करणे, हा भगवंताचा गुण यातून दिसतो. 
 पुढील चरणात तुकोबाराय निर्देशित करतात, तो प्रसंग भगवंताचा दुसरा गुण दाखविणारा आहे. सोळा सहस्त्र एकशे आठ जणींचा हा कुटुंबवत्सल दादला आहे.सगळ्याच जणींना हा तितकाच हवाहवासा वाटणारा आहे. परंतु सत्यभामा अधिक हळवी आहे. ‘हाच पति आपल्याला जन्मोजन्मी लाभावा’ ही तिची उत्कट इच्छा आहे. तिने नारदांना यासाठी गळ घातली. नारदांनी हंसत हंसत तिला ऐकविले की, ‘कणभर दिले तर मणभर देणारा हा तुझा दादला... त्याचे तू एकदा दान दे... तो तुला जन्मोजन्मी लाभेल.’ ते दान स्वीकारण्यास तिने नारदांनाच गळ घातली. नारदांनी लगेच तिला आपल्या हातावर त्या भगवंताच्या नावाने पाणी सोडण्यास सांगितले. सत्यभामेने मागचा पुढचा विचार न करता लगेच तसे केले. नारदांनी ‘नारायण नारायण’ म्हणत जरा गुर्मीतच कृष्णाला बोलावून घेतले. कृष्ण तत्काल हजर झाला. नारदांनी झाला प्रकार त्याला सांगितला आणि तो आता आपला दास झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पादुका डोक्यावर घेऊन आपल्या मागून येण्याची आज्ञा त्यांनी कृष्णाला केली. कृष्णाने कोणतेही आढेवेढे न घेता (उजुर नाही अंगिकारी) नारदांची आज्ञा शिरसावंद्य मानली. तो नजर खाली करून, हात बांधून नारदांसमोर उभा राहिला. तो आता नारदांचा दास झालेला होता. ते सांगतील त्याप्रमाणे करीत तो सार्‍या द्वारकेत फिरू लागला. सत्यभामेला आपली चूक समजली. नंतर नारदांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाची सुवर्णतुला करण्याचा घाट घातला आणि त्यायोगे श्रीकृष्णाला प्राप्त करून घेण्याचा खरा मार्ग सार्‍या जणींना उकलून दाखविला. सारे ऐश्वर्य असतानाही हा भगवंत वैराग्याचा अंगिकार करून, त्याचे खरे स्वरूप जाणणार्‍या आदिभागवत नारदांचा दास झाला.
 पुढे तुकोबाराय भगवंताच्या गुणांपैकी शौर्य आणि ज्ञान यांबद्दची विशेषता निवेदन करतात. भगवंताने त्याच्या अकर्तुम्-अन्यथाकर्तुम् सामर्थ्याने वामनाचा अवतार धारण करून इंद्रपदावर आरूढ बलीला तीन पावले भूमीचे दान मागितले. दानशूर बलीने आपले गुरू शुक्राचार्यांसह अनेक दानववीरांचा विरोध डावलून आपला बाणा राखला. वामनाने एका पावलात पृथ्वी व्यापली व दुसर्‍या पावलाने स्वर्गादी लोक पादाक्रांत केले. तिसर्‍या पावलाकरिता जेव्हा काहीच जागा राहिली नाही तेव्हा बलीने आपले मस्तक झुकविले आणि भगवंताचे तिसरे पाऊल आपल्या माथी धारण केले. वामनाने त्याला सुतलाचे राज्य दिले व सावर्णी मन्वंतरातले इंद्रपद बहाल केले. बलीच्या विलक्षण त्यागाने प्रसन्न झालेले भगवंत सुतलातील बलीच्या निवासस्थानी द्वारीचे रक्षक झाले. तुकोबारायांनी पुढे हाच भगवंत, जो ज्ञानाचा निधी आहे, त्याच्या भक्तकल्याणप्रियतेचा उल्लेख केला आहे. श्रेष्ठ धनुर्धर असलेला अर्जुन, जो कृष्णाचा सखा होता, त्याचे रक्षण करण्यासाठी कृष्ण महाभारतीय युद्धात त्याचा सारथी झाला. अर्जुन जेव्हा किंकर्तव्यमूढ झाला तेव्हा त्याला ज्ञानामृत पाजून कृष्णाने त्याच्या बुद्धीला स्थिरत्व दिले आणि त्याचे सर्वतोपरी कल्याण साधून दिले. तुकोबारायांनी बली आणि अर्जुनाची दोन उदाहरणे देऊन भगवंताचा हा गुण अधोरेखित केला आहे की, भगवंत सेवकांचे केवळ परमकल्याण साधून देत नाही तर त्यांचा अंकित होऊन राहतो. भगवंत जेव्हा भक्ताचा अंकिला होतो, तेव्हा तो ‘न पुसतां जातां नये । खालीं बैसतांही भिये । अवघा त्याचा होय । जीवभावासहित ॥’ असे तुकोबारायांनी अन्यत्र वर्णन केले आहे.
 नारदाचार्यांनी भक्तीसूत्रात ‘अभिमानद्वेषित्वात्’ असे एक सूत्र प्रतिपादन केले आहे. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची तर अहंपणाचा त्याग करावयास हवा. भगवंताला अभिमान रुचत नाही. भगवंताचे स्वतःचेही आचरण तसेच असल्याचे तुकोबाराय सांगतात. भक्तांच्या विषयी हा भगवंत कमालीचा संवेदनशील असल्याचे सांगतात. त्यासाठी, पुंडलिकापुढे हा भगवंत कसा वागला, तो प्रसंग तुकोबाराय उद्धृत करतात. पुंडलिकाशी बोलण्यासाठी भगवंत आलेला. पुंडलिक त्याच्या माता-पित्याच्या सेवेत व्यग्र आहे आणि आपल्या या कार्यात त्याला व्यत्यय येऊ द्यायची इच्छा नाही. म्हणून त्याने एक वीट फेकून भगवंताला जरा थांबण्यास सांगितले. खुणेनेच त्याने भगवंताला न बोलण्याचा इशाराही केला. कारण त्याच्या माता-पित्यांना नुकतीच कुठे झोप लागू लागली होती. पुंडलिकाच्या इशार्‍याला मान देऊन त्याने फेकलेल्या विटेवर समचरण ठेवून मुकाटपणे मर्यादा पाळून (अठ्ठावीस युगे) हा भगवंत उभा राहिला आहे. वास्तविक हा भगवंत त्याला सुखदायक होईल अशा ‘त्रिभंगी’ अवस्थेत म्हणा, वा ‘देहुडा चरण’ - दीड पायावर म्हणा, उभा राहतो. विश्वव्यापक असलेला हा भगवंत ‘दशांगुळी उरलेला’ आहे. परंतु पुंडलिकाच्या आज्ञेने हा टिचभर विटेवर स्वतःला आवरीत उभा आहे, असे तुकोबाराय सांगतात.
 सर्वसमर्थ, सर्वस्वतंत्र असणार्‍या या भगवंताकडे भक्ताकरिता पारतंत्र्य आनंदाने स्वीकारण्याचे कौशल्य आहे. एकंदरीत कृपावंत, दयाळू, उदार, चतुरांचा शिरोमणी असणारा आणि भक्तांप्रती अतिशय संवेदनशील असा हा भगवंत आपल्या भक्तांवर माउलीप्रमाणे स्नेहाची पाखर घालणरा आहे. मग अशा या माउलीला आम्ही का भजू नये, असा (आज्ञार्थक) किंचित् प्रश्न तुकोबाराय शेवटी विचारतात.
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)