‘पहाटस्वप्न’ (कविता)

पहाटस्वप्न (कविता)
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वाला-मात्रा वृत्त
**********************************************

भल्या पहाटे कोण मला देतो आरोळी?
कुणी काढली दवबिंदूंची ही रांगोळी?
तलम धुके पांघरून धरणी निजली आहे....
साखरझोपेमधेच अजुनी बुडली आहे!
मंद मंद झुळकींची ये जा सुरू जाहली....
किलबिल किलबिल हळू पाखरे करू लागली!
रविकिरणांचे सडासारवण सुरू जाहले....
प्राजक्ताने पखरण केली...अंगण सजले!
सकाळच्या शाळेची घंटी जणू वाजली!
पहा कावळ्यांची तारेवर शाळा भरली!!
क्षितिजावरती रंगपंचमी सुरू जाहली....
जाग नभाला सोनेरी किरणांनी आली!
जणू धरेला साद नभाने दिली असावी....
धरणी सुद्धा हळूच नकळत झाली जागी!
सूर्य लागला तेजाळाया जसा अंबरी....
धरणीचीही एकच लगबग सुरू जाहली!
घडी घालुनी धुके तिने ठेवले  नेटके!
अन् किरणांनी स्नान जणू अभ्यंगच केले!!
किरणांची चाहूल लागता मीही उठलो....
प्रसन्न चित्ताने सूर्याच्या पायी पडलो!
मला वाटले स्वप्न पहाटेचे ते होते!
स्वप्न नव्हे ते तर सत्याचे दर्शन होते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१