काय म्हणावे प्रेमाला ते खरोखरी मज समजत नाही!

काय म्हणावे प्रेमाला? (कविता)
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-वनहरिणी-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+८=३२मात्रा
***********************************************************

काय म्हणावे प्रेमाला ते खरोखरी मज समजत नाही!
एकतानता, एकरूपता, एकजीवता उमजत नाही!!
एक मनाची ओढ आगळी दोन जिवांना जवळ आणते....
कळायच्या आधीच जिवांचे एक अनामिक नाते जुळते!
स्पंदन एका हृदयामधले हृदयी दुसऱ्या निनादते का?
कोण छेडतो तार उराची? उरी कुणाच्या रुणझुणते का?
पहिल्या भेटीमधेच जुळते जणू एक नाते जन्माचे!
काय म्हणावे या नात्याला? क्षणात एखाद्या जे जडते!!
जन्मोजन्मीची पुण्याई जवळ आणते काय जिवांना?
एक रेशमी बंधन नकळत असे जोडते का हृदयांना?
 नात्याला प्रत्येक असावे नाव काय? ते समजत नाही!
बिननावाचे, बिनहेतूंचे बंध कोणते? उमगत नाही!!
कसा चेहरा? रंग कोणता? काही काही अडसर नाही!
बिनशब्दांची, बिनप्रश्नांची, अबोल भाषा उमजत नाही!!
दोन समांतर रेषा सुद्धा जणू पाहती एक व्हायला....
अंतरावरी, तरी पाहती अनंताप्रती एक व्हायला!
रक्ताचे असले की, त्याला काय म्हणावे सच्चे नाते?
बिनरक्ताचे, बिनस्वार्थाचे नसते का हो कुठले नाते?
कळे न कुठली ओढ लागते अशी अचानक दोन जिवांना....
प्रेम म्हणू की, स्नेह म्हणू? जे खेचत असते दोन मनांना!
नाव तुम्ही-आम्ही देतो प्रत्येक अशा का या नात्यांना?
निखळ प्रेम, निरपेक्ष प्रेम हे कसे कळावे या लोकांना?
प्रेम असो कोणामधलेही, निखळ प्रेम हे सच्चे असते!
तुमच्या लौकिक नात्यांच्या नावांची त्यांना गरजच नसते!!
नाते असले म्हणजे का शाश्वती असवी रे प्रेमाची?
असेच जर का, असेल तर का, वाताहत होते नात्याची?
नात्याची कुठल्याही नसते गरज कोणत्याही प्रेमाला!
एक अलौकिक अर्थ असावा बिननात्याच्याही प्रेमाला!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१