एकाकी मी सुखात आहे


चार दिवारी अन् उंबरठा
कैद भोगते निवांत आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

नजरेला नजरा भिडल्यावर
माझ्यामध्ये गुंतशील तू
देत मुद्रिका पाश रेशमी
विणून लिलया विसरशील तू
दुष्यंताच्या शंकुतलेची
भीती माझ्या मनात आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

सुखास लाथाडून पकडली
वाट तुजसवे वनवासाची
एकच आशा मनी ठेवली
श्रीरामा ! तव सहवासाची
पुरुषोत्तम तू ! पण का माझ्या
अग्निदिव्य प्राक्तनात आहे?
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

उजेडात मज कुठे न दिसतो
एक कोपरा भय नसलेला
आश्रमात सत्संग कशाचा?
बाबा दिसला वखवखलेला
नजरा टाळत हिंस्त्र पशूंच्या
कुठे लपू? संभ्रमात आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

यौवनशोषण होता स्त्रीचे
तिला कलंकित का ठरवावे?
डाग समाजाच्या भाळी हा
सुजाण जनतेने समजावे
गुन्हेगार सोडून पीडिता
सजा कशाची भोगत आहे?
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

पिढीदरपिढी हिरावलेले
हक्क घ्यायचे अता ठरवले
आदर्शांच्या गुंत्यामध्ये
होते वेडी काल हरवले
खड्ग घेउनी एल्गाराची
गरज भासते नितांत आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com