बिकट वाट

    माझे एक मित्र आहेत.एक दिवस कोणीतरी म्हणाले,"अहो***** च्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झालाय" अर्थातच मला त्यांच्याकडे गेल्यावाचून राहवले नाही.त्या वेळी त्यांच्या वडिलांचे वय असेल ६५-६६.माझ्यासाठी दार माझ्या मित्रानेच उघडले.त्यांचा चेहरा नेहमीसारखाच होता. त्यामुळे मला बोलायला धीर आला,"काय मला कळले ते खरे आहे काय?" मी भीत भीत विचारले.
"बाबांच्याविषयीच म्हणतोस का ?"त्याने उलट मलाच विचारले." खरे आहे ते "
" मग काही उपचार वगैरे सुरू केलेस का ?"
" नाही,बाबांनी मला सांगितले आहे की शांतपणे ते या दुखण्यास तोंड देतील.कुठलेही उपचार नकोत."
" आणि तू त्याला हो म्हटलेस ?"
"हे बघ बाबांच्या विचारामागील भूमिका मला पटते.त्यांच्या मते त्यांच्या अधिक जगण्याबे फारसा कुणाचा फायदा होणार आहे अशातला भाग नाही.आम्हाला ते नकोसे झाले आहेत अशातला भाग नाही,पण त्यांच्या मते त्यांच्या दुखण्यावर जो काही लाखो रुपयांचा खर्च होणार आहे तो करून त्यांचे आयुष्य कदाचित अजून आठ दहा वर्षे वाढेलही पण त्यापेक्षा एकाद्या सेवाभावी संस्थेला ती रक्कम दान केली तर काही नुकतीच उमलू लागलेली आयुष्ये फुलतील.म्हणून त्या रकमेचा विनियोग आम्ही त्यांच्या मर्जीनुसारच करायचा ठरवले आहे."
   मित्राने इतरांना आम्ही काहीही उपचार करणार नाही असेच सांगितले व त्यामागील कारणमीमांसाही तो देत बसला नाही त्यामुळे बऱ्याच जणांनी त्याला हृदयशून्य,वगैरे संबोधने लावली तरी त्याने ते फारसे मनावर घेतले नाही.
   डॅन ब्राउन (Dan Brown)यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या Inferno या कादंबरीतील काही भाग वाचताना मला माझ्या या मित्राची आठवण झाली.कारण या कादंबरीतील एक महत्वाचे पात्र बर्ट्रॅन्ड (Burtrand) झोब्रिस्ट (Zobrist) हा वैज्ञानिक असून मानवजात नष्ट होण्यास प्रलय वगैरे कुठल्याही प्रकारच्या आपत्तीची आवश्यकता नसून लोकसंख्या स्फोटानेच ती गोष्ट घडणार आहे असे त्याचे मत असते.त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना (W.H.O.)हीही त्याला कारणीभूत असते असे त्याचे मत आहे कारण त्या संघटनेने वेगवेगळ्या रोगांवर उपचार शोधून त्या रोगांनी मरणाऱ्यांची संख्या कमी केलेली असल्यामुळे लोकसंख्येत अशी बेसुमार वाढ होत आहे.
  जागतिक आरोग्य संघटनेची प्रमुख एलिझाबेथ सिन्स्की (Elizabeth Sinskey) इला तो भेटतो व त्या संघटनेने जगाला वाचवण्यासाठी रोगप्रतिकाराऐवजी रोगप्रसार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे लोकसंख्यावाढ आटोक्यात राहून जगाचा सर्वनाश टळेल. त्याच्या मते केवळ लोकसंख्यावाढीमुळे मानवजात नष्ट होण्यास एकादे शतक एवढाच अवकाश आहे.त्याने हेही दाखवले की अमेरिकेत वृद्ध लोकांवर औषधोपचार करून त्यांचे आयुष्य एक दोन वर्षांनी वाढवण्यात कोट्यावधी डॉलर्स खर्च होतात.तो खर्चही थांबवावा.यापेक्षाही त्याने अधिक भयंकर उपाय सुचवला आहे आणि तो म्हणजे रासायनिक/जैविक पद्धतीने रोगजंतूंचा प्रसार करून लोकसंख्या कमी करणे अर्थात त्याचे हे मत एलिझाबेथला मान्य नसते. पण त्यानंतर प्रत्यक्षात झोब्रिस्टने तश्या प्रकारच्या जंतूंचा प्रसार करणारी योजना आखली आहे व त्यासाठी त्याचे काही सहाय्यकाची एक टोळी किंवा सभ्य भाषेत पथक तयार केले आहे असे तिला समजल्यावर ते रासायनिक अस्त्र नाहीसे करण्यासाठी ती प्रयत्न करते.
    लोकसंख्या वाढीचा प्रश्न इतका भीषण स्वरूप धारण करेल असे आपणा कोणासच वाटत नाही.त्याचे कारण मानवी मेंदूतील एक यंत्रणा ज्यामुळे आपल्यला अप्रिय गोष्टींचा नकारार्थी विचार करणे.म्हणजे ती घडणार नाही अशी मनाची समजूत करून घेणे असे घडते. अमेरिकेत काही विद्यार्थ्यांनी मेंदूच्या विचार करण्याच्या पद्धतीवर संशोधन करून हे सिद्ध केले आहे.
   लोकसंख्यावाढीवर उपाय म्हणून स्वत:च आपल्यावर वयोमर्यादा घालून घेणे हा उपायही झोब्रिस्टने सुचवला आहे.त्यानुसार Logan’s Run" या विज्ञानकाल्पनिकेवर आधारित चित्रपटात प्रत्येकास ३० वर्षाची आयुर्मर्यादा ठरवून देण्यात येते व त्यासाठी जन्मत: त्या व्यक्तीच्या शरीरात अशी एक यंत्रणा बसवण्यात येते की ३० व्या वर्षी त्या व्यक्तीचे बाष्परूपांतर होऊन ती नष्ट होते.त्या व्यक्तीच्या हातावर एक घड्याळ बसवण्यात येते व त्यास आयुर्कालमापक संबोधण्यात येते.त्यातील रंग व्यक्तीचे वय जसजसे वाढत जाते तसे बदलते व तो रंग लाल झाला की आपली आयुर्मर्यादा संपत आली हे तिला समजते.आपली आयुर्मर्यादा ठरलेली असल्यामुळे त्याच कालावधीत जो काय आयुष्याचा उपभोग घ्यायचा तो ती व्यक्ती घेते.
   अर्थात अशी अनैसर्गिक मर्यादा घालून घेण्यासही तयार नसलेल्या व्यक्तीही असतात व तेच या यंत्रणेपासून मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न करतात याविषयी चित्रपटाचा पुढचा भाग आहे.  लोकसंख्या वाढीवर जननप्रमाण कमी करणे एवढाच एकमेव उपाय असू शकतो कारण माझ्या मित्राच्या वडिलांसारखे विचार करणे उचित असले तरी असे करणारे कितीजण निघतील हा प्रश्न मोठा बिकट आहे.त्यामुळे आपण तरी "बिकट वाट वहिवाट नसावी धोपटमार्गा सोडु नको" असेच वागणार.