काय सांगू तुला प्रेम म्हणजे?

कविता
वृत्त: लज्जिता
लगावली: गालगा/गालगा/गालगा/गा
***************************************************

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
ओठ अन् बासरीतील झुरणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
रेशमी रेशमानेच होणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
एकमेकांत मिसळून जाणे!

 काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
ठेच एकास....दुसरा विव्हळणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
स्पंदनांचे अलौकीक गाणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
उत्तरे मूक राहून देणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
बिनलिपीचे जणू चक्क लिहिणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
पाहण्या प्राण डोळ्यांत येणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
एक थेंबात सागर पहाणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
आपल्यातून आपण निसटणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
काळजातील कोरीव लेणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
स्वप्न अन् सत्य एकत्र होणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
काळ, स्थळ लंघुनी रोज जाणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
तो न त्याचा, तिची ती न उरणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
दिलखुशीनेच आगीत जळणे!

 काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
हारुनी सर्वकाही मिळवणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
एकमेकांत पुरते झिरपणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
शिंपल्यातील मोतीच होणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
आसवे पापण्यांनी अडवणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
मस्करी विस्तवाशीच करणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
पानगळतीतही फूल होणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
वाट काट्याकुट्यांची निवडणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
लाट असुनी तटाचे न होणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
लाट होऊन उध्वस्त होणे!

काय सांगू तुला प्रेम म्हणजे?
जीव एका फुलावर उधळणे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१