नाटाचे अभंग... भाग ३९

३८. हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस ।
 होऊनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥
 धरूनि पाय त्यजिलें जन । न लगे मान मृत्तिका धन ।
 कंठीं नामामृत पान । न लगे आन ऐसें झालें ॥धृ॥
 वाव तरी उदंडचि पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी ।
 कामक्रोधा न सुटे मिठी । गिर्‍हे तरी वेठी राबविती ॥३॥
 बळ तरी नागवती काळा । लीन तरी सकळांच्या तळा ।
 उदार तरी देहासी सकळां । जाणोनि कळा सर्व नेणते ॥४॥
 संसार तो तयांचा दास । मोक्ष तो पाहातसे वास ।
 रिद्धिसिद्धि देशवटा त्रास । न शिवती यास वैष्णवजन ॥५॥
 जन्ममृत्यु स्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें ।
 तुका म्हणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमामृताची ॥६॥

 अनमोल अशा नरदेहाचा लाभ झाल्यानंतर पूर्वपुण्याईने संत, पुराणे, शास्त्र, आगम-निगमादींपैकी कशाचाही कुठल्याही प्रकारे संग घडून आल्यास मनुष्याचा विवेक जागृत होतो. त्याला असे कळून येते की, अखिल ब्रम्हांडाचा कर्ता-धर्ताऱ्हर्ता असलेला आणि त्यामध्ये स्वतः  प्रवेश करून साक्षित्वाने राहणारा परमात्मा हा साधकास एकमेव वरेण्य तसेच वर्णनीय विषय ठरू शकतो. एखाद्याचे वर्णन करण्यामागे स्वार्थ नसला तरी, ज्याचे वर्णन करावयाचे, त्याला संतोष व्हावा, ही अपेक्षा असते. साधकाच्या चिंतनात सहज असा विचार येतो की, या परमात्म्याचे पूर्णत्वाने वर्णन करताना आगम-निगमांदींनाही आपले सामर्थ्य तोकडे पडत असल्याची जाणीव होते, तेथे आपली काय कथा? अशा स्थितीमध्ये तुकोबारायांना माऊलींच्या एका ओवीचे स्मरण येते - ‘तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें । जे भक्त चरित्रातें । प्रशंसिती ॥’. तुकोबारायांच्या मनात असा विचार येतो की, आपले उपास्य असणार्‍या परमात्म्याच्या ठिकाणी ज्यांच्या अंतःकरणात आत्यंतिक प्रीती आहे आणि उपास्यालाही ज्यांच्याविषयी तशीच प्रीती आहे, अशांचे वर्णन केल्यास उपास्याला निश्चितच संतोष होईल. तीच त्याची यथार्थ सेवाही ठरेल. आपल्या बाळाचे कौतुक कोणत्या आईला आवडणार नाही? त्यांचा मग निर्णय होतो, ‘तुका म्हणे संतसेवा । हेचि देवा उत्तम ॥’ मनात असा विचार आल्यानंतर तुकोबारायांना हरिदासांचे वर्णन करण्याची अनावर ऊर्मी उत्पन्न झाली. परीणामी, ते या अभंगाद्वारे उपास्याच्या संतोषासाठी हरिदासाचे वर्णन विविध अंगांनी करून त्यांचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात.
 तुकोबाराय अभंगाच्या सुरुवातीला हरी आणि त्याचे दास दोघेही एकसारखेच असल्याचे सांगतात. हरी स्वभावतः निर्गुण असला तरी तो सगुणात येतो, तेव्हा त्याची सुखानंद स्थिती तशीच असते. त्याच्या ठिकाणी चार प्रमुख नकारात्मक वृत्तींचा अभाव असतो. या वृत्ती, ज्या सुखानंदाला आडकाठी ठरणार्‍या असतात, अज्ञानाला कारण होत असतात, त्या म्हणजे भय, मोह, चिंता आणि आशा. मनुष्यदेह प्राप्त झालेल्या जीवाच्या ठिकाणी या चारही वृत्ती प्रत्ययास येणार्‍या असतात. या चार वृत्तींविषयी असे सांगता येते की, भूतकाळातील कृतकर्माचे फळ, जे अवश्यंभावी भोगावे लागणार असते, त्याचे जीवाला भय असते. वर्तमानकाळात नाना गोष्टींचा मोह होऊन त्यातून कर्मबंधनात जीव स्वतःला अडकवून घेत राहतो. रोजच्या जीवनातील अनिश्चितता, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या अनुभवास येणारे दुःखाचे व संकटांचे नानाविध प्रकार पाहून ती दुःखे किंवा संकटे भविष्यात आपल्याला तर भोगावी लागणार नाहीत ना, याची जीवाला (काल्पनिक) चिंता लागून राहते. आस किंवा आशा हीसुद्धा कर्मबंधनाला कारण होणारी आणि असमाधाना़ची द्योतक असणारी अशी असते. त्यामागे स्वार्थ, आप-पर भाव असतो. हरी आणि हरीचे दास दोघेही भूत-वर्तमान-भविष्य कालीन कर्मबंधनातून नित्य मुक्त असतात, असे सांगताना तुकोबाराय पुढे सांगतात, दोघेही उदास वृत्तीचे म्हणजे साक्षीत्वाने पाहणारे असतात. हरी आणि हरीचे दास यांच्यातील जे साम्य तुकोबाराय वर्णन करीत आहेत, त्यातील दुसरे वैशिष्ट्य सांगताना तुकोबाराय म्हणतात, या दोघांनीही भक्तीची कास बळकटपणे धरलेली असते. हरी त्याच्या भक्तांचा अनन्य भक्त असतो तर हरिदास हे हरीचे अनन्य भक्त असतात.
 हरी आणि हरीचे दास यांच्यातील साम्य वर्णन केल्यानंतर तुकोबाराय हरिदासांचे वर्णन करतात. हे हरिदास असतात कसे, हे अभंगाच्या धॄपदात सांगतात. संताच्या ठिकाणी स्वजनेषणा, लोकेषणा आणि वित्तेषणा या तिन्हींचा पूर्ण अभाव असतो. ‘एषणा’ म्हणजेच आस. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी या तीन एषणा स्वभावतः वास करीत असतात. संतांनी या एषणांवर मात केलेली असते. स्वजनेषणा म्हणजे पत्नी आणि संततीची आस. लोकेषणा म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी, अन्य जन यांच्याबद्दलचे आकर्षण आणि समाजात लोकांनी आपला उदो-उदो करावा, आपल्याला मान द्यावा, ही इच्छा. धनेषणा म्हणजे संपत्तीची, श्रीमंतीची आस. हरिदासांनी स्वजन तसेच समाजातील इतरेजन या सर्वांचा त्याग करून एकनिष्ठपणे भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतलेला असतो. कुणाकडून होणार्‍या कौतुकाचे वा निंदेचे त्यांना सोयरसुतक नसते. कुणी मान द्यावा, अशी त्यांची अपेक्षा नसते. धन म्हणावे, तर त्यांना ते मातीसमान असते. त्यांच्या जीविताचा एकमेव स्त्रोत जो असतो, तो म्हणजे सदा हरीच्या नामाचे अमृतपान. त्याशिवाय अन्य कशाचेही त्यांना आकर्षण नसते, अन्य कशाचीही त्यांना गरज नसते.
 हरिदासांचे हे अलौकिक वैशिष्ट्य कथन केल्यानंतर तुकोबाराय हरिभक्त, ज्यांनी भय, मोह, चिंता, आस यांच्यावर मात केली आहे,  त्यांच्या ठिकाणी व्यक्त रूपाने प्रगत झालेली लक्षणे वर्णन करतात. कामक्रोधादी षड्‍-रिपु हे अत्यंत बलवान् असून त्यांच्या मगरमिठीत जीव आजन्म कैद झालेला असतो. हरिदासांनी या कामक्रोधादिकांनाच जखडून ठेवलेले असते. हरिदासांच्या तावडीतून त्यांना बिल्कुल स्वातंत्र्य मिळत नाही. या बलवान् षड्‍-रिपुंना हरिदासांनी वेठीस धरलेले असते. या कामक्रोधादिकांना त्यामुळे यातना होणे स्वाभाविक जरी असले, तरीही हरिदास जगत्‍कल्याणार्थ त्यांना स्वेच्छेने राबवितात.
 जीवाला सर्वात मोठे भय असते, ते काळाचे किंवा मृत्यूचे. या बाबतीत जीव हा सर्वार्थाने निर्बल आणि परावलंबी आहे. याला अपवाद आहे तो हरिदासांचा. हरिदासांच्या ठायी असे अलौकिक सामर्थ्य असते की, ते काळालाच नागवितात. तुकोबारायांनी अन्यत्र म्हटले आहे, ‘तें बळिया शिरोमणी । हरिभक्त ये मेदिनी । तुका म्हणे कानीं । यम सांगे दूतांचे ॥ किंवा ‘काळाचेही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥’ सामान्यतः असे पाहण्यात येते की, बलवत्ता आणि नम्रत्व सहसा एकत्र नांदत नाहीत. विशेष म्हणजे काळाला नागविणार्‍या या बलिष्ठ हरिदासांच्या ठायी गर्वाचा लवलेशही नसतो. ते सकळांपुढे अति नम्र असतात. सर्व भूतांच्या ठायी ईश्वराला पाहणारे हरिदास, ते जसे उपास्याच्या चरणाचे दास असतात, तीच भावना ते सर्वांच्या ठायी व्यक्त करतात. ‘मोह’ आणि ‘होम’ या दोन शब्दांच्या रचनेतून जीवाच्या वृत्तींची दोन विरुद्ध टोके दाखविली जातात. एकात स्वार्थ आहे तर दुसर्‍यात त्याग आहे. हरिदासांनी मोहाला नामोहरम केलेले असते. त्यागाची परिसीमा गाठताना जगाच्या कल्याणासाठी ते स्वतःचा देहही कस्पटासमान मानतात. इंद्राला वज्रलाभ व्हावा, यासाठी दधिचींनी आपल्या अस्थि दिल्याचा दाखला पुराणांतरी मिळतो. हरिदास अशाच प्रकारे सर्व जीवमात्रांना अत्यंत जवळचा वाटणारा देह उपाधी समजून त्याविषयी उदास असतात. हरिदासांचे आणखी एक वैशिष्ट्य तुकोबाराय सांगतात की, हरिदास पूर्णतः निरहंकारी असतात. आपल्याकडील चातुर्यामुळे अहंकार जागृत होऊन पतन होत असते. या हरिदासांजवळ सार्‍या चातुर्यकळा विकसित झालेल्या असूनही बाह्यांगाने ते नेणतेपणा स्वीकारतात. तुकोबारायांनी अन्यत्र म्हटले आहे, ‘तरलों म्हणूनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा ॥... (त्यामुळे) नरका गेलीं अधोगती ॥’ म्हणूनच ते भगवंताला विनवितात, ‘जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण दावोनियां ॥’ रामदासस्वामींचेही वचन आहे, ‘वेष असावा बावळा । अंगीं असाव्या नाना कळा ॥’  
 लौकिकातला विचार सांगताना तुकोबारायांच्या मनात येते की, मोह हा संसाराचे अभिन्न अंग आहे. जीवाला तो संसाराचा दास बनवित असतो. संसार हा मायाधिन असतो नि माया ईश्वराधिन राहून कार्य करीत असते. हरीदास हे हरीसारखेच असल्याने माया हरिदासांच्या अधिन राहते. याचा परिणाम असा होतो की, संसार हरिदासांचा दास बनतो. संसारातून मुक्त होण्यासाठी जीवाला अनंत जन्मांचा प्रवास करावा लागतो. या मोक्षाचाही मोह हरिदासांना नसतो. किंबहुना आपला लाभ हे हरिदास कधी घेतील, याची दीर्घकाळ वाट पाहात मोक्ष ताटकळत राहतो. लौकिक जीवन जगताना पदोपदी अडचणी येत राहातात. माणूस परावलंबी जीवन जगत असतो. जे नाही त्याच्या प्राप्तीची चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कधी कधी त्याला वाटते की, एखादी कामधेनू दारी असावी किंवा एखादा कल्पवृक्ष सापडावा, जेणेकरून जे इच्छावे ते हाती येईल. किंवा, रिद्धी-सिद्धी लाभाव्यात्. भगवद्भक्तीच्या सामर्थ्यामुळे हरिदासांना ना कामधेनूची आवश्यकता भासते, ना कल्पवृक्षाची. रिद्धी-सिद्धी त्यांच्या दासी झालेल्या असतात. परंतु, हरिदासांना त्या उपाधी वाटतात. त्यांना कोणत्याच गोष्टीची एषणा किंवा आस नसल्याने त्यांनी या रिद्धी-सिद्धींना देशोधडीला लावलेले असते. त्यांचा स्पर्शही या वैष्णवजनांना म्हणजेच हरिदासांना नको-नकोसा असतो. भगवंताचा बळकट आधार ज्याला गवसलेला आहे, त्याला म्हणूनच भय, मोह, चिंता, आस यांचा स्पर्श होत नाही.
 जीवासाठी जन्म-मृत्यु हे दोन्हीही अत्यंत क्लेषदायी असतात. तथापि, जो जन्माला येतो त्याला मृत्यूला सामोरे जायचे नसते. किंबहुना मृत्यूचे महाभय त्याच्या मनात वास करीत राहते. जीवाच्या अज्ञानाचे हे द्योतक आहे. ज्याला यथार्थ ज्ञान झाले, तो हे जाणत असतो की, जन्म काय किंवा मृत्यु काय, तो शरीराचा असतो. जीव हा जीवात्मा म्हणून किंवा शिवात्मा म्हणून अमर आहेच. तो परमेश्वराचाच अंश असल्याने अविनाशी आहे. त्याचे अस्तित्व अखंडित आहेच. हरिदास हे तत्त्व जाणत असतात. त्यामुळे जन्ममृत्यु ते स्वप्नवत् मानतात. तो निद्रावस्थेतील खेळ असल्याचे ते समजत असतात. प्रत्येक जीव परमेश्वराचाच अंश आहे, हे तत्त्व त्यांच्या अंतःकरणात पूर्णतः बिंबलेले असल्याने त्यांच्या ठिकाणी समत्वयुक्त ममत्व प्रकट झालेले असते. त्यांना कुणीही आप्त नाही आणि कुणीही परका नाही. सार्‍यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकी सारखीच असते. सार्‍यांबद्दलचे प्रेम त्यांच्या मुखातून येणार्‍या वाणीत व्यक्त होत राहते. भय, मोह, चिंता, आस, षड्-विकार यांच्यावर विजय मिळविलेले, सर्वांभूती परमेश्वर पाहणारे अनासक्त हरिदास म्हणूनच अखंडित सुखाचा अनुभव घेत राहतात.      
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)