नाटाचे अभंग... भाग ४०

३९.बहुत जाचलों संसारीं । वसें गर्भीं मातेच्या उदरीं ।
 लक्ष चौर्‍यांशीं योनिद्वारीं । झालों भिकारी याचक ॥१॥
 जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं ।
 प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥धृ॥
 न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा ।
 नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहीं जीवा खापरीं तडफडी ॥३॥
 काळ बहुत गेलें ऐसिया रीति । आणिक पुढेंही नेणों किती ।
 खंडना नाहीं पुनरावृत्ति । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥४॥
 ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें ।
 भवसिंधुतारकनाम तुझें । धांवसी काजें आडलिया ॥५॥
 आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना ।
 गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥६॥

 अज्ञानाने वेढलेला माणूस असहाय्य होऊन विषयांना कवळीत राहातो. परिस्थिती त्याला पामर अवस्थेत ढकलते. मग गतानुगतिक होऊन तो प्रपंचातील सुख-दुःखाचे चढ-उतार अनुभवत राहतो. त्यातून त्याच्या चित्ताला समाधान वा शांती कायमस्वरूपी लाभत नाही. त्याला मग असे वाटू लागते की, तात्पुरते मिळालेले शांती-समाधान अधिक कालासाठी कसे प्राप्त करून घेता येईल. प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश असल्याने काही कालानंतर का होईना, निर्गुण निराकार असलेला ईश्वर त्या पामराच्या चित्तात कुठल्या तरी स्वरूपात साकार होऊन प्रवेश करतो. त्याच्या अंतःकरणात त्या जीवाविषयी अनुकंपा निर्माण होते. मग त्या स्वरूपातील ईश्वर त्या जीवाचे आराध्य बनते. परंतु ईश्वर प्रत्येकास स्वतंत्रपणे भेटून त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखवित नाही. याला कारण हे की, साक्षित्वाने राहणे, हा ईश्वराचा स्थायी स्वभाव आहे. अशा स्थितीत, ज्याच्या विषयी त्याच्या अंतःकरणात अनुकंपा निर्माण झालेली आहे, त्या जीवाची (येन केन प्रकारेण) संतांशी गाठ घालून देतो.
 संतांशी भेट झाल्यानंतर नकळत अनिच्छेने का होईना, क्लांत मनुष्याला शास्त्राधारित वचनांचे श्रवण घडते व त्यातून मनामध्ये नाना तर्‍हेचे तरंग उठतात. स्वाभाविकपणे तो त्याच्या शंका संतांपुढे ठेवतो. संत अशा मनुष्याची अंतर्बाह्य दशा आणि त्याचा असणारा अधिकार यांचा विचार करून मांडलेल्या शंकांचे निरसन करतात (अधिकार तैसा करूं उपदेश ।). एव्हढेच नव्हे तर त्याला पुढील मार्गक्रमणाचे मार्गदर्शनही करतात. या उपदेशातून समोरील मनुष्याच्या अंतःकरणात आशेचा कोंब नकळतपणे उगवत असतो. यापुढेही आपल्याला योग्य असा मार्ग आचरिता यावा, याकरिता मनुष्य अप्रत्यक्षपणे संतांची जणु शरणागती पत्करतो. मग संत त्या मनुष्यास रुचेल व पचेल असे साधन सांगून त्याचा प्रवेश साधक अवस्थेत करवितात.
 साधक अवस्थेला प्राप्त झालेला मनुष्य संतांनी सांगितलेल्या साधनात रुची घेत प्रगतीपथावर हळू हळू आरूढ होतो. तरीसुध्दा त्याच्या मनात शंकेची वावटळ उठत असते की, ‘ही साधक अवस्था मला सिद्धावस्थेपर्यंत नेण्यास किती काळाने उपयुक्त ठरेल ? आयुष्यभर ती तशी ठरलीच नाही, तर सारे सायास मातीमोल होतील’. त्याला प्राप्तव्य स्थानाबाबत, हळू हळू का होईना, उत्कंठा तयार होत जाते. अशा अवस्थेप्रत गेलेल्या मनुष्याच्या मनात उठणारे नाना तरंग तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगात प्रकट करीत आहेत.
 जन्मणे, प्राप्त झालेले जीवन कंठणे आणि मृत्यु पावणे म्हणजे संसार. तुकोबाराय अभंगाच्या प्रारंभी मनोगत प्रगट करतात की, संसारात अतिशय कोंडमारा सहन करावा लागतो. संसारात यावयाचे तर मातेच्या गर्भात राहणे क्रमप्राप्त असते. असा गर्भवास स्वाभाविकरित्याच कष्टप्रद असतो. या अवस्थेत शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे जीवाला जाच सहन करीत राहण्याशिवाय पर्याय नसतो. पुढे जीवनातही प्रवाहपतित होऊन ‘सुख जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ अशा स्थितीला सामोरे जावे लागते. प्रपंच पाठ सोडीत नाही. कर्माच्या बंधनामुळे किती योनीतून असाच प्रवास करीत राहायचे आहे, ते सांगता येत नाही. हा संसार म्हणजे चौर्‍यांशी लक्ष योनींचे प्रवेशद्वार आहे. कुठल्याही योनीत जन्म लाभला तरी पदोपदी भूक भागविण्यासाठी यातायात करावी लागते. लाचार होऊन भीक मागणे किंवा याचना करीत राहणे सुटत नाही (अन्नासाठी दाही दिशा । आम्हां फिरविसी जगदीशा ॥). ‘भीक’ आणि ‘याचना’ य दोन पदातला फरक असा की, जो भिकारी आहे, त्याला निवडीचा अधिकार नसतो.(बेगर्स् हॅव् नो चॉइस् - एक इंग्रजी सुभाषित.) याचना करताना याचना करणार्‍यास इच्छा प्रगट करता येते. दुसरी गोष्ट अशी की, भिक्षा (भीक) ही सामान्यतः भूक भागविण्यासाठी मागितली जाते. याचना ही केवळ भूक भागविण्यासाठी नसते तर काही गरजेपोटी केलेली असते.
 तुकोबाराय पुढे सांगतात की, मनुष्याचे जीवन पराधीनपणे जगावे लागते. तो परक्याच्या हातचे बाहुले बनून राहतो. अनेक जन्मापासून केलेल्या कर्मातून निष्पन्न झालेले संचित आणि त्याच्या जोडीला असलेले प्रारब्ध व क्रियमाण या त्रिकूटाच्या पाशात जीव पक्का जखडलेला राहतो. या त्रिकूटाची जीवावर असलेली सत्ता अबाधित राहते. ती मनुष्याला गरगरा फिरविते. मनुष्याच्या वाट्याला जे येते ते ‘नशिबाचा फेरा’ असे म्हणत मुकाट्याने स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसते.
 कितीही क्लेश भोगावे लागले तरी जीव ज्या योनीत जन्म घेतो, त्या योनीतील जिणे संपू नये अशी त्याची तीव्र इच्छा असते. लोभ आणि मोह यांचा जबरदस्त पगडा असतो. त्यामुळे ‘पोट भरले आहे’ असे त्याला वाटत नाही. ‘हे हवे, ते हवे, अजून हवे’ या अभिलाषेपोटी त्याला शांती-समाधान त्याला लाभत नाही. थोड्या व्यापक अर्थाने विचार करता लक्षात येते की, कोणत्याही योनीतील जन्म असो, त्यातील भ्रामक आनंदाच्या हव्यासामुळे ती योनी हवीहवीशी वाटत राहते, जीवावरील संचिताच्या सत्तेचा अंत होत नाही. असेही नाही की, एकाच योनीत पुन्हा पुन्हा जन्म लाभेल. संचितात असेल त्या अनुसार कर्मफल भोगण्यासाठी योग्य असलेल्या योनीत प्रवेश करून जीवाला जिणे भोगावे लागते. कुठल्या योनीत पुढील जन्म लाभेल, याचा नेम नसतो. जन्म-जन्मांतराचे हे चक्र थांबावे, या योनीतून त्या योनीत जन्म घेत फिरणे संपावे, अशी सत्ता जीवाच्या हाती नाही. त्यावर नियतीचा पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे तापल्या खापरावर लाहीचे तडतडणे जसे असते, ती अवस्था जीव भोगीत असतो. तुकोबारायांच्या निवेदनातून मनुष्याची असहाय्यता किंवा अगतिकता व्यक्त होत आहे.
  मनुष्य आल्या परिस्थितीला या आशेवर तोंड देत असतो की, आज ना उद्या आपल्या मनासारखे घडून येईल. तुकोबाराय म्हणतात, आशेवर भरवसा ठेवून जीव अनेक जन्म भोगतो. त्याला हेही जाणता येत नाही की, भविष्यात काय वाट्यास येणार आहे ! पुन्हा पुन्हा याच स्थितीला सामोरे जाण्यास भाग पाडणार्‍या या गतीला खंड पडणे, या शृंखलेतून वेगळे होणे, कल्पांती तरी शक्य आहे का, हेही माहीत नाही. (पुराणांतरी असा उल्लेख आढळतो की, कल्पांती प्रत्येक जीवाचा लिंगदेह त्यावरील संस्कारांसह बीजरूपाने ब्रह्मांडी राहतो आणि नव्या कल्पात पुन्हा देह धारण करून संचित भोगत राहतो.)
 संतसंगतीने शास्त्रश्रवणाद्वारे मनुष्याच्या अंतःकरणात विवेकयुक्त ज्ञान जेव्हा जागे होते, तेव्हा तो आपल्या उपास्याला कळकळीने आपले दुःख, आपल्या मनातील तळमळ निवेदन करतो. तुकोबाराय त्यांच्या उपास्याला किंचित प्रश्न करतात की, ‘जे दुःख असह्य झाले आहे, त्यातून सुटका होण्यासाठी कोणावर मी माझा भार टाकू ?’ तुकोबारायांनी येथे ‘भार’ आणि ‘ओझे’ हे वरवर समानार्थी दिसणारे शब्द योजलेले आहेत. या शब्दांचा येथे गर्भित अर्थ ‘भार’ म्हणजे ‘अज्ञान’ आणि ‘ओझे’ म्हणजे ‘अहंभाव’ असा होतो. अज्ञान दूर झाल्याशिवाय तसेच अहंभावाला तीलांजली दिल्याशिवाय कर्मातून जीवाची सुटका संभवनीय नसते, असे तुकोबारायांचे परोक्ष सांगणे आहे. दीन-दुःखी झालेल्या जीवासाठी एक भगवंतच त्राता असल्याचे शास्त्रश्रवणाद्वारे मुमुक्षुला उमगते, तेव्हा त्याच्याही मनात आशेचा किरण उगवतो. तो उपास्याला साकडे घालतो. संतांनी असा भरवसा दिलेला असतो की, ‘भवसागर तरतां । कां रे करीतसा चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवूनियां ॥’ पलीकडच्या तीरावर तो जरी उभा असला तरी तो ‘भावा एकासाठीं’ धावत येतो आणि ‘खांदा वाहे आपुल्या’. भगवंताचे रूप-सामर्थ्य असलेले उपास्य हेच ‘भवसिंधुतारक’ असल्याचा विश्वास साधकाच्या अंतःकरणात संतांनी दृढ करून दिलेला असतो. ते उपास्यच ‘जो आडला-नडला-गांजला’ आहे, त्याच्या सोडवणुकीसाठी धाव घेत असते, हे संतांनी स्वानुभवाने पटवून दिलेले असते. साधक त्यामुळे आश्वस्त होतो.
 अभंगाच्या समारोपातील प्रार्थना ही सार्‍याच साधकांसाठी उदाहरणस्वरूप आहे. अत्यंत विनित भावाने उपास्याला कळकळीने विनंती केलेली आहे की, ‘मी एक यःकश्चित् रंक आहे, दीन-दुबळा आहे, माझे गुण-अवगुण न पाहता, माझ्या सोडवणुकीसाठी उशीर न लावता धाव घाल. तू करुणासागर आहेस्, तुझी करुणा मी भाकतो. माझा अंगिकार कर.’
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)