स्पर्शिका

‘स्पर्शिका’
(कविता)

मी परिघ....
अन् स्पर्शिका
आहेस तू
माझी!
परिसस्पर्शाने
झळाळे....
जिंदगी
माझी!!
गंधवेडा....
चौकडे मी,
शोधतो तुजला...
मी हरिण आहे....
प्रिये तू....
कस्तुरी माझी!
मी जरी 
नाही तुझा,
ताईत झालेलो.....
बघ, तुझ्या....
पायांमधे ही.....
पैंजणे
माझी!
मी कसा,
जाईन तुजला,
सोडुनी कोठे?
तू सखे!
आहेस अंती,
सावली
माझी!
सूर तू....
झालीस माझ्या,
जिंदगानीचा!
बासरी,
साक्षात झाली....
जिंदगी
माझी!!
आळवीतो....
मी तुला.....
प्राणांतुनी,
माझ्या!
तूच माझा
मारवा अन्
भैरवी
माझी!!

***********************************
वृत्त: राधा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गा
*******************************************

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१