नाटाचे अभंग... भाग ४१

४०.जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय ।
    तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जाय चुकों नको ॥१॥
    जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गाय आइक वहिला ।
    मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥धृ॥
    जोडोनि धन न घालीं माती । ब्रह्मवृंदें पूजन यति ।
    सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥३॥
    दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हे विषयसंगीं ।
    काम क्रोध लोभ मोह त्यागी । राहें संतसंगीं चुकों नको ॥४॥
    मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं ।
    पुढें संचित जाईल ग्वाही । तुका म्हणे तईं यमआज्ञा ॥५॥

    (तुकोबारायांचा हा अभंग, जरी ‘नाटाच्या अभंगा’त समाविष्ट केलेला आहे, तरी तसे पाहता तो उपदेशपर आहे. हरिकीर्तन, संतसंग आणि सदाचार यांची महती अपरोक्षतः येथे सांगितलेली दिसते.) 
    मनुष्यजीवनाच्या सार्थकतेचा विचार करताना प्रथम हे लक्षात घ्यावे लागते की, जे प्रारब्ध पुढे आलेले आहे, त्यावर सुख-दुःखाचे अनुभव येणारे असतात. प्राप्त स्थितीचा बिनबोभाट स्वीकार करायचा असतो. मात्र जीवाची पुढील जन्मातील वाटचाल सुखकर व्हावी, यासाठीची बेगमी याच जन्मी करणे श्रेयस्कर असते. मनुष्यजन्म म्हणजे जणु अबलख घोड्याचा अनायासे झालेला लाभ. या घोड्याचा वापर शर्यतीसाठी करायचा की वरातीसाठी करायचा का आणकी काही कार्यासाठी करायचा, हा विवेक करावयास हवा. उपयोगात न आणलेला घोडा कामाचा रहात नाही, हेही आहेच. मनुष्यजन्माचा उपयोग ईश्वरप्राप्तीसाठी करणे, यास पुरुषार्थ-साधन म्हणायचे. पुरुषार्थ साधावयासाठी म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक असे जे काही सकारात्मक साधन किंवा कार्य करायचे, त्यासाठी जो अवधी मिळणारा आहे, तो मात्र निसर्गतःच मर्यादित असतो. आयुष्याच्या शैशव, बाल्य, कुमार, पौगंड, तारुण्य, प्रौढ व जरा (म्हातारपण) या अवस्थांमधील शैशव, बाल्य व जरा या तीन अवस्था प्रामुख्याने परावलंबित असतात. कुमार व पौगंड अवस्था साधन करण्यासाठी उपयोगी नसतात असे नव्हे, परंतु त्यासाठी प्रभावी संस्कार आणि संचिताची जोड असणे अत्यावश्यक असते. तशी स्थिती असेलच असे नव्हे. म्हणून पुरुषार्थासाठी अवधी हाताशी असतो, तो तारुण्य आणि प्रौढ अवस्थेतला. या अवधीचा सदुपयोग कसा करता येईल, ते तुकोबाराय या अभंगात विषद करतात आणि शेवटी तसे आचरण न केल्यास होणारा परिणामही सांगतात.
    जीवमात्रांना त्या त्या योनी अनुसार देहप्राप्ती झालेली असते. परंतु, ते प्राणी देहाचा विनियोग स्वतःच्या जीवितासाठी जरी करीत असले तरी त्या देहाचा विनियोग परमार्थासाठी करण्याचे स्वातंत्र्य मानवेतर योनींमध्ये असत नाही. तुकोबारायांचा उपदेश केवळ मनुष्ययोनीत जन्म लाभलेल्या जीवांसाठीच आहे, हे उघडच आहे. दुसरी गोष्ट जी लक्षात घ्यायची ती, अभंगाच्या धृपदात सांगितल्याप्रमाणे, जे काही करायचे ते ‘मनीं भाव धरूनी भला’. यात श्रद्धा जोपासणे अधोरेखित आहे. तुकोबाराय अभंगाच्या सुरुवातीला ‘जंव हें सकळ सिद्ध आहे’ असे म्हणतात. त्यातून ‘सकळ’ या शब्दाने कर्मेन्द्रिये तसेच ज्ञानेन्द्रिये यांचा निर्देश होत आहे. ‘सिद्ध आहे’ या शब्दांनी ‘कृती’ आणि ‘ग्रहण’ या दोन्ही क्रिया त्या त्या इंद्रियांना स्वभावतःच निसर्गाकडून बहाल केल्या गेल्या आहेत, हे ध्वनित केले जात आहे, त्याचप्रमाणे या शरीराची निरोगी अवस्था अन् दशेन्द्रियांची पूर्ण कार्यक्षमताही निर्देशित होत आहे. या इन्द्रियांचा उपयोग करताना स्वतःचे हित नजरेआड न करण्यासाठी तुकोबाराय प्रथम सांगतात. कर्मेन्द्रियांतील पायांचा विनियोग स्वहितासाठी कसा करायचा, हे सांगताना ते म्हणतात, ‘तीर्थयात्रेला जाण्याचे चुकवू नको.’ सामान्यतः दैनंदिन जीवनात मागे लागलेल्या कामाचा व्याप सांभाळताना तीर्थयात्रेला गौण अथवा दुय्यम स्थान दिले जाते. किंबहुना, या ना त्या कारणाने तीर्थयात्रा चुकविण्याकडे माणसाचा कल असतो. कामाच्या व्यापातून विरंगुळा म्हणून सहलीला जाणे निराळे. त्यात मुख्यतः देहाला मिळणार्‍या आरामाचा विचार असतो. या उलट तीर्थयात्रा तेव्हाच होते जेव्हा देहाच्या आरामाचा विचार बाजूला ठेवून, प्रसंगी क्लेष सहन करीत, श्रद्धायुक्त मनाने पवित्र स्थानांचा, अल्प का होईना, संग साधलेला असतो. यातून होणारा लाभ हा संस्कारात्मक असतो. (अनेक संतांना झालेला ज्ञानलाभ हा त्यांनी केलेल्या प्रदीर्घ तीर्थयात्रातून झालेला असल्याचे वर्णन आहे.) तुकोबारायांना असा लाभ अपेक्षित आहे.    
    जन्मापासूनच मृत्यु आपल्या देहाची कालगणना करीत असतो. देह हे काळाचे खाद्य आहे आणि देह क्षीण होत जाणे, टाळता येत नाही. काळ म्हणजे मृत्यु जोपर्यंत दूर आहे, देह कार्यक्षम आहे, तोपर्यंत माणसाला स्वहित साध्य करून घेता येते. पायांचा विनियोग सांगितल्यानंतर तुकोबाराय अकरावे इन्द्रिय ‘मन’ त्याविषयी सांगतात. कार्यक्षम अवस्थेत मनाला जडलेल्या सवयी पुढेही तशाच राहतात. देह विकलांग झाला तरी मन विकलांग होत नसते. विकलांग अवस्थेत तीर्थयात्रा करण्यात काहीच हंशील नसते. परंतु हरीच्या गुणांचे श्रवण-गायन करण्याची मनाला लागलेली सवय देहाच्या अंतापर्यंत तशीच राहू शकते. त्याला प्राधान्य देऊन अट्टहासाने हे साधे-सोपे साधन निरंतर करावयास हवे. 
    सर्वसामान्यपणे पाहता मायेच्या प्रभावाने का होईना, त्रयेषणांमध्ये गुरफटून जात असतो. आम्ही ईश्वर सोडून अन्य सार्‍या भौतिक वस्तूंना धन समजत असतो व त्याच्या प्राप्तीसाठी जीवाचे रान करीत असतो. भौतिक सधनतेची भूक अमर्यादपणे वाढवित जातो. विविध प्रकारच्या धनाचा साठा करून भविष्यात त्याचा असा उपयोग करीन, तसा उपयोग करीन, असे मनोरथ करीत राहतो. पूर्वी बॅंका नव्हत्या. साठविलेले धन मातीत लपविले जात असे. आता धनाच्या साठवणुकीचे मार्ग अनेक झाले आहेत. मातीत गाडलेले असो वा अन्य मार्गाने साठवून ठेवलेले असो, ते धन इथेच सोडून अंती जायचे असते. तुकोबारायांनी अन्यत्र संकेत दिला आहे की, जे धन जोडायचे ते ‘उत्तम व्यवहारें’. असे जे धन जोडले जाते, त्याचा विनियोग शास्त्रात उपदेशिल्याप्रमाणे योग्य कारणासाठी स्वतःच्या हातांनी करणे यथार्थ ठरणारे असते. यात ब्रह्मवृंद, यति-संन्यासी-अतिथी यांचे पूजन हा एक विहित मार्ग आहे. प्रसंगी आपली भूक बाजूस ठेवून, आपल्या घासातील घास देऊन त्यांची संभावना करावयास शास्त्र्त सांगते. आपणास प्राप्त झालेल्या धनाचे अधिकारी आपण एकटे नसून त्याचे वाटेकरी अनेक असतात. हे नीतिबंधन माणसाने पाळलेच पाहिजे. सत्संचित, जे देहांतानंतर साथ करणारे असते, त्यात वाढ करणारे हे कार्य आहे. ‘उत्तम व्यवहाराचा’ महत्त्वाचा भाग म्हणजे सत्याचे आचरण आणि सर्व भूतांप्रती दयाभाव ठेवणे. हे दोन गुण आपल्या आयुष्यभरासाठी सांगाती करून ठेवावयास तुकोबाराय सांगत आहेत. हे दोन गुण जोपासण्यातील दुसरा भाग जो आहे तो ममत्वाच्या त्यागाचा. जे ममत्व हवे, ते सत्संचितासाठी, केवळ संकुचित स्वार्थासाठी नव्हे.
    मनुष्याच्या जीवनातील यौवन दशा महत्त्वाची असते. या काळात अनेक प्रकारची उत्क्रांती करून घेण्यास मनुष्य समर्थ असतो. तरीही या अवस्थेत विषयसाधनांची प्राप्ती आणि त्याविषयीची आसक्ती टोकाला गेलेली असते. त्या कारणाने त्याला स्वहिताचा विचार करण्याची आवश्यकताच वाटतच नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. विषयाच्या आत्यंतिक आसक्तीमुळे शरीराने व मनाने पराधिन अवस्था तो ओढवून घेतो. विषयांचा मिंधा होऊन न राहता काम, क्रोध, लोभ व मोह यांचा त्याग या यौवन अवस्थेतच करावयास हवा, असे तुकोबारायांचे सांगणे आहे. येथे षड्‍रिपूंतील ‘मद’ आणि ‘मत्सर’ यांचा समावेश तुकोबारायांनी येथे का केला नाही, अशी शंका येते. तथापि, माणसाच्या स्वभावातील हे दोन दोष, तो जेव्हा ‘सत्य’ आणि ‘दया’ या दोन गुणांचा आश्रय घेतो, तेव्हा आपोआपच लोप पावलेले असतात. ‘संगति संगदूषण’ या न्यायाने काम-क्रोधादी  दोष समस्वभावी माणसांच्या संगाने आपल्याही अंतःकरणाचा आश्रय करतात. त्याकरिता संग करावयाचा तो अशाच व्यक्तींचा, ज्यांची अशा दोषांपासून सुटका झालेली आहे. संत अशा निर्दोष अवस्थेस प्राप्त झालेले असतात. स्वतःला अवनतीपासून रोखायचे असेल, तर नित्य संतसंग करावा असा आग्रह तुकोबाराय करतात.
    या अभंगातून तुकोबारायांनी तीर्थस्थानांचे सेवन, हरिगुण-गायन-श्रवण, धनाचा सत्कारणी विनियोग, सत्याचरण, सर्वाभूतीं दयाभाव, काम-क्रोध-लोभ-मोहाचा त्याग आणि संतसंग या सप्तपदींचा उल्लेख करून, यांकडे अजिबात दुर्लक्ष न करण्याबाबत, स्वतःच स्वतःची वंचना, फसवणूक करून न घेण्याबाबत उपदेश केला आहे. प्रत्येक गुणाचा उल्लेख करून ‘चुकों नको, चूक करू नकोस्, असे त्यांनी वारंवार सांगितलेले आहे. ‘मग या शब्दाने ‘यात हलगर्जी केल्यास’ काय होईल, त्याबाबत निर्वाणीचा इशारा तुकोबाराय शेवटी देतात. स्वहिताचा विचार न करता, विषयात रंगून आयुष्याचा उपभोग घेत राहिल्यास शेवटी आपल्या हातात काहीच राहात नाही. सत्ता-संपदा येथेच राहणार असते. यमधर्माच्या स्वाधिन होऊन, तो देईल त्या भोगांना अवश्यपणे भोगणे क्रमप्राप्त होते. त्याठिकाणी इहलोकात मिळवलेली सत्ता, संपदा, ऐश्वर्य यांपैकी काहीच विचारात घेतले जात नाही. कारण ‘कर्मानुगो गच्छति जीव एका’ या न्यायाने कृतकर्मातून क्रियमाणरूपी संचित तयार होऊन यमाच्या दरबारात ग्वाही देण्यास, साक्ष देण्यास उभे असते. त्या प्रसंगी यमाआज्ञाच केवळ प्रमाण असते. मग जीवाला केवळ आणि केवळ पश्चात्ताप करीत यमाज्ञेने प्राप्तभोग भोगत राहण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. तुकोबाराय याकरीताच धृपदातून सांगत आहेत, ‘'मनीं भाव धरूनि भला । न वंचे त्याला चुकों नको ॥'
(क्रमशः)   
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)