जोडी तुझी माझी .

       जोडी तुझी माझी .
दोन डोळ्यांची ति निरांजने,
ओवाळून केले निंबलोण..
स्वप्नपूर्ती झाली आज,
नवी जोडी तुझी माझी..
     राजसी ते रूप तुझे,
     म्हणे मला हे सारे तुझे..
     भाग्य घेउनी दारी आली,
     जमली जोडी तुझी माझी..
दिस दिस मास मास,
साल साल झाल खास..
तुझ्या असण्याने घडली,
सजली जोडी तुझी माझी..
    ह्रदयीच्या या सोन कोंदणी,
    तळहातीच्या रेशीम आसनी ..
    बसवूनी तुजला पिता पाहती ,
    आगळी जोडी तुझी माझी ..
बंधुराज हा तुला लाभला ,
द्रौपदीस तो कृष्ण मिळाला ..
कृष्णलीला पाहण्यात रमते ,
फुलते जोडी तुझी माझी ..
       बालपण सरुनी जाता ,
       तारुण्याचा भास होता ..
        नव्या दिशा नव्या वाटा ,
        शोधी जोडी तुझी माझी ..
स्वप्नात दंगुनी जाशी तू ,
अफाट गगनी विहरशी तू ..
पुढे प्रकाश दाखवाया ,
केली जोडी तुझी माझी ..
           झणी तारुण्य सरती ,
          चूल बोळकी दिसती ..
          तुझी भातुकली मांडाया ,
          आहे जोडी तुझी माझी ..
लेक लाडकी माता पित्यांची ,
असशी ताई लहानग्याची ..
माय लेकीचे हे नाते ,
मिरवीते जोडी तुझी माझी ..