नाटाचे अभंग... भाग ४२

४१.    चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप ।
    विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अति सार ॥१॥
    शस्त्र हें निर्वाणींचा बाण । निकट समयो अवसान ।
    कोठें योजेल दश दान । खंडी नारायण दुःख चिंतनें ॥धृ॥
    सकळ श्रेष्ठाचें हें मत । पावे सिद्धि पाववी अनंत ।
    म्हणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढेंचि ॥३॥
    म्हणोनि रुसलों संसारा । सर्प हा विखार पांढरा ।
    तुजशीं अंतर रे दातारा । याचि दावेदारानिमित्त ॥४॥
    येणें मज भोगविल्या खाणी । नसता छंद लाविला मनीं ।
    माजलों मी माझे भ्रमणीं । झाली बोडणी विटंबना ॥५॥
    पावलों केलियाचा दंड । खाणी भोगिल्या याति उदंड ।
    आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥६॥

    ईश्वराची अंगभूत असणारी माया. तिने ईश्वराची इच्छा म्हणून नाम-रूप-गुणांचा आश्रय घेतला आणि जगत् उत्पत्ती केली. एव्हढेच नव्हे, तर त्या नाम-रूप-गुणांचा गौरव करीत ईश्वराने विविध अवताराच्या रूपाने या त्रयीचा वेळोवेळी स्वीकार केला. ईश्वराने जे जे स्वीकारलेले आहे, ते ते पवित्र असणारच! अशा प्रकारे नाम-रूप-गुणाला प्राप्त झालेला ईश्वर, विभूती रूपाने (आराध्य बनून) साधकाला पावित्र्य देऊन, साधन-आचरणासाठी त्याला उपयुक्त ठरत असतो. तुकोबारायांना या अभंगाद्वारे ईश्वराच्या नाम-रूप-गुणाची महती सांगावयाची आहे. शास्त्रात सांगितलेली अन्य दानादी साधने प्रत्यक्ष आचरणात आणता येतीलच, असे नव्हे. या ठिकाणी केवळ शास्त्र-सिद्धांतांचा विचार न करता तुकोबाराय श्रेष्ठांच्या म्हणजेच संतांच्या मताचेही साकल्याने अवलोकन करून त्यांचे साधन निवडून त्याचे अवलंबन करतात. साधकाने शास्त्र व संतवचनांच्या आधाराने बिनबोभाटपणे आपला साधनक्रम निवडावा. किंबहुना, तसे करणेच उचित ठरणारे आहे. जो संसार मनुष्याला निजस्वरूपापासून दूर नेतो, भरकटवतो, विसरावयास लावतो, विन्मुख करतो, त्या संसाराचा निषेध ते करतात. सारासार विचार करून तुकोबाराय सांगतात, संसाराच्या नादी लागून भगवंताला विन्मुख झाल्यामुळे जीवास नाना योनी अन् नाना यातींतून हिंडावे लागले. एव्हढेच नव्हे, तर त्यामुळे होणारा दंड, म्हणजेच, अवांछनीय भोग जीवास भोगावे लागले आहेत. या क्लेषातून सुटका करून घेण्यासाठी आणि आत्यंतिक कल्याण साधून घेण्यासाठी जीवाजवळ असणारा अवधी आणि त्याची शक्ती सर्व गोष्टींचा साकल्याने विचार तुकोबाराय करतात आणि केवळ नि केवळ शरणागती पत्करण्याशिवाय अन्य मार्ग शिल्लक राहात नसल्याचे प्रतिपादन करतात. तसे करून, केलेली कर्मे भगवंताला अर्पण करावीत आणि भगवंताने त्याच्या चरणांचा आश्रय आपल्याला द्यावा, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
  निर्गुण-निराकार परमेश्वराची नाम-गुण-रूपात्मक जी प्रथम विभूती, ती नारायण. या नारायणाच्या चिंतनाने दुःख खंड पावते, असे ‘श्रेष्ठां’चे म्हणजे ज्ञानी तसेच संत जनांचे मत असल्याचे तुकोबारायांनी या अभंगाच्या धृपदाद्वारे प्रतिपादिले आहे. संतांनी एकमुखाने उद्‍घोष केला आहे की, पंढरीचा राणा असलेला ‘विठ्ठल’ हा नारायणच आहे आणि महादेव-ब्रह्मादिक सारे देव त्याच्यातच सामावलेले आहेत. तुकोबारायांनी या विठ्ठलाचा त्यांचे आराध्य म्हणून स्वीकार केला आहे. त्यांच्या अंतःकरणात या विठ्ठलाचे चिंतन सुरू आहे. या विठ्ठलाचे ध्यान त्यांच्या चित्तावर ठसले आहे. ते वर्णन करतात की, या विठ्ठलाचे नाव चांगले आहे, श्रेयस्कर आहे नि त्याचे रूप गोमटे आहे, मनाला आकर्षित करणारे आहे. शास्त्र तसेच संत वाङ्मयातून ईश्वराशी संबंधित असणार्‍या सर्वच गोष्टी चांगल्या म्हणविल्या जातात. भगवंताचे रूप अथवा काया ‘दिव्य वपु’ म्हणून संबोधिली जाते. म्हणजे भगवंताचे रूप पांचभौतिक किंवा नाशवंत नाही. वास्तविकतः जगतामध्ये जे जे दृष्य आहे, ते सारे नाशवंत आहे. (दिसे तें नासे । नासे तें पुनरपि दिसे ॥) जीवाच्या ठिकाणी असणारे षड्‌विकार, (- अस्ति, जायते, वर्धते, विपरीणमते, क्षीयते, नश्यते इत्यादी), भगवंताच्या दिव्य वपुला लागत नाहीत. अशा दिव्य नाम-रूपाबद्दल बोलताना, ऐकताना, जीवाला आनंदाची प्राप्ती होते, असे सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, ‘निवती डोळे हरती ताप’. डोळा हा ज्ञानेंद्रियांचा प्रतिनिधी आहे. ज्ञानेंद्रियांनी भगवत् रूपाची सुखानुभूती घेता येते. मेख अशी आहे की, प्रपंचात निखळ सुखाची अनुभूती मिळणे, सहसा शक्य होत नाही. भगवंताच्या नाम-रूप-गुणांचे चिंतन अंतःकरणात होत असताना मनाला अस्वस्थ करणारे ताप शमन पावतात. या प्रकारच्या सुखाची प्रत्यक्ष अनुभूती घेताना तुकोबाराय त्यांच्या उपास्याच्या अशा सामर्थ्याची आलेली अनुभूती सांगतात. ही अनुभूती त्यांना मिळाली ती त्यांच्या उपास्याच्या नाम-जपाने. ‘विठ्ठल’ हे नाम प्रगट आहे. कुणालाही हे नाम सहज घेता येणारे आहे. इतर मंत्रांप्रमाणे ते घेण्यासाठी कुणाकडेही जाण्याची गरज नाही. ते सुलभ आहे. याचे दुसरे वैशिष्ट्य हे की, ते अति स्वल्प म्हणजे एकच शब्द असलेले, लहान आहे. त्याला विधि-निषेधाचे बंधन नाही. तुकोबाराय प्रतिपादन करतात की, या नामाचा जप सर्व साधनांचे सार आहे. हे नाम जरी छोटे दिसत असले तरी त्याची किमया थोर आहे.
    भगवंताच्या नामाविषयी शास्त्रातील वर्णन सामान्य जनांस माहित असेलच असे नव्हे. तुकोबारायांनी जो साधन मार्ग अवलंबिला तो पारखून घेतलेला आहे. स्वतः त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली आहे. जीवाच्या कल्याणासाठी शास्त्र काय सांगते, हे विचारात घेण्यापेक्षा स्वतःची अनुभूती प्रमाण असते. ‘निर्वाण’ या शब्दाने ‘आणिबाणीचा प्रसंग, निरूपायाची स्थिती, देहांत’ असा अर्थ दाखविला जातो. असा प्रसंगी आपला अमोघ प्रभाव दाखविणारे, अवसान देणारे हे नामरूपी शस्त्र आहे, काळाचा भेद करणारा हा (राम)बाण आहे. शास्त्रातून सांगितलेले आहे की, आपल्या देहाचा अंत दिसू लागतो, तेव्हा (गलितगात्र झालेल्या त्या) व्यक्तीने स्वतःच्या हाताने दश-दाने देऊन कृतार्थ व्हावे. (ही दशदाने अशी : गाय, भूमी, तीळ, सुवर्ण, तूप, वस्त्र, धान्य, गूळ, लवण, गृह.) परंतु देहांताची घडी निकट आली असताना बळे अवसान आणावे कुठून? असे दान देण्याची योजना करावी कशी? त्यापेक्षा, साधे सुलभ असलेले, अवसान गळाल्यामुळे जरी मुखाने घेता आले नाही तरी मनातल्या मनात स्मरता येणारे, अन्य कुणाचेही सहाय्य नको असलेले भगवन्नामचिंतन सारे दुःख संपविते, असे तुकोबाराय खात्रीपूर्वक सांगतात.
    भगवन्नामाने साधणारी किमया तुकोबारायांनी स्वानुभूतीने प्रतिपादिली. त्यांना वाटते की, माझी अनुभूती माझ्यापुरती खरी असली तरी त्यावर दुसर्‍याचा कदाचित् विश्वास बसणार नाही. म्हणून ते ज्ञानी जन तसेच संतांचा दाखला देतात. भगवन्नामाच्या योगे सिद्धी प्राप्त होते (पावे) आणि संतवचन सिद्धीस नेण्यास अनंत बांधलेला आहे (पाववी) . म्हणून त्यालाच शरणागत व्हावे. हे आणि एव्हढेच मनुष्यासाठी उचित ठरणारे आहे, असे ‘श्रेष्ठां’चे मत असल्याचे ते सांगतात. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवावा आणि नामसाधन अंगिकारावे, असे ते सुचवितात. इथे संत व भगवंत या दोघांनाही शरण जाणे अपेक्षित आहे.
    तुकोबाराय सांगतात, 'मीही तोच मार्ग अनुसरला.' त्यांच्या पूर्वायुष्यात एकामागून एक आलेल्या कठीण प्रसंगातून त्यांची होरपळ झाली. संसाराविषयीचा भ्रम दूर झाला. संसाराचा वीट आला, तो नकोसा झाला. हे कळून चुकले की, हा संसार म्हणजे ‘पांढरा विखार’ आहे, पांढर्‍या दोरीप्रमाणे साधा-सरळ दिसणारा, निर्धोक वाटणारा, परंतु प्रत्यक्षात अत्यंत विषारी असणारा असा हा साप आहे. जीवाला अत्यंत हवाहवासा वाटणारा, पण शेवटी गर्तेत घालणारा हा संसार दावेदार (- शत्रू) आहे. हा संसार जीवाला अनंतापासून विलग होण्यास कारणीभूत होतो. या संसाराच्या विळख्यातून सुटण्याचे सामर्थ्य जीवाच्या ठायी राहात नाही. परवश झालेल्या जीवाला हा संसार विविध योनींमध्ये, अनेक खाणींतून भोग देत राहातो. या भोगातून जे संचित जमा होत जाते, ते चिखलात रुतविणारेच असते. विषयवासनांचे नाना छंद या संसारामुळे जीवाला लागलेले असतात. दुःख डावलून सुखासाठी उतारेटा करायचा म्हणजे मृगजळासाठी उरफोड करण्यासारखे आहे, तुकोबारायांचे सांगणे आहे की, स्वसामर्थ्याने, स्वबुद्धीने, स्वकौशल्याने स्वतःची इष्ट सिद्धी प्राप्त करून घेता येईल, असा भ्रम संसाराच्या संगाने जीवास होतो. परंतु, त्यातून केवळ निंदानालस्ती, मानहानी, विटंबना मात्र वाट्यास येते.
    तुकोबाराय त्यांनी केलेल्या अर्थहीन सव्यापसव्याची कबुली देतात. त्यापासून झालेल्या शारीरिक व मानसिक तापाला तोंड देऊन योग्य तो दंड भोगला, असे ते म्हणतात. अनेक जन्म तीच स्थिती त्यांना भोगावी लागली, असे ते म्हणतात. शेवटी त्यांनी भगवंताची शरणागती पत्करली. तन-मनाने दंडवत घातला आणि ‘पांढर्‍या विखारा’च्या नागपाशातून सुटका, म्हणजेच जन्म-मरणाची शृंखला, खंडित व्हावी, म्हणून कळकळीने गळ घातली.
अन्य दृष्टीने या अभंगाचा विचार करता असे दिसते की, तुकोबारायांच्या जीवनात जे स्थित्यंतर घडून आले, त्याविषयीचे हे आत्मनिवेदन आहे. स्थित्यंतराच्या पूर्वीची स्थिती तुकोबारायांनी या अभंगाच्या उत्तरार्धात नमूद केली आहे. अभंगाचा पूर्वार्ध हा त्यांना 'श्रेष्ठां'चा संग घडल्यानंतर काय घडले, याचे निवेदन आहे. त्या संगातून श्रेष्टांचे म्हणजे जाणत्यांचे मत जाणून घेता आले. प्राप्त व्यूहातून बाहेर पडण्यासाठी उचित काय, हे त्यांना उमगले. या कार्य-कारण परंपरेतून तुकोबारायांना इष्टप्राप्ती झाल्याचे निवेदन या अभंगातून वाचावयास मिळते.
(क्रमशः)   
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)