नाटाचे अभंग... भाग ४३

४२.तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्पमति नारायणा ।
 भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
 काय जाणावें म्यां दीनें । तुझियें भक्तिचीं लक्षणें ।
 धड तें तोंड धुऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥धृ॥
 न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वायां जाय ऐसें ।
 चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥३॥
 तुज समर्पिली काया । जीवेंभावें पंढरीराया ।
 सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥४॥
 चतुर तरी चतुरां राव । जाणता तरी जीवांचा जीव ।
 न्यून तो कोण एक ठाव । आरुष भाव परि माझा ॥५॥
 होतें तें माझें भांडवल । पायापें निवेदिलें बोल ।
 आदरा ऐसें पाविजें मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी ॥६॥
 
 माणसाचे अंतःकरण हे विचाराचे क्रीडांगण आहे. या अंतःकरणाचे चार स्तर आहेत; मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या चार स्तरांना ‘अंतःकरण चतुष्टय’ असे म्हटले जाते. या चार स्तरांच्या कार्यानुरुप मती, धृती, स्मृती आणि प्रज्ञान असे जाणीवेचे चार स्तर आहेत, असे म्हणता येते. मन हे चंचल असते. अनेक विषयांभोवती ते निरंतर पिंगा घालत राहते. त्यातील चांगले-वाईट, श्रेयस्करऱ्हानीकारक याचा निर्णय करण्याचे काम हे मनाच्या सामर्थ्याबाहेरची बाब असते. ते काम बुद्धी करते, म्हणून बुद्धीला ‘निश्चयात्मिका’ म्हटलेले आहे. अध्यात्माचा विचार करताना धारणा-ध्यान-समाधी या योगक्रियांचा संबंध अनुक्रमे मन-बुद्धी, बुद्धी-चित्त आणि चित्त-अहंकार यांच्या एकत्रित कार्याशी लावता येतो. मनाला विषय मिळाला व बुद्धीने तो निवडला, म्हणजे तो विषय ‘धारणा’ बनतो. बुद्धीने निवडला व चित्ताने साठविला, म्हणजे धारणेतला विषय ‘ध्यान’ होतो आणि, चित्त व अहंकार यांनी तो विषय स्वीकारला की ‘समाधी’ अवस्थेत पोहोचतो. तिथे अन्य विषयाला प्रवेश राहात नाही. थोडक्यात, मन-बुद्धीची स्थिरता आणि चित्ताची एकाग्रता ही कोणत्याही कार्यासाठी आवश्यक असते.
  योगमार्गाचा विषय ‘निर्गुणा’ची किंवा ‘कैवल्या’ची प्राप्ती हा असतो. भक्तीमार्गात ‘सगुण परमेश्वराची प्राप्ती’ अपेक्षित असते. या दोन्हीही मार्गांमध्ये धारणा आणि ध्यान या दोन अवस्था साधाव्या लागतात. तुकोबारायांनी भक्तीमार्गात प्रवेश केल्यानंतर त्यांची उपास्याविषयीची धारणा पक्की झाली होती, हे तुकोबारायांच्या या आत्मनिवेदनपर अभंगातून स्पष्ट होत आहे. त्यापुढची पायरी म्हणजे त्यांना ध्यास लागला आहे. पुढील मार्गक्रमणासाठी आपल्या सामर्थ्यहीनतेची त्यांना जाणीव झाली. अशा अवस्थेत, ज्याच्या प्राप्तीचा ध्यास लागला आहे, त्याला सर्वभावे शरण जाणे, हा अंतिम उपाय तुकोबाराय अवलंबितात. आपल्या उपास्यापुढे आपले अंतरंग काहीही आडपडदा न ठेवता ते या अभंगाद्वारे निवेदन करतात. ‘निवेदन’ या शब्दात ‘वेदना’ अंतर्भूत आहे. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी जीवापाड केलेले प्रयत्नही अपुरे पडत आहेत, आपली बुद्धी तोकडी पडत आहे, आपण हतबल झालो आहोत, अशी अवस्था माणसाला अगतिक बनविते. तुकोबारायांना या अगतिकतेने पछाडले आहे. त्यांना आता आशा आहे की, त्यांचे उपास्यच त्यांना मार्ग दाखवू शकेल. ते मग त्यांच्या उपास्याच्या सामर्थ्याचा उल्लेख करतात आणि त्याच्या अलौकिक कर्तृत्वाला साद घालतात.
 संसारात अडकल्यानंतर प्रपंच सांभाळताना झालेली होरपळ तुकोबारायांसाठी इष्टापत्ती ठरली. त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. त्यांना शास्त्र-संत वचनांचा संग घडला. आपल्या उपास्याच्या अपार गुणांविषयी, त्याच्या अलौकिक सामर्थ्याबद्दल त्यांना श्रवण घडले. एकमात्र तोच ‘भवतारक’ असून तोच आपल्याला या होरपळीतून वाचवू शकतो, अशा निर्णयाला ते आले. त्याच्याप्रत जाण्यासाठी मात्र आपली कुवत नाही, या वस्तुस्थितीची त्यांना जाणीव झाली. संतांचे सांगणे की, भगवंत सर्व काही जाणतो, तो दीनांचा कैवारी आहे, हे त्यांच्या अंतःकरणात ठामपणे रुजले होते. म्हणून आपल्या उपास्यापुढेच मनातली अगतिकता मग त्यांनी काहीही न लपविता व्यक्त केली... उपास्याच्या चरणांपाशी त्यांनी ‘विज्ञापना’ सादर केली. 
 आयुष्यात ज्या विषयाचा दूरान्वयानेही संबंध आलेला नाही, त्याविषयी अनभिज्ञ असणे स्वाभाविकच असते. जेव्हा एखाद्या गोष्टीचा ध्यास लागतो, तेव्हा ही अनभिज्ञता मनात वैषम्यता निर्माण करते. ती माणसाला दीन बनवते, हे व्यवहारातही आपल्याला पाहावयास मिळते. तुकोबाराय भगवंतापुढे आपली विज्ञापना सादर करताना, ज्यायोगे त्याची प्राप्ती संभवते, ती भक्ती म्हणजे काय, ती कशी करतात, तिची लक्षणे कोणती, याविषयी आपण काहीच जाणत नाही, असे सांगतात आणि ‘स्वतःचे तोंडही धुवू न शकणार्‍या बालका’ सारखे आपण अजाण आहोत, असे निवेदन करतात. अशा अजाण बालकासाठी त्याची आई हीच तारक असते. तिच्या ठायी त्या बालकाचा अनन्य भाव अविचल असतो. तुकोबारायांच्या अंतःकरणात ‘भगवंत हाच एकमेव तारक’ असल्याचा दृढ भाव आहे. भगवंताला विनवीत ते जी मागणी करतात, ती सकल जनांसाठी प्रातिनिधिक स्वरूपाची अशी आणि सकलांना श्रेयस्कर ठरणारी आहे. ‘परि चिंतने काळ सारीं’ या चरणखंडातून दोन अर्थांची व्याप्ती दिसून येते. कोणत्याही कार्यात साधन आणि साध्य अंतर्भूत असते. व्यवहारात दिसते की, हे दोन्हीही बदलणारे असतात. शिक्षण हे साधन तर धन हे साध्य असते. शिक्षण संपले की, धन हे साधन बनते, अन् प्रापंचिक सुखासाठी विविध बाबींची प्राप्ती, हे साध्य बनते. परमार्थात यथार्थ अनुभूती आलेल्या साधकास उपास्याच्या कृपेने अलौकिक अशी मागणी मागता येते की, ज्यायोगे साधन हेच साध्य बनते. (बीज आणि फळ हरिचे नाम ।) अजाण असलेले तुकोबाराय भगवंताला निवेदन करतात की, ते भक्ती जाणत नाहीत, पण क्षण-क्षण त्याच्याच ध्यासात, त्याच्याच चिंतनात ते व्यतित करीत आहेत. अन्य प्रकारे या चरणखंडाचे चिंतन करताना जाणवते की, भगवंताला शरण गेलेला साधक कर्तृत्व कधीच आपल्याकडे घेत नाही. भगवंतच कर्ता-करविता असतो, जे काही घडते, ते भगवंताच्या इच्छेने ही भावना त्याच्या अंतःकरणात रुजलेली असते. तुकोबाराय येथे त्याच भावनेतून विनवित आहेत की, त्यांच्या आयुष्याचा क्षण नि क्षण भगवंताने त्याच्याच चिंतनासाठी ते कारणी लावावा, असे कृपादान भगवंताने त्यांना द्यावे. 
 मायाधिष्ठित संसारात अडकलेल्या माणसाच्या मनाला प्रपंचाच्या नाना विषयांनी अगदी वेड लावलेले असते. जागतेपणी तसेच झोपेतही ते विषय त्याचा पिच्छा सोडीत नाहीत. या विषयांचा संग करणे, म्हणजे आयुष्याचा अपव्यय ठरणारा आहे, हे तुकोबारायांना पटलेले आहे. म्हणूनच ते अशा विषयसंगाला ‘पिसे’ म्हणतात. संसाराला विटलेल्या, संसारावर रुसलेल्या तुकोबारायांना आता विठ्ठलाशिवाय अन्य विषय नको आहे. लौकिक विषयांसाठी आयुष्य वेचणे, हे अंधारातले चाचपडणे ठरणारे आहे. ‘डोळे असून आंधळा’ अशी संसारी माणसाची गत झालेली असते. आयुष्याचे यथार्थ सार्थक साधण्यासाठी त्याची बुद्धी काम करीत नाही. चकवा लागलेल्या माणसाप्रमाणे त्याची स्थिती झालेली असते. ज्याप्रमाणे प्रकाश दिसला की तो माणूस चकव्यातून बाहेर येऊ शकतो, तद्वत् तुकोबारायांना विठ्ठलरूपात प्रकाश दिसला आहे. परंतु, तुकोबारायांची गत अशी झाली आहे की, प्रकाश दिसत असला तरी कुठे आणि कसे जावे, हे उमगत नाही. अनेक साधनांचे प्रलोभन समोर आहे. अनेक मार्ग दिसताहेत्. अशा वेळी तुकोबारायांना ‘सुजाण’ विठ्ठल हाच एकमेव मार्गदर्शक वाटतो. त्याने आपला हात धरून, प्रसादरूपाने ज्ञान देऊन, आपल्याला योग्य त्या मार्गाने, सुरक्षित चालवावे, असे तुकोबारायांचे विनवणे आहे (आतां होईं माझें बुद्धीचा जनिता ।). 
 मूलतः आत्मा सुखरूप आहे. तो जेव्हा मायेने ग्रासला जातो, तेव्हा अज्ञानी होऊन जीवदशा पावतो. जीव सुखलोलुप असणे, हे स्वाभाविक असते खरे, परंतु जीवाला भ्रामक सुखाची चटक लागलेली असते. भौतिक विषयात तो सुखाची अनुभूती घेण्याचा खटाटोप करीत राहतो. त्यासाठी ‘काया’ हे त्याचे साधन बनलेले असते. कायेसह अस्तित्वात असलेल्या जीवाच्या ठायी देहभाव रुजलेला असतो, जो विकृत अहंकारापोटी निर्माण होत असतो. सुखाची हाव नि दुःखाचा तिरस्कार, हा जीवाचा स्थायी भाव बनलेला असतो. त्यापोटीच माणूस नाना प्रकारचे छंद जोपासतो. तुकोबारायांनी भगवंताला प्रथम विनवले आहे की, ‘माझा जीवभाव जोपासणारे नि आयुष्याचे मातेरे करणारे छंद आता मला लागू देऊ नकोस्.’ त्यासाठी प्रथम देहभाव संपणे जरूरीचे आहे, हे जाणून तुकोबाराय काया अन् जीवभाव दोन्हीही भगवंताला समर्पित करतात. अहंभावाचा पूर्ण त्याग त्यांनी केला आहे. राहिलेले आयुष्य त्यांनी भगवंताच्या हवाली केले आहे. आता जे सुख-दुःख देणारे प्रसंग येतील, ती सारी द्वंद्वे भगवंताची होणारी आहेत. त्तुकोबाराय भगवंताला विनवीत आहेत की, आता त्यानेच त्याच्या कृपेची सावली करून सम (सुखदायी) अन् विषम (क्लेषदायी) अशा प्रसंगी (- डाया) सांभाळ करावा.
 अवघड वाटणार्‍या प्रसंगात जो सहजतेने मार्ग काढतो, तो चतुर. भगवंताच्या लोकविलक्षण चातुर्याच्या कथा पुराणातून जागोजागी लिहिल्या गेल्या आहेत. कीर्तन-प्रवचनातून त्या प्रसंगांचे रसभरित वर्णन केले जाते. तुकोबाराय भगवंताची स्तुती करताना त्याला ‘चतुरांचा राव (- राजा)’ असे संबोधतात. चातुर्याला जाणतेपणाची जोड असणे म्हणजे दुधात साखर! ते चाणाक्षपणाचे लक्षण असते. म्हणून ‘त वरून ताकभात’ ओळखणारा कौतुकास पात्र होतो. दुसरा भाग असा की, अजाण बालकाच्या व्यथा त्याची माताच जाणू शकते. जीव हा भगवंताचाच अंश असल्याने भगवंत हा ‘जीवांचा जीव’ असल्याचे सिद्ध होते. तुकोबाराय आपले निवेदन भगवंतापुढे मांडताना या दोन्ही अंगांनी विचार करतात. ‘कुठे इंद्राचा ऐरावत अन् कुठे शामभटाची तट्टाणी’ अशी तुलना तुकोबारायांच्या मनात येते. भगवंताचे थोरपण अतुलनीय असले तरी  ‘अडाणी, पोरकट’ वाटणारी त्यांची मागणी भगवंताने डावलू नये, असे तुकोबारायांना वाटते.
 अकारण करुणावलय असणारा भगवंत भक्तवांछाकल्पतरु असल्याचे म्हटले जाते. शिवाय संत वचन असेही आहे की, ‘न सांगता तुम्हां कळों ये अंतर ।’ संतवचनांवर भरवसा ठेवून तुकोबाराय आपला भाव देवापुढे व्यक्त करतात. ज्या शब्दात तुकोबारायांनी त्यांचा आरुष भाव व्यक्त केला आहे, ते शब्दही ‘आरुष (आर्ष), वेडेवाकडे बोल’ असल्याची भावना त्यांच्या अंतःकरणात आहे. असे असले तरी भगवंत, जो जीवांचा जीव आहे, तो भाव जाणणारा आहे, खरे-वायफळ जाणणारा आहे. आपल्या निवेदनामागील भाव भगवंत जाणेल आणि त्याचे काय ते मोल ठरवेल, असे म्हणून निर्णय ते भगवंतावर सोपवितात. आपले निवेदन स्वीकारायचे का नाही, याचा निर्णय भगवंताने करावा, असे शेवटी तुकोबाराय भगवंताकडे अपेक्षा व्यक्त करतात.
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)