अक्षांश तुझा आणि रेखांश माझा

साचलेलं मनाच्या तळागाळात,
सारं गोठलेलं प्रवाहीत होताना,
किनाऱ्यावर बांधलेलं माझं घरटं,
डोळ्यात दाटतं कधीतरी.

नव्याने जगावयास जाताना,
उगीचच पोकळी जाणवते,
क्षणभर आयुष्यातले रकाने.
तुझ्या आठवांनी भरतात कधीतरी.

माझं पुर्णविराम देत जाणं
आणि तुझं त्याला पुसत जाणं,
तुझ्यामाझ्या अर्थहीन वाक्यांचे,
आता उतारे छळतात कधीतरी.

प्राजक्त सायलीची कोमलता,
हुरहुरणाऱ्या सायलीची मादकता,
ओघळणाऱ्या अश्रूंच्या थेंबात,
हरलेले डाव रंगतात कधीतरी.

जगण्याचा आलेख काढताना,
अक्षांश तुझा आणि रेखांश माझा,
आणि मांडलेल्या सुखाचे अचानक,
आकार मोडतात कधीतरी.