वयं मोठं छोटं ----

     "घाबरू नका,हाणा बुक्की" एका लग्नाच्या मांडवात एक पंचाहत्तरी गाठू पहाणाऱ्या म्हाताऱ्याने या वयातही आपल्या अंगात कशी रग आहे हे दाखवण्यासाठी पु.ल.देशपांडे यांच्याशी केलेल्या शाब्दिक व शारीरिक झटापटीचे त्यांनीच केलेल्या विनोदी वर्णनातील हे वाक्य. त्यात तो म्हातारा आपल्या दंडातील बेटकुळी अभिमानाने दाखवून आपण या वयातही कसे जवानाहून जवान आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्या बेटकुळीवर बुक्की मारून त्याची प्रचीती घेण्याचे आवाहन पु.लं.ना करत होता अर्थात त्यावेळी पु.ल.म्हातारे झालेले नव्हते.
         असे म्हातारे सुदैवाने आम्हाला तरुण वयात भेटले नव्हते.आणि आम्ही त्या वयातच काय पण तरुणपणी पण आपल्या दंडाच्या (अगदी तुरळक असल्यास) बेटकुळ्या दाखवून त्यावर बुक्क्या मारण्याचा आग्रह केल्याचे आठवत नाही. .याची आठवण होण्याचे कारण म्हणजे राहुल गांधी यांनी आपले सरकार तरुणांचे असेल असा केलेला निर्धार.अर्थात तरुणपणाची व्याख्या त्यांनी केलेली नाही.नाहीतर असा एकादा म्हातारा दंडाच्या बेटकुळीवर बुक्की मारण्याचा आग्रह करून त्यांची फिरकी घ्यायचा व तरुणपणाची व्याख्या करणे त्यांना अशक्य करून टाकायचा.
      काहीसा तसाच प्रकार माधवराव रानडे यांच्या विठूकाकांच्या बाबतीत झालेला वाचण्यात आणि रमाबाई रानडे यांच्यावरील मालिकेत पहाण्यात आहे.त्यांच्या ऑफिसातील गोऱ्या साहेबाने वय झाले म्हणुन काही लोकांना सेवानिवृत्त व्हावयास लावले त्यावर त्यानी साहेबाच्या समोर त्याला न उचलणारे वजन उचलून दाखवून वय झाले तरी आपली शक्ती कमी झाली नाही हे दाखवून सेवानिवृत्तीचा हुकूम मागे घ्यायला लावला.कॉंग्रेसचे निष्ठावंत सेवकही असेच चमत्कार करून राहुल गांधींना तरुणपणाची व्याख्या बदलायला लावतील यात शंकाच नाही.
        पु.लंच्या तरुणपणी म्हातारे लोक कमीच भेटायचे,कारण त्यावेळी वयोमर्यादा जरा कमीच होती त्यामुळे शतायुषी माणसे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी पण नसायची.त्यामुळॅ त्यांच्याविषयी सर्वांनाच कौतुक !.आमच्याच गावात रामू अण्णा किर्लोस्कर हे शतायुषी होते.ते लक्ष्मणराव किर्लोस्करांचे भाऊ  आपल्या एका विशिष्ट जीवनशैलीमुळे आपण शतायुषी होऊ शकलो असे रामूअण्णांना वाटत असे त्यामुळे ते १०१ वर्षाचे झाल्यावर त्याना भेटायला दुसरे शतायुषी धोंडो केशव कर्वे म्हणजे दुसरे अण्णाच आले त्यावेळी  त्यांचा झालेला संवाद केवळ दीर्गायुष्य या विषयावरच मर्यादित होता असे दिसते. कदाचित अण्णासाहेब कर्व्यांचे कार्य यावरही काही बोलणे झालेच असेल पण रामूअण्नांचा आवडता विषय दीर्घायुष्य व आरोग्य असल्यामुळे त्यां चा अण्णासाहेबांशी झालेला संवाद असा,
रा. आ."आपण नियमित व्यायाम करत असाल"
अण्णासाहेब : "छे छे माझ्या दिवसाच्या कामातून फुरसत कोठे मिळते? "
रा. आ. आपण चहा पीत नसाल
अण्णाः अगदी तसेच काही नाही, कोणी देत असेल तर मी नाही म्हणत नाही
रा. आ. मग आपण अगदी वेळेवर व नियमित पथ्यपाणी. आहार  घेत असाल.
अण्णा : तसे काही नाही माझ्या कामातून फुरसत मिळेल तेव्हां आणि जे मिळेल ते खातो.
अशा स्वरूपाच्या संवादातून अण्णासाहेबांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय हे रामू अण्णांना काही समजेना.   दीर्घायुष्याचे रहस्य नियमित व्यायाम,वेळेवर व योग्य आहार आरोग्यदायक संवयी असे असणार या समजुतीने त्याना विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे अपेक्षीत उत्तर न मिळाल्यामुळे रामूअण्णा आश्चर्यचकित झाले.कारण अण्णासाहेब कर्वे कामाच्या रगाड्यात अगदी वेळी अवेळी जेवण,व्यायाम वा योगासने कधीच न करणे चहा वगैरे न टाळणे इ.रामूअण्णांना अपेक्षित नसलेल्या दिनक्रमात राहूनही शतायुषी झाले होते. त्यामुळे त्यांच्या कामाच्या दिनक्रमात त्याना सारखे चालावे लागत होते हेच काय ते कारण त्यांच्या दीर्घायुषाचे रहस्य मानता येईल असे म्हणून रामूअण्णांनी मग तसेच स्वत:चे समाधान करून घेतले.
     आता आम्हीच म्हातारे झाल्यावर आमच्यापेक्षाही म्हातारे आम्हाला भेटू लागले आहेत व आपले वय सांगून आम्हास आश्चर्यचकित करू लागले आहेत. अमेरिकेत जमलेले आमच्यासारखेच अनेक तरुण म्हातारे होते.स्वत:स वय झाले या सदरात टाकणारा मी त्यांना पाहून अजून आपण लहानच आहोत असे वाटून घेऊ लागलो.
        सध्यातरी आमच्यातील बहुतेक म्हातारे एकमेकास भेटल्यावर आपल्या बेडकुळ्या न दाखवता आपलया सांधेदुखीचे,रक्तदाबाचे अथवा मधुमेहाचे वर्णन करून एकमेकाचे मनोरंजन करत असतात.